Monday, November 19, 2012

p.p. Sri Vasudevanandswami Maharaj Charitra sar

        श्री प.प.वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) महाराज चरित्रामृत

 _________________________________________________________

                      अनुक्रमणिका

अध्याय               विषय                                    पृष्ठ संख्या

________           ___________________________________    ________

                                               माणगावी  जन्म आणि नामकरण

                                               बालपण आणि शिक्षण

                                               वासुदेवाचा विवाह

                                               गोव्यास गमन आणि माणगावी पुनरपी आगमन

                                               नरसोबाच्या वाडीस प्रस्थान

                                               महाराजाना श्री नृसिंह सरस्वती स्वामींचे दर्शन

                                               माणगावी आगमन आणि वास्तव्य

                                               माणगावात दत्तमूर्तीची स्थापना

                                               शास्त्रीबुवाना गृहस्थाश्रमास सुरवात करण्याची देवांची आज्ञा

१०                                           अन्नपूर्णा बाईंचे देहावसान आणि बुवांचे सन्यास ग्रहण

११                                           धर्मोद्धार आणि संपूर्ण भारत प्रवास

१२                                           प.प.श्री महाराजांची साहित्य रचना

श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान पिठापुराम येथील प्रबोधिनी संमेलन

प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी) महाराज प्रबोधिनीचे दुसरे वार्षिक संमेलन आंध्र प्रदेशातील पिथापुराम या क्षेत्री दिनांक २७ आणि २८ नोव्हेंबर रोजी संपन्न होणार असल्याची शुभ वार्ता प.पु. सदगुरु श्री हरिभाऊ निटूरकर महाराज यांच्याकडून कळली. तेंव्हा पासून या संमेलनास जाण्याचा आणि थोर गुरुजन, महात्मे आणि विद्वानांच्य  सत्संगाचा मनी ध्यासच लागला होता. गुरुकृपेने आणि ईश्वरी इच्छेने हा योग जुळून आला. आम्ही दिनांक २५ नोव्हेंबरच्या सायंकाळी गाडीने पिठापुरामला जाण्यास निघालो.स्वत: श्री महाराज आमच्या बरोबर असल्याने या प्रवासास एका सत्संगाचे स्वरूप प्राप्त झाले होते.प.पु. स्वामी महारांजांच्या जीवनातील अनेक दिव्य लीला प्रसंग त्यांचे त्याचे आचार संपन्न जीवन आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व तसेच विशाल साहित्य रचना यावर श्री भाऊ महाराज अत्यंत आत्मीयतेने बोलत होते. आम्ही ते एकचित्ताने ऐकत होतो. ते ऐकताना रात्रीचे बारा केंव्हा वाजले ते कळालेच नाही.  महाराजांनी सर्वाना आता झोपा असे सांगितले आणि आम्ही आप आपल्या जागी आलो.गाडी वेगाने धावत होती.नोव्हेंबर नोवेम्बर महिन्याच्या सुखद थंडीने सर्वजण लवकरच निद्राधीन झाले, परंतु मला मात्र झोप येत नव्हती. कालच वाचून संपविलेल्या प.प.श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या ( प.पु.श्री दत्त महाराज कविश्वर लिखित ) चरित्रातील एक एक प्रसंग डोळ्या समोर येऊ लागला.

१.     माणगावी जन्म आणि बालपण

सावंतवाडी संस्थानातील एक लहानसे गाव- माणगाव, शहराच्या घाई-गर्दी पासून दूर, निसर्ग सौन्दर्याच्या कुशीत विसावलेले.येथील जन-सामान्यांचा शेती हाच मुख्य व्यवसाय होता. ब्राम्हण वर्ग मात्र आपले विहित कर्म- यजनयाजन, याजन, अध्ययन, अध्यापन आणि दान याचे पालन करून पौरहित्याचा व्यवसाय करीत असे.याच गावी श्री हरीभट  टेंबे नावाचे एक विद्वान, सच्छील, आचार संपन्न ब्राम्हण रहात  होते.हेच आपल्या प.प.श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे आजोबा.हरी भटजीना चार मुले आणि दोन मुली होत्या.सर्वात ज्येष्ठ पुत्र श्री गणेश भटजी, मोठे दत्तभक्त होते.ते वारंवार गाणगापुरी जावून श्री दत्तात्रेयांची सेवा करीत.एकदा ते गाणगापुरी बारा वर्षे श्री दत्तप्रभूंची सेवा करीत राहिले.त्यावेळी श्री दत्तात्रेयांनी प्रसन्न होऊन सांगितले   आता आपण घरी जाउन रहा, या उपरी गाणगापुरी येण्याचे कारण नाही. श्री दत्तात्रेयांच्या आदेशांनुसार श्री गणेश भटजी माणगावी येवून आपल्या माता,पिता आणि कुटुंबासह आनंदात राहिले.गणेश भटजीच्या पत्नी सौ. रमाबाई अत्यंत सात्विक, पतिपरायण,आणि धर्मनिष्ठ होत्या.त्यांचा आघिक वेळ पूजा, अर्चा, व्रत, वैकल्ये या मध्ये जात असे.अतिथी सत्कार, सासू, सासऱ्यांची सेवा, औदुम्बरास प्रदिक्षणा, यक्षिणीची नित्य सेवा हे करण्यात त्या माउलीला धन्यता वाटत असे.अशा या आचार संपन्न  दाम्पत्य जीवनात श्री दत्तप्रभूंच्या कृपेने रामाबाईना पुत्र प्राप्तीची लक्षणे दिसू लागली.या बातमीने आजोबा हरी भटजी आणि त्यांच्या धर्मपत्नीस अत्यंत आनंद झाला.ते आपल्या नातवाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहू लागले.नउ मासांचे अंती, शके १७७६, आनंद नाम सवत्सरी श्रावण मासी कृष्ण पंचमीस रविवारी सूर्योदयापूर्वी दोन घटिका या शुभ मुहूर्तावर एका दिव्य बालकाने जन्म घेतला.बालकाचा जन्म होऊन तो रडू लागताच अंगणातील आंब्याच्या झाडावरील कोकिळा आनंदाने गाऊ लागल्या.चिमण्यांनी आपल्या चीव-चीवाटांनी नवशिशूचे स्वागत केले. प्रात:कालचा शीतल मंद वारा मोगरा,चमेली,पारिजात या फुलांचा मिश्रित सुवास घेऊन खिडकीतून हळुवारपणे आत प्रविष्ट झाला आणि शिशुस सुखऊ लागला.याच वेळी यक्षिणीच्या मंदिरातील मधुर घंटानाद ऐकू येऊ लागला.गणेश भटजी देवघरात श्री दत्तप्रभुंच्या मूर्तीसमोर बसून दत्तात्रेय स्तोत्राचा पाठ करीत होते. हरी भटजीना मात्र कृतार्थ पितरो तेज धन्यो देश:कुलंच| जायते योगवान यत्र दत्तम क्षयान्तम व्रजेत|| हे सुभाषित सारखे आठवत होते. त्यांचे मन सारखी ग्वाही देत होते की हा नवबालक एक महान व्यक्ती होणार. याच्या जन्माने आपले संपूर्ण कुळ धन्य होणार.या गावी जन्म झाल्याने हे माणगाव धन्य होणार. ज्या देशात हे गाव आहे तो देश धन्य होणार.या विचारात हरीभट किती वेळ मग्न होते ते कळलेच नाही.नातवाच्या जन्माची साखर ज्यावेळी त्यांच्या पत्नीने त्यांच्या हातावर ठेवली त्यावेळी ते योगनिद्रेतून जागे झाल्या प्रमाणे  उठले, उत्तरीयाने त्यांनी आपल्या नेत्रातील आनंदाश्रू टिपले आणि साखर तोंडात घातली.

नातवाच्या जन्माने आजी, आजोबाना अत्यंत कृत-कृत्य झाल्या प्रमाणे वाटत होते.बालक दिवस मासाने वाढू लागला.एका शुभ मुहूर्तावर त्याचे नाव ठेवण्यात आले. आजोबांच्या आवडीचे वासुदेव हे नाव ठेवले. नातवाच्या संगोपनात आणि त्याच्या बाल लीला पाहण्यात आजी-आजोबांचा वेळ कसा जाई ते कळत नसे. गणेश भटजीना तर वासुदेवाच्या रूपात आपले इष्ट दैवत श्री दत्रात्रेयचं दिसत असे.

२.     बालपण आणि शिक्षण

वासुदेव आता एक वर्षाचा झाला होता.घरभर रांगणारा शिशु भिंतीला धरून चालू लागला आणि एक महिन्यातच स्वतंत्रपणे पाउले टाकू लागला. त्याचे ते चालणे पाहून रमाबाईना प्रेमाचे भरते येई. त्याचे बोबडे बोल ऐकण्यात आजी आजोबा रंगून जात. वासुदेवाच्या रुपात त्याना श्री कृष्णाचे दर्शन झाल्यासारखे वाटे.  हा बालक लहानपणापासूनच अत्यंत प्रखर बुद्धिमत्तेचा होता. तीन वर्षाचा होताच तो तेथील एका खाजगी शाळेत जाऊ लागला.त्यावेळी आतासारख्या पाटी, पेन्सिली नव्हत्या.लाकडाच्या फळीवर धूळ पसरून त्यावर बोटाने अथवा काडीने अक्षरे काढावी लागत त्यामुळे मुलांची बोटे अगदी गळून जात. यक्षिणीच्या मंदिरात असलेल्या या शाळेतच वासुदेवास अक्षर ओळख झाली.त्यास व्युत्पन्न आजोबांचे सानिध्य लाभल्याने त्याची अभ्यासातील प्रगती फारच झपाट्याने झाली.तीव्र बुद्धीमत्तेच्या वासुदेवास कोणाचेही स्तोत्र, कविता आदी पाठ होण्यास फारसा वेळ लागत नसे. आजोबांनी त्याला हळू हळू रुपावली,समासचक्र, अमरकोश, नित्यस्तोत्र पाठ या सारखे उपग्रंथ शिकविले. वयाच्या आठव्या वर्षी आजोबांनी आपल्या आवडत्या नातवाची मुंज केली. वृत्तबंधनाच्या या दिव्य संस्कारांनंतर वासुदेव नित्य प्रात:संध्या, सायंसंध्या, श्री गुरुचरित्र वाचन ही हि नित्य कर्मे आवडीने न चुकता करू लागला.वेदांचे अध्ययन करण्यासाठी तो घर जवळच राहणार्या वेदमूर्ती श्री विष्णूभट तात्या उकिडवे यांच्या घरी जाऊ लागला. आपल्या प्रेमळ आजोबांचे सानिध्य वासुदेवास फार काळ लाभले नाही. मुंजी नंतर केवळ दोन वर्षातच हरीभटजीना देवाज्ञा झाली. त्यावेळी वासुदेवाचे पिता गणेशभट गाणगापूरला होते त्यामुळे पित्याचे सारे क्रियाकर्म धाकटे बंधू बाळकृष्ण यांनीच केले.घरातील सर्वात मोठे  कर्ते पुरुष गेल्यामुळे वासुदेवाचा मोठा आधार गेला. परंतु त्याने आपले वेदाध्ययन वेदमुर्ती तात्या भटजी उकिडवे आणि वेदमुर्ती भास्कर ओळकर यांच्याकडे चालूच ठेवले.वासुदेव, कोनकर यांचे घरी नित्य भोजनास जात असे.त्यावेळी तो स्वत: सोवळ्यात भात  शिजवून नैवेद्य  वैश्यदेव करून नंतरच भोजन करीत असे.  आचार: प्रथमो धर्म:  या वचनाचा  मूर्तिमंत पुतळा म्हणजे वासुदेव होता.लहानपणापासून कर्म मार्गाचे यथाविधी पालन करीत असल्याने वासुदेवाचे ब्रम्ह्तेज वाढले होते.त्याला तीन-चार संथे मध्येच सर्व पाठ होत असे.वासुदेवाचे वेदाध्ययन नित्य सोवळ्यात शुद्रादिकापासून  दूर राहून होत असल्याने वेद मंत्रांची शक्ती सिद्धी बालवयातच प्राप्त झाली.गुरुजींच्या मुखातून मंत्र नुसते श्रवण करून ते शिष्याने पाठ करावयाचे असा वासुदेवाचा अभ्यास  अत्यंत निष्ठेने चालला होता.वासुदेवाने वेदाध्ययन संपवून  याज्ञिकीचा अभ्यास सुद्धा पूर्ण केला. माणगावचे वेदमूर्ती शंभू शास्त्री साधले यांच्याकडे वासुदेवाने संस्कृतचा आणि ज्योतिष्याचा थोडा अभ्यास केला. आजोबांचे देहावसान झाल्यानंतर ग्रहप्रपंच चालविण्यासाठी वासुदेवास यजमानांच्या घरी पौरोहित्य करण्यासाठी जावे लागे.त्यांचे कर्म यथासांग करून देवून, घरी येवून नैवेद्य,वैश्वदेव करून जेवावे असा त्याचा परिपाठ होता.त्याने परान्न  कधीही घेतले नाही.  सर्वथा स्वहीतमा चरणीयम  ही वृत्ती ठेऊन नेहमी सतकर्मात  काळ घालवयाचा, धरलेला नियम प्राणापलीकडे जपावयाचा, असत्यअसत्या कधी बोलावयाचे नाही, त्रिकाळ संध्या करावयाची असा त्यांचा नियम होता.माते बद्दल त्यांचे मनात नितांत आदरभाव होता.अशा प्रकारे अंतर-बाह्य अत्यंत नियम बद्ध आचरण आणि उत्तम,मुखोद्गत, तेजस्वी अध्ययन या गुणामुळे माणगावातील लोकांची वासुदेवावर धृढ श्रद्धा बसली होती. त्यामुळे ते कोणत्याही कारणाने त्याना घरी बोलावून यथाशक्ती संभावना करीत. वासुदेवाच्या मदतीनेच गणेश भटजीने  दोन मुलींची विवाह  आणि धाकटा मुलगा सीताराम याची मुंज सुद्धा केली.

                           ३.वासुदेवाचा विवाह

                            ______________

वासुदेवाचे अध्ययन पूर्ण झाले होते. आता त्याच्या मातेस वासुदेवाने विवाहबद्ध  होऊन गृहस्थाश्रमात पदार्पण करावे असे वाटू लागले होते. विवाहाचा योग लवकरच जुळून आला.नाना कोनकर यांनी मध्यस्थी करून रागणागड  येथील हवालदार बाबाजी गोडे यांची कन्या वासुदेवाकरीता ठरवून टाकली.ही मुलगी सुस्वरूप नसून पायाने सुद्धा अधू होती. ती वासुदेवास न दाखविता नाना कोनकर, उकिडवे आणि ओळकर यांनी हे लग्न ठरविले. त्यांनी सर्वाना सांगितले की मुलास मुलगी पसंत आहे.वासुदेवाच्या आईस  वाटले की आपल्या मुलाने आपणास न विचारता लग्नास होकार कसा दिला?  वासुदेवाने ज्यावेळी सत्य परिस्थिती सांगितली त्यावेळी तिच्या मनातील  किंतु दूर झाला.ऐनवेळी वासुदेवाने आपणास लग्न करावयाचे नाही असे सांगितले. त्यावेळी  दोन्ही गुरुवर्यांनी- उकिडवे आणि ओळकर यांनी आमच्या शब्दास मान देण्याकरिता तरी हे लग्न केले पाहिजे असे सांगून वासुदेवास धर्मसंकटात टाकले.वासुदेव नाईलाजाने केवळ गुरुजनांची आज्ञा पालनासाठी लग्नास तयार झाला आणि हा विवाह संपन्न झाला.यावेळी वासुदेवाचे वय एकवीस वर्षे होते. लग्नानंतर लगेच वासुदेवाने स्मार्ताग्नीची उपासना चालू करून गायत्री मंत्राचे एक पुरश्चरणही  केले.

३.     गोव्यास गमन आणि माणगावी पुनरपी आगमन

 माणगावात प्रपंचास लागणारी आर्थिक मदत अपुरी पडत असल्याने वासुदेवाने गोवा प्रांतात जाण्याचे ठरविले. गोव्यास गेल्यावर त्यांच्या बरोबर असलेल्या गृहस्थाने तेथील एका श्रीमंत व्यक्तीबरोबर वासुदेवाची ओळख करून दिली.तीव्र बुद्धीमत्ता आणि  ज्योतिष्य शास्त्रातील ज्ञान अजमावून त्या श्रीमंत गृहस्थाने वासुदेवाची उत्तम प्रकारे संभावना करून गोव्याचे नामवंत ज्योतिषी नीलमभट पद्ये यांच्याकडे या विद्येचा सखोल अभ्यास करण्यासाठी पाठविले. येथे वासुदेवाने अंदाजे सहा महिने अध्ययन केले.आपल्या प्रखर बुद्धिमत्तेने,सदाचारपूर्ण आचरणाने आणि अत्यंत नम्र स्वभावाने पद्ये गुरुजींचे वासुदेवावर अत्यंत प्रेम जडले.परंतु याच काळात वासुदेवाचे पिताश्री श्री गणेश भट आजारी असल्याचे पत्र आल्याने वासुदेवास माणगावि परत यावे लागले.गणेश भटजींचे हे दुखणे अखेरचेच ठरले. यातच त्याना देवाज्ञा झाली. वासुदेव ज्येष्ठ पुत्र असल्याने त्यानेच सारे क्रिया-कर्म केले. यानंतर त्याचे गोव्यास जाणे झालेच नाही.अत्यंत सदाचार संपन्न जीवन, आचार संहितेचे काटेकोरपणे पालनआणि प्रखर बुद्धिमत्ता यामुळे वासुदेवाच्या मुखावर एक आगळेच विद्येचे तेज दिसून येत असे. आता त्याना सर्वजण आदराने वासुदेव शास्त्री असे संबोधन करू लागले. त्यांच्या पत्नीचे नाव अन्नपूर्णा  असे ठेवले होते. घरात सासू-सुनेचे कधीच जमले नाही.त्यांचातील खडाष्टकाने शास्त्रीबुवांचे जीवन मात्र अत्यंत क्लेशकारक झाले होते.घरातील  या वातावरणास कंटाळून त्याना अनेक वेळा श्री नरसोबाच्या वाडीस जावून रहावे असे वाटे.परंतु मातेवरील श्रद्धाभावाने ते त्रास सहन करूनही माणगावीच राहिले.आपल्या पत्नीसाठी त्यांनी आपल्या आईस कधीही दुखविले नाही.पत्नीचा रोष मात्र त्यांना सहन करावा लागला.

काळ आपल्या गतीने चालला होता. माणगावात शास्त्रीबुवांची प्रसिद्धी खूप झाली होती.लोक आपल्या समस्या घेऊन येत आणि बुवा त्यांचे समाधान करून घरी पाठवीत.एकदा सावंतवाडीचे सबनीस यांचा मुलगा आजारी पडला.त्याची  जन्मपत्रिका पाहून   बुवांनी गोदान करण्याचा सल्ला दिला.सबनिसांनी बुवाना न कळतच त्यांचे  धाकटे बंधू सितारामपंत  याना   गाय दान दिली. ती गाय घरी  घेऊन येताच सितारामपंताना भयंकर ताप आला.तो कोणत्याच औषधाने कमी होईना.शास्त्रीबुवा त्याना भेटावयास गेले.त्यावेळी सीताराम पंतांनी गोदान घेतल्याची बातमी सांगितली. त्यावेळी बुवा रागाने आपल्या भावास म्हणाले मला न विचारता तू ती गाय दानात का घेतलीस? नंतर दुप्पट दक्षिणा देऊन ती गाय अन्य ब्राम्हणास दिली त्यावेळी पंतांचा ताप कमी झाला.माणगावातील एका गृहस्थाची संतती वाचत नव्हती तो शास्त्रीबुवांकडे आला आणि त्याने आपली दु:खद कहाणी सांगितली. बुवांनी पिशाच्याच्या पादुका करून देवामध्ये ठेवण्यास सांगितले.या नंतर त्याची संतती जगू लागली.

वासुदेव शास्त्री एकदा परगावी जात असताना मार्गात एक मोठा वाघ बसलेला दिसला. बुवा घाबरून झाडावर चढून बसले आणि तेथून ओरडू लागले.तो आवाज ऐकून एक धाडसी ब्राम्हण- आत्माराम जडवे  तेथे आले त्यांनी त्या वाघास हाकलून देवून बुवाना घरी पोहोचविले. परंतु  बुवांचा भीतीमुळे उत्पन्न झालेला कंप पुढे वाघरे काढल्यानंतरच नाहीसा झाला.कांही दिवसांनी देवांनी बुवाना सांगितले शास्त्री बुवा तुम्ही रात्री-अपरात्री रानातून हिंडत असता म्हणून आम्हीच वाघाचे रूप घेवून तुम्हाला भीती दाखविली.

४.     नरसोबाच्या वाडीस प्रस्थान                                                                                                                                                               

वासुदेव शास्त्रींची नरसोबाच्या वाडीस जाण्याची खूप दिवसापासून इच्छा होती.परंतु मातेकडून जाण्याची अनुज्ञा मिळणार नाही या विचाराने त्यांनी मातेला  या संबंधी विचारलेच नाही.एके दिवशी त्यांच्या स्वप्नात एक ब्राम्हण आला आणि म्हणाला बुवा तुम्ही नरसोबाच्या वाडीस जावे म्हणता मग जात का नाही? बुवा म्हणाले मातोश्रीकडून अनुज्ञा मिळणे कठीण आहे. तो ब्राम्हण म्हणाला तुम्ही तुमच्या आईना विचारून तर पहा त्या परवानगी देतील. दुसरे दिवशी सकाळीच बुवांनी रात्री पडलेले स्वप्न आईस सांगितले. तेंव्हा ती म्हणाली वासुदेवा तू नरसोबाच्या वाडीस अवश्य जा. मातेची अनुज्ञा मिळाल्याने शास्त्रीबुवा आनंदित झाले.ते जाणार असल्याचे ऐकून शेजारचे एक गृहस्थ बुवांबरोबर जाण्यास तयार झाले.ते दोघे सावंतवाडीस आले. त्यावेळी रामभाऊ सबनीस यांनी बुवाना अडीच रुपये दिले. ते म्हणाले शास्त्रीबुवा पूर्वी तुम्ही एक जन्म पत्रिका करून दिली होती त्याचे पैसे द्यावयाचे होते ते आता घ्या. स्वप्नात सांगितल्या प्रमाणे सर्व गोष्टी जुळून आल्याने बुवाना अत्यंत आनंद झाला.वाटेत सुद्धा  त्याना ठीक- ठिकाणी सोबत मिळत गेली.एके ठिकाणी त्यांचा मुक्काम असताना त्याना दृष्टांत झाला नरसोबाच्या वाडीस श्री गोविंद स्वामी नावाचे मोठे अधिकारी पुरुष आहेत त्यांचे दर्शन घ्यावे.  मजल दरमजल करीत शास्त्री बुवा वाडीस येवून पोहोचले.कित्येक दिवसांचा संकल्प पूर्ण झाल्याने त्याच्या मुखावर एक आगळेच समाधान झळकत होते.श्री दत्तपादुकांचे दर्शन घेवून ते श्री गोविंद स्वामींची चौकशी करीत होते तेव्हड्यात ब्रम्हानन्दाच्या मठातील माडीवरून स्वत: गोविंदस्वामी,  शास्त्री बुवांच्या अगदी समोर आले आणि चीरपरिचिता प्रमाणे विचारूविछ्रू लागले वासुदेव शास्त्री केव्ह्ना आलात? चला माडीवर. तेथे स्नान वगैरे उरकून घ्या.  प्रथम दर्शनीच श्री गोविंद स्वामींचे इतके आपुल्केचे बोलणे ऐकून शास्त्रीबुवा भारावूनच गेले.

वासुदेव शास्त्रींची नरसोबाच्या वाडीत प्रथम कोणाचीच ओळख नव्हती.बुवांचा साधा वेश, एक पंचां नेसलेला आणि एक अंगावर पांघरलेला पाहून वाडीच्या पुजाऱ्यांनी त्याना श्री दत्तप्रभूंच्या पादुकांवर पाणी घालू दिले नाही.बुवा पादुकांना नुसता नमस्कार करून वर येवू लागले. त्याच क्षणी दत्तप्रभुनी गोविंद स्वामीना सांगितले अरे गोविंदा पोथी वाचायचे सोडून मंडपात काय चालू आहे ते पहा.त्या बिचार्या लांबून आलेल्या ब्राम्हणाला, पुजारी पाणी घालू देत नाहीत. हे ऐकल्या बरोबरच गोविंद स्वामी तत्काळ उटून खाली आले.त्याच वेळी शास्त्री बुवा वर येत होते.त्यांनी बुवाना विचारले पादुकांवर पाणी घातले का? त्यावेळी बुवांनी झालेली घटना स्वामीना सांगितली. गोविंद स्वामिनी आपला दंड बुवांच्या हाती दिला आणि त्याना घेऊन मंडपात आले.नंतर शास्त्री बुवांनी पादुकांवर पाणी घातले. त्यावेळी गुरुकृपेची अगाध लीला अनुभवून त्याना अत्यंत समाधान वाटले.पुजारी मंडळींची शंका दूर झाली. यानंतर बुवा वाडीत एक महिना राहिले. प्रतिदिन कृष्णामाईचे स्नान करून पादुकांना पाणी घालावे, प्रदक्षिणा घालाव्या  असा त्यांचा नित्य नेम होता.

   वाडीस असताना बुवाना देवांचा दृष्टांत झाला मिरज गावी शंकर भटजी नावाचे सज्जन ग्रहस्थ आहेत त्यांच्याकडून गुरुचरीत्राची पोथी आणून सप्ताह करा. त्यानुसार बुवा मिराजेस गेले.परंतु त्या गृहस्थाने ग्रंथ न दिल्यामुळे वाडीस परत आले.  ग्रंथ मिळेल पुन्हा एकदा जावून या. असा प्रभूंचा पुन्हा आदेश झाला.त्यानुसार बुवा पुन्हा एकदा मिराजेस गेले आणि यावेळी पोथी घेवूनच आले. गुरुचरीत्राची पोथी मिळेपर्यंत बुवांनी अन्न ग्रहण केले नव्हते. यानंतर एके शुभदिनी  गुरुचरीत्राचा सप्ताह सुरु झाला.

            ६.शास्त्री बुवाना श्री नृसिंहसरस्वतींचे यांचे दर्शन

शास्त्री बुवा वाडीस पहिल्यांदाच आल्याने त्याना मंदिरातील सर्व नियम माहित नव्हते. रात्री शेजारती झाल्यावर खाली कोणी जावयाचे नाही असा नियम होता.तो बुवाना माहीत नव्हता.नव्हते.एके दिवशी ते कृष्णामाईवर हात पाय  धुण्यास गेले असताना सटाणा परत येण्यास उशीर झाला. तो पर्यंत शेजारती होऊन गेली होती. बुवा देव दर्शनासाठी  गेले असताना द्वार बंद झाले होते.नंतर प्रदक्षिणा करून जावे असा विचार करून ते दक्षिण दरवाज्या जवळ आले.तेथे त्याना एक भव्य तेज:पुंज संन्यासी दिसले. त्यांनी दरडावून विचारले शेजारती झाल्यानंतर इकडे यावयाचे नाही हा नियम तुला माहीत नाही का?त्यावेळी शास्त्री बुवांनी त्या दिव्य पुरुषाची क्षमा मागून नमस्कार केला आणि अत्यंत नम्र भावाने म्हटले महाराज मी येथे नवीन असल्याने मला हे नियम माहीत नव्हते.  नंतर बुवा गोविंदस्वामी कडे गेले. त्याना  ही घटना सांगितली .ती ऐकून स्वामी म्हणाले वासुदेवा ते भव्य दिव्य संन्यासी साक्षात श्री नृसिंह सरस्वती दत्त महाराजच होते. स्वामींचे वक्तव्य ऐकून बुवांच्या अंगी रोमांच उभे राहिले आणि त्यांच्या नेत्रातून दोन आनंदाचे आनंदाच्र अश्रू गालावर ओघळले.

                   ७.माणगावी आगमन आणि वास्तव्य

वासुदेव शास्त्री वाडीहून परत येईपर्यंत घराचे बांधकाम पूर्ण झाले होते.वास्तूवास्ती शांतीची सारी तयारी झाली होती.परंतु मुहूर्ताच्या वेळेपर्यंत अन्नपूर्णाबाईच  न आल्यामुळे बुवांचा विरस झाला.ते उद्वेगाने म्हणाले या घरात कोणी राहणार नाही.याची धर्मशाळा होईल. नंतर बुवांचे धाकटे बंधू सितारामपंत यांनी वास्तुशांती केली.या प्रसंगानंतर बुवांचे चित्त अत्यंत उद्विग्न झाले.त्यांनी पाप क्षालन करण्यासाठी चांद्रायण व्रत करण्याचे ठरविले. हे व्रत अत्यंत कठीण असते.आरंभी उपवास करून शुक्ल प्रतिपदेपासून रोज जेवताना एक एक घास वाढवीत जायचे. अशा प्रकारे पौर्णिमेस पंधरा घास जेवण होते.नंतर पुन्हा एक एक घास कमी करीत जावयाचे.असे अमावास्ये पर्यंत करून नंतर उपोषण करावयाचे. या प्रमाणे चांद्रायण व्रत केल्याने बुवा अत्यंत अशक्त झाले.त्याना चार पाउले सुद्धा चालणे कठीण झाले. तरी सुद्धा त्यांनी त्रिकाळ  स्नान, संध्या हा नित्यनेम  चालूच ठेवला. या अनुष्ठानानंतर बुवा आपल्या मातोश्री बरोबर नरसोबांच्यानारासोबांच्या वाडीस गेले.या वेळी बुवांचा मुक्काम वाडीस तीन-चार महिने होता.येथे असताना श्री गोविंद स्वामिनी बुवाना दत्तोपासना स्वीकारण्यास सांगितले. त्यावेळी शास्त्रीबुवा म्हणाले स्वामी मला अग्नी आणि सूर्य ही ब्राम्हणाची नित्य उपासना आहेच. निराळी काय करायची? परंतु आश्चर्याची गोष्ट अशी झाली की त्याच दिवशी रात्री वासुदेव शास्त्रीना स्वप्नात श्री दत्तात्रेयाकडून मंत्रोपदेश झाला.श्री गोविंद स्वामिनी हे सर्व जाणून आपण निजलेल्या जागेवरूनच विचारले शास्त्रीबुवा मंत्र मिळाला ना? आता याचे सर्वसर्व सांग विधान उद्या सांगू  ही श्री गोविंदस्वामींची सर्वज्ञता बुवांच्या अनेक वेळा अनुभवास आली होती.त्यामुळे त्यांची स्वामींवर नितांत श्रद्धा बसली होती.बुवा त्याना गुरु मानीत. दुसरे दिवशी गोविंद स्वामिनी बुवाना एक पोथी दिली. त्यात स्वप्नात देवांनी दिलेल्या मंत्राचे विधान होते.त्या प्रमाणे बुवांनी मंत्रजप सुरु केला. बुवाना आपण संन्यास घ्यावा असे सारखे वाटत होते परंतु देवांनी सांगितले तुला अजून सात वर्षे माणगावात राहावयाचे आहे. या आदेशां नुसार बुवा माणगावी येण्यास निघाले.मार्गातील कोल्हापूरच्या देवीचे दर्शन घेवून आणि एक दत्तमूर्ती घेवून माणगावी जावे असे त्याना वाटत होते.परंतु पैशाची कांही व्यवस्था न झाल्यामुळे तो विचार मनातच राहिला. देवीचे दर्शन घेऊन  कागल या भागातून  येताना बुवाना एक मुर्तीकाराचे दुकान दिसले. त्या दुकाना समोर उभे राहून ते त्या दुकानातील मूर्तीकडे पहात होते. तितक्यात मूर्तिकार दुकानातून बाहेर आला आणि शास्त्रीबुवाना म्हणाला आपणास कशी मूर्ती पाहिजे ते सांगा. मी करवून देईन पैशाची काळजी करू नका. बुवांनी  मूर्ती कशी घड्वावयाची ते त्या मुर्तीकारास सविस्तर सांगितले. ती मूर्ती घेऊन जाण्यासाठी बुवा आठ दिवस त्या गावी राहिले.मूर्तीकाराने तयार केलेली सात बोटे उंचीची द्विभुज, वराभयकर सिद्धासन घातलेली श्री दत्तात्रेयांची पितळी मूर्ती अत्यंत आदराने बुवाना दिली. बुवांनी आपणाजवळ असलेला एक रुपया त्या मुर्तीकारास दिला. त्याने तो मोठ्या  श्रद्धाभावाने घेतला. तो म्हणाला शास्त्रीबुवा, मला श्री दत्तात्रेयांची मूर्ती तुम्हास देण्याबद्दल दृष्टांत झाला होता आणि मी तुमच्या शोधातच होतो.

                     ८.माणगावात श्री दत्तमूर्तीची स्थापना

बुवा श्रीदत्तात्रेयांची मूर्ती घेऊन माणगावी आले. त्याना ती मूर्ती आपल्या घराच्या पश्चिमेस थोड्या अंतरावर असलेल्या जागेवर स्थापना करावी असे मनापासून वाटत होते. परंतु ती जागा दुसऱ्यांची होती. माणगावाजवळ एक वाडी होती. त्या वाडीचे मालक निवर्तल्यामुळे त्यांचा सारा  कारभार त्यांची पत्नीच पहात होती.एके दिवशी तिला स्वप्न पडले त्यात देवांनी तिला जमीन ब्राम्हणास दान दे असे सांगितले होते. ती रमाबाईंकडे येऊन या स्वप्नाचा अर्थ विचारूविछ्रू लागली. रमाबाई म्हणाल्या आमच्या घराच्या पश्चिमेस असलेली जमीन तू तो वासुदेवास दान दे. तो तेथे श्रीदत्त मंदिर बांधील.त्या स्त्रीने ती जागा मोठ्या आनंदाने शास्त्री बुवाना दान दिली.तसेच आसपास असलेली दोन-तीन खंडीची जमीन सुद्धा देवास दिली. या प्रमाणे न मागता केवळ ईश्वर इच्छेने जागा मिळाली आणि त्यावर लगेच मंदिराचे बांधकाम सुरु झाले. कोणी विटा दिल्या, कोणी दगड दिले, कोणी चुना दिला तर कोणी पैसे दिले. अशी चोहीकडून मदत आली. अवघ्या सात दिवसात मंदिराचे मुख्य बांधकाम पूर्ण झाले.देवांच्या आदेशां प्रमाणे मंदिरासमोर एक विहीर सुद्धा खणून उत्तम प्रकारे बांधून काढली.मंदिराचे मुख पूर्वेकडे होते.पुढे मोकळी पडवी मागे एक खोली आणि मधल्या भागात तीन,चार हात लांब-रुंद असे देवांचे गर्भगृह होते. मागच्या खोलीत स्मार्ताग्नि, स्वयपाकगृह होते. या मंदिर निर्माण कार्यात बुवांनी आपल्या हाताने विटा तयार केल्या होत्या. मंदिराचे काम पूर्ण झाल्यावर त्याठिकाणी शास्र्त्रीबुवांनी कागलहून आणलेल्या श्री दत्तात्रेयांच्या प्रसन्न मूर्तीची प्रतिष्ठापना शके १८०५, वैशाख शुद्ध पंचमीस झाली.शास्त्रीबुवांची मंदिरातील नित्य पूजा,अर्चा,नवैद्य, तसेच  कथा,कीर्तने, प्रवचने इत्यादी नियमितपणे  होत असलेल्या नियमित होणार्या कार्यक्रमामुळे  मंदिराची अगदी अल्पकाळातच भरभराट झाली.बुवा मात्र आपले जेवण मागून आणलेल्या कोरड्या भिक्षेचा स्वत: स्वयपाक करून करीत असत.मंदिरात प्रत्येक शनिवारी मोठा समारंभ होत असे.सायंकाळी धूपआरती नंतर पालखी सेवा निघे,यावेळी तीन-चार हजार लोक जमत असत.मंदिरात प्रतिवर्षी गुरुद्वादाशीस  आणि श्रीदत्त जयंतीस मोठा उत्सव  होत असे.यावेळी आठ-दहा हजार पर्यंत अन्नसंतर्पण होत असे.प्रथम गुरुद्वादाशीच्या सोहळ्याच्या वेळी पुरणाचा नैवेद्य श्रीदत्तप्रभूना अर्पणअरण् केला असताना शास्त्री बुवांच्या घशात घास अडकल्या प्रमाणे होऊन खूप त्रास होऊ लागला.सर्व मंडळी घाबरून गेली. त्यांनी देवाची प्रार्थना करण्यास सुरवात केली. त्यावेळी त्यांचा त्रास कमी झाला. नैवेद्यामध्ये पुरणपोळी बरोबर तूप ठेवले नसल्याने देवानीच हा प्रकार केला असल्याचे नंतर कळाले.

याच काळात देवांनी बुवाना मराठी भाषेतील गुरुचरीत्रावर संस्कृत भाषेत ग्रंथ रचना करावी अशी आज्ञा केली. या नुसार शास्त्रीबुवांनी द्विसहस्त्री गुरुचरीत्राची रचना केली. या पूर्वी बुवांनी सप्तशती गुरुचरीत्राची रचना केली होती.

पहिल्या गुरुद्वादाशिच्या समारंभाच्या वेळी हजारो भाविक भक्तांची गर्दी जमली होती. महाप्रसादाची जेवणे सुरु होणार होती तितक्यात  थोडा थोडा पाउस पडू लागला.सर्व भाविकांनी बुवाना विनंती केली की हे संकट दूर व्हावे. बुवा म्हणाले तुमच्या प्रमाणे हा पाउस सुद्धा प्रसादासाठीच आला आहे.त्याला एक मोठा नैवेद्य दाखवा म्हणजे तो जाईल. असे सांगून बुवांनी नैवेद्य दाखवून पर्जन्य राजास विनंती केली कि त्याने थोडा वेळ दूर राहावे. या विनंती बरोबरच तेथील  पाउस बंद झाला. आसपास मात्र खूप पाउस पडत होता परंतु समारोहाच्या प्रांगणात सर्वांची जेवणे होईपर्यंत एक थेंब सुद्धा पाउस पडला नाही. बुवांची ही अगम्य लीला पाहून समस्त भक्त गणांनी त्याचा जयजयकार केला.

            ९. शास्त्रीबुवाना गृहस्थाश्रमास सुरवात करण्याची देवांची अनुज्ञा

शास्त्रीबुवा माणगावि असतानाच देवाकडून आज्ञा झाली शास्त्रीबुवा आता योगाभ्यास होणे शक्य नाही तरी आता गृहस्थाश्रमात प्रवेश करावा. हि देवांची आज्ञा बुवांनी मातोश्रीस सांगितली त्यावेळी तिलाही समाधान वाटले.देवांचे धर्मशाळेतच बुवांचा गृहस्थाश्रम सुरु झाला.येथेच स्मार्ताग्नीची उपासना प्रारंभ झाली.बुवांचे जेवण मंदिरातच होत असे.अन्नपूर्णाबाई मात्र जेवणास घरी जात असत. त्या, रात्रीरअत्री सारी कामे आटोपून धर्मशाळेत येत. एके दिवशी नित्याप्रमाणे रात्री धर्मशाळेत गेल्या परंतु बुवा तेथे नव्हते म्हणून मंदिरात गेल्या. मंदिराचे दार लोटलेले होते आणि आत बुवा वाचनात मग्न होते.अन्नपूर्णा बाईनी दाराचा आवाज केला तेंव्हा कोण आहे असे बुवांनी विचारले त्यावेळी मी आहे असे उत्तर देऊन त्या मंदिराच्या बाहेर बसल्या. बुवाना दाराचा आवाज झाल्याचे स्मरण राहिले नाही.वाचन पूर्ण करून ते बाहेर येऊन पहातात तो त्याना अन्नपूर्णाबाई मंदिराच्या बाहेर बसल्या आहेत आणि त्याना समाधी लागली आहे.बुवांनी त्याना हलवून सावध करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या देहभानावर आल्या नाहीत.शेवटी शास्त्रीय उपायांनी बुवांनी त्याना सावध केले त्यावेळी त्या म्हणाल्या मी पूर्ण आनंदात निमग्न होते आपण मला उगीच सावध केले. योगाभ्यासाचा कांहीच संबंध नसताना श्री दत्तप्रभुनी सहज लीलेने बाईना समाधी सुखाची अनुभूती घडवून आणली होती.

आता बुवांच्या माणगावातील वास्तव्याचा सात वर्षाचा अवधी संपत आला होता.यावेळी देवाकडून माणगाव सोडण्याची आणि बरोबर देव आणि कुटुंब घेण्याची आज्ञा झाली. त्यानुसार बुवांनी पौष मासात माणगाव सोडले. ते पुन्हा येथे आलेच नाहीत. वाडीस आल्यानंतर त्यांनी श्री गोविंदस्वामीना आणि मौनीस्वामीना साष्टांग नमस्कार करून श्री दत्तप्रभूंच्या आदेशां बद्दल सांगितले.श्री गोविंद स्वामिनी आपल्या जवळच्या उपनिषदाच्या पोथ्या आणि शाळीग्राम बुवाना देण्याचा मानस सांगितला. त्यावेळी त्यांनी सध्याची अडचण दूर झाल्यावर घेईन असे सांगितले.पुढे लवकरच  अन्नपूर्णा बाई प्रसूत झाल्या परंतु बाळ मृतच जन्मास आल्याने त्यांची निराशा झाली.
 
                  १०. अन्नपूर्णाबाईंचे देहावसान आणि बुवांचे संन्यास ग्रहण

कांही दिवसांनी बुवाना वाडी सोडून उत्तर दिशेस जाण्याची देवांची आज्ञा झाली.त्यानुसार बुवा कुटुंबासह कोल्हापूरला आले. येथे मातेचे उभयतानी दर्शन घेऊन एक दोन दिवस मुक्काम केला. येथून ते पंढरपुरास आले. येथे त्यांनी चंद्रभागेत स्नान करून भक्तांची आतुरतेने वाट पहात उभे असलेल्या पांडुरंगाचे अत्यंत श्रद्धाभावाने दर्शन घेतले. येथून ते बार्शीस आले. बार्शीहून ते गोदातीरी किनारी वसलेल्या  गंगाखेड गावी आले.येथे त्यांनी कांही दिवस मुक्काम केला.येथे बुवाना एक दृष्टांत झाला. तो असा होता आजपासून चौथे दिवशी तुम्हा दोघानाही नेण्यासाठी आम्ही येवू . हे ऐकून बुवा म्हणाले मला संन्यास घ्यावयाचा आहे त्यामुळे मी येणार नाही. हवे असल्यास  तिला घेऊन जा. यानंतर अन्नपूर्णाबाईना ताप आला आणि त्यातच महामारीचा उपद्रव सुरु झाला.या आजारातच त्या साध्वीचे प्राण शके १८१३ वैशाख वद्य १४ शुक्रवारी दुपारी अनंतात विलीन झाले.बुवांनी तेरा दिवसा पर्यंत पत्नीचे सर्व औध्वदेहिक यथाविधी केले आणि लगेच चौदाव्या दिवशी संन्यास ग्रहण केला. रात्री श्री दत्तप्रभूनि श्री गोविंद स्वामींच्या रुपाने स्वप्नात येवून प्रणवाचा उपदेश करून त्याचा जप करण्यास सांगितले. तसेच या संन्यास आश्रमात केवळ माधुकरीचेच अन्न घ्यावे, मठभिक्षा नको असाही उपदेश केला.बुवांनी दुसरे दिवशी गोदावरीच्या तीरावर जाऊन सर्व ब्राम्हण मंडळीना बोलावून प्रायश्चित्त विधी केला. स्नान झाल्यावर  प्रेशोच्चार करविण्यासाठी एखादे स्वामी असते तर बरे झाले असते.असा विचार बुवांच्या मनात आला आणि आश्चर्य असे की नदीच्या पैलतीरावरून एक संन्यासी आले आणि त्यांनी बुवाकडून प्रेशोच्चार करवून घेतला आणि संन्यास दिला. आता पूर्वीचे बुवा हे नांव गेले आणि सर्वजण त्याना महाराज या नावाने संबोधू लागले.श्री महाराज सर्व विधी आटोपून गावात आले.तितक्यात त्या स्वामीना भिक्षेस बोलाविण्यास कांही मंडळी नदीतीरी गेली परंतु तेथे कोणीच नसल्याचे पाहून सारे विस्मय चकित झाले. नंतर महाराजाना देवांची आज्ञा झाली की उज्जैनीस  जावून तेथे असलेल्या नारायणानंद सरस्वती स्वामीकडून दंड घ्यावा. या देव आज्ञेनुसार महाराज  मंडलेश्वर, बलवाडा असा प्रवास करीत उजैनिस येऊन पोहोचले. तेथील श्री दत्तमंदिरात जाऊन स्वामीना भेटले आणि आपला येण्याचा उद्देश सांगितला.नारायण स्वामिनी आपले गुरुदेव श्री अनिरुद्धानंद सरस्वती  यांची अनुमती घेऊन महाराजाना दंड अर्पण केला आणि त्यांचे नांव वासुदेवानंद सरस्वती असे ठेवले.हेच नांव संन्यास ग्रहणाच्या समयी महाराजाना देवांनी सांगितले होते.यावेळी सर्व संन्यासिना मठभिक्षा दिली परंतु महाराज स्वत: मात्र माधुकरी मागण्यास गेले.

            ११. धर्मोद्धार आणि संपूर्ण भारत यात्रा.  

संन्यास ग्रहण केल्यानंतर श्री महाराजांच्या जीवनातील पुवार्ध संपला.त्याना श्रीदत्तप्रभूंची आज्ञा झाली ती अशी –“ सर्वत्र वर्णाश्रम लोप पावला आहे. तरी संपूर्ण भारतात पायीच प्रवास करून सर्व लोकाना उपदेश करावा आणि धर्म मार्गाची स्थापना करावी. या आदेशानुसार श्री महाराजांचे वर्तन सुरु झाले.त्यांचा पहिला चातुर्मास शके १८१३चा श्री क्षेत्र उज्जैनी येथे झाला. येथे महाराजांचा नित्यक्रम असा होतापहाटे उठून  शौच-मुखमार्जन करून  स्नान करावयाचे नंतर दंडतर्पण, प्रणव जप झाल्यावर श्रीदत्तपूजा करावयाची. कोणी विद्यार्थी असल्यास त्यास वेद, शास्त्र यांचा पाठ द्यावयाचा. दुपारी पुन्हा स्नान करून दक्षिणी ब्राम्हणाचे घरून भिक्षा आणून ते सर्व अन्न एकत्र करून खावयाचे. केवळ तीनच घरी भिक्षा घ्यावयाची असा त्यांचा नियम होता.दुपारच्या वेळी कोणी कांही विषय समजाऊन घेण्यास आल्यास तो त्याला समजाऊन त्याचे ते समाधान करीत.सायंकाळी अनुष्ठान झाल्यावर महाराज पुराण सांगत.त्यांची प्रवचन शैली उत्कृष्ट होती.सर्व विषय समजावून देण्याची हातोटी अप्रतिम होती. श्री दत्तात्रेयांच्या आदेशानुसार चातुर्मास सोडून इतर वेळी ते एकाच ठिकाणी  अधिक काळ  राहत नसत.त्यांनी दंड ग्रहण केल्यानंतर एकूण चोवीस चातुर्मास वेगवेगळ्या क्षेत्रात केले.ते असे १)श्री क्षेत्र उजैनी २) ब्रह्मावर्त (चार) ३)हरिद्वार (दोन) ४) हिमालय  ५) पेटलाद  ६) तिलकवाडा  ७) द्वारका  ८) चीखलदा (दोन) ९) महत्पूर १०) नरसी  ११) बढवाई  १२) नरसोबाची वाडी  १३) तंजाउर  १४)मुक्त्याला  १५) पवनी १६) हावनूर  १७) कुर्वपूर  १८) श्री क्षेत्र गरुडेश्वर

वरील क्षेत्रापैकी ब्रह्मावर्त मध्ये चार, हरिद्वार आणि चीखलदा  या ठिकाणी प्रत्येकी दोन दोन चातुर्मास झाले.श्री क्षेत्र गरुडेश्वर येथील चातुर्मास शके १८३५ साली झाला. हा महाराजांचे जीवनातील अखेरचा चातुर्मास ठरला. गुरु द्वादशीचा उत्सव या ठिकाणी फारच मोठ्या प्रमाणात साजरा झाला.लघुरुद्र पुष्कळ झाले. हजारो  भक्त मंडळी प्रसाद घेवून तृप्त झाली. भक्तांच्या पंगतीत श्री महाराज सर्वाना  स्वस्थपणे जेवा  असे हात जोडून सांगत होते. त्या दिवशी सर्वाना महाराजांनी भोजनोत्तर दक्षिणा दिली. अशा प्रकारे हा उत्सव अविस्मरणीय झाला.

एके दिवशी सकाळी भाष्यपाठ संपल्यावर महाराज म्हणाले आज पर्यंत मी  जो प्रत्यक्ष उपदेश केला आणि ग्रंथ लिहिले त्या सर्वांचे सार आज सांगावयाचे आहे.मुक्तीचा लाभ करून घेणे हे मनुष्य जन्माचे मुख्य कर्तव्य आहे.त्याकरीता प्रथम मन स्थिर व्हावे या उद्देशाने वर्णाश्रम धर्माचे यथाशास्त्र पालन झाले पाहिजे.वेदांताचे श्रवण, मनन आणि निदिध्यासन नित्य करावे.मुख्यत: श्रवणाकडे अधिक लक्ष द्यावे.त्यामुळे मनातील आसक्ती कमी होईल. सात्विक प्रवृतीनेच मानवांची उन्नती होते.सात्विक प्रवृत्ती होण्यासाठी आहार हा हित, मित्, मेध्य म्हणजे पवित्र असण्याकडे लक्ष दिले पाहिजे.आपली प्रवृत्ती सात्विक झाली का  हे ओळखण्याची खूण म्हणजे स्वधर्मावर दृढ श्रद्धा, स्नान, संध्या, कीर्तन, भजन, पुराण यांचे श्रवण,  सर्वाबरोबर गोड बोलणे,दुसरयाचे नुकसान होईल असे न वागणे, माता पित्याची सेवा करणे,स्त्रियांनी सुद्धा सासरी राहून सासू सासरे आणि इतर वडील मंडळींच्या आज्ञेत राहून पतीची दृढ निष्ठेने सेवा करणे,इत्यादी गुण येणे म्हणजे आपली प्रवृत्ती सात्विक झाल्याची चिन्हे आहेत.उदर निर्वाहासाठी व्यापार, शेती, नोकरी, कोणताही व्यवसाय केला तरी वेदविहित कर्म आणि गुरुआज्ञा पालन हे कधीही सोडू नये.स्वकर्म केले तरच अंत:करण  शुध्द होते. अंत:करण  शुद्ध झाले म्हणजे उपासना स्थिर होते, उपासना स्थिर झाली म्हणजे मनाला शांती मिळते. मनाची गडबड थांबली म्हणजे आत्मज्ञान प्राप्त होऊन मोक्षाचा लाभ होतो. अशा प्रकारे उपदेश करून महाराजांनी सात ज्ञान भूमिका समजावून सांगीतल्या. यानंतर महाराज म्हणाले या प्रमाणे जो वागेल तो पूर्ण सुखी होईल.  हा श्री महाराजांचा उपदेश अखेरचाच ठरला. शके १८३६ वैशाख महिन्यात महाराजांच्या  मुळच्या  अतिसार रोगाने उचल खाल्ली आणि शरीर दिवसेंदिवस क्षीण होत चालले होते. ही बातमी कळताच नरसोबाच्या वाडीस ब्राम्हणांनी देवावर संतत  धार अनुष्ठान सुरु केले. परंतु हे महाराजाना कळताच त्यांनी वाडीच्या ब्राम्हणास कळविले की देवास उगाच त्रास देऊ नका हे शरीर अल्पावधीतच पडणार आहे.  महाराज एक महिनाभर पडूनच होते.त्यावेळी पत्रोत्तरे सुद्धा ते दुसरयाकडून लिहून घेत. महाराज नेहमी ध्यानात निमग्न असत.संपूर्ण दिवसात केवळ पाच दहा वाक्येच  बोलत असत. भक्तमंडळीनी औषध घेण्याबद्दल विनंती केली त्यावेळी महाराज म्हणाले अरे हा देह लवकरच सोडून जावयाचे आहे, यासाठी औषधाची गरज नाही.श्रीमत शंकराचार्य तर केवळ बत्तीस वर्षेच राहिले. त्यामानाने हे शरीर जास्तच टिकले.जन्मापासून ज्या वैद्याला धरले आहे तो या वेळीसुद्धा आहेच.त्याची इच्छा असेल तसे होईल. असे सांगून महाराजांनी, भीष्माचार्यानी त्यांच्या अंतिम समयी म्हटलेले श्लोक सर्वाना म्हणून दाखविले. त्यांची क्षीणता दिवसेंदिवस वाढतच होती.वेदना फार होऊ लागल्या होत्या.शरीरात उष्णता एव्हढी वाढली की शरीरावर सारखे थंड पाणी शिंपडावे लागे. इतकी बिकट अवस्था असताना सुद्धा महाराजांचे मुखाने दत्तनाम घेणे चालूच होते.आणि बाजूस बसलेल्या सर्वाना ते घेण्यास सांगत.महाराजांनी ज्येष्ठ वद्य चतुर्दशीस धोंडोपन्ताना बोलावून त्याना सांगितले धोंडोपंत  प्रतिदिन दत्त.दत्त नामाचा १२०० जप करावा. गुरुद्वादशी, दत्तजयंती आणि गुरुप्रतीपदा हे उत्सव  साजरे करून यथाशक्ती ब्राम्हण भोजन घालावे. त्यायोगाने अंत:करण शुद्ध होऊन कैवल्यपद मिळेल,  असे सांगून त्यांनी आपल्या अंगावरील छाटी काढून धोंडोपन्ताना  दिली.त्यांनी सदगतीत अंत:करणाने श्री महाराजांचे चरण कमलावर मस्तक टेकवून तो प्रसाद घेतला.ज्येष्ठ वद्य अमावस्येस त्यांची क्षीणता फारच वाढली.त्या दिवशी सुद्धा नित्य कर्म करण्याचा महाराजांनी प्रयत्न केला.परंतु आचमनाचे पाणी हातात राहीना, ते पाहून देवाची इच्छा असे म्हणून स्वस्थ राहिले. आज अमावास्या संपल्यावर हा देह सोडायचा आहे. असे त्यांनी सांगितले होते. अमावास्या संपुन प्रतिपदा लागताच श्री महाराज सिध्दासन घालून  देवाकडे मुख करून बसले. देवाकडे पाहून त्राटक केले आणि श्वास निरोध करून प्रणवाचा उच्चार करीत देहाचे विसर्जन केले. अशा प्रकारे महाराज ब्रम्हरूपी लीन झाले.त्यावेळी आषाढ शुद्ध  प्रतिपदा , मंगळवार,आद्रा नक्षत्र उत्तरायण आणि रात्रीचे अकरा वाजले होते.सर्व भाविक भक्तमंडळीना गुरु माउलीच्या देहावसनाने अत्यंत दु:ख झाले. हे दिव्य परमेश्वराचे, सगुण साकार रूप पुन्हा पहावयास मिळणार नाही, या विचाराने त्यांच्या भक्तांच्या नेत्रातील आसवे थांबत नव्हती. दुसरे दिवशी सकाळ होताच महाराजांचे देहावर सर्वानी पवमान, पुरुषसुक्त इत्यादींच्या मंत्रोच्चारासहित अभिषेक केला. षोडशोपचारे  पूजा केली. बेल, तुळस.फुले यांच्या माला  गळ्यात घातल्या. नंतर पुष्पासनावर बसवून त्याना  वाजत,गाजत नर्मदा तीरावर नेले.या अंत्य यात्रेबरोबर गरुडेश्वरातील  भाविकांचा जनसमुद्र लोटला होता. येथे सुद्धा पूजा करून नैवेद्य,फळ,तांबूल,दक्षिणा ठेवून तो पार्थिव देह नर्मदेच्या जलात समर्पण केला. या नंतर समस्त दु:खी जनसमुदाय गुरु स्मरण करीत, आप आपल्या आठवणी एकमेकास  सांगत घरी परतले.

श्री महाराजांचे जीवन हे भगवंतांनी श्रीमद भगवत गीतेत वर्णन केलेल्या स्थितप्रज्ञाच्या लक्षणाशी तंतोतंत जुळते. पूर्वी पासूनच महाराजांची संग्रही वृत्ती नव्हती.त्यांच्या जवळ अगदी आवश्यक असलेले जिन्नसच असत.ते कोणाकडून कसलीच सेवा करून घेत नसत.स्वत:ची  सारी कामे ते स्वत:च करीत.स्वत:ची वस्त्रे स्वत:च धूत. संपूर्ण भारतभर त्यांनी अनवाणी पायानेच प्रवास केला. सर्व सिद्धी प्राप्त असूनसुद्धा त्यांचा उपयोग स्वत:साठी कधीच केला नाही. आचार संपन्न जीवन आणि अत्यंत काटेकोरपणे शास्त्राच्या नियमांचे पालन, यामुळे त्यांच्या उपदेशाचा परिणाम जनसमुदायावर तत्काळ होत असे.

            १२. प.प. श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची साहित्य रचना.

 प.प. महारांजाचे जीवन अत्यंत व्यस्त असून सुद्धा त्यांनी अद्वितीय स्वरुपाची विशाल ग्रंथ रचना करून ठेवली आहे. असे म्हटल जाते की अध्यात्म साहित्य निर्मिती मध्ये श्रीमत शंकराचार्या नंतर स्वामी महाराजांचाच क्रमांक लागतो. या साहित्य रचनेत प्रामुख्याने येणारे ग्रंथ म्हणजे १) श्रीदत्त महात्म्य  २) श्रीदत्त लीलामृत ३) श्री सप्तशती गुरुचरित्र सार  हे प्राकृत भाषेतील ग्रंथ आणि १) द्विसह्स्त्री गुरुचरित्र २)श्री गुरुचारीत्रम ३)श्रीदत्त चंपू ३) शिक्षात्रयम ४) श्रीकृष्णालहरी  ५)श्रीद्त्तभाव सुधारस स्तोत्रं हे संस्कृत भाषेतील ग्रंथ आहेत. या शिवाय महाराजांनी उप ग्रंथही लिहिले उदा. श्री दत्तात्रेय षोड शावातार पूजा, नित्य उपासना क्रम ,स्त्री शिक्षा  माघ महात्म्य इत्यादी.

अ) श्रीदत्त महात्म्य  हा महाराजांचा एक अप्रतिम असा प्रासादिक ग्रंथ आहे. हा ग्रंथ श्रीदत्त कृपेने रचला गेला असल्याने तो एक सिद्ध वरद ग्रंथ झाला आहे. हा एकच ग्रंथ श्रद्धावान भक्तांना आपल्या समस्त कामना पूर्ण करून देणारा आहे.यात पाच हजार चारशे ओव्या असून एक्कावन अध्याय आहेत. याची निर्मिती महाराजांनी शके १८२३ साली उजैनिच्या चातुर्मासात केली होती.या रसाळ भाषेतील ग्रंथात भक्तीमार्गाचे प्रतिपादन केले असले तरी साधकांना ज्ञान प्राप्ती व्हावी, त्यांचे अंगी वेदांताचे सिद्धांत बाणावे,त्याना ईश्वराचे व्यापकत्व कळावे हा उद्देश सुद्धा आहे या ग्रंथात अष्टांग योग,भक्ती,ज्ञान, कर्ममार्ग,आश्रम धर्म, प्रणवोपासना, मृत्यूलक्षण  असे अनेक विषय आले आहेत.

आ) श्रीदत्त पुराण 

ब्रम्हावर्त  मध्ये असताना महाराजांनी शके १८१४ साली चातुर्मासात श्रीदत्त पुराण हा ग्रंथ रचला. यात एकूण साडेतीन हजार श्लोक असून चौषष्ट अध्याय आहेत.ऋकसंहिते प्रमाणे याची रचना झाली आहे.ऋकसंहिते प्रमाणे प्रत्येक अध्यायातील श्लोकात एक,दोन असे ऋकपाद घालून स्तुती केली आहे.यालाच वेद्पाद स्तुती असे म्हणतात. असा हा भव्य, दिव्य ग्रंथ गंगातीरी निर्माण झाला.

इ) श्रीसप्तशिती गुरुचरित्र सार

श्री गुरुचरित्राचे सार विषद करणारा सातशे ओव्यांचा लघुकाव्य ग्रंथ शके १८२४ साली महाराजांनी लिहीला  या लघु ग्रंथाचे वैशिष्ट्य असे की यातील प्रत्येक ओवीतील तिसरे अक्षर घेतले असता श्रीमद भगवत गीतेतील पंधरावा अध्याय तयार होतो. या ग्रंथात महाराजांनी पंधराव्या अध्यायातील पुरुषोत्तम योगाची जीवनोद्धारक भूमिका आणि श्री गुरु चरित्रातील लोकोद्धाराची भूमिका या दोहोंचा सुंदर समन्वय घडवून आणला आहे.

ई) श्री दत्त लीलामृत सिंधू

 इंदूर या संस्थानातील पेटलाद या गावी महाराजांनी शके १८१९ साली चातुर्मास केला. येथील वास्तव्यात त्यांनी दत्तलीलामृत सिंधू नावाचा एक सहस्त्र ओव्यांचा प्राकृत भाषेतील ग्रंथ रचिला. श्री दत्तात्रेयांच्या अनेक लीलांचे वर्णन करणारा हा एक उत्कृष्ट ग्रंथ आहे.यातील रसाळ भाषा भाविकांना भावविभोर करते.

उ) समश्लोकी श्रीगुरुचरित्र

   महाराज एकदा प्लेगने आजारी होते.त्यावेळीच देवांनी त्याना समश्लोकी गुरुचरित्र लेखनाची आज्ञा दिली. ग्रंथाची रचना कशी असावी याबद्दल देवांनी सविस्तर माहिती महाराजाना सांगितली. या आदेशांनुसार महाराजांनी ६७५० श्लोकांचा दिव्य ग्रंथ केवळ पंचेचाळीस दिवसात पूर्ण केला. या ग्रंथाच्या निर्मिती बद्दल सांगताना शेवटच्या दोन श्लोकात महाराज म्हणतात प्रत्येक दिवशी शंभर पेक्षा अधिक श्लोकांची रचना होत असे.शेवटच्या पाच दिवसात तर दर रोज दोनशे पेक्षा अधिक श्लोकांची रचना महाराजांनी केली.या काळात त्यांचे रोजचे नित्यक्रम शिवाय प्रासंगिक कार्यक्रम, आजारीपण अशी एकंदर स्थिती असतानाही  एवढ्या श्लोकांची रचना करणे, यावरून महाराजांची अलोकिक बुद्धिमत्ता, सामर्थ्य,आणि दृढ निश्चय याची कल्पना येते.

ऊ) कृष्णा लहरी स्तोत्र रचना

  वाडीत मुक्काम असताना महाराजाना तेथील ब्राम्हणांनी गंगा लहरी प्रमाणेच कृष्णा लहरी  स्तोत्र लिहून देण्याची विनंती केली.परंतु अति व्यस्ततेमुळे महाराजाना तेथील वास्तव्यात ते जमले नाही. महाराज ज्यावेळी गाणगापुरी जाण्यास निघाले   

तेंव्हा कृष्णामाईने  प्रत्यक्ष दर्शन देऊन कृष्णा लहरी रचण्याची आज्ञा केली.त्या वेळी श्रीदत्त प्रेरणेने अतिशय लवकर,  स्वयमस्फूर्तीने एक्कावन श्लोक त्यांच्या मुखकमळातून बाहेर पडले. या वेळी कृष्णामाई प्रत्यक्ष रुपाने महाराजांचे समोर उभी होती.ती म्हणाली वासुदेवा आता पुरे. तू केलेली रचना उत्तम झाली आहे. मला आवडली. एवढे बोलून ती अंतर्धान पावली.महाराजांनी रचलेला प्रत्येक ग्रंथ विशिष्ट शैलीने नटलेला असून त्यातील प्रासादिक वाणी, भक्ती,प्रेम, भाषेतल सौष्ठव, माधुर्य आणि ओजास्वीता अप्रतिम आहे.महाराजांनी केलेली ग्रंथ रचना पाहून मन  आश्चर्याने थक्क होऊन जाते.

      या महान संताच्या विपुल साहित्यास एकत्र करून त्याला ग्रंथ रूपात प्रकाशित करण्याचे महान कार्य महाराजांचे शिष्य प.पु. श्री दत्तमहाराज कविश्वर यांनी अथक परिश्रम करून पूर्ण केले. या साहित्याचा  प्रसार होऊन  जनसामान्यांना भक्ती, ज्ञान, आणि वैराग्य  यांचा लाभ व्हावा या उदात्त हेतूने प्रेरित होऊन प.प.श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) स्वामी महाराज प्रबोधिनी ची स्थापना झाली आणि तिचे सभासद  आपले  कार्य उत्तम प्रकारे बजावीत आहे  आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाने समस्त जनपरिवारास प्रभावित करणार्या या महान संताच्या चरणी कोटी,कोटी प्रणाम.

  ||प.प.श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज चरणार्पणमस्तु ||

                   || हरी ओम तत्सत ||

आषाढ पौर्णिमा (गुरु पौर्णिमा)

दिनांक २१-०७-२००५