Wednesday, September 26, 2012

अध्यात्म रामायणातील सौंदर्य स्थळे. अध्यात्म रामायणातील सौंदर्य स्थळे. अध्यात्म रामायणातील सौंदर्य स्थळे. अध्यात्म रामायणातील सौंदर्य स्थळे. अध्यात्म रामायणातील सौंदर्य स्थळे. अध्यात्म रामायणातील सौंदर्य स्थळे. अध्यात्म रामायणातील सौंदर्य स्थळे. अध्यात्म रामायणातील सौंदर्य स्थळे. अध्यात्म रामायणातील सौंदर्य स्थळे.

                                     अध्यात्म रामायणातील सौंदर्य स्थळे.

                            नम्र निवेदन

भगवान शिवशंकर आणि भगवती पार्वती कैलासातील औदुम्बराच्या झाडाखाली एकत्र बसले असताना पार्वती मातेने भगवंताना विचारले नाथ, श्रीराम हे स्वतः परब्रम्ह असून त्याना आत्मज्ञान होते तर त्यांनी सीतेसाठी इतका विलाप का केला? या शंकेचे समाधान करण्यासाठी भगवान शंकर म्हणाले प्रिये, प्रभू राम निःसंशय प्रकृती पलीकडील परमात्मा. आनंदघन, अद्वितीय, आणि पुरुषोत्तम आहेत. ते या विश्वामध्ये आकाशा प्रमाणे अंतरबाह्य भरून राहिले आहे. ते आपल्या मायेने या विश्वाचे संचालन करतात. मूढ लोक आपल्या अज्ञानाने श्रीरामांचे खरे स्वरूप ओळखू शकत नाहीत.ते त्याना स्वतःप्रमाणे सामान्य मानव समजतात. श्रीराम प्रभूंच्या ठिकाणी अविद्या अथवा अज्ञान असूच शकत नाही. ते मायेचे अधिष्ठान असून माया त्याना मोहित करू शकत नाही.
श्रीरामचंद्र प्रभूंच्या रहस्याचे भगवंतांनी  पार्वती मातेसाठी जे विवेचन केले होते तेच अध्यात्म रामायण या नांवाने प्रसिद्ध झाले. याचे महात्म्य, देवर्षी नारादाना कथन करताना कमलासन ब्रम्हदेव म्हणाले हे साधू नारदा, अध्यात्म रामायणाचे महात्म्य अनन्य साधारण आहे. जो साधक याचे श्रद्धाभावाने पठण करतो अथवा लोकाना ऐकवितो तो जीवनमुक्त होतो. या ग्रंथातील कथाभाग एवढा रसपूर्ण आहे कि तो अनेक वेळा वाचला तरी प्रत्येक वेळी त्यात नवीन, नवीन अर्थ असल्याचे जाणवते. या सुरस कथाभागा प्रमाणेच त्यातील अध्यात्माचे ज्ञान आपणास कथा विश्वातून परमार्थाच्या भव्य, दिव्य आणि मंगलमय अशा  दालनात घेवून जाते. या ग्रंथात श्रीरामचंद्र प्रभूंची भक्ती,ज्ञान, उपासना, नीती, सदाचार, तसेच त्यांचे परब्रम्हत्व, याच्या तात्विक विवेचनाची नुसती लयलूट आहे. या ग्रंथातील अक्षर नि अक्षर मधुर रसाने ओतप्रोत भरलेले आहे. तरी सुद्धा यात अध्यात्म दृष्टीने नटलेली अनेक सौंदर्यस्थळे आहेत. ती निवडून भाविक भक्तांच्या समोर प्रस्तुत करण्याचा हा प्रयत्न आहे.

विनीत
प्रभाकर गंभीरे

१.     श्रीरामचंद्राच्या जन्माच्या वेळी कौसल्या मातेने केलेली भगवंतांची स्तुती.
सरयू नदीच्या तीरावर वसलेल्या कोसल देशाचे अधिपत्य, त्रेता युगात, इक्ष्वाकू वंशातील राजांकडे होते. या वंशात अनेक महान राजे झाले. यामध्ये महाराज अज यांचा पुत्र, महाराज दशरथ एक महापराक्रमी, प्रजादक्ष, धर्मपरायण, सम्राट होते. त्यांचे प्रजेवर पुत्रवत  प्रेम होते. महाराज दशरथाना  तीन राण्या होत्या- संयमी आणि विचारी कौसल्या, विशाल मनाची आणि अत्यंत उदार बुद्धी असलेली सुमित्रा, आणि अतीत लावण्याचे लेणे लाभलेली  कैकयी. या सर्व वैभवसंपन्न जीवनात एकच उणीव होती. महाराजांच्या विवाहांना कित्येक वर्षे लोटली होती परंतु पुत्रप्राप्ती अजून झाली नव्हती. या एका गोष्टीचे दुःख महाराजांसह तिन्ही राण्यांना सलत होते. यावेळी कुलगुरू वशिष्ठ मुनींनी महाराजाना पुत्रकामेष्टी यज्ञ करण्याचा सल्ला दिला.    

कुलगुरू वशिष्ठाचा उपदेशाप्रमाणे अयोध्यापती महाराज दशरथानी  ऋष्यशृंग मुनिना बोलावून त्यांच्या करवी पुत्र कामेष्टी यज्ञ प्रारंभ केला. यज्ञात श्रद्धापूर्वक आहुती दिल्या जात असताना त्यातून तप्त सुवर्णासमान दैदिप्यवान असे भगवान अग्निदेव प्रकट झाले. त्यांच्या हातात पायसाने भरलेले एक सुवर्ण पात्र होते. अग्निदेव अत्यंत मधुर अशा स्वरात महाराज दशरथास म्हणाले हे राजा, देवांनी निर्माण केलेले, पुत्र प्राप्ती करून देणारे हे दिव्य पायस घे आणि आपल्या राण्यांना दे. याच्या सेवनाने प्रत्यक्ष परमात्मा तुझे घरी पुत्र रुपाने जन्म घेतील. असे सांगून आणि तो सुवर्ण कलश महाराजांचे हाती देवून, अग्निदेव अंतर्धान पावले. वशिष्ठ मुनींच्या सांगण्या प्रमाणे महाराजांनी त्या सुवर्ण कलशातील पायस अर्धे, अर्धे वाटून आपल्या दोन राण्या- कौसल्या आणि कैकयी याना दिले. तितक्यात राणी सुमित्रा तेथे आली. त्यावेळी कौसल्येने आपल्यातील अर्धे पायस सुमित्रेस दिले. तसेच कैकयीने सुद्धा आपल्या पायसातील अर्धे सुमित्रेस दिले. तिन्ही राण्या पायसाचे सेवन करून लवकरच गर्भवती झाल्या. राजभवनात त्या तिन्ही राण्या आपल्या दिव्य कांतीने देवतांप्रमाणे शोभून दिसू लागल्या.
काळ आपल्या गतीने चालला होता. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमीच्या दिवशी, अत्यंत शुभ अशा कर्क लग्नात. पुनर्वसू नक्षत्राचे समयी, ज्यावेळी पाचही ग्रह उच्च स्थितीत होते आणि सूर्यदेवाने मेष राशीत प्रवेश केला होता, त्या मध्यान्हीच्या वेळी सनातन परमात्मा-जगन्नाथ अविर्भूत झाले त्यावेळी निरनिराळ्या रंगीबेरंगी सुवासिक फुलांनी नभोमंडळ भरून गेले होते. भगवंतांचा, नील कमलाच्या पाकळी प्रमाणे श्याम वर्ण होता. त्यांनी पितांबर परिधान केलेला असून ते चतुर्भुज होते. नेत्रांची शोभा तर वर्णनातीत होती. कानातील कुंडले त्यांच्या मुळच्याच सौंदर्यात भर घालीत होते. त्यांचे तेज हजारो सूर्या प्रमाणे असून मस्तकावर प्रकाशमान मुकुट होता. त्याचे केस काळे,कुरळे आणि रेशमा प्रमाणे मउ होते. त्यांच्या चार हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण केले असून गळ्यात वैजयंती माला अत्यंत शोभून दिसत होती. हृदयातील अनुग्रहरूपी चंद्राची सुचना देणारे स्मित रूपी चांदणे त्यांच्या मुखमंडळावर विलसत होते. करूण रसाने भरलेले त्यांचे नेत्र कमळाप्रमाणे विशाल आणि सुंदर होते. श्रीवत्स, हार, केयूर, नुपूर, इत्यादी अनेक अलंकारांनी ते विभूषित होते. अशा या परमदिव्य परमात्म्यास पाहून कौसल्या राणी आश्चर्यचकित झाली. आनंदाश्रूंनी भरलेल्या नेत्रांनी, दोन्ही हात जोडून अत्यंत श्रद्धा भावाने ती म्हणाली, हे देवाधिदेवा तुम्हाला नमस्कार असो. शंख, चक्र, गदा, पद्म धारण करणार्या हे प्रभो, तुम्ही  अच्युत आणि अनंत असे परमात्मा आहात. तुम्ही सर्वत्र परिपूर्ण पुरुषोत्तम आहात. वाणी, मन यांचे तुम्ही विषय नाही. तुम्ही इंद्रियातीत, सत्तारूप आणि केवळ ज्ञान हेच स्वरूप असणारे भगवंत आहात. तुम्हीच आपल्या मायेने सत्व, रज आणि तम या गुणांनी युक्त होऊन हे विश्व निर्माण करता, त्याचे पालन करता आणि यथासमयी त्याचा लय करता. परंतु खरे पाहता तुम्ही नेहमी निर्मल अश्या तुरीय स्थितीचच असता. तुम्ही कर्ता नाही परंतु तुम्ही कर्म करीत असल्या सारखे वाटते. तुम्ही गमन करीत नाही परंतु गमन करीत असल्यासारखे वाटते. तुम्ही ऐकत नाही परंतु तसे भासते. समस्त प्राण्यांमध्ये तुम्ही समान भावाने स्थित आहात परंतु अज्ञानरूपी अंधकाराने ज्यांचे मन झाकले गेले आहे त्याना तुम्ही दिसत नाही. ज्यांची बुद्धी शुद्ध असते त्या साधकांना तुमचा साक्षात्कार होतो. हे भगवान रघुत्तमा, तुमच्या उदरात अनेक ब्रम्हांडे परमाणु प्रमाणे दिसतात. परंतु माझ्या उदरातून तुम्ही जन्म घेतला आहे असे जे तुम्ही प्रकट करीत आहां ती तुमची एक लीलाच आहे. यावरून मला तुमची भक्तवत्सलता दिसून आली. हे प्रभो, तुमच्या मायेने मोहित होऊन मी संसार सागरात पती, पुत्र, धन या मध्येच गुंतून जन्म, मृत्यूच्या फेर्यामध्ये फिरत होते. परंतु आज माझ्या परम भाग्याने तुमच्या पदकमळी शरण आले आहे.हे परमेश्वरा, तुमची ही मंगलमयी मनोहर मूर्ती निरंतर माझ्या हृदयात विराजमान राहो. विश्वाला मोहित करणारी तुमची माया मला मोहित न करो. हे विश्वात्मन तुम्ही हे अलौकिक रूप आवरून घ्या आणि परम आनंददायक आणि कोमल असे बालरूप धारण करा. भगवान म्हणाले हे माते, तुझी जी, जी इच्छा असेल ती पूर्ण होवो. भूमीचा भार उतरविण्यासाठी पूर्वी ब्रम्हदेवांनी माझी प्रार्थना केली होती. म्हणून रावण आदी निशाचराना मारण्यासाठी मी मानव रूपात अवतार घेतला आहे. हे पुण्यशील माते, मला पुत्र रुपाने प्राप्त करून घेण्याच्या इच्छेने दशरथासह तू सुद्धा तपस्या करून माझी आराधना केली होतीस. तू जे माझे दिव्य रूप पाहिलेस ते तुझ्या पूर्वीच्या तपस्येचे फळ आहे. माझे दर्शन हे मानवाना मोक्ष प्रदान करणारे आहे. भगवान पुढे म्हणाले माते आपणा दोघांचा हा संवाद जे साधक पठण करतील अथवा श्रवण  करतील त्याना माझ्या कृपेने त्यांच्या अंतसमयी माझी स्मृती राहील आणि नंतर माझी सरूपता मुक्ती प्राप्त होईल. अशा प्रकारे माता कौसल्येस सांगून भगवंत बालरूप घेवून रडू लागले. त्यांचे बालरूप सुद्धा इंद्रनील मण्याप्रमाणे कान्तिमय, विशाल नेत्र, अतिसुंदर नासिका, पातळ गुलाबी ओंठ आणि सुंदरशी नाजूक जीवणी असे नयन मनोहारी होते. कौसल्येने त्या दिव्य बालकास अत्यंत प्रेमभराने उचलून आपल्या मांडीवर घेतले आणि छातीशी लावले.
कौसल्येस पुत्र प्राप्ती झाल्यानंतर अल्पावधीतच कैकयीस एका पुत्राची आणि सुमित्रेस दोन जुळ्या पुत्रांची प्राप्ती झाली. यथा समयी त्यांचे नामकरण झाले. कौसल्येच्या पुत्राचे  नांव श्रीराम, कैकयीच्या पुत्राचे नांव भरत आणि सुमित्रेच्या मुलांची नांवे  अनुक्रमे लक्ष्मण आणि शत्रूघ्न अशी  ठेवली होती. चार पुत्रांसमवेत महाराज दशरथ आणि तिन्ही राण्या आनंद सागरात डुंबत होते. काळ पंख लावून उडून गेला. चारी बालके शस्त्र-अस्त्र आणि शास्त्र विद्येत पारंगत होऊन  किशोर अवस्थेस प्राप्त झाली.  एके दिवशी महाराज आपल्या चारी पुत्रांसह दरबारात बसले असताना महर्षी विश्वामित्रांचे आगमन झाले. महाराजांनी महर्षींचे यथायोग्य स्वागत करुन त्याना स्थान ग्रहण करण्याची अत्यंत नम्रभावाने विनंती केली. स्थानापन्न झाल्यानंतर  महर्षींनी यज्ञाच्या वेळी राक्षासांकडून होणार्या त्रासांचे वर्णन करून सांगितले. नंतर त्यांनी यज्ञाच्या रक्षणासाठी श्रीराम आणि लक्ष्मणास त्याच्या बरोबर पाठविण्याची विनंती केली. कुलगुरूंशी चर्चा करून महाराजांनी महर्षींची विनंती मान्य केली.
  
                         अहिल्येचा उद्धार     

  महर्षी विश्वामित्रांनी श्रीराम आणि लक्ष्मणास आपल्या यज्ञाच्या रक्षणासाठी महाराज दशरथाना विनंती करून आणले होते. दोघा बंधूनी आपल्या अतुल पराक्रमाने सर्व राक्षसाना यमसदनी पाठविले आणि यज्ञ उत्तम प्रकारे संपन्न झाला. याच वेळी महाराज जनकाकडून त्यांच्या कन्येच्या स्वयंवराचे आमंत्रण महर्षीना आले. यानुसार महर्षी विश्वामित्र, श्रीराम, लक्ष्मण आणि अन्य ऋषीगण मिथिला नगरीस जाण्यास निघाले. मार्गात त्याना एक फुला,फळांनी बहरलेला आणि वृक्ष, वेलींनी वेढलेला मुनिश्रेष्ठ गौतमांचा पवित्र आश्रम दिसला. सर्वजण त्या आश्रमात गेले.या सुंदर आश्रमात मृग, मोर, चिमण्या राघू, मैना असे कोणतेच पशु अथवा पक्षी दिसत नव्हते. हा आश्रम पाहिल्यावर श्रीरामांनी महर्षीना प्रश्न केला गुरुदेव, फुला,फळांनी समृद्ध परंतु जीव-जन्तुनी रहित असा हा पवित्र आश्रम कोणाचा आहे? हा आश्रम पाहून माझे मन आनंदित होत आहे. हे भगवन याचा वृतांत मला सांगावा. महर्षी म्हणाले हे रामा, या आश्रमात मुनिश्रेष्ठ गौतम आणि अहिल्या हे परम पावन असे दाम्पत्य रहात  होते.देवांचा राजा इंद्र, हा अहिल्येस भ्रष्ट करण्याची योग्य संधी पहात होता.एकदा गौतम ऋषी आश्रमातून बाहेर गेले असताना, इंद्राने गौतम ऋषीचे रूप घेवून आश्रमात प्रवेश केला आणि अहिल्येजवळ जाऊ लागला.परंतु तिच्या पातिव्रत्याच्या बलामुळे तो तिच्या जवळ जाऊ शकला नाही त्यावेळी कामातुर झालेल्या इंद्राने मायेने एक अन्य अहिल्या निर्माण केली आणि तिचा उपभोग घेवून आश्रमातून बाहेर पडला. त्याच वेळी गौतम ऋषीनि आश्रमात प्रवेश केला. त्यांनी आपले रूप धारण केलेल्या इंद्रास पहिले आणि अत्यंत क्रोधाने म्हणाले अरे दुष्टात्मा, अरे अधमा, माझे रूप धारण करणारा तू कोण आहेस? सत्य सांग नसता तुला भस्म करून टाकीन. त्यावेळी इंद्र म्हणाला भगवन कामवश झालेला मी देवराज इंद्र आहे. माझे रक्षण करा. त्यावेळी क्रोधाने डोळे लाल झालेल्या गौतमांनी देवराज इंद्राला शाप दिला. ते म्हणाले  अरे नीचां तू योनी लंपट आहेस म्हणून तुझ्या शरीरास सहस्त्र छिद्रे पडतील. असा शाप देवून ते घरात प्रविष्ट झाले. अहिल्येने सत्य परिस्थिती सांगण्याच्या पूर्वीच मुनींनी तिच्यावर आग पाखडण्यास सुरवात केली. ते म्हणाले हे दुष्टे, दुराचारिणी, माझ्या आश्रमातील शिला होऊन रहा. यथे यु निराहार राहून उन, वारा, पाउस सहन करीत रात्रंदिवस कठोर तप करीत आपल्या हृदयात विराजमान असलेल्या परमात्मा श्रीरामाचे ध्यान कर.  या क्षणापासून हा आश्रम विविध प्रकारच्या जीव-जन्तुने रहित होईल. अशा प्रकारे सहस्त्रो वर्षांनंतर दशरथ पुत्र श्रीराम येथे येतील आणि तुझ्या शिळेवर पाय ठेवतील त्यावेळी तू पापमुक्त होशील. असा शाप देवून गौतम ऋषी हिमालयात निघून गेले. महर्षी विश्वामित्रांनी हा वृतांत सांगितल्यावर म्हणाले हे रघुश्रेष्ठा, त्या दिवसापासून केवळ वायू भक्षण करून कठोर तप  करणारी अहिल्या तुमच्या चरणरजाच्या स्पर्शाची प्रतिक्षा करीत अन्य प्राण्यांना न दिसता आपल्या या पवित्र आश्रमात रहात आहे. असे सांगून उग्र तपामध्ये रत  असलेली अहिल्या, महर्षींनी श्रीरामाना दाखविली. त्यावेळी श्रीरामांनी आपल्या पायाने त्या शिळेस स्पर्श करून तपोनिष्ठ अहिल्येस पाहिले. तिला पाहून मी श्रीराम आहे असे सांगून भगवान श्रीरामांनी तिला प्रणाम केला. त्यावेळी रेशमी पितांबर परिधान केलेल्या श्रीरघुनाथाना अहिल्येने पाहिले. त्यांच्या खांद्यावर धनुष्यबाण विराजमान होते. त्यांच्या मुखावर स्मित होते. त्यांचे नेत्र कमळा प्रमाणे सुंदर असून वक्षस्थळ   श्रीवत्सांकाने सुशोभित होते.नीलमण्यासम कांतीने ते दाही दिशा प्रकाशित करीत होते. हे दिव्य रूप पाहून अहिल्येचे नेत्र आनंदाने भरून आले. तिला गौतमांच्या वचनांची आठवण झाली. श्रीराम हे साक्षात श्रीनारायण आहेत हे जाणून तिने त्यांचे यथाविधी पूजन केले. तिने प्रभुना दंडवत प्रणाम केला आणि सद्गतीत वाणीने श्रीरामांची स्तुती करू लागली. अहिल्या म्हणाली हे जगन्निवासा श्रीरामा आज मी कृतार्थ झाले तुमच्या लीला अनाकलनीय आहेत. तुमच्या मानवी रुपामुळे सर्व विश्व मोहित होत आहे. परम सुंदर अश्या मानव देहात श्रीहरीने या मर्त्य लोकात अवतार घेतला आहे. त्या धनुर्धारी, कमळा  समान विशाल लोचन असलेल्या भगवान श्रीरामप्रभुना मी मी नित्य भजते. ज्यांच्या नाभीतून निघालेल्या कमळात ब्रम्हदेव प्रकट झाले. ज्यांच्या नामामृताचे रसिक, स्वतः  भगवान शंकर आहेत, अश्या त्या श्रीरामचंद्रांचे मी माझ्या हृदयात अहर्निश ध्यान करते. देवर्षी नारद, ब्रम्हदेव शंकर आणि सरस्वती ज्यांच्या अवतार चरित्राचे निरंतर गायन करतात त्या प्रभुना मी शरण आले आहे. पुराण पुरुष परमात्मा श्रीराम हे एक स्वयम प्रकाशी अनंत आणि सर्वांचे आदिकारण आहेत. असे असूनही जगाला मोहित करणारे मायामय मानवी रूप त्यांनी लोकाना परम अनुग्रहित करण्यासाठी धारण केले आहे. तुम्ही एकटेच या विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय करण्यासाठी आपल्या मायेच्या तीन गुणात प्रतीबिंबीत होऊन ब्रम्हदेव, विष्णू आणि महादेव या नांवानि तीन रूपे धारण करता. अहो श्रीरामा, तुम्ही ओमकार शब्दाने वाच्य आहात.तसेच वाणीला अगोचर असे परम पुरुष तुम्हीच आहात. आकाशा प्रमाणे तुम्ही आत,बाहेर सर्वत्र विराजमान आहां.तुम्ही निर्मळ, असंग, अचल, नित्य, शुद्ध, बुद्ध, सत स्वरूप आणि अव्यय आहात.
अशा प्रकारे समोर उभे असलेल्या श्रीरामांची स्तुती करून त्याना प्रदक्षिणा घालून अहिल्या मातेने भगवंताना नमस्कार केला आणि त्यांच्या अनुमतीने ती आपल्या पतीकडे निघून गेली. अहिल्येने केलेले हे  श्रीरामांचे स्त्रोत्र जे भक्तीने पठण करतील ते सर्व पापातून मुक्त होउन परब्रम्ह पदाला प्राप्त होतील. तसेच श्रीरामचंद्र प्रभूंचे हृदयात ध्यान करून ज्या स्त्रिया भक्ती भावाने याचे पठण करतील त्या लवकरच पुत्रवती होतील अशी याची फलश्रुती सांगितली आहे.
                         श्रीराम आणि परशुरामांची भेट.
श्रीराम आणि सीता, लक्ष्मण आणि उर्मिला, भरत आणि मांडवी तसेच शत्रुघ्न आणि श्रुतकीर्ती यांचा विवाह मोठ्या थाटात संपन्न झाला. विवाहोत्तर अल्पकाळ मिथिलेस राहून महाराज दशरथ, आपले चार पुत्र, पुत्रवधू आणि वशिष्ठ आदी ऋषी समवेत अयोध्या नगरी जाण्यास निघाले ते मिथिला नगरीपासून तीन-चार योजने दूर गेले असताना कोटी सूर्याप्रमाणे तेजस्वी, विजेच्या पुंजाप्रमाने कान्तिमय तेजाने संपन्न, निळ्या मेघासारखा वर्ण असलेले, उंच, हातात धनुष्य आणि परशु धारण केलेले जमदग्नी पुत्र परशुराम येत असल्याचे महाराज दशरथाना दिसले. त्याना पहातच महाराज अत्यंत भयभीत झाले आणि रक्षण करा, रक्षण करा असे म्हणू लागले. परंतु त्यांच्या म्हणण्याकडे लक्ष न देता क्रोधाने थर-थरणारे परशुराम राघुश्रेष्ठ श्रीरामचंद्राना  निष्ठूरपणे म्हणाले अरे अधम क्षत्रिया, तू राम या माझ्या नांवाने मिरवीत आहेस. तू जर खरा क्षत्रीय असशील तर माझ्याबरोबर द्वंद युद्ध कर. एक जुने, जीर्ण,शीर्ण धनुष्य तोडून तू उगाच शेखी मिरवीत आहेस. हे राघवा, या वैष्णव धनुष्यास तू दोरी लावलीस तर मी तुझ्याबरोबर युद्ध करीन. नसता आत्ताच मी तुम्हा सर्वाना ठार करीन. परशुरामाच्या या वक्तव्यावर पृथ्वी चळ-चळा कापू लागली आणि सर्वांच्या डोळ्यासमोर अंधकार पसरला. दशरथ नंदन, वीरश्रेष्ठ श्रीरामांनी परशुरामाच्या हातातून त्यांचे धनुष्य हिसकावून घेतले, अत्यंत सहजपणे त्यावर दोरी चढवली आणि आपल्या भात्यातून एक बाण काढून तो धनुष्यास जोडला आणि म्हणाले अरे ब्राम्हणा माझा हा बाण अमोघ आहे त्याचे लक्ष्य दाखवा.आपल्या पुण्याने जिंकलेले लोक अथवा तुमचे दोन चरण यापैकी एक बाणाचे लक्ष्य म्हणून तत्काळ सांगा. यामुळे तुम्ही इहलोकी अथवा परलोकी कोठेही जाऊ शकणार नाही. रामचंद्र प्रभू असे बोलत असताना परशुरामाचे मुख निस्तेज झाले.नंतर पूर्वीच्या वृतांताचे स्मरण करीत ते बोलले अहो रामा, तुम्ही परमेश्वर आहात हे मला आताच कळले आहे. विश्वाची उत्पती, स्थिती आणि लय यांचे कारण असणारे पुराणपुरुष भगवान विष्णू तुम्हीच आहां. बालपणी मी भगवान विष्णूंची तपाने आराधना आराधना केली होती. त्यावेळी प्रसन्न होऊन ते  मला म्हणाले होते, हे ब्राम्हणा तुझे महान तप सफल झाले आहे.माझ्या चैतन्याच्या अंशाने तू युक्त झाला आहेस. तुझ्या पित्याचा वध करणार्या हैहव श्रेष्ठ कार्तविर्यास ठार कर नंतर एकवीस वेळा सर्व अधम क्षत्रियांचा वध करून संपूर्ण पृथ्वी कश्यपाना देवून शांती धारण कर. त्रेता युगाच्या प्रारंभी मी दशरथपुत्र होऊन श्रीराम या नांवाने जन्म घेईन, त्यावेळी सीता या माझ्या शक्तिसह मला पाहशील. त्यावेळी मी पूर्वी दिलेले तेज तुझ्याकडून परत घेईन. यानंतर तू तपस्या करीत काल्पांता पर्यंत  पृथ्वीवर रहा. असे सांगून भगवान विष्णू अंतर्धान पावले होते. परशुराम पुढे म्हणाले हे रामा ते विष्णू तुम्हीच आहात. तुमचे तेज जे माझ्याकडे  होते ते तुम्ही परत घेतले आहे. हे प्रभू तुम्हाला मी विष्णूंच्या  रूपात ओळखले आहे, त्यामुळे माझा जन्म सफल झाला आहे. अहो रामा, हे आश्चर्य कसे ते पहा ना, पाण्यापासून पाण्याचा जसा फेसाचा समुह, अग्नी पासून अग्नीवर जसा धूर उत्पन्न होतो आणि त्यालाच झाकून टाकतो त्याच प्रमाणे तुमच्याच आधाराने असणारी माया तुम्हाला विषय करून नाना प्रकारची विचित्र कार्ये निर्माण करते आणि तुमच्या सत्य स्वरूपाला झाकून टाकते. जोपर्यंत मानव मायेने झाकलेला असतो तोपर्यंत तो तुम्हास जाणत नाही. अविवेकामुळे उत्पन्न झालेली ही अविद्या, जो पर्यंत सखोल विचार केला जात नाही तोपर्यंत ती टिकून रहाते. अविद्येमुळे निर्माण झालेल्या देह इत्यादींच्या समूहामध्ये प्रतिबिंबित झालेल्या चित्-शक्तीलाच जीव असे म्हटले जाते. जो पर्यंत हा जीव मन, प्राण, बुद्धी इत्यांदिच्या बद्दल अभिमान धारण करतो, तो पर्यंत तो कर्तृत्व,  भोक्तृत्व, सुख, दुःख इत्यादी भोगतो. वास्तविक पहाता आत्म्यास जन्म, मरण, संसार इत्यादी कोणत्याही अवस्था असत नाहीत. बुद्धी ही अविद्येचे कार्य असल्याने तिच्या ठिकाणी सुद्धा ज्ञान, शक्ती असत नाही. अविवेकाने ते दोन्ही एकत्र करून मी संसारी आहे असे मानून जीव कर्म करण्यास प्रवृत्त होतो. पाणी आणि अग्नी यांचा संयोग झाला असता ज्याप्रमाणे पाण्यात उष्णता येते आणि अग्नी शांत होतो, त्याच प्रमाणे  जडस्वरूप असलेल्या बुद्धीचा चेतन स्वरूपी आत्म्याशी संयोग झाला असता बुद्धीमध्ये चेतना येते आणि त्या चेतन आत्म्याचे ठिकाणी कर्तृत्व, भोक्तृत्व इत्यादी जडत्व प्रकट होते.हे रामा, ज्यावेळी मनुष्य तुमच्या भक्तांच्या संगतीने प्राप्त झालेल्या भक्तीमुळे तुमची उपासना करतो तेंव्हा तुमची माया हळू हळू निघून जावून ती क्षीण होऊन जाते. यानंतर त्या साधकाला तुमच्या ज्ञानाने संपन्न अशा सद्गुरूंची प्राप्ती होते. त्यांच्याकडून महावाक्यांचे ज्ञान मिळाल्या नंतर तो तुमच्या कृपेने मुक्त होतो. तुमच्या चरण युगलांवर जन्मो-जन्मी भक्ती असू दे. तसेच तुमच्या भक्तांची संगती मला निरंतर लाभू दे. या दोन्ही साधनांनी अविद्या नष्ट होते. नंतर परशुराम श्रीरामचंद्रांच्या चरणी नतमस्तक होऊन म्हणाले हे जगन्नाथा तुम्हाला नमस्कार असो. हे अनंता, तुम्हाला नमस्कार असो. या वेळी करुणामय भगवान श्रीराम प्रसन्न होऊन म्हणाले हे ब्राम्हणा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुमच्या मनात ज्या,ज्या इच्छा असतील त्या सर्व मी पूर्ण करीन. त्यावेळी अत्यंत आनंदित मनाने परशुराम श्रीरामचंद्र प्रभुना म्हणाले हे मधुसुदना रामा, जर तुमची माझ्यावर कृपा असेल तर मला निरंतर तुमच्या भक्तांची संगती प्राप्त होवो आणि तुमच्या चरणकमलांवर माझी अखंड भक्ती असू द्यावी. एखादा पुरुष भक्ती रहित असून सुद्धा तो जर या स्तोत्राचे पठण करील तर त्याला सर्वदा तुमची भक्ती प्राप्त होवो, तसेच त्याला ज्ञान सुद्धा प्राप्त होउन त्याला अंतकाळी तुमची स्मृती राहो.  असेच होऊ दे. असे श्री रघुनाथांनी म्हटल्यावर
परशुरामांनी श्रीरामाना तीन प्रदक्षिणा घालून नमस्कार केला आणि त्यांच्या आज्ञेने महेंद्र पर्वताकडे निघून गेले. श्रीराम  जणू मृत्युच्या मुखातून परत आले असे वाटून महाराज दशरथानी अत्यंत आनंदाने श्रीरामाना वारंवार आलिंगन दिले. त्यावेळी त्यांच्या नेत्रातून आनंदाश्रू वाहू लागले. यानंतर महाराज दशरथ, सर्व लवाजम्यासह स्वस्थ चित्ताने अयोध्या नगरीस पोहोचले.
 महाराज दशरथ आपल्या तीन राण्या, चार पुत्र आणि चार पुत्रवधू यांच्यासह आनंदाने  जीवनाचा आनंद घेत राज्यकारभार उत्तम प्रकारे चालवीत होते. परंतु त्याना आता राज्याचा भार श्रीरामावर सोपवून आपण विश्रांती सुखाचा लाभ घ्यावा असे वाटू लागले होते

                   श्रीराम आणि देवर्षी नारद यांचा संवाद    
                         
एके दिवशी श्रीरामचंद्र प्रभू रत्नजडीत सिंहासनावर सुखाने बसले होते. नील कमलाप्रमाणे त्यांच्या सुंदर वर्णास गळ्यातील कौस्तुभ मणी  अत्यंत शोभून दिसत होता. यावेळी त्यांचे दर्शन घेण्यासाठी देवर्षी नारद आकाश मार्गाने आले. शुद्ध स्फटिक मण्याप्रमाणे स्वच्छ आणि शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे निर्मळ  आणि दिव्य दृष्टी असणार्या  देवर्षी नारादाना  पहाताच भगवान श्रीराम लगबगीने उठले आणि सीतेसह, भक्तियुक्त अंत:करणाने प्रथम त्यांनी हात जोडले आणि नंतर जमिनीवर मस्तक टेकवून देवर्षीना नमस्कार केला. भगवान श्रीराम देवर्षीना म्हणाले हे मुनिश्रेष्ठा, आमच्या सारख्या संसारी लोकाना आपले दर्शन अत्यंत दुर्लभ आहे. हे मुनी मी पूर्व जन्मात केलेल्या पुण्याच्या संचयानेच मला आज आपले दर्शन होत आहे आणि सत्संगाचा लाभ होणार आहे. आज मी आपल्या दर्शनाने कृतार्थ झालो. आता आपले अभिष्ट कार्य सांगा मी ते पूर्ण करीन. श्रीरामचंद्र प्रभूंचे हे अत्यंत नम्रतायुक्त आणि मार्दवपूर्ण वक्तव्य ऐकून देवर्षी नारद म्हणाले प्रभू रामा, सामान्य मानवाप्रमाणे बोलून मला मोहित का करीत आहां? आपण मी संसारी आहे असे जे म्हटले ते योग्यच आहे, कारण संपूर्ण विश्वाचे आदिकारण जी माया तीच तुमची गृहिणी आहे. तुमच्या केवळ सानिध्यानेच  त्या मायेपासून ब्रम्हा, शिव आदी देव उत्पन्न झाले आहेत. सत्व,रज आणि तम या त्रिगुणांनी युक्त अशी जी माया आहे ती तुमच्या आश्रयानेच सर्वदा भासमान होते. तसेच ती स्वगुणाना अनसरून शुक्ल आणि कृष्णवर्ण प्रजा निर्माण करते. त्रैलोक्याच्या या समूहरूपी विशाल गृहात तुम्हीच गृहस्थांश्रमि आहात. तुम्ही विष्णू आहात आणि जानकी ही  लक्ष्मी आहे. देवर्षी पुढे म्हणाले प्रभू, तुमच्या आभासामुळे निर्माण होणार्या अज्ञानाला अव्याकृत असे म्हटले जाते. त्यापासून महत् हे तत्व, त्या महत् तत्त्वापासून सूत्रात्मा म्हणजे हिरण्यगर्भ आणि त्यापासून सर्वात्मक लिंगदेह निर्माण होतो. मन, बुद्धी, अहंकार, पंच प्राण आणि दहा इंद्रिये यांच्या समुहालाच तज्ञ लोक, जन्म, मृत्यू, सुख, दु:ख इत्यादी धर्म असणारे लिंगशरीर असे म्हणतात.या देहाचा अभिमानी या जगात जीव या नांवाने ओळखला जातो. अनिर्वचनीय आणि अनादी अशी अविद्या ही या जीवाची कारण उपाधी आहे. शुद्ध चैतन्याला स्थूल. सूक्ष्म आणि कारण अशा तीन देहांच्या उपाधी आहेत. जीव या तीन उपाधींनी युक्त आहे. उपाधिरहित झाल्यावर हाच जीव परमेश्वर पद प्राप्त करून घेतो. हे रघूश्रेष्ठा, जागृती,स्वप्न आणि सुषुप्ती अशी जी तीन प्रकारची सृष्टी आहे तिच्यापेक्षा तुम्ही संपूर्णपणे भिन्न आहात. केवळ चैतन्यरूप असे तुम्ही तिचे साक्षी आहां. हे संपूर्ण जगत तुमच्यापासूनच निर्माण झालेले आहे. तुमच्या ठिकाणीच स्थित आहे आणि  संपूर्णपणे  तुमच्यातच लीन होऊन जाते. म्हणून तुम्हीच सर्वांचे कारण आहात. रज्जूच्या ठिकाणी दिसणार्या सर्पाप्रमाणे स्वतःला जीव मानल्यामुळे मनुष्याला भयं वाटते. परंतु मीच परमात्मा आहे असे जेंव्हा मनुष्य जाणून घेतो तेंव्हा संपूर्णपणे  भयं, दुःख यातून मुक्त होऊन जातो. चिन्मात्र ज्योती स्वरूपाने तुम्ही सर्व देहात राहून सर्व देहातील सर्व बुद्धीना प्रकाशित करता म्हणून तुम्हीच सर्वांचे आत्मा आहात. रज्जूवर भासणार्या सर्पा प्रमाणे,  अज्ञानामुळे तुमच्या ठिकाणी सर्व जगताची कल्पना केली जाते. परंतु ज्ञान झाल्यावर सर्व कांही लीन होऊन जाते. म्हणून मनुष्याने नेहमी ज्ञान प्राप्तीचा अभ्यास करावयास हवा. तुमच्या चरणकमलावरील भक्तीने युक्त असणार्या पुरुषांनाच ज्ञानाची प्राप्ती होते आणि तेच मुक्तीला पात्र होतात. हे प्रभो, मी तुमच्या भक्तांच्या भक्तांचा दास आहे. मला मोहित न करीता माझ्यावर अनुग्रह करा. हे भगवंता तुमच्या नाभीकमलापासून उत्पन्न झालेले ब्रम्हदेव माझे पिता आहेत म्हणून मी तुमचा नातू आहे. अशा प्रकारे बोलून आणि वारंवार प्रणाम करून आनंदाश्रूंनी भरून येवून देवर्षी पुढे म्हणाले हे प्रभू, ब्रह्मदेवांच्या प्रेरणेने मी तुमच्याकडे आलो. रावणाचा वध करण्यासाठी तुमचा अवतार झाला आहे. आता तुमचे पिता दशरथ महाराज तुमचा राज्याभिषेक करणार आहेत. जर तुम्ही राज्यामध्ये आसक्त होऊन रावणाचा वध केला नाही तर भूमीचा भार हरण करण्याची जी तुम्ही प्रतीज्ञा केली ती असत्य  होईल.  देवर्षीचे हे वक्तव्य ऐकल्यावर श्रीराम त्याना म्हणाले अहो देवर्षी अशी कोणती गोष्ट आहे की  जी मला ज्ञात नाही. पूर्वी मी जी प्रतीज्ञा केली होती ती पूर्ण करीन. सर्व असुराना मारून मी पृथ्वीचा भार हरण करीन. रावणाचा वध करण्यासाठी उद्याच मी दंडकारण्यात जाण्यास निघेन आणि मुनींचा वेश धारण करून चौदा वर्षे तेथे राहीन. सीतेला निमित्त करून त्या दुष्टांचा कुळासह नाश करीन.श्रीरामचंद्रांनी अशी
प्रतीज्ञा केल्यावर नारदाना अतिशय आनंद झाला. त्यानंतर श्रीरामाना तीन प्रदक्षिणा घालून दंडवत प्रणाम करून आणि श्रीरामांची आज्ञा घेवून देवर्षी आकाश मार्गाने देवलोकी निघून गेले  मुनिश्रेष्ठ नारद आणि श्रीरामचंद्र यांचा हा संवाद जे भक्तीभावाने पठण करतील अथवा श्रद्धाभावाने श्रवण करतील ते क्रमा-क्रमाने कैवल्यरुपी मोक्षपद प्राप्त करून घेतील. __________________________________________________________________      

               वनात जाण्यापूर्वी श्रीरामांनी लक्ष्मणास केलेला उपदेश.

श्रीरामांना राज्याभिषेक करण्याचा महाराज दशरथानि  निश्चय केला आणि त्यासाठी तयारी सुद्धा प्रारंभ झाली. ही वार्ता ऐकून सर्वजण अत्यंत आनंदित झाले.परंतु कैकयीची प्रिय दासी मंथरा मात्र दुःखी झाली. ती त्वरेने कैकयीकडे आली आणि तिने श्रीरामना राज्यपद मिळाल्यास तिची (कैकयीची) कशी दयनीय अवस्था होईल याचे भीषण चित्र रेखाटले. अल्पमती कैकयीस ते सत्यच वाटले आणि तिने मंथरेस कांही उपाय सुचविण्यास सांगितले. दुष्टबुद्धी मंथरेने कैकयीस दशरथ महाराजांनी पूर्वी दिलेल्या दोन वरांची आठवण करून दिली आणि म्हणाली महाराणी, तू एका वराने भरतासाठी राज्यपद मागून घे आणि दुसर्या वराने श्रीरामाना चौदा वर्षे वनवासात पाठविण्यास सांग. मंदबुद्धी कैकयीने महाराज द्शरथाना हे दोन वर देण्यास भाग पाडले. 
कैकयीने मागीतलेल्या दोन वरांची पूर्तता करण्यासाठी श्रीरामचंद्र प्रभू चौदा वर्षासाठी वनवासात जाण्यास निघाले. वनात जाण्यापूर्वी ते माता कौसल्येस भेटण्यासाठी आले. श्रीराम चौदा वर्षासाठी वनवासात जाणार असल्याचे ऐकून ती माता मूर्च्छितच झाली. थोड्या वेळाने शुद्धीवर आल्यानंतर ती विलाप करू लागली. ती म्हणू लागली कैकयीला वर देणारे महाराज तिला खुशाल देवोत. परंतु तू कैकयीचा अथवा महाराजांचा कोणता अपराध केला आहेस? ती पुढे म्हणाली हे रामा तुझे पिता जसे तुझे गुरु आहेत तशीच मी सुद्धा j त्यांच्या पेक्षा अधिक प्रमाणात तुझी गुरु आहे.जरी पित्याची वनात जाण्याची आज्ञा केली असले तरी मी माझ्या पुत्राला थांबविन. माझ्या वचनांचे उल्लंघन करून जर तू महाराजांच्या आज्ञेने वनात जाशील तर मी प्राणत्याग करीन. कौसल्या मातेचे हे वचन श्रीरामांच्या शेजारी उभ्या असलेल्या लक्ष्मणाने ऐकले आणि अत्यंत क्रोधायमान होऊन तो म्हणाला, भ्रांतचित्त झालेल्या कैकयीला वश झालेल्या राजा दशरथाला कैद करून, भरताला आणि त्याला सहाय्य करणार्या त्याच्या मामाला सुद्धा मी ठार करुन टाकीन. शत्रूंचे दमन करणार्या श्रीरामा तुम्ही स्वःतावर राज्याभिषेक करवून घेण्याची तयारी करा यामध्ये विघ्न आणणार्याना मी हातात धनुष्य घेवून ठार करीन. श्रीरामावर अत्यंत प्रेम असलेल्या लक्ष्मणाचे हे वक्तव्य ऐकून प्रभूनि लक्ष्मणास आलिंगन दिले आणि त्याला शांत करीत म्हणाले, हे लक्ष्मणा तू फार शूर वीर आहेस आणि माझे हित जपण्यास तत्पर आहेस तू जे काही म्हटलेस ते सर्व सत्य असले तरी तसे करण्याची ही वेळ नाही. हे जे सर्व राज्य, तसेच आपले देह इत्यादी जे दिसते आहे ते जर सत्य असते तर त्या संदर्भातील तुझे परिश्रम सफल झाले असते. परंतु तसे नाही मेघांचे समुहात असणार्या विजेच्या लख-लखाटा प्रमाणे भोग  हे चंचल न टिकणारे असतात. मानवाचे जीवन हे अग्नीने तापलेल्या लोखंडावर पडलेल्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे क्षणभंगुर आहे. सर्पाच्या तोंडात अडकलेला बेडूक सुद्धा  ज्या प्रमाणे माशा खाण्याची इच्छा करतो त्याच प्रमाणे काळरूपी सर्पाने ग्रस्त झालेले लोक सुद्धा अनित्य भोगांची इच्छा करीत असतात. शरीराला भोग मिळावेत म्हणून मनुष्य रात्रंदिवस कष्ट करून मोठ्या दुःखाने कर्माच्या खटपटी करतो. परंतु देह हा आत्म्यापेक्षा भिन्न आहे हे जर विवेकामुळे कळून आले तर कोणता मनुष्य भोग भोगू शकेल. माता, पिता, बंधू, भगिनी,पुत्र, पत्नी तसेच अन्य नातेवाईक यांच्याशी होणारी आपली भेट पाणपोईवर जमलेल्या प्राण्यांच्या भेटी सारखी अथवा नदीच्या प्रवाहात एकत्र आलेल्या लाकडांच्या ओंडक्या समान क्षणिक आहे लक्ष्मी ही छायेप्रमाणे चंचल असल्याचा अनुभव आहे. पाण्यावरील तरंगाप्रमाणे तारुण्य हे अनित्य आहे स्त्रीसुख हे स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे आणि आयुष्य अल्प आहे. तथापि प्राण्याना केवढा अभिमान असतो तो बघ ना. रोग, दुःख, अत्याचार आदींनी सदैव भरलेला हा संसार स्वप्नाप्रमाणे आहे किंवा गंधर्वनगरी प्रमाणे भासमान होणारा आहे. तो सत्य मानून मूढ लोक त्याचे अनुसरण करतात. सूर्याच्या उदय आणि अस्त या बरोबरच मानवाचे आयुष्य क्षीण होत असते तसेच इतर लोकांचे वार्धक्य आणि मरण पाहून सुद्धा मूढ मनुष्य कधीच जागा होत नाही. मतिमंद माणूस भोगांच्या मागे धावत सुटतो. त्याला काळाचा वेग कळत नाही. वृद्धावस्था ही एखाद्या वाघीणी सारखी भिववित समोर उभी असते आणि मृत्यू सुद्धा तिच्या बरोबरच  अंतकाळाची वाट पहात चालत असतो. तथापि, कृमी, विष्ठा, आणि भस्म असे स्वरूप असलेल्या या शरीराबद्दल अहंभाव धारण करणारा प्राणी हा मी लोकप्रसिद्ध राजा आहे असे समजत असतो. हे लक्ष्मणा ज्याच्या आधाराने तू जगास दग्ध करू इच्छितोस तो देह त्वचा, अस्थी, मांस आदींनी बनलेला असून विकार पावणारा आहे. तो देह आपला आत्मा कसा असू शकेल सांग बरे.देहाचा अभिमान  बाळगणारया पुरुषाच्या ठिकाणीच सर्व दोष प्रकट होतात. देह म्हणजे मी, अशी जी बुद्धी तिचेच अविद्या हे नांव आहे. मी देह नाही, मी चेतन आत्मा आहे अशा बुद्धीला विद्या असे म्हटले जाते. जीवन-मरण रूपी संसाराचे कारण अविद्या आहे. तिला निवृत्त करणारी विद्या आहे. म्हणून मोक्षाचि इच्छा असलेल्या साधकांनी नेहमी विद्येच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करावेत. या प्रयत्ना मध्ये काम, क्रोध इत्यादी विकार विघ्न आणणारे  शत्रू आहेत. क्रोध हा एकटाच मोक्षमार्गत विघ्न आणण्यास पुरेसा आहे क्रोध हाच मनुष्याला संसारात बद्ध करणारा आहे. तो धर्माचा क्षय करणारा आहे. म्हणून तू क्रोधाचा त्याग कर. क्रोध हा एक महान शत्रू आहे तृष्णा म्हणजे वैतरिणी नदी आहे. संतोष हा नंदनवन आहे आणि शांती ही कामधेनु आहे. म्हणून शांती धारण कर. त्यामुळे क्रोधरूपी  शत्रूचा तुझ्यावर प्रभाव पडणार नाही. आत्मा हा देह, मन, इंद्रिये, प्राण, बुद्धी  इत्यादी पेक्षा संपूर्णपणे भिन्न आहे. तो शुद्ध, स्वयंप्रकाशी, विकार रहित, आणि आकार रहित आहे. जो पर्यंत मनुष्य हा भेद जाणत नाही तोपर्यंत ते संसारातील दुःखे भोगीत रहातो. म्हणून हे लक्ष्मणा आत्मा हा देह, बुद्धी, मन इत्यादी पेक्षा भिन्न आहे ही  गोष्ट मनात सतत बाळगून ठेव. हे जाणून तू सर्व बाह्य व्यवहार कर. प्रारब्ध सुखरूप अथवा दुःखरूप असेल  तसे भोगत तू मनामध्ये खेद करू नकोस. हे रघुकुलोत्पन लक्ष्मणा बाह्य जगात सर्वत्र इंद्रिये इत्यादींचे द्वारा कर्तृत्व प्रकट करीत प्रारब्धाच्या प्रवाहात उपस्थित झालेले कार्य करताना सुद्धा तू कर्म बंधनात पडणार नाहीस आणि दुःखाने बाधित होणार नाहीस. असे सांगून श्रीराम मातेकडे वळले आणि म्हणाले हे आई तू सुद्धा मी सांगितलेल्या गोष्टीवर नेहमी मनात विचार कर. माझ्याशी पुन्हा होणार्या भेटीची तू प्रतिक्षा कर. तुला फार काळ  दुःख सोसावे लागणार नाही. ज्याप्रमाणे नद्यांच्या प्रवाहात पडलेल्या नावांचे नेहमी एकत्र असणे संभवत नाही त्याप्रमाणे प्रारब्ध कर्मगतीमुळे सर्व जीवांचे एकत्र राहणे शक्य नसते चौदा वर्षाचा काळ अर्ध्या क्षणाप्रमाणे जाईल. म्हणून हे आई, दुःखाला दूर ठेवून मला वनगमनाची अनुमती दे.
                   निषादराज गुह आणि लक्ष्मण यांचा संवाद

श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेला रथात बसवून सुमंत्राने रथ चालविण्यास प्रारंभ केला. अयोध्येची समस्त जनता रथामागे जात होती. सायंकाळच्या वेळी रथ तमसा नदीच्या किनारी पोहोचला. या ठिकाणी श्रीरामप्रभू आणि सीता एका वृक्षाच्या खाली झोपले. अयोध्यावासी सुद्धा नदीकिनारी गाढ झोपले. या वत्सलमूर्ती जनते पासून सुटका करून पितृवचनाचे पालन करण्यासाठी श्रीरामांनी रात्रीच्या तिसर्या प्रहरी सुमंत्रास उठविले आणि रथ सज्ज करण्यास सांगितले. अल्पावधीतच श्रीराम, लक्ष्मण आणि सीता रथात आरूढ झाले आणि रथ अयोध्येच्या दिशेने थोड्या अंतरापर्यंत नेला आणि नंतर ते घोर अरण्याच्या दिशेने वेगात निघून गेले. थोड्याच वेळात पुर्व दिशेस आसमंतात सूर्याची लाली पसरली, कोकिळा, मैना मधुर स्वरात गाऊ लागल्या जणू त्या प्रभू रामचंद्रांचे स्वागतच करीत होत्या. रथ शृंगवेर  नगरापासून अगदी जवळ असलेल्या गंगा नदीच्या तीरावर पोहोचला. त्या सर्वानी गंगा नदीस नमस्कार केला आणि नदीत स्नान केले. नंतर ते सर्वजण एका शिसवी वृक्षाच्या छायेत विसावले. श्रीरामचंद्रप्रभू सीता आणि लक्ष्मणासह गंगा किनारी आले असल्याची वार्ता निषादराज गुहाला कळताच तो अत्यंत आनंदित होऊन प्रभुना भेटण्यासाठी बरोबर फळे,फुले,मध आदी घेवून आला. त्याने नजराण्याची सामुग्री समोर ठेवून श्रीरामाना दंडवत प्रणाम केला.त्यावेळी त्याला उठवून रघुनाथांनी त्याला मोठ्या प्रेमाने आलिंगन दिले आणि कुशल मंगल विचारले. त्यावेळी गुह इतका आनंदित झाला होता कि थोडा वेळ तो प्रभूकडे नुसता पहातच उभा राहिला. नंतर स्वतःला सावरून घेवून म्हणाला लोकपावन रामा, आज मी धन्य झालो. माझा निषाद जातीतील जन्म सफल झाला. तो पुढे म्हणाला हे रघुवरा, तुमच्या या सेवकाचे राज्य तुमचेच आहे. म्हणून तुम्ही येथेच राहून आमचे पालन करा. या, आपण आमच्या नगरीत जाऊ या. माझ्या घरात प्रवेश करून ते आपल्या चरण रजाने पावन करा. मी तुमचा दास आहे मजवर कृपा करा. गुहाचे हे वक्तव्य ऐकून अत्यंत प्रसन्न झालेले श्रीराम गुहाला म्हणाले अरे मित्र, पित्याची आज्ञा पालनासाठी मी चौदा वर्षे कोणत्याही गावात अथवा घरात प्रवेश करणार नाही तसेच कुणी दिलेली फळे, मुळे खाणार नाही. तुझे हे संपूर्ण राज्य माझेच आहे, कारण तू माझा अतिशय प्रिय मित्र आहेस. यानंतर श्रीराम आणि सीतेने केवळ पाणी पिले. लक्ष्मणाने कुश,पाने इत्यादींच्या सहाय्याने जमिनीवर शय्या तयार केली.या शय्येवर श्रीराम आणि सीता पहुडले आणि लक्ष्मण गुह बरोबर आपले धनुष्य बाण घेवून चौफेर नजर फिरवीत त्यांचे रक्षण करू लागला.श्रीराम आणि सीता याना कुश शय्येवर निजलेले पाहून निषादराज गुहाचे नेत्र अश्रुनी भरून आले. तो अत्यंत विनयाने लक्ष्मणास म्हणाला बंधू लक्ष्मणा, पहा ना जे रघुनाथ कालपर्यंत आपल्या भव्य महालातील शृंगारलेल्या सुवर्ण मंचकावर जानकीसह शयन करीत होते तेच प्रभू आज या कुश आणि पानांनी बनविलेल्या शय्येवर निजले आहेत. विधात्याने श्रीरामांच्या या दुःखाचे कारण कैकयीला बनविले. मन्थरेच्या बुद्धीवर विश्वास ठेवून कैकयीने हे घोर पापकर्म केले. गुहाचे वक्तव्य ऐकून लक्ष्मण म्हणाला मित्रा, माझे वचन ऐक. एखाद्याच्या दुःखाचे अथवा सुखाचे कारण दुसरा कोणी होऊ शकत नाही. मनुष्याने पूर्वी केलेले कर्मच त्याच्या सुख अथवा दुःखास कारण बनते. मनुष्याला सुख,दुःख देणारा अन्य कोणी नसतो. मी करतो हा मानवाचा व्यर्थचा अभिमान आहे कारण मानव हा स्वत:च्या कर्माच्या दोरीने बांधलेले असतो. स्वतःच नाना प्रकारची कर्मे करणारा पुरुष आपल्या भावने प्रमाणे मित्र, सुह्रद, शत्रू, उदासीन द्वेष्य, मध्यस्थ, बांधव इत्यादी वेगवेगळ्या कल्पना  करीत राहतो. स्वतःच्या प्रारब्धानुसार जे जे सुख अथवा दुःख येईल ते मानवाने भोगून स्वस्थ चित्ताने रहावे. आपण भोगाच्या प्राप्तीची इच्छा करू नये. भोग येऊ नयेत अशीही इच्छा करू नये. माझ्याकडे भोग येवोत अथवा न येवोत असे मानून भोगांच्या अधीन होऊ नये. ज्याने जे शुभ अथवा अशुभ कर्म केले असेल ते त्याला येथेच भोगावे लागते. यापेक्षा वेगळे असे कांही घडत नाही. म्हणून शुभ अथवा अशुभ फलाची प्राप्ती झाली असता हर्ष अथवा विषाद मानू नये. कारण विधात्याने जे कांही ठरविलेले असते ते देव किंवा असुर याना सुद्धा चुकविणे शक्य नसते. मानव शरीर हे पुण्य आणि पाप यांच्यामुळे निर्माण होते म्हणून ते सुख आणि दुःखानि युक्त असते. सुखा नंतर दुःख येते आणि दुःखा नंतर सुख हे दिवस आणि रात्री प्रमाणे मनुष्यास टाळता येत नाहीत. म्हणून हे सर्व कांही माया आहे या भावनेने विद्वान लोक इष्ट अथवा अनिष्ट यांची प्राप्ती झाली असता धीर धरून, अति आनंदितही होत नाहीत अथवा अनिष्टाने अति दुःखी होत नाहीत. अशाप्रकारे लक्ष्मण आणि गुह यांचा संवाद चालू असताना आकाश उजळून गेले आणि  पहाट झाली. कोकिळा, मैना आपल्या मधुर सुरात गाऊ लागल्या जणू प्रभूंचे स्वागत करीत होत्या. श्रीरामचंद्रांनी उठून पाण्याने आचमन करून प्रात:कालची संध्यावंदन आदी उरकले. नंतर श्रीराम गुहाला म्हणाले मित्रा, माझ्यासाठी एक चांगली बळकट नाव त्वरित घेवून ये.  गुहाने एक उत्तम नाव आणली. यावेळेपर्यंत निषादराजचे सर्व आप्त, मित्र,सखे गंगाकिनारी श्रीरामप्रभूंच्या दर्शनासाठी जमा झाले होते. गुहाने आपल्या भार्येसहित प्रभूंची पाद्य पूजा केली आणि ते जल आपल्या शिरी धारण करून तो कृतकृत्य झाला. निषादराज नंतर त्याच्या सर्व आप्तांनि, श्रीरामांचे अत्यंत श्रद्धाभावाने  पूजन केले. यानंतर श्रीरामांनी जानकीस आपला हात देवून नावेत चढविले. लक्ष्मण आणि स्वतः प्रभू नावेत बसल्यानंतर गुहाने  आपल्या दोन सहाध्यायासह  नाव सुरु केली. ज्यावेळी नाव नदीच्या मध्यभागी आली त्यावेळी जानकी देवीने गांगामातेची प्रार्थना केली. ती म्हणत होती हे माते तुला नमस्कार असो. वनवासातून परत आल्यानंतर श्रीराम आणि लक्ष्मणासह तुझी पूजा करीन.  गंगा माता आपल्या लाटाद्वारे आशीर्वाद देत जणू म्हणत होती हे जानकी तुमचे नियोजित कार्य सफल होवो.  श्रीरामांच्या समवेत हा हा जलप्रवास अत्यंत आनंददायक होता. वाटत होते कि हा असाच चालू राहावा. परंतु थोड्या वेळातच नाव पैलतीरी पोहोचली आणि सर्वजण नावेतून खाली उतरले. निषादराज श्रीराम प्रभुना म्हणाला हे राजेंद्रा, मी सुद्धा तुमच्या बरोबर येतो मला तशी अनुज्ञा द्या, नसता मी प्राणत्याग करीन. गुहाचे हे वचन ऐकताच श्रीराम प्रभू समजावणीच्या सुरात म्हणाले हे मित्रा चौदा वर्षांचा वनवास संपवून मी पुन्हा येथे येईन. मी जे बोलतो ते सदैव सत्यच असते. ते कधीच खोटे होत नाही. हे बोलताना प्रभूंचा गळा प्रेमाने भरून आला होता. त्यांनी निशादराजास गाढ आलिंगन  दिले. त्या वात्सल्यपूर्ण स्पर्शाने गुहाचे मन शांत झाले. त्याने  आपल्या साथीदारासह प्रभुना पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार केला आणि मोठ्या जड अंत:करणाने त्या तिघांचा निरोप घेतला.          ********************************************************************
     
               पंचवटीच्या निवासात श्रीरामांचा लक्ष्मणास उपदेश
गुहाचा निरोप घेवून श्रीराम,लक्ष्मण आणि सीता वार्तालाप करीत, सृष्टीसौंदर्याचा आस्वाद घेत,घेत चालले  होते. थोड्याच अंतरावर त्याना भारद्वाज मुनींचा आश्रम दिसला. श्रीरामांचे दर्शनाने महर्षी अत्यंत आनंदित झाले त्यांनी तिघांचे यथायोग्य स्वागत केले आणि मधुर फळे खावयास दिली. रात्री महर्षींच्या आश्रमातच निवास करून प्रात:काल होताच ते चित्रकुट पर्वताकडे निघाले. चालत,चालत ते तिघे माध्यानापर्यंत पर्वताजवळ  येवून पोहोचले. येथील निसर्गरम्य वातावरणाने त्यांचा शीण पार नाहीसा झाला. येथेच आश्रम बांधून ते तिघे आनंदात राहु लागले. अयोध्येमध्ये मात्र महाराज दशरथ, श्रीरामच्या वियोगाने अति दुःखी झाले आणि अल्पावधीतच त्यांचे देहावसान झाले. त्यावेळी भरत आपल्या आजोळी होता. त्याला श्रीरामांच्या वनवासाची आणि पित्याच्या स्वर्गवासाची कल्पना नव्हती. तो अयोध्येस आल्यावर त्याच्यवर जणू दुःखाचा पहाडच कोसळला होता. भरताने पित्याचे अंत्यकर्म केले आणि नंतर तो सर्व गुरुजन आणि मातांना बरोबर घेवून श्रीरामाना अयोध्येस परत आणण्यासाठी चित्रकुट पर्वतावर गेला. श्रीरामना पित्याच्या स्वर्गावासाची बातमी ऐकून अत्यंत दुःख झाले.त्यांनी सर्व माता, बंधूंचे सांत्वन केले. पित्याच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी अयोध्येस परत येण्यास मात्र नकार दिला. भरताने श्रीरामांच्या पादुका मागून घेतल्या आणि त्या सिंहासांवर ठेवून राज्य कारभार चालविण्याचा संकल्प केला.
 श्रीराम,लक्ष्मण आणि सीता कांही काळ चित्रकुट  येथे वास्तव्य करून नंतर ते दंडकारण्यात जाण्यास निघाले. मार्गात त्यांनी अत्री मुनींच्या आश्रमात प्रवेश करून त्यांचे आदरातिथ्य स्वीकारून त्या आदर्श दाम्पत्यास आनंदित केले. येथून ते मजल-दर-मजल करीत अति रमणीय अशा पंचवटी स्थानी येऊन पोहोचले.    
या निसर्गरम्य स्थानी लक्ष्मणाने एक विस्तृत आश्रम बनविला. तेथे ते तिघे आनंदात राहू लागले. एकदा लक्ष्मणाने ध्यानमग्न बसलेल्या श्रीरामाजवळ जावून अत्यंत नम्र भावाने विचारले हे भगवन, तुमच्याकडून मोक्षाचे एकांतिक साधन मी ऐकू इच्छितो. हे कमलनयन श्रीरामा भक्ती आणि वैराग्य यांनी युक्त असणारे विज्ञाना सहित ज्ञान  तुम्ही मला संक्षेपाने सांगा. या भूतलावर तुमच्या शिवाय अन्य कोणी या विषयावर उपदेश करणारा नाही.  श्रीराम आनंदाने म्हणाले वत्सा ऐक, गुह्या पेक्षा श्रेष्ठ गुह्य मी तुला सांगेन जे जाणल्या नंतर माणूस विकल्प जनित संसार रूपी भ्रम तत्काळ टाकून देतो. प्रथम मी तुला मायेचे स्वरूप सांगतो त्यानंतर ज्ञानाचे साधन सांगतो आणि नंतर विज्ञानाने युक्त असे ज्ञान सांगतो . या शिवाय ज्ञेय अशा परमात्म्याचे स्वरूप मी सांगतो ते सर्व जाणल्यावर मनुष्य संसाराच्या भीतीपासून मुक्त होतो. आत्मा नसलेल्या देह आदींच्या ठिकाणी आत्मा आहे (अर्थात देहालाच आत्मा) असे मानण्याची जी बुद्धी होते तिलाच माया असे म्हणतात. तिच्यामुळेच विश्वप्रपंच कल्पिला जातो. मायेची दोन रूपे आहेत १) विक्षेप २) आवरण पहिले रूप विक्षेप हे लिंगापासून, महतत्वापासून ते थेट ब्रम्हदेवापर्यंत, स्थूल आणि सूक्ष्म या भेदासाहित जगाची कल्पना करते. मायेचे दुसरे रूप आवरण ज्ञानावर आवरण टाकते. ज्या प्रमाणे भ्रांतीमुळे रज्जुचे ठिकाणी भुजंग कल्पिला जातो, त्याप्रमाणे केवळ शुद्ध अश्या परमात्म्यावर हे विश्व मायेने कल्पिले आहे. विचार केला असता हे कांही नाही असे कळून येते. या विश्वात माणसे जे,जे नेहमी पहातात, ऐकतात, अथवा स्मरण करतात ते सर्व स्वप्न किंवा मनोरथ या सारखे संपूर्णपणे असत आणि अविद्यामान असते. देह हाच संसाररूपी वृक्षाचे बळकट मुळ आहे असे म्हटले जाते. या देहामुळेच पुत्र, पती, पत्नी आदी बंधने येतात. तसे नसते तर त्यांचा आत्म्याशी काय संबध आहे? पंच महाभूते, पंच तन्मात्रा, अहंकार, बुद्धी, दहा इंद्रिये चिदाभास, मन आणि मूलप्रकृती हे सर्व मिळून क्षेत्र म्हणजेच देह म्हटले जाते. निर्दोष असा परमात्मस्वरूप जीव (आत्मा) या सर्वापेक्षा भिन्न आहे. त्या जीवाचे ज्ञान होण्यासाठी जी साधने आहेत ती तुला मी सांगतो. आत्मा आणि परमात्मा हे शब्द पर्यायवाचक आहेत म्हणून ते भिन्न आहेत असे मानू नये. आता ज्ञानाची साधने ऐक. १) अभिमानाचा अभाव २) दंभ, हिंसा आदींचा त्याग ३) दुसर्याने केलेली निंदा सहन करणे ४) सर्व बाबतीत सरळपणा ५) मन, वाणी आणि शरीर यांचे द्वारे उत्तम भक्तीने सदगुरु सेवा ६) अंतर बाह्य शुद्धी ७) सत्कर्म करण्यात स्थिरता राखणे ८) मन, वाणी आणि शरीर यांचा संयम राखणे ९) विषयांच्या ठिकाणी अनिच्छा १०)अहंकार रहितता ११) जन्म, जरा, इत्यादीमुळे होणारया दुःखाचा विचार.१२)पुत्र, पत्नी धन आदींच्या ठिकाणी आसक्ती आणि प्रेमाचा अभाव (आसक्ती, प्रेम नसणे) १३) इष्ट अथवा अनिष्ट गोष्टी घडल्या तरी समभाव ठेवणे. १४) सर्वात्मक अश्या भगवान श्रीरामांच्या चरणी अनन्य भक्ती.१५) जनसंपर्क रहित अश्या पवित्र स्थानी वास्तव्य १६)सामान्य संसारी लोकसमाजाविषयी सर्वदा नावड बाळगणे. १७) आत्मज्ञानाचे प्राप्तीसाठी सदैव प्रयत्नशील असणे. १८) वेदान्ताच्या अर्थाचा विचार.
या साधनांनी ज्ञान प्राप्ती होईल आणि यांच्या विरुद्ध गोष्टीनी ज्ञानाच्या उलट फळ म्हणजे अज्ञान प्राप्त होते
बुद्धी प्राण, मन, देह आणि अहंकार याच्यापेक्षा वेगळा असणारा, नित्य, शुद्ध-बुद्ध असा चैतन्यरूप आत्मा मीच आहे असा निश्चय ज्या ज्ञानाच्या योगाने मनुष्यास अनुभवास येतो तेच ज्ञान होय असे माझे निश्चित मत आहे. या ज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मनुष्याला ज्या वेळी येतो त्यावेळी तेच ज्ञान विज्ञान बनते. आत्मा हा सर्वत्र पूर्ण, चिदानंद स्वरूप अविनाशी, बुद्धी, विकार आदी उपाधींनी रहित आहे. आत्मा आपल्या स्वतःच्या प्रकाशाने देह इत्यादिना प्रकाशित करतो. तो स्वतः आवरण रहित आहे. तो एकच अद्वितीय आणि सत्य ज्ञान स्वरूप आहे. हा आत्मा संग्रहित, स्वयंप्रकाशी, साक्षी आहे. हे विज्ञानानेच कळून येते. आचार्य आणि शास्त्र, यांच्या उपदेशाने जेंव्हा जीवात्मा आणि परमात्मा यांच्यात एकत्वाचे ज्ञान होते  तेंव्हाच मुळविद्या ही स्वतःचे शरीर इत्यादी कार्य आणि इंदिये ही करणे यांच्यासह परमेश्वरामध्ये लीन होऊन जातात. परमात्म्यामध्ये मुळ अविद्येचा लय ही अवस्था म्हणजे मुक्ती असे म्हटले जाते. हा मोक्ष म्हणजे आत्म्याचे ठिकाणी केवळ एक उपचार आहे. कारण आत्मा हा सर्वदा मुक्तच असतो. त्याची मुक्त अवस्था कोठून येणारी नसते. हे लक्ष्मणा ज्ञान, विज्ञान आणि वैराग्य यांच्यासह हे परमात्म्याचे मोक्ष स्वरूप मी तुला सांगितले आहे. परंतु माझ्या भक्तीला ज्याचे मन विन्मुख आहे त्याला ते सर्व दुर्लभ आहे. असे माझे मत आहे. माझ्या भक्तीने युक्त असलेल्या पुरुषांच्या पुढे आत्मा हा योग्य प्रकारे प्रकट होतो. आता माझी भक्ती निर्माण होण्याची कांही कारणे मी तुला सांगतो. ती तू ऐक. माझ्या भक्तांची संगती,  माझी आणि माझ्या भक्तांची सेवा, एकादशीचा उपवास पाळणे, माझे पर्व-दिवस पाळणे,  माझी कथा ऐकण्यात, तिचे पठण करण्यात आणि तिचे स्पष्टीकरण करण्यात नेहमी आवड बाळगणे, माझ्या पूजेच्या बाबतीत आत्यंतिक निष्ठा आणि माझ्या नांवाचे संकीर्तन  हे सर्व माझी भक्ती उत्पन्न होण्याची साधने आहेत. अशा प्रकारे जे सतत माझ्या ठिकाणी तत्पर असतात त्यांच्या ठिकाणी माझ्या विषयीची शुद्ध भक्ती उत्पन्न होते. माझ्या भक्तीने युक्त असणार्या पुरुषाच्या बाबतीत ज्ञान, विज्ञान आणि वैराग्य हे शीघ्र निर्माण होतात. नंतर तो पुरुष मुक्ती प्राप्त करून घेतो. जो पुरुष श्रद्धा आणि भक्ती यांनी युक्त होऊन हे सर्व विवेचन नेहमी पठण करतो, तो अज्ञानसमूह रूपी अंधकार टाकून देवून मुक्त होतो. श्रीराम प्रभू पुढे म्हणाले अरे लक्ष्मणा, ज्याचे अंतःकरण अतिशय शुद्ध आहे, ज्याचे मन अतिशय शांत असून माझी सेवा करण्यात रत आहे, ज्याच्या हृदयात शुद्ध ज्ञान आहे अश्या माझ्या भक्त योग्यांची संगती जे सर्वदा तत्पर बुद्धीने करतील आणि त्यांची सेवा करण्यात अनन्य असतील त्यांच्या हाती मोक्ष असणार हे निश्चित. मी त्याना  रात्रंदिवस दृश्यमान होतो, अन्यथा नाही एवढे सांगून श्रीरामांनी आपल्या वाणीस विराम दिला.
पंचवटीस वास्तव्य करीत असताना एके दिवशी दुष्ट रावणाने संन्याशाचा वेश घेवूनश्रीराम आणि लक्ष्मण आश्रमात नसताना सीतेचे हरण केले.
__________________________________________________________________

              श्रीरामचंद्र प्रभुनी शबरीस उपदेशिलेली भक्तीची साधने

श्रीरामचंद्र आणि लक्ष्मण, रावणाने दुष्ट बुद्धीने हरण केलेल्या, सीतेचा शोध करीत एका निर्बीड अरण्यात येऊन पोहोचले. तेथे त्याना एक आश्रम दिसला. त्यांनी त्या आश्रमात प्रवेश केला. तो, श्रीराम भक्त शबरीचा आश्रम होता. त्या दोघा बंधूना पहातच शबरीचे नेत्र आनंदाश्रूंनी भरून आले. इतक्या वर्षांची तिची तपस्या आणि प्रतिक्षा आज सफल झाली होती. तिने अत्यंत  श्रद्धाभावाने आपले मस्तक श्रीरामांच्या चरणांवर ठेवून नमस्कार केला त्यावेळी तिच्या आनंदाश्रूंनी भगवंतांचे चरणकमल ओले झाले. नंतर शबरीने विधीपूर्वक दोन्ही  बंधूंची पाद्यपूजा केली आणि ते पवित्र जल आपल्या शिरावर धारण केले. यानंतर तिने दोघाना खाण्यासाठी मधुर फळे दिली आणि भक्तियुक्त अंत:करणाने हात जोडून म्हणाली हे रघुश्रेष्ठा, पूर्वी या आश्रमात माझे गुरुदेव महर्षी मातंग रहात असत. त्यांची सेवा शुश्रुषा करीत मी येथे हजारो वर्षे रहात आहे, माझे गुरु ब्रह्मलोकी गेले आहेत, जाण्यापूर्वी त्यांनी मला येथेच रहाण्याची अनुज्ञा दिली आणि सांगितले होते कि राक्षसांचा वध करण्यासाठी आणि ऋषीवरांचे रक्षण करण्यासाठी सनातन परमात्मा, महाराज दशरथाचे पुत्र रुपाने जन्मले आहेत. ते यथाकाली येथे येतील. गुरुदेव पुढे म्हणाले होते शबरी श्रीराम प्रभूंचे येथे आगमन होई पर्यंत स्वतःच्या शरीराचे रक्षण कर. प्रभूंचे दर्शन घेवून नंतर देहत्याग कर म्हणजे त्यांच्या परमधामाला जाशील. त्या दिवसापासून मी केवळ  आपलीच प्रतिक्षा  करीत आहे. हे रामा तुम्ही मन आणि वाणी याना अगोचर आहां. तरी मला तुमचे दर्शन झाले. मला तुमची भक्ती कशी करावी ते कळत नाही. तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हा. श्रीराम म्हणाले हे शबरी माते, पुरुष किंवा स्त्री, असा कोणताच भेद, तसेच जात, नाम, आश्रम, इत्यादी कांहीही मला भजण्याचे कारण ठरू शकत नाही केवळ भक्ती हेच त्याचे कारण आहे. यज्ञ, दान, तप. वेदांचे अध्ययन, इत्यादी करून सुद्धा जर तो माझ्या भक्तीस विन्मुख असेल तर त्याला माझे दर्शन घडणे कधीच शक्य नाही, म्हणून मी तुला संक्षेपाने  भक्तीची साधने सांगतो. संतांची संगती हे पहिले साधन आहे.माझ्या कथांचे कीर्तन करणे हे दुसरे साधन आहे. माझ्या गुणांचे उच्चारण करणे हे तिसरे साधन आहे. उपनिषिद, गीता, इत्यादितील माझ्या वचनांचे विवेचन करणे, हे चौथे साधन आहे.  श्रीराम पुढे म्हणाले हे भद्रे, गुरु म्हणजे मी परमेश्वर आहे अशा बुद्धीने निष्कपट भावाने गुरुदेवांची नित्य उपासना करणे हे पाचवे साधन आहे पवित्र स्वभाव, यम,नियम आदींचे पालन करणे आणि माझी निष्ठा पूर्वक नित्य नेमाने पूजा,अर्चा करणे हे सहावे साधन आहे. माझ्या नाम मंत्राची सांगोपांग उपासना करणे हे सातवे साधन आहे. माझ्या भक्तांचा माझ्यापेक्षा सुद्धा अधिक सम्मान करणे, समस्त प्राण्यांच्या ठायी मी म्हणजे ईश्वर आहे अशी बुद्धी बाळगणे आणि शम, इत्यादीसह बाह्य विषयांच्या बाबतीत वैराग्य असणे हे सर्व माझ्या भक्तीचे आठवे साधन आहे. माझ्या खर्या स्वरूपाचा विचार हे नववे साधन आहे. ही  साधने ज्या व्यक्तीच्या  जवळ असतात त्यांच्या ठिकाणी प्रेमा भक्ती निर्माण होते. अशी ही भक्ती उत्पन्न होताच माझ्या सत्य स्वरूपाचा अनुभव येतो.  माझ्या या स्वरूपाच्या अनुभवात जो सिद्ध होतो त्याला येथेच या जन्मीच मुक्ती प्राप्त होते. म्हणून भक्ती हेच मोक्षाचे कारण आहे हे सिद्ध होते. ज्याला भक्तीचे पहिले साधन प्राप्त झाले त्याला क्रमाने नंतरची साधने प्राप्त होतात. म्हणून भक्ती म्हणजेच मुक्ती हे निश्चितपणे ठरते. आता तुला माझे दर्शन झाले आहे तेंव्हा मुक्ती मिळणार यात शंकाच नाही.  या उपदेशात्मक वक्तव्या नंतर श्रीरामचंद्र प्रभू शबरीस म्हणाले हे शबरी माते मला सांग कि माझी कमलनयना सीता कोठे आहे? तिला कोणी पळवून नेले आहे? शबरी म्हणाली हे श्रीरामा तुम्ही सर्व काही जाणत असून केवळ लोकोपचारासाठी मला विचारीत आहात. रावणाने सीतेचे अपहरण केले आहे आणि ती आता लंकेमध्ये आहे. येथून जवळच पम्पा नांवाचे सरोवर आहे. त्याच्या जवळ ऋष्यमूक नांवाचा एक मोठा पर्वत आहे. अतुल पराक्रमी असा वानरांचा राजा सुग्रीव हा अपला  भाऊ वाली याच्या भीतीने आपल्या चार मंत्र्यांसह त्या पर्वतावर रहात आहे. हे प्रभो तुम्ही तेथे जावून सुग्रीवाशी मैत्री करा. तो तुमचे सर्व कार्य सिद्ध करील. असे सांगून शबरीने आपला देह अग्नीस समर्पण केला. क्षणातच अविद्येने निर्माण झालेले सारे  बंधन  नष्ट होऊन ती श्रीरामांच्या कृपेने अतिसाय दुर्लभ अशा मोक्षाप्रत पोहोचली. भगवान श्रीरामांची भक्ती ही मुक्ती देणारी आहे, म्हणून कामधेनु प्रमाणे सर्व काही देणार्या श्रीरामचंद्र प्रभूंच्या चरणकमळांची अतिशय श्रद्धाभावाने सेवा करावी.
                 
            कबंध राक्षसाचा उद्धार आणि त्याने केलेली श्रीरामचंद्र प्रभूंची स्तुती.

श्रीराम आणि लक्ष्मण सीतेचा शोध करीत एका घनघोर अरण्यात आले. तेथे त्यांना एक
अद्भूत आकाराचा राक्षस दिसला. त्याच्या छातीवर प्रचंड तोंड होते.त्याला डोळे वगैरे कांही नव्हते. त्याचे बाहू एक योजने पर्यंत पसरलेले होते त्या राक्षसाच्या पसरलेल्या बाहूंच्या मध्यभागी राम लक्ष्मण फिरत असताना त्याच्या बाहुनी वेढले गेले होते. या वेळी श्रीरामांनी त्या राक्षसाचा उजवा बाहू तलवारीने कापून टाकला. लक्ष्मणाने डावा बाहू कापला. कबंधाने  श्रीरामना विचारले माझे बाहू कापून टाकणारे आपण एवढे पराक्रमी वीर कोण आहात?श्रीरामांनी आपला परिचय दिला ते म्हणाले मी श्रीराम, महाराज दशरथाचा पुत्र आहे. हा माझा धाकटा बंधू लक्ष्मण आहे. कबंध म्हणाला हे श्रीरामा. मी गंधर्वांचा राजा होतो. एकदा मी अष्टवक्र नांवाच्या मुनिना पाहून हसलो. त्यांनी मला शाप दिला. ते क्रोधाने म्हणाले अरे गन्धर्वा, तू राक्षस होशील  मी त्याना शरण गेलो आणि वंदन करून क्षमा मागितली. त्यावेळी  त्यांनी शापाचा अंत कसा होईल ते सांगितले ते म्हणाले अरे गन्धर्वा, त्रेता युगात भगवान नारायण स्वतः दशरथ पुत्र होऊन अवतार घेतील त्यावेळी ते तुझ्या जवळ येतील आणि तुझे एक एक योजने लांब बाहू कापून  टाकतील. त्या वेळी तू माझ्या शापातून मुक्त होशील. कबंध  पुढे म्हणाला हे प्रभू आता ती वेळ आली आहे. आपण एक खोल खळगा खणून त्यांत माझे शरीर ठेवून वरून त्यास अग्नी द्यावा. तुम्ही दिलेल्या अग्नीने दग्ध झाल्यावर मला माझे पूर्वीचे रूप प्राप्त होईल. श्रीरामांनी लक्ष्मणास सांगून  एक खळगा खणवून घेतला आणि त्यात कबंधाचे शरीर ठेवून त्यास अग्नी दिला. त्यावेळी कबंधाच्या शरीरातून एक मदना प्रमाणे सुंदर रूप असलेला, सर्व अलंकार आणि सुंदर वस्त्रांनी विभूषित पुरुष निर्माण झाला. त्याने श्रीरामना एक प्रदक्षिणा घातली आणि साष्टांग नमस्कार केला.भक्तीने गद, गद  झालेल्या वाणीने तो बोलू लागला. तो म्हणाला, हे श्रीरामा तुम्ही आदी आणि अंत रहित असून अनंत आहात. आपण मन आणि वाणीस अगोचर आहात. तथापि आज अतिशय आदराने तुमची स्तुती करण्यास माझे मन उत्सुक झाले आहे.हे प्रभू तुमच्या स्थूल आणि सूक्ष्म म्हणजे विराट आणि हिरण्यगर्भ अशा या दोन शरिरापेक्षा वेगळे असे तुमचे ज्ञानमय सत्य स्वरूप अव्यक्त आणि सूक्ष्म आहे. तुम्ही सर्वांचे साक्षी आहात.  तुमच्या शिवाय जे कांही आहे ते सर्व दृश्य, अचेतन आणि अनात्म स्वरूप आहे.बुद्धी आणि चिदाभास यांच्या एकमेकावरील अध्यासालाच जीव असे म्हणतात.या बुद्धी इत्यादींचे साक्षी असणारे ब्रम्ह हेच आहे. त्या निर्विषय, निर्विकार आणि सर्वात्म अशा ब्रह्मावर अज्ञानामुळे संपूर्ण चराचर जगाचा आरोप केला जातो. तुमच्या सूक्ष्म रूपात भूत कालीन, वर्तमान कालीन आणि भविष्य कालीन जग दिसून येते.हे सूक्ष्म रूप ध्यानाचा विषय असते आणि ते रूप ध्यान करणाऱ्यांचे कल्याण करते.उत्तरोत्तर मोठे होत जाणार्या महत्, अहंकार, आकाश वायू, तेज, पृथ्वी या सात तत्वांनी आवृत्त असणार्या तुमच्या ब्रम्हांडरूपी स्थूल देहात धारणेला आधारभूत असणारे विराट शरीर स्थित आहे. हे रामा केवळ तुम्हीच कैवल्यरूप आहात. सर्व लोक हे तुमचे अवयव म्हटले जातात. पाताळ लोक हे तुमच्या पायाचे तळवे आहेत. महातल हे तुमच्या पायाची टाच आहे. रसातल आणि तलातल  हे तुमच्या पायाचे घोटे आहेत. सुतल  हे गुडघे, अतल, वितल ह्या तुमच्या मांड्या आहेत. पृथ्वी ही तुमचे नितंब आहेत. आकाश (भुर्लोक) हे तुमचे नाभी स्थान आहे. ज्योतिर्गण हे तुमचे उर:स्थळ आणि महार्लोक ही तुमची ग्रीवा आहे. हे रघुश्रेष्ठा जनलोक हे तुमचे मुख आहे. तपोलोक हे तुमचे शंखाच्या आकाराचे ललाट आहे. सत्यलोक हा नेहमी तुमच्या मस्तक स्थानी असतो. इंद्र आदी लोकपाल तुमचे बाहू आहेत. दिशा तुमचे कान आहेत. दोन अश्विनीकुमार हे तुमच्या नाकपुड्या आहेत. अग्नी हे तुमचे मुख आहे. सूर्य तुमचे नेत्र आहेत. चंद्र तुमचे मन आहे. काळ हा भृभंग आहे. बृहस्पती हे तुमची बुद्धी आहेत. हे श्रीरामा रुद्र हे तुमचा अहंकार आहेत. वेद ही तुमची वाणी आहे. यम हा तुमच्या दाढेच्या स्थानी आहे. नक्षत्रे म्हणजे तुमची दन्तावली आहे. सर्वाना मोहात पाडणारी माया ही  तुमचे हास्य आहे. सृष्टी ही तुमचा कटाक्षपात  आहे. धर्म हा तुमचा समोरील भाग आहे आणि अधर्म हा मागचा भाग आहे. हे रघुत्तमा रात्र आणि दिवस हे तुमचे निमिष आणि उन्मेष (पापण्यांची उघड-झाप) आहेत. सात समुद्र हे तुमची कुक्षी(पोट) आहे आणि नद्या तुमच्या नाड्या आहेत. वृक्ष आणि वनस्पती तुमचे केस आहेत. ज्ञानशक्ती तुमचा महिमा आहे. अशाप्रकारे तुमचे स्थूल शरीर आहे. या स्थूल शरीराच्या ठायी जर मनुष्याने आपले मन स्थिर केले तर त्याला विनासायास मुक्ती मिळते. अशा प्रकारे मुक्त झाल्यावर कांही करावे लागत नाही. म्हणून हे श्रीरामा मी तुमच्या स्थूल देहाचेच चिंतन करीत असतो. त्याचे ध्यान केले असता शरीरावरील रोमांचासह हृदयात प्रेमरस उत्पन्न होतो. मी तुमच्या माझ्या समोर दिसणार्या श्रीराम रुपाचेच चिंतन करतो.  ते रूप असे असते- धनुष्य बाण धारण केलेले, श्यामवर्ण, जटा आणि वल्कले यांनी विभूषित, तरुण वय असलेले, आणि लक्ष्मणासह सीतेचा शोध घेणारे. हे जगन्नाथा माझे रक्षण करा. तुमच्या मायेमुळे मला मोह पडू नये.
त्या गंधर्वाची स्तुती ऐकून भगवान श्रीराम म्हणाले हे निष्पाप देव गन्धर्वा, तुझ्या भक्तीने आणि स्तुतीने मी संतुष्ट झालो. केवळ योगी लोकाना प्राप्त होण्यासारखे असे जे माझे स्थान आहे तेथे तू जा. वेदाला अनुसरणारे आणि तू उच्चारलेले हे स्तोत्र जे कोणी अनन्य बुद्धीने आणि भक्तीने नित्य जपतील ते अज्ञानापासून निर्माण होणार्या संसाराचा त्याग करून नित्य आणि अनुभव स्वरूप अशा माझ्या स्वरुपाप्रत जातील.

               श्रीरामचंद्रांनी वाली पत्नी तारा हिला केलेला उपदेश.
कबंध राक्षसाचा उद्धार केल्यानंतर श्रीराम आणि लक्ष्मण शबरीने सांगितलेल्या माहिती प्रमाणे अति सुंदर अशा पम्पा सरोवरा निकट येवून पोहोचले. येथे त्यांनी एक दिवस विश्रांती घेतली आणि नंतर ऋष्यमूक पर्वताकडे प्रस्थान केले. या पर्वतावर वानरराज सुग्रीव आपल्या चार सहाध्यायीसह रहात  होता.वीर हनुमान हा सुग्रीवाचा अत्यंत  प्रिय सचिव होता. त्याने आपल्या चातुर्याने श्रीराम आणि लक्ष्मणास आकर्षित केले होते.त्यानेच श्रीराम आणि सुग्रीवाची भेट घडवून आणली आणि त्यांच्यात मैत्रीचे बंध निर्माण केले. श्रीरामानी दुष्ट वालीचा वध करून किष्किंधा नगरीचे राज्य सुग्रीवास मिळवून देण्याची अग्नीसमोर प्रतिज्ञा केली होती. वानरराज सुग्रीवाने सीतेचा शोध करून तिला हरण करणार्या दुष्ट रावणाशी युद्ध करण्यात संपूर्ण सहायता प्रदान करण्याची प्रतिज्ञा केली. श्रीरामांनी आपल्या वचनानुसार वालीचा वध करून सुग्रीवास किष्किंधा नगरीचे राज्य सुपूर्द केले.  
श्रीरामचंद्रांच्या हातून वानरराज वालीचा वध झाल्याची वार्ता त्याची पत्नी तारा हिला कळताच ती शोकाने मूर्च्छित झाली. थोडया वेळाने शुद्धीवर आल्यानंतर ती पतीच्या रक्त आणि धुळीने माखलेल्या मृत देहा जवळ आली आणि अत्यंत शोकाकुल होऊन हे नाथा, हे नाथा असा आक्रोश करू लागली. करूण स्वरात विलाप करीत असतानाच तिला श्रीराम दिसले. ती म्हणाली हे श्रीरामा ज्या बाणांनी तुम्ही माझ्या पतीदेवास ठार मारले त्याच बाणांनी मलाही ठार मारा, म्हणजे मी पतीच्याच लोकी जाइन. अशा प्रकारे विलाप करीत असलेल्या तारेस  श्रीरामांनी दयापुर्वक तत्वज्ञानाचा उपदेश करून तिचे सांत्वन केले. श्रीराम म्हणाले हे तारे, शोक करण्यास पात्र नसलेल्या तुझ्या पतीबद्दल का बरे शोक करीत आहेस?हा तुझा पती म्हणजे त्याचा देह का जीव हे मला तत्वात: सांग. जर हा देह जर  तुझा पती असेल तर बघ, पंचमहाभूतानी बनलेला हा अचेतन देह, त्वचा, मांस, रक्त, अस्थी यांनी युक्त आहे. तो देह काल, कर्म आणि गुण यांच्यामुळे उत्पन्न झालेला आहे. तोच देह तुझ्या समोर पडलेला आहे. आता जीवात्मा हा तुला जर तुझा पती वाटत असेल तर लक्षात घे कि जीव हा निरामय ( विकार रहित, रोग रहित)आहे. तो कधी जन्मास येत नाही अथवा मरतही नाही. उभा रहात नाही अथवा कोठे जात,येत नाही. जीव हा स्त्री,पुरुष अथवा नपुसक नाही. तो सर्वव्यापक आणि अव्यय आहे. तो एकमेव अद्वितीय असून आकाशाप्रमाणे लेप रहित आहे. तो नित्य, ज्ञानस्वरूप आणि शुद्ध आहे. अशा जीवाबद्दल शोक करणे कसे बरे योग्य आहे? तारा म्हणाली हे श्रीरामा देह हा काळा प्रमाणे अचेतन आहे आणि चैतन्यस्वरूप असलेला जीव हा नित्य आहे मग सुख-दु:ख यांचा संबंध कोणाशी येतो? श्रीराम म्हणाले जो पर्यंत अविवेकी जीवांचा देह व इंद्रिये यांच्या ठायी मी, माझे इत्यादी संबंध असतो तोपर्यंतच त्याला संसार असतो. ज्या प्रमाणे विषयांचे चिंतन करणार्या मनुष्यास स्वप्नात मिथ्या पदार्थ उत्पन्न झालेले दिसतात, त्या प्रमाणे आत्म्यावर आरोपित केलेला मिथ्या संसार ज्ञाना शिवाय निवृत्त होत नाही. अनादी अविद्येशी संबंध आल्यामुळे तसेच त्या अविद्येचा अहंकार या कार्याशी संबंध आल्यामुळे, जरी हा संसार सत्य नसला तरी तो राग, द्वेष इत्यादींनी भरलेला असतो. हे कल्याणी मन हेच संसार आहे आणि मन हाच बंध आहे. अनात्मा वस्तू असलेल्या मनाबरोबर एकाकार झाल्याने आत्मा मनातील सुख-दुःखाच्या बंधनात पडतो, ज्या प्रमाणे शुद्ध स्फटिक मणी हा लाख इत्यादी रंगीत वस्तूच्या सानिध्यात आला असता तो त्या रंगाचा असल्यासारखा भासतो. परंतु खरे तर स्फटिकात ते रंग नसतात. त्याप्रमाणे बुद्धी आणि इंद्रिये यांच्या सानिध्याने आत्म्यास बळजबरीने संसार येतो. स्वतःला ओळखण्याची खूण असणार्या मनाचा स्वीकार करून त्या मनामुळे प्राप्त होणारे विषयांचे सेवन करीत आत्मा हा राग, द्वेष, आदी गुणांनी बद्ध होतो. यामुळे तो संसारात अडकून रहातो. प्रथम मन हे राग, द्वेष  आदी गुणांची निर्मिती करते नंतर ते नाना प्रकारची कर्मे उत्पन्न करते. जीव हा त्या मनाबरोबर संचार करतो. आणि नंतर त्यांच्या संबंधामुळे नाना प्रकारची कर्मे करतो. ती कर्मे शुक्ल, म्हणजे जप, ध्यान इत्यादी उत्तम कर्मे,  लोहित म्हणजे काम्य कर्मे इत्यादी मध्यम प्रतीची आणि कृष्ण म्हणजे अभिचारिक कर्मे इत्यादी कनिष्ठ अशा  तीन प्रकारची असतात. त्या कर्मानुसार जीवाला उत्तम, मध्यम आणि अधम अशा गती प्राप्त होतात. सहा प्रकारे कर्माना वश होऊन जीव प्रलय काळापर्यंत जन्म,मरण रूपी संसारात  भ्रमण करीत राहतो. प्रलयाच्या वेळी सर्वांचा लय झाला असताना सुद्धा स्वतःमध्ये  कर्ता-भोक्ता रूप अभिनिवेशामुळे हा जीव आपल्या वासना आणि कर्मे यांच्यासह अनादी अविद्येच्या ताब्यात राहतो, मुक्त होत नाही. नंतर ज्यावेळी, पुन्हा नवीन सृष्टीची निर्मिती होते त्यावेळी हा जीव असाह्यपणे आपल्या पूर्वीच्या वासना आणि मन यांचेसह रहाट-गाडग्या प्रमाणे  पुनरपी जन्मास येतो. नंतर ज्यावेळी त्यास पुण्याईने शांत, सज्जन अशा माझ्या भक्ताची संगती लाभते, त्यावेळी त्याची बुद्धी माझ्या ठिकाणी जडते.यानंतर त्याच्या मनात माझ्या कथा श्रवण करण्याची दुर्लभ अशी श्रद्धा निर्माण होते. त्यामुळे त्यास माझ्या स्वरूपाचे ज्ञान विनासायास होते. त्यावेळी गुरुदेवांच्या कृपेने आणि तत्वमसी आदी महावाक्यांच्या अर्थाच्या ज्ञानाने तसेच स्वतःच्या अनुभवामुळे  आपला आत्मा हा देह,इंद्रिये, मन, प्राण, आणि अहंकार या सर्वापेक्षा संपूर्णपणे वेगळा असून सत्य, आनंदस्वरूप तसेच अद्वितीय आहे असे जाणून तो जीव एका क्षणात तत्काळ मुक्त होऊन जातो. हे सत्यच मी तुला सांगितले आहे. अशा प्रकारे मी केलेल्या उपदेशांचे जे कोणी नित्य विचार करतील त्याना संसारातील दुःखे कधीही स्पर्श करणार नाहीत. श्रीराम पुढे म्हणाले हे तारे, तू पूर्व जन्मी माझी उत्तम भक्ती केली होतीस. म्हणून तुझ्या मोक्षासाठी  मी तुला दर्शन दिले आहे. माझ्या रूपाचे ध्यान करीत,  मी तुला आता जे सांगितले आहे त्याचे निरंतर मनन कर. मग तू जीवनाच्या प्रवाहात प्राप्त होतील ती कर्मे करून सुद्धा त्या कर्मानी लिप्त होणार नाहीस, एवढे बोलून श्रीरामांनी आपल्या वाणीस विराम दिला.
श्रीरामांनी सांगितलेला उपदेश ऐकून तारा अत्यंत विस्मयचकित झाली. देहावरील अभिमानामुळे निर्माण होणारा शोक टाकून आणि रघुत्तमाना नमस्कार करून आत्मानुभावाने संतुष्ट झालेली तारा यथासमयी जीवनमुक्त झाली.
                                   भगवान श्रीरामांनी लक्ष्मणास सांगितलेला कियायोग.

वालीच्या वधानंतर सुग्रीवास किष्किंधा नगरीचे राज्य सुपूर्द करून श्रीराम आणि लक्ष्मण प्रवर्षण  नांवाच्या एका उंच आणि विस्तृत अशा पर्वताच्या शिखरावर गेले. तेथील स्फटिक मण्यांनी बनलेली प्रकाशमान आणि स्वच्छ अशी गुहा श्रीरामाना आवडली.त्या गुहेच्या जवळच मोत्या प्रमाणे स्वच्छ अशा पाण्याने भरलेली अनेक सरोवरे होती. फळे, मुळे यांची सुबत्तता होती. तो परिसर चित्र विचित्र पशुपक्ष्यानि संपन्न होता. अशा या रम्य स्थानी श्रीराम लक्ष्मणासह पावसाळा संपेपर्यंत राहिले. तेथिल  वास्तव्यात, एके दिवशी लक्ष्मणाने भक्ती,प्रेमाने श्रीरामाना म्हटले हे देवा,  पूर्वी तुम्ही केलेल्या उपदेशाने माझ्या मनात असणारा आणि अनादी अविद्येने निर्माण झालेला संशय दूर झाला आहे, हे श्रीरामा, या जगात योगी लोक ज्या क्रिया मार्गाने- पूजा पद्धतीने तुमची आराधना करतात तो क्रिया मार्ग जाणून घेण्याची माझी इच्छा आहे.  हे राजेंद्रा, सर्व वर्ण आणि सर्व आश्रमातील लोकाना मुक्तीचा मार्ग असणारे हे साधन मला सांगा. श्रीराम म्हणाले हे लक्ष्मणा माझ्या पूजा विधानाला कांही अंत नाही. तथापि मी तुला ते शास्त्रानुसार क्रमश: संक्षेपाने सांगतो. प्रत्येक माणसाने स्वतःच्या वेदाच्या शाखेच्या गुह्य सूत्रात सांगितलेल्या प्रकाराने उपनयन संस्कारानंतर द्विजत्व प्राप्त करून घ्यावे आणि माझ्या भक्तीने युक्त होऊन चांगल्या गुरुकडून मंत्र प्राप्त करून घेवून, गुरुनी दर्शविलेल्या विधी प्रमाणे चांगली  बुद्धी बाळगून माझी आराधना करावी. अथवा हृदय, अग्नी, मूर्ती, शालीग्राम,सूर्य इत्यादी ठिकाणी माझी पूजा करावी. बुद्धिमान उपासक भक्ताने प्रथम देहशुद्धी साठी प्रात:काळी वेदात किंवा तंत्रात  सांगितलेल्या मंत्रांचे उचारण करीत शरीरावर शास्त्र विधानाप्रमाणे माती इत्यादी लावून स्नान करावे.नंतर संध्या इत्यादी नित्य कर्मे विधीपूर्वक करावीत. कर्मांची सिद्धी व्हावी म्हणून पूजकाने प्रथम संकल्प करावा. नंतर आपला गुरु म्हणजे प्रत्यक्ष मी (श्रीराम परमेश्वर) आहे या बुद्धीने त्याने गुरूंची पूजा करावी. पूजेसाठी माझी मूर्ती, शाळीग्रमाची असल्यास त्या शिळेस स्नान घालावे. जर ती प्रतिमा मातीची असेल तर तिच्यावर मार्जन करावे. प्रसिद्ध असलेल्या गंध, फुलांनी माझी पूजा करावी ही पूजा सिद्धी प्राप्त करून देणारी आहे. दांभिकपणा सोडून आणि गुरुनी सांगितलेल्या व्रतांचे पालन करीत साधकाने माझी पूजा व्रत म्हणून करावी. माझ्या प्रतिमा इत्यादीवर अलंकार घालणे आणि सजविणे हे तर मला प्रिय आहे. अग्नीची पूजा करावयाची असेल तर हविर्द्रव्ये अर्पण करून त्याची पूजा करावी. सूर्याच्या पूजेसाठी वेदीवर सूर्याची आकृती काढून त्याची पूजा करावी. माझ्या भक्ताने श्रद्धापूर्वक अर्पण केलेले पाणी सुद्धा माझ्या प्रसन्नतेला कारण होते.तर मग भक्ष्य, भोज्य, इत्यादी पदार्थ तसेच गंध, फुले, अक्षदा इत्यादी मला अर्पण केल्यास मी संतुष्ट होतो हे काय सांगावयास हवे? सर्व पूजा द्रव्ये एकत्र जमवून पूजेस प्रारंभ करावा. आता प्रत्यक्ष पूजा कशी करावी ते मी तुला सांगतो. प्रथम खाली दर्भ त्यावर मृगाजिन आणि त्यावर वस्त्र पसरून पूजकाने स्वतःसाठी योग्य आसन तयार करावे. नंतर शुद्ध मनाने देवांकडे तोंड करून त्या आसनावर बसावे. त्यानंतर बहिर्मातृका आणि अंतर्मातृका न्यास करावा. अर्थात अंगन्यास, करन्यास पूर्वक अंतर्बाह्य शुद्ध आणि पवित्र व्हावे. तसेच केशव, नारायण इत्यादी चोवीस नांवांचा न्यास करावा. यानंतर पूजकाने तत्वन्यास करावा आणि विष्णू पंजर स्तोत्रात सांगितल्या प्रमाणे मंत्रन्यास करावा. याच प्रमाणे माझ्या प्रतिमा,मूर्ती इत्यादीवर सुद्धा तशा प्रकारचा न्यास पूजकाने निरलसपणाने करावा.आपल्या डाव्या बाजूस पाण्याचा कलश आणि उजव्या बाजूस फुले, गंध इत्यादी सामुग्री ठेवावी. त्याच प्रमाणे अर्घ्य आणि पाद्य देण्यासाठी तसेच मधुपर्कासाठी आणि आचमनासाठी  चार पात्रे ठेवावीत. त्यानंतर सूर्या प्रमाणे तेजस्वी अशा आपल्या  हृदय कमळात जीव हे नांव असणार्या माझ्या कलेचे ध्यान करावे आणि आपला संपूर्ण देह त्या कलेने व्यापलेला आहे असे समजून घ्यावे आणि प्रतिमा इत्यादींचे पूजन करताना त्या प्रतिमा आदींच्या ठिकाणी त्याच माझ्या जीव कलेचे आव्हान करावे. त्यानंतर पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, अलंकार, यांनी अथवा जितके उपचार शक्य आहेत तितक्याचे द्वारा निष्कपट भावाने माझे पूजन करावे. जर पूजका जवळ वैभव असेल तर कापूर, केशर, रक्तचंदन तसेच उत्तम सुवासिक फुले याने मंत्रोच्चार करीत माझी पूजा नित्य करावी. तसेच निरंजन, धूप,दीप, आणि नाना प्रकारचे नैवेद्य यांचे द्वारा शास्त्रात  सांगितल्या प्रमाणे माझी दशावरण पूजा करावी हे सर्व उपचार मला श्रद्धेने नित्य अर्पण करावेत. कारण मी परमेश्वर श्रद्धेने दिलेल्या पदार्थांचा भोक्ता आहे. मंत्र जपणार्या पूजकाने पूजेनंतर विधीपुर्वक होम करावा. अगस्त्य ऋषींनी सांगितलेल्या पद्धतीनुसार कुंड तयार करवून घेवून त्या कुंडा मध्ये गुरुनी सांगितलेल्या मूलमंत्राचा अथवा पुरुष सूक्ताचा वापर करून आगम  जाणत्या बुद्धिमान पुरुषाने होम करावा. अथवा अग्निहोत्रासाठी सिद्ध केलेल्या अग्नीमध्ये परू(भात)आणि अन्य हविर्द्रव्ये यांचा होम करावा. होम करण्याच्या वेळी तापलेल्या सोन्याप्रमाणे असणारी दिव्य आभरणानि भूषित असणारी यज्ञपुरुषाच्या रूपात असलेली  माझी मूर्ती अग्नीमध्ये उभी आहे असे कल्पून शहाण्या याजकाने परमात्म्याचे ध्यान करावे. त्यानंतर माझ्या पार्षदासाठी बली अर्पण करून होमाचा उरलेला भाग पूर्ण करावा. यानंतर वाचेवर नियंत्रण ठेवून माझे स्मरण करीत ध्यान करावे. आणि जप करावा. त्यानंतर मुखवासासाठी तांबूल अर्पण करावा. त्यानंतर माझ्यासाठी नृत्य गायन आदी तसेच स्तुतिपाठ करवून घ्यावेत. हृदयात माझी स्थापना करून जमिनीवर साष्टांग दंडवत घालून प्रणाम करावा. मी दिलेला भावनामय प्रसाद हा भगवंताचा आहे या भावनेने तो मस्तकी धारण करावा.नंतर भक्तीने युक्त होऊन माझे पाय धरून ते पूजकाने आपल्या मस्तकावर धारण करावेत. नंतर हे प्रभो, या घोर संसारातून माझे रक्षण करा असे म्हणून त्या बुद्धिमान उपासकाने मला नमस्कार करावा. शेवटी  प्रतिमेत आवाहन केलेली जीवन कला आता माझ्या हृदयातील तेजात पूर्वीप्रमाणे  आली आहे असे स्मरण करून विसर्जन करावे.अशा प्रकारे मी सांगितलेल्या पद्धतीने जे विधिवत माझी पूजा करतील त्याना माझ्या अनुग्रहामुळे इहलोकी आणि परलोकी उत्तम सिद्धी प्राप्त होतील. अशा प्रकारे जर माझा भक्त प्रतिदिन माझी पूजा करीत राहील तर त्याला माझे सारुप्य प्राप्त होईल यात संशय नाही. श्रीराम शेवटी म्हणाले हे लक्ष्मणा, हे अतिशय पवित्र आणि पूर्वीपासून चालत आलेले सनातन असे माझ्या पूजेचे तंत्र साक्षात मीच तुला सांगितले आहे. जे कोणी याचे निरंतर पठण  करतील अथवा श्रवण करतील त्याना पूजेचे संपूर्ण फळ प्राप्त होईल यात संदेह नाही. एवढे बोलून श्रीरामचंद्र प्रभुनी आपल्या वाणीस विराम दिला
                      हनुमान आणि रावण यांचा संवाद
पावसाळा संपताच सुग्रीवाने आपली वानर सेना सीतेच्या शोधासाठी चारी दिशाना पाठविली. त्यांमध्ये हनुमान,अंगद,जांबुवंत आदी महावीर दक्षिण दिशेस गेले. हनुमंताने उड्डाण करून समुद्र पार करून  लंकेत प्रवेश केला आणि  श्रीरामांच्या आदेशा नुसार त्याने सीतेची भेट घेउन श्रीरामांनी दिलेली मुद्रिका सीतेस दिली. हनुमंताची ओळख पटताच सीता अत्यंत आनंदित झाली. ती हनुमंतास म्हणाली हे हनुमंता श्रीरामाना सांग कि लवकर येवून रावणाचा वध करून मला घेवून जावे. हनुमंतास सीतेच्या भेटीमुळे अत्यंत आनंद झाला होता. त्याने तिच्याकडून अशोक वनातील फळे खाण्याची परवानगी मिळविली आणि थोड्याच वेळात झाडावर उडी मारून मनसोक्त फळे खाल्ली. त्यावेळी वनरक्षक तेथे आले ते हनुमंतावर प्रहार करू लागले. त्यावेळी महाबली हनुमंताने आपल्या बाहू बलाने मोठे मोठे वृक्ष तोडून ते त्या रक्षकांच्या अंगावर टाकण्यास सुरवात केली. ते रक्षक रावणाकडे गेले आणि त्यांनी घडलेली घटना राजास सांगितली. रावणाने आपल्या सैनिकाना हनुमंतास पकडून आणण्यासाठी पाठविले. परंतु ते सर्व सैनिक आणि रावणाचा पुत्र, अक्ष याचा हनुमंताने वध केला. शेवटी इंद्रजीताने आपल्या ब्रम्हपाशाने हनुमंतास बंदिस्त केले. ब्रह्मदेवांनी दिलेल्या वरांमुळे तो ब्रम्हपाश हनुमंतास केवळ स्पर्श करून निघून गेला होता. ही गोष्ट हनुमंतास माहीत होती, परंतु रावणाची भेट घ्यावी या उद्देशाने तो बंदिस्ताप्रमाणे  इंद्रजीताबरोबर रावणाच्या दरबारी गेला. इंद्रजित पित्यास म्हणाला तात हा वानर सामान्य नाही. त्याने मोठ्या,मोठ्या राक्षसाना ठार केले. तुम्ही मंत्र्यांबरोबर विचार विनिमय करून या वानराचे काय करावयाचे याचा योग्य तो निर्णय घ्या. रावणाच्या आदेशाप्रमाणे रावणाचा सचिव प्रहस्त याने आदरपूर्वक हनुमंतास प्रश्न केला अरे वानरा तुला कोणी इकडे पाठविले आहे? तू घाबरू नकोस या राजराजेश्वर रावणा जवळ सर्व सत्य सांग. मी तुला सोडवीन. यानंतर हनुमंताने मनामध्ये श्रीरामांचे ध्यान करून बोलण्यास प्रारंभ केला. तो अत्यंत निर्भयपणे म्हणाला देवादिकांचा शत्रू असलेल्या हे रावणा, लक्ष पूर्वक ऐक. ज्या प्रमाणे एखादा कुत्रा यज्ञातील हवी चोरून नेतो, त्याप्रमाणे तू स्वतःचा नाश करून घेण्यासाठी ज्या सर्वेश्वर श्रीरामांची भार्या हरण करून आणलीस त्या सर्वांतर्यामी श्रीरामांचा मी दूत आहे. श्रीराम मतंग पर्वतावर आले आहेत. त्यांनी अग्नीच्या साक्षीने सुगीवाशी मैत्री करून दुष्ट वालीचा एका बाणाने वध करून सुग्रीवाला वानरांचा अधिपती केले आहे. अरे रावणा तो अतिबलवान सुग्रीव महा बलवान अशी कोट्यावधी वानरांची सेना घेवून श्रीराम लक्ष्मणासह प्रवर्षण पर्वतावर रहात आहे.पृथ्वीकन्या सीतेचा शोध घेण्यासाठी अनेक वानर श्रेष्ठ पाठविले आहेत त्यांच्यापैकी मी एक आहे. मी वायुपुत्र हनुमान सीतेला अशोक वनात भेटलो. वानर जातीच्या हूड स्वभावानुसार मी अशोक वनातील फळे खाल्ली आणि वनाचा विध्वंस केला. त्यानंतर मला मारण्यासाठी जेंव्हा राक्षस धनुष्य बाण घेवून आले त्यावेळी मी स्वतःच्या रक्षणा साठी त्या राक्षसाना ठार केले. यानंतर मेघनाद नांवाच्या राक्षसाने ब्रम्हस्त्राच्या पाशाने मला बांधून येथे आणले. हे रावणा, ब्रह्मदेवाने दिलेल्या वरामुळे ते अस्त्र मला केवळ स्पर्श करून निघून गेले होते. तरी सुद्धा माझी बुद्धी करुणापूर्ण असल्याने तुला हितकारक गोष्ट सांगण्याच्या इच्छेने मी एखाद्या बंदिजना प्रमाणे येथे तुझ्या दरबारात आलो आहे. हे रावणा, विवेक केल्यामुळे लोकाना चागली गती मिळते. म्हणून तू राक्षसी वृत्तीचा अंगीकार करू नकोस. प्राण्याचे अतिशय हित करणारी आणि त्याना संसारातून मुक्त करणारी अशी जी दैवी बुद्धी आहे तिचा तू आश्रय घे.तू ब्रह्मदेवाच्या उत्तम वंशात जन्माला आहेस. तू पुलस्त्य पुत्र विश्रवाचा पुत्र असून कुबेराचा बंधू आहेस. हे बघ, देह म्हणजेच आत्मा अशा देह बुद्धीने पहिले तरी तू राक्षस नाहीस. मग देह हा आत्म्यापेक्षा वेगळा आहे अशा आत्माबुद्धीने पाहिल्यास तू राक्षस नाहीसच. हे काय सांगावयास हवे? तू संपूर्णपणे निर्विकार असल्याने शरीर, बुद्धी, इंद्रिये आणि दुःखाचे ओघ हे तुझे गुण नाहीत. तसेच ते म्हणजे तू स्वतः  नाहीस. ते सर्व अज्ञानामुळे  तसे वाटते. स्वप्नातील दृष्य जसे असत्य असते तसे हे पदार्थ असत आहेत. हे सत्य आहे कि तुझ्या आत्मरुपात कोणताही विकार होत नाही. कारण आत्मा हा अद्वितिय असल्याने त्याचे ठिकाणी कोणत्याही विकाराचे कारण असत नाही. ज्या प्रमाणे आकाश सर्वत्र असले तरी ते कोणत्याही गुण-दोषांनी लिप्त होत नाही, त्याप्रमाणे तू देहात रहात असलास तरी सूक्ष्म असा आत्मा असल्याने कशानेही लिप्त होत नाहीस. देह,इंद्रिये, प्राण, आणि शरीर यांच्यशी आत्म्याचे मिलन झाले आहे. अशा बुद्धीनेच मनुष्य सर्व बंधनात पडतो. मी केवळ चैतन्यरूप, जन्मरहित, अनिनाशी आणि आनंद स्वरूप आहे अशा बुद्धीने प्राणी संसारातून मुक्त होऊन जातो. पृथ्वीच्या विकारापासून बनलेला हा देह आत्मा नाही. तसेच प्राण म्हणजे आत्मा नव्हे. कारण प्राण हा एक अचेतन वायुच आहे. अहंकाराचा विकार असलेले मन हे सुद्धा आत्मा नाहीच. त्याच प्रमाणे पृथ्वीच्या विकारापासून उत्पन्न होणारी बुद्धी ही सुद्धा आत्मा नाही. आत्मा तर चिदानंद स्वरूप, विकाररहित, देह इत्यदि पेक्षा वेगळा आणि त्यांचा स्वामी किंवा ईश्वर आहे. हा आत्मा निरंजन असून उपाधीपासून सर्वदा मुक्त आहे. अशा प्रकारच्या आत्म्यास जाणल्यानंतर प्राणी संसारातून मुक्त होतो. म्हणून हे महाबुद्धीवाना, मी तुझ्यासाठी एक आत्यंतिक मोक्षाचे साधन सांगतो ते लक्षपुर्वक ऐक. विष्णूंची भक्ती ही बुद्धीला अतिशय शुद्ध करणारी आहे. त्यानंतर अतिशय निर्मळ असे आत्मज्ञान होते त्यानंतर विशुद्ध आत्मतत्वाचा अनुभव येइल अशा प्रकारे योग्य रीतीने आत्म्याला जाणल्यावर मनुष्य परम पदास जातो. म्हणून हे रावणा, प्रकृतीच्या पलीकडे असणार्या पुराणपुरुष, सर्वव्यापक आदिनारायण लक्ष्मीपति श्रीरामांची भक्ती कर. तुझ्या हृदयातील शत्रूभावना रूपी मुर्खपणा टाकून देवून, शरणागताबद्दल प्रेम असणार्या श्रीरामांचा आश्रय घे. सीतेला पुढे करून पुत्र आणि बांधवासह तू श्रीरामाना नमस्कार कर म्हणजे तू भयातून मुक्त होशील. जो माणूस आपल्या हृदयात असणार्या अद्वितीय, सुखस्वरूप परमात्मा अशा श्रीरामांचे भक्तीने ध्यान करीत नाही तो दुःख रूपी संसार सागर कसा बरे पार करून पैलतीरावर जाईल? अशाप्रकारे तू श्रीरामांचे ध्यान केले नाहीस तर अज्ञान रूपी अग्नीने जळणार्या स्वतःला एखाद्या शत्रूप्रमाणे सुरक्षित ठेवू शकणार नाहीस. उलट आपण केलेल्या पापांनी तू स्वतःला अधोगतीस नेत राहशील. मग तुझ्या मोक्षाची कोणतीच शक्यता राहणार नाही.
हनुमंताचे हे अमृततुल्य भाषण रावणास सहन झाले नाही. तो अतिशय क्रोधाने म्हणाला अरे दुष्ट बुद्धी वानरा, मी सुग्रीवासह त्या नराधम रामास ठार करीन. आज प्रथम तुला ठार करीन नंतर जनक कन्येचा वध करून त्यानंतर लक्ष्मणासह रामाला ठार करीन. रावणाचे हे वक्तव्य ऐकल्यावर हनुमंत अत्यंत क्रोधाने म्हणाले अरे नीचां, कोट्यावधी रावण सुद्धा माझी बरोबरी करू शकत नाहीत. मी श्रीरामांचा दास आहे आणि माझ्या पराक्रमाला कोणतीच सीमा नाही. हनुमंताचे हे आवेशपूर्ण भाषण ऐकून रावण रागाने लाल,पिवळा झाला. त्याने तेथे उभ्या असलेल्या राक्षसाना म्हटले अरे या वानराचे तुकडे तुकडे करा.रावणाची आज्ञा होताच सारे राक्षस शस्त्र उगारून पुढे आले. तितक्यात बिभीषणाने त्या सर्व राक्षसांचे निवारण केले आणि रावणास म्हणाला महाराज, दूत म्हणून आलेल्या या वानराचा वध केल्यास तुम्ही ज्याच्या वधास तयार झाला आहात त्या रामाना  सर्व वार्ता कोण सांगेल? रावणास बिभीषणाचे म्हणणे पटले. त्याने हनुमंताच्या पुच्छास कपडे गुंडाळून त्यास आग लावण्याचा आदेश दिला. ज्यावेळी राक्षसानि हनुमंताच्या पुच्छास अग्नी लावला त्यावेळी त्याने एका घरावरून दुसर्या घरावर अशा उड्या मारीत सर्व घराना तसेच राजप्रासादाना  आग लावली. थोड्याच  वेळात सारी लंका  अग्नीच्या ज्वालांनी लपेटून गेली. केवळ अशोकवन आणि बिभीषणाचा प्रासाद मात्र सुरक्षित होता. नंतर हनुमंताने आपले पुच्छ समुद्राच्या पाण्यात बुडवून अग्नी विझविला आणि मोठ्या आनंदाने स्वस्थानी जाण्यासाठी श्रीरामांचे स्मरण करून उड्डाण केले. अल्पावधीतच तो समुद्र किनारी वाट पहात असलेल्या महावीर अंगद, जांबुवंत आदी वानर सेनापती जवळ येवून पोहोचला. विजयी झालेल्या हनुमंतास पहातच सर्व वानरांनी त्याचा जय जयकार केला. नंतर सारी वानर सेना आनंदाने नाचत गात किष्किंधा नगरीस परतली. प्रथम, हनुमंत श्रीराम प्रभूंच्या चरणी नतमस्तक झाला नंतर लंकेत घडलेला संपूर्ण वृतांत त्याने श्रीरामाना सांगितला. तो ऐकून प्रभू अत्यंत आनंदित झाले आणि त्यांनी प्रेमभराने  हनुमंतास आलिंगन दिले. थोड्याच काळात एका विशाल वानर सेनेसह श्रीराम,लक्ष्मण, सुग्रीव, हनुमान जाम्बुवंत यांनी लंकेकडे प्रस्थान केले. नळ, नील, हनुमंत आणि असंख्य वानर विरानि मिळून समुद्रावर सेतू बांधला आणि त्यावरून संपूर्ण वानरसेना लंकेच्या  बाहेरील तटाजवळ येवून पोहोचली.

                               बिभीषणाची शरणागती आणि श्रीरामांचा कृपा प्रसाद.

श्रीरामांच्या बरोबर युद्ध प्रारंभ करण्यापूर्वी भगवत-भक्तात अग्रगण्य, बुद्धीमत्तेमध्ये श्रेष्ठ अशा बिभीषणाने लंकापती रावणास युद्धापासून परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला. तो समजावणीच्या सुरात अत्यंत नम्रतेने रावणास म्हणाला महाराज, सीता नांवाच्या ग्रहाने तुम्हाला ग्रासले आहे. त्यातून तुमची सुटका होणार नाही. म्हणून त्या सीतेचा सत्कार करून आणि विपुल धन देवून तुम्ही तिला श्रीरामाना परत देवून सुखी व्हा. अन्यथा तुम्ही श्रीरामांच्या हातून जीवित सुटणार नाहीत. परंतु त्या दुष्ट रावणास बिभीषणाचा हा कल्याणकारी संदेश आवडला नाही. तो क्रोधाने म्हणाला अरे अधमा, अन्य कोणी जर असे वाक्य उच्चारले असते तर मी त्याला त्याच क्षणी ठार केले असते. परंतु तू माझा भ्राता असल्यामुळे मी तुझा केवळ धिक्कार करीत आहे. हे रावणाचे कटू वक्तव्य ऐकल्यावर बिभीषण आपल्या चार मंत्र्यांसह रावणाचा त्याग करून श्रीरामांकडे आला आणि त्याने श्रीरामांची शरण घेतली. त्याने घडलेली घटना श्रीरामाना सविस्तर सांगितली आणि साष्टांग नमस्कार केला. तो श्रीरामांच्या दर्शनाने परम भक्तीने भरून गेला होता. श्यामवर्ण, विशाल नेत्र, प्रसन्न मुखमंडळ, अजानबाहू असलेल्या श्रीरामांच्या समोर हात जोडून उभे राहून हर्षाने गद-गद झालेल्या वाणीने बिभीषणाने भगवंतांची स्तुती करण्यास प्रारंभ केला. तो म्हणाला हे राजेंद्रा, सितादेवीचे मन रमविणार्या, प्रचंड धनुष्य धारण करणार्या हे भक्तवत्सल श्रीरामा तुम्हाला नमस्कार असो. सुग्रीवाचे मित्र आणि स्थुलांचे स्वामी असलेल्या श्रीरामचंद्राना नमस्कार असो. या विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि विलय यांचे कारण असणार्या, त्रैलोक्याचे गुरु असणार्या, आदिकालापासून गृहस्थाश्रमी असलेल्या श्रीरामना मी पुन्हा, पुन्हा नमस्कार करतो. हे प्रभू तुम्हीच समस्त जगाचे आदिकारण आहात. तुम्हीच स्वतःच्या इच्छेप्रमाणे आचरण करणारे आहात. हे राघवा, स्थावर आणि जंगम सर्व प्राण्यांच्या आत आणि बाहेर, व्याप्त आणि व्यापक या रुपाने तुम्हीच असून जगन्मय आहात तुमच्या मायेमुळे ज्यांचे ज्ञान हरण केले गेले आहे आणि ज्यांची बुद्धी नष्ट झाली आहे तसेच ज्यांचे मन विपरीत प्रवृत्ती मार्गाकडे लागले आहे असे लोक आपल्या पाप पुण्यास वश होऊन सतत या संसारात येरझारया करीत असतात. जोपर्यंत अनन्य भावाने तुम्हा परमात्म्याला जाणले जात नाही तोपर्यंत शिंपेवर भासणार्या रुप्याप्रमाणे  हे विश्व सत्य भासते. हे विभू तुमचे ज्ञान न झाल्यामुळे मानव, आपले पुत्र, पत्नी, गृह इत्यादींचे ठिकाणी आसक्त होऊन शेवटी दुःख देणार्या सर्व विषयात सतत रमून जातात. हे पुरुषोत्तमा, तुम्हीच इंद्र, अग्नी, यम, निऋती, वरूण, आणि वायू आहात. हे प्रभो, तुम्ही अणू पेक्षा अणू आणि स्थुलापेक्षा अधिक स्थूल आहात. तुम्ही आदी, मध्य, आणि अंत यांनी रहित आहात. तुम्हीच सर्व लोकांचे पिता आणि माता असून सर्व लोकांचे पोषण करणारे आहात. तुम्ही परिपूर्ण, अच्युत, आणि अव्यय आहात. खर,दूषण आदी राक्षसांचा नाश करणार्या हे रामा, तुम्ही, श्रोता, द्रष्टा आणि ग्रहण करणारे असून तुम्ही वेगवान आहात. तुम्ही, अन्नमय, प्राणमय, मनोमय. विज्ञानमय आणि आनंदमय अशा पंच कोषा पेक्षा वेगळे असून तुम्ही निर्गुण आणि आश्रयरहित आहात. तुम्ही निर्विकल्प, निर्विकार, निराकार असून सहा विकारांनी (उत्पत्ती, वृद्धी, परिणाम, भयं,जीर्णता, आणि नाश) रहित, अनादी आणि प्रकृतीच्या पलीकडील पुरुष आहात. मायेच्या योगाने धारण केलेल्या रूपात तुम्ही मनुष्य असल्या सारखे दिसता परंतु तुम्ही निर्गुण अज आहात असे जाणून विष्णूंचे भक्त मोक्षाप्रत जातात हे राघवा, तुमच्या चरणांची उत्तम भक्तीरूप शिडी प्राप्त करून घेवून हे ईश्वरा, ज्ञानयोग नांव असणार्या प्रासादावर चढून जाण्याची माझी इच्छा आहे. हे सीतापते, हे श्रेष्ठ करुणावंता तुम्हाला माझा नमस्कार असो. तुम्ही माझे संसार सागरातून रक्षण करा. बिभीषणाने केलेली स्तुती ऐकल्यावर भक्तवत्सल श्रीराम प्रसन्न होऊन म्हणाले हे बिभीषणा तुझे कल्याण होवो. तू कोणताही वर माग. तुझ्या इच्छेप्रमाणे मी वर देईन बिभीषण म्हणाला हे राघवा तुमच्या चरणांच्या दर्शनाने मी धन्य झालो, कृत-कृत्य झालो आहे मी मुक्त झालो आहे यात संदेह नाही. हे रघुनंदना माझ्या कर्मबंधनाचा नाश होण्यासाठी भक्तीरूप असे तुमचे ज्ञान आणि तुमचा परमार्थ स्वरूपाचा साक्षात्कार घडविणारे तुमचे ध्यान तुम्ही मला द्या. हे राजेंद्र, रामा, तुमच्या चरण कमळांच्या ठिकाणी माझी भक्ती जडून राहो अशी माझी मागणी आहे. ठीक आहे असे म्हणून संतुष्ट झालेले श्रीराम पुन्हा म्हणाले बिभीषणा, तुझे कल्याण होवो. आता मी माझे रहस्य स्पष्ट करून 
 सांगतो ते ऐक अतिशय शांत भक्तीयोगी आणि आसक्ती रहित असलेल्या माझ्या भक्तांच्या हृदयात मी सीतेसह सर्वदा निवास करतो. सर्वकाळी शांत आणि सर्व पापांनी रहित होऊन तू माझे नित्य ध्यान केलेस तर तू या भयंकर संसार सागरातून मुक्त होशील. मला प्रसन्न करण्यासाठी जे कोणी तू केलेले हे स्त्रोत्र वाचेल, लिहील, अथवा श्रवण करील तो मला प्रिय असणारे सारुप्य प्राप्त करून घेईल. असे सांगून भक्तांवर प्रेम करणारे श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले अरे लक्ष्मणा, माझ्या दर्शनाने मिळणारे फळ हा बिभीषण आत्ताच पाहू दे. आत्ताच मी याला लंकेच्या राज्यावर अभिषिक्त करतो. तू समुद्रातून पाणी घेवून ये. श्रीरामांच्या आदेशा प्रमाणे लक्ष्मणाने समुद्रजळ आणले आणि श्रीरामांनी बिभिषणास समस्त वानर सेने समक्ष विधिवत राज्याभिषेक केला.

                शुक नांवाच्या राक्षसाने रावणास केलेला उपदेश
श्रीरामांनी बिभीषणास लंकेचा अधिपती म्हणून अभिषिक्त केले त्यावेळी रावणाचा एक दूत वायू मार्गाने आला आणि त्याने सुग्रीवासाठी रावणाकडून एक संदेश आणला होता. तो असा होता, हे वानरराज सुग्रीवा, तू मला भावाप्रमाणे आहेस. तुझ्या कोणत्याही गोष्टीचा नाश माझ्याकडून आतापर्यंत झालेला नाही. जर मी एखाद्या राजपुत्राच्या पत्नीचे हरण केले असेल तर त्याच्याशी तुझा काय संबंध आहे? तेंव्हा तू आपल्या वानर सेनेसह किष्किंधा नगरीस निघून जा. देवताना सुद्धा लंका जिंकता येणे शक्य नाही तर अल्प सामर्थ्य  असलेले मानव आणि वानर समुहाचे नायक यांची गोष्ट ती काय? हा संदेश रावणाचा दूत शुक सांगत असताना, वानर त्या राक्षसास बुक्क्यांचा प्रहार करीत होते. त्यावेळी शुक श्रीरामना म्हणाला हे राजेंद्रा, शहाणे लोक दूतास ठार मारीत नाहीत. हे प्रभो, तुम्ही या वानरांचे निवारण करा. शुकाचे दुःखपूर्ण शब्द ऐकल्यावर श्रीरामप्रभू वानराना म्हणाले  अरे मित्रानो, या असुरास मारू नका. त्यावेळी वानरांच्या प्रहारापासून मुक्त झालेला शुक राक्षस सुग्रीवास म्हणाला हे वानरराज सुग्रीवा, मी रावणास आपला काय संदेश सांगू?  सुग्रीव शुकास म्हणाला, तू रावणास असे सांग कि जसा वाली हा माझा भाऊ तसा हे अधम राक्षसा तू माझा भाऊ आहेस तथापि वाली प्रमाणेच  पुत्र, सैन्य, आणि वहाने यांच्यासह माझ्याकडून ठार मारल्या जाण्यास योग्य आहेस. हा निरोप घेवून शुक  आपला जीव मुठीत धरून लंकेस परतला. रावणाने शुकास पाहून विचारले, अरे शुका, तुला शत्रूंनी खूप त्रास दिला काय? त्यावेळी शुक म्हणाला महाराज मी आपला संदेश जसाच्या तसा सुग्रीवास सांगितला वानरांनी मला पकडले आणि बुक्क्यांनी ,नखांनी, दातांनी ते मला त्रास देवू लागले आणि शेवटी मला ठार मारण्याचा प्रयत्न करू लागले. त्यावेळी मी श्रीरामाना माझे रक्षण करण्याची आर्त स्वरात विनंती केली. त्यावेळी त्या दयाघन श्रीरामांनी मला त्या भयानक वानरांपासून सोडविले. ती अफाट वानर सेना पाहून भिऊन मी येथे आलो. ज्या प्रमाणे देव-दानवात संधी होणे शक्य नाही त्याच प्रमाणे राक्षस सेना आणि वानर सेना यांच्यामध्ये संधी होणे शक्य नाही असे मला वाटते. हे प्रभो, लवकरच ती सेना आपल्या नगरीच्या तटावर येईल. आता तुम्ही दोनपैकी एक गोष्ट करा. एक ती सीता तरी श्रीरामाना सत्वर देवून टाका, अथवा श्रीरामाबरोबर युद्धास तयार व्हा. शुक पुढे सांगू लागला महाराज, श्रीराम मला म्हणाले अरे शुका, तू रावणास माझा निरोप सांग की ज्या सामर्थ्याच्या आधार घेऊन तू माझ्या सीतेचे अपहरण केलेस ते सामर्थ्य आता तू तुझ्या इच्छेप्रमाणे सर्व सैन्य आणि सर्व पुत्र, बंधू, यांच्यासह मला दाखव. उद्याच्या उद्याच लंकापुरी आणि तुझे राक्षस सैन्य मी बाणांनी नष्ट केलेले तू पाहशील. असे बोलून श्रीराम मौन झाले. नंतर शुकाने श्रीरामांच्या सैन्यातील मुख्य, मुख्य योध्ये हनुमान, अंगद, नळ,नील, सुग्रीव यांची माहिती रावणास दिली. यानंतर शुक म्हणाला रावणा, श्रीराम हे सामान्य मानव नाहीत. ते साक्षात आदिनारायण परमात्मा आहेत आणि सीता ही  जगाचे साक्षात कारण असणारी जगदरुपिणी चीछक्ती आहे. त्या दोघापासूनच हे स्थावर आणि जंगम विश्व निर्माण झाले आहे. श्रीराम आणि सीता हे या जगताचे पिता आणि माता आहेत. अजाणतेने  तुम्ही ज्या सीतेला पळवून आणले आहे ती जानकी जगन्माता आहे. हे राजन, क्षणोक्षणी नष्ट होणार्या या संसारात शरीर हे क्षणभंगुर, पंच महाभूतानि बनलेले आणि चोवीस तत्वांचा समूह असणारे आहे. मल, मास, अस्थी, आणि दुर्गंधीयुक्त पदार्थ यांचाच जास्त भरणा असणार्या, अहंकाराचे आश्रयस्थान, अचेतन आणि तुझ्या आत्म्या पेक्षा वेगळे असलेल्या या शरीराची तू कसली आस्था बालगीत आहेस?ज्या देहासाठी तू ब्रम्हहत्या इत्यादी पातके केली आहेस आणि जो देह भोग भोगणारा आहे तो तर मरणोत्तर येथेच पडणार आहे. परंतु सुख-दुःखाची कारणे असणारी पुण्य, पापे मात्र जीवा बरोबर येतात. देहाशी संबंध असल्याने ही  पुण्य, पापे रात्रंदिवस जीवात्म्याला सुख,दु:ख देत रहातात. जोपर्यंत अज्ञानामुळे उत्पन्न होणार्या अध्यासामुळे मी देह आहे, मी कर्ता आहे, असा अभिमान आत्मा करतो तोपर्यंत अध्यासामुळे त्याला जन्म,मरण असहायपणे भोगावेच लागतात. म्हणून हे बुद्धिवान रावणा, तू देह इत्यादि वरील अभिमान सोडून दे. मुळात आत्मा हा अतिशय निर्मळ, शुद्ध, विज्ञान स्वरूप, निश्चल  आणि निर्विकार आहे.परंतु आपल्या अज्ञानामुळे तो आत्मा जन्म, मरण आदी बंधनात पडून मोहित होतो. म्हणून तू शुद्ध रुपाने आत्म्यास जाणून  नित्य त्याचे स्मरण ठेव. पुत्र, पत्नी, घर-दार इत्यादी विषयी वैराग्य धारण कर. कारण कुत्रा, मांजर, वराह या योनीमध्ये सुद्धा तसेच नरकात सुद्धा भोग हे मिळत असतात. खरे म्हणजे हा देह प्राप्त झाल्यावर, विशेषतः विवेकाने युक्त असे द्विजत्व प्राप्त झाल्यानंतर, तसेच कर्मभूमी असणार्या या भारत देशात, अतिशय दुर्लभ असा मानव जन्म प्राप्त झाला असता, कोणता शहाणा माणूस देहाला आत्मा मानून भोगांच्या मागे लागेल? तेंव्हा तू स्वतः ब्राम्हण असून आणि त्यातही, पुलस्त्य नंदन विश्रवा ऋषींचा पुत्र असताना सुद्धा एखाद्या अज्ञानी माणसा प्रमाणे तू निरंतर भोगांच्या मागे का लागला आहेस? यापुढे तरी सर्व आसक्तीचा त्याग करून अत्यंत भक्तीने नेहमी परमात्मा श्रीरामांचा आश्रय घे. त्याना सीता अर्पण करून त्यांच्या चरणांचा सेवक बन. असे जर तू केलेस तर सर्व पापांतून मुक्त होऊन विष्णू लोकी जाशील. असे जर तू केले नाहीस तर तुला असे दुर्लभ मानव शरीर मिळू शकणार नाही. तू उत्तरोत्तर अधोगतीस जाशील मग तेथून वर येणे तुला अशक्य होईल. मी तुला तुझ्या हिताची गोष्ट सांगत आहे. या माझ्या बोलण्याचा स्वीकार कर. अरे रावणा, तू सतत सत्संगती कर. जे शरणागताचे रक्षण करतात, मर्कत  मण्या प्रमाणे ज्यांची अंगकांती सुंदर आहे, ज्यांच्या समवेत सीता आहे, जे धनुष्यबाण धारण करतात, तसेच सुग्रीव, लक्ष्मण आणि बिभीषण हे ज्यांच्या चरण कमळांची सेवा करतात, अशा त्या विष्णुरूप श्रीराघवांची तू रात्रंदिवस सेवा कर. शुकाच्या मुखातून बाहेर पडलेले, अज्ञानाचा नाश करणारे हे वक्तव्य ऐकल्यावर क्रोधाने जणू जळणारा आणि रागाने डोळे लाल झालेला रावण शुकाला म्हणाला अतिशय दुष्ट बुद्धी असणार्या शुका, माझ्या तुकड्यांवर वाढलेला तू माझा सेवक असून एखाद्या गुरु प्रमाणे माझ्याशी कसे बोलतोस? मी तिन्ही लोकांचे शासन करणारा आहे. मला उपदेश करताना तुला लाज कशी वाटली नाही. खरे म्हणजे आत्ताच मी तुझा वध केला असता परंतु तू पूर्वी माझ्यासाठी जे कांही चांगले कर्म केले आहेस ते माझ्या लक्षात आहे म्हणून जरी तू वध करण्यास योग्य असलास तरी मी तुला जीवदान देत आहे. तू आता येथून निघून जा. शुक म्हणाला  महाराज आपली मोठी कृपा आहे. असे बोलून भीतीने थर थर कापतच तो आपले घरी निघून गेला.
शुक पूर्व जन्मीचा एक विद्वान ईश्वरभक्त विप्र होता. परंतु अगस्ती ऋषींच्या शापामुळे त्याला राक्षस योनी प्राप्त झाली होती. या जन्मात सुद्धा त्याला ईश्वर भक्तीचे स्मरण होते.हनुमंत, बिभीषण, शुक. आदीनि रावणास केलेल्या उपदेशाचा त्याच्यावर कांहीच परिणाम झाला नाही. अंती त्याचे श्रीराम आणि वानर सेनेशी युद्ध प्रारंभ झाले. युद्धात हनुमंत, अंगद, जांबुवंत या महावीरांनी रावणाच्या सैन्यातील सर्व प्रमुख सेनापती आणि रावणाचे पुत्र,पौत्र बंधू आणि आप्त याना मारून टाकले.   

                      रावण आणि कालनेमी यांचा संवाद

श्रीरामांनी रावणास आपल्या तीक्ष्ण बाणांनी अगदी घायाळ करून सोडले त्यावेळी श्रीराम त्यास म्हणाले हे  रावणा, तू माझ्या बाणांनी अत्यंत घायाळ झाला आहेस, तेंव्हा तू आता परत जा. माझी अनुज्ञा आहे. लंकेत प्रवेश करून विश्रांती घे उद्या तू माझे सामर्थ्य पाहशील. यानंतर रामाच्या बाणांनी विद्ध झालेला रावण अतिशय लज्जित होऊन लंकेत आला.  इकडे इंद्रजीताची शक्ती लागून लक्ष्मण मूर्च्छित झाला होता. त्याला पाहून राम सुद्धा मनुष्य स्वभावाचा आश्रय घेवून लीलेने शोक करू लागले.त्यानंतर ते हनुमंतास म्हणाले वत्सा, द्रोणागिरी पर्वतावरून महा औषधी आणून लक्ष्मण तसेच अन्य वानराना  जीवित कर राघवाचे वचन ऐकून हनुमंत क्षणाचाही विलंब न लावता वायुवेगाने तेथून निघून गेला. दरम्यानच्या काळात गुप्तहेरांनी रावणास ही  वार्ता सांगितली तो हेर म्हणाला महाराज, लक्ष्मणास जिवंत करण्यासाठी महा औषधी आणण्यासाठी श्रीरामांनी
पाठविलेला हनुमंत क्षीरसमुद्राकडे गेला आहे. हे गुप्त हेराचे वचन ऐकल्यावर रावण अतिशय चिंतातूर झाला. त्याच रात्री एकटाच कालनेमी नांवाच्या मायावी शक्तीसंपन्न असुराच्या घरी गेला. रावणाला पाहून कालनेमी आश्चर्यचकितच झाला. त्याने रावणाचे यथायोग्य स्वागत केले आणि येण्याचे कारण विचारले. त्यावेळी दुःखी झालेला रावण म्हणाला मित्रा, काळवशेकरून माझ्यावर सुद्धा संकट कोसळले आहे. शक्तीच्या प्रहाराने मूर्च्छित झालेला लक्ष्मण जमिनीवर पडलेला आहे. त्याला जिवंत करण्यासाठी औषधी आणण्यास हनुमान गेला आहे. हे महाबुद्धीवंता असे कांही तरी कर ज्याच्यामुळे त्याच्या कार्यात विघ्न येईल. कपटाने मुनी वेश धारण करून त्या महा वानरास मोहित कर. ज्याच्यामुळे औषधीच्या प्रयोगाचा काळ  निघून जाईल. असे करून तू परत ये. रावणाचे हे वक्तव्य ऐकल्यावर कालनेमी त्यास म्हणाला, महाराज, आता तुम्ही माझे वचन ऐका आणि ते खरे आहे असे समजून ध्यानी घ्या. मी तुमचे प्रिय करीनच त्यासाठी माझ्या प्राणांची सुद्धा परवा करणार नाही. परंतु त्यामुळे काय होणार? पुर्वी, दंडकअरण्यात मृगाचे रूप धारण केलेल्या मारीचाची जशी  अवस्था झाली होती तशीच माझीसुद्धा होणार यात शंकाच नाही. आतापर्यंत तुमचे पुत्र, पौत्र, बंधू, बांधव आणि अन्य राक्षस मारले गेले आहेत अशा प्रकारे राक्षस कुलाचा सर्वनाश करून तुमच्या जगण्याचा काय उपयोग आहे? त्यापेक्षा हे महाबाहो, सीता श्रीरामाना परत देवून टाका. बिभीषणाला राज्य देवून मुनि समुहाचा आश्रय असणार्या तपोवनात तुम्ही जा. तेथे प्रात:काळी निर्मल पाण्यात स्नान करून संध्या आदी नित्य कर्म करून नंतर एकांत स्थानी सुखासनावर बसून, सर्व प्रकारे आसक्ती सोडून, अन्य विषयाना मनांत प्रवेश न देता बाहेरच ठेवून, बाहेर प्रवृत्त होणार्या इन्द्रियाना तुम्ही  हळू, हळू आत वळवून घ्या. हे निष्पाप रावणा, प्रकृतीपेक्षा आत्मा हा भिन्न आहे असा नेहमी विचार करा. ब्रम्हदेवा पासून ते सूक्ष्म किटकापर्यंत देह,बुद्धी, इंद्रिये सर्व स्थावर, जंगमात्मक असे हे जग आहे त्याला प्रकृती म्हटले जाते आणि याला माया सुद्धा म्हणतात. विश्वरूपी वृक्षाची उत्पत्ती, स्थिती आणि विनाश यांचे कारण असणारी ही प्रकृती सात्विक, राजस, आणि तामस या तीन प्रकारची प्रजा निर्माण करते.तसेच ती काम, क्रोध इत्यादी पुत्र, आणि हिंसा, तृष्णा इत्यादी कन्या निर्माण करते. ती माया स्वतः च्या गुणांनी सर्व व्यापक  आणि निर्गुण अशा आत्मदेवाला रात्रंदिवस मोहित करते. कर्तृत्व, भोक्तृत्व इत्यादी मुख्य असणारे आपले गुण हे ईश्वररूप आत्म्यावर आरोपित करून आणि त्याला स्वतःला वश करून घेवून ती प्रकृती सदा सर्वदा त्याच्या बरोबर खेळत असते. आत्मा जरी शुद्ध असला तरी तो जेंव्हा त्या प्रकृतीने युक्त होतो तेंव्हा मायेच्या गुणांनी अतिशय मोहित झालेला तो स्वतःचे स्वरूप विसरून जाऊन नेहमी बाहेरच्या विषयांकडे पहात राहतो. परंतु ज्यावेळी ज्ञान रूपी सद्गुरुशी युक्त होऊन त्यांच्याकडून उपदेश घेतो त्यावेळी त्याची बाह्य विषयांकडे लागलेली दृष्टी परत मागे फिरते आणि नंतर तो सतत स्पष्टपणे आपल्या आत्मस्वरुपालाच पाहू लागतो. अशा प्रकारे जिवंतपणीच मुक्त झालेला देहधारी प्राणी प्रकृतीच्या गुणातून सुटून जातो.हे रावणा इंद्रियांचे नियमन करून आणि सातत्याने आत्म्याचा विचार करून तसेच प्रकृती पेक्षा आत्मा भिन्न आहे हे जाणून घेवून तुम्ही सुद्धा अशा प्रकारे मुक्त व्हाल. आता अशा या निर्गुण आत्म्याचे ध्यान करण्यास जर तुम्ही असमर्थ असाल तर तुम्ही सगुण रूपाचा आश्रय घेवून भक्ती करा. सगुण ध्यानाचा प्रकार असा आहे- हृदय कमळाच्या गाभार्यात तेथे रत्नसमुहाने जडित आणि अतिशय मृदू आणि चकचकीत अशा सुवर्ण सिंहासनावर जानकीसह श्रीराम बसले आहेत. ते वीरासन घातलेले, विशाल नेत्र असलेले, विजेच्या पुंजा  प्रमाणे तेज:पुंज, सुंदर वस्त्र परिधान केलेले. किरीट, हार,केयूर, कौस्तुभ इत्यादी अलंकारांनी विभूषित तसेच नुपूर, कडी आणि वनमाळा  यांनी सुशोभित आहेत. श्रीरामांचे एक आणि स्वतःचे एक असे दोन धनुष्ये धरणारा लक्ष्मण त्यांची सेवा करीत आहे, ते सर्वांच्या हृदयात स्थित आहेत, अशा प्रकारे आत्मस्वरूपी श्रीरामांचे ध्यान जे कोणी श्रेष्ठ भक्तीने युक्त होऊन सतत करतील ते मुक्त होतील यात संशय नाही.श्रीरामांच्या इतर भक्ता सह त्यांचे चरित्र तुम्ही अनन्य बुद्धी ठेवून ऐका. असे जर तुम्ही केले तर, ज्या प्रमाणे अग्नीमुळे कापसाचे ढीग जळून नष्ट होऊन जातात त्याप्रमाणे तुम्ही पूर्वी केलेली महापातके सुद्धा एका क्षणात नष्ट होऊन जातील.तुम्ही रामाबरोबरचे वैर सोडून द्या आणि आपल्या हृदयात त्यांच्या बद्दल भक्तियुक्त व्हा. मग परिपूर्ण, अद्वितीय, नामरूपा रहित पुराण पुरुष अशा त्या श्रीरामाची सगुण रुपाची आपल्या हृदयात भावना करून त्याना भजत रहा. एवढे बोलून कालनेमी मौन झाला. त्याचे अमृततुल्य वक्तव्य रावणास आवडले नाही. तो म्हणाला माझ्या आज्ञेच्या विरुद्ध वागणार्या  दुष्टा, तुला मी आताच ठार करीन. मला वाटते कि तू शत्रूकडून कांहीतरी लाच घेवून, रामाचा सेवक होऊन अशा प्रकारे बोलत आहेस. त्यावेळी कालनेमी रावणास म्हणाला महाराज जर तुम्हाला माझे वचन आवडले नसेल तर मी आपण जे सांगाल ते काम करीन. असे म्हणून कालनेमी हनुमंताच्या मार्गात विघ्न आणण्यासाठी निघून गेला. हनुमंताच्या मार्गात विघ्न आणण्याचा कालानेमीने खूप पर्यंत केले परंतु श्रीरामांच्या कृपा प्रसादाने आणि हनुमंताच्या समय सूचकतेने ते निष्फळ झाले. हनुमंताने संन्याशाच्या  रूपातील कालनेमिचा वध केला आणि लक्ष्मणास जीवित करण्यास हवी असलेली औषधी वनस्पती वेळेवर आणून दिली. तिच्या प्रयोगाने लक्ष्मण झोपेतून जागे व्हावे तसे उठून बसला. त्या औषधीने असंख्य वानरांचे प्राण वाचले. रावणाकडील समस्त सेनापती, महान योद्धे आणि त्याचे सर्व पुत्र, पौत्र या युद्धात मारले गेले. अंती रामाच्या तीक्ष्ण बाणांनी रावण सुद्धा मृत्यूमुखी पडला.युद्धात रावणाचा संपूर्णपणे पराभव झाला आणि श्रीरामानि  लंकेचे राज्य बिभिषणास  सुपूर्द केले.त्याचा लंकेचा अधिपती असा राज्याभिषेक प्रभुनी अगोदरच केला होता.  
   
               श्रीरामांनी हनुमंतास केलेला उपदेश –“ श्रीराम हृदय
लंकाधिपती रावणाचा वध करून, सीतेस अशोक वनातून सोडवून आणून श्रीराम,लक्ष्मण, सीता, हनुमंत, सुग्रीव, आणि बिभीषण यांच्यासह पुष्पक विमानाने अयोध्येस परत आले. थोड्याच काळात श्रीरामांचा राज्याभिषेक झाला आणि ते राजसिंहासनावर विराजमान झाले. त्यावेळी हनुमंतास कृतकृत्य झाल्यासारखे वाटत होते. युद्ध समयी त्याने एवढे महान कार्य केले होते कि त्याला तोड नव्हती. एवढे असूनही तो निरपेक्ष भावाने राज्यसभेत श्रीरामांच्या समोर हात जोडून उभा होता. त्यावेळी श्रीराम सीतेस म्हणाले जानकी या हनुमंताची आपणा दोघावर अढळ श्रद्धा आणि भक्ती आहे. याला तू माझ्या सत्य स्वरूपाचे ज्ञान करवून दे. सीता श्रीरामांच्या आदेशाप्रमाणे हनुमंतास श्रीरामांचे सत्य स्वरूप सांगू लागली. ती म्हणाली वत्सा हनुमंता, श्रीराम हे अद्वितीय, सच्चीदानंद परब्रम्ह आहेत. ते सर्व उपाधींनी रहित असून मन आणि इंद्रिये यांचा विषय नसणारे आहेत. आनंदघन, निर्मल, शांत, विकारहीन, निरंजन, सर्वव्यापक, स्वयंप्रकाशी आणि रागादि दोषरहित परमात्मा आहेत.सीता पुढे म्हणाली, अरे हनुमंता, विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय करणारी मूलप्रकृती मीच आहे. श्रीरामांच्या सानिध्यामुळेच मी निरलसपणे हे विश्व निर्माण करते. यानंतर सीतेने श्रीरामांच्या जीवनातील प्रमुख घटना हनुमंतास संक्षेपाने सांगितल्या. सीता पुढे म्हणाली तत्वतः श्रीराम सर्वव्यापी असल्याने ते कोठेही जात नाहीत, येत नाहीत, शोक करीत नाहीत, इच्छा करीत नाहीत, त्याग करीत नाहीत तसेच अन्य कोणतीही क्रिया करीत नाहीत. ते आनंदस्वरूप, अविचल आणि विकार रहित आहेत. परंतु मायेचा गुणांशी संबंध आल्यामुळे ते तसे भासतात. एवढे बोलून सीता मौन झाली. यानंतर श्रीरामचंद्रांनी स्वतः हनुमंतास आत्मा, अनात्मा, आणि परमात्मा यांचे तत्व सांगितले. श्रीराम म्हणाले अरे हनुमंता, ज्या प्रमाणे आकाश तीन प्रकारचे असते, एक महाकाश, दुसरे जलाने मर्यादित झालेले आकाश आणि तिसरे प्रतिबिंब असलेले आकाश याच प्रमाणे चैतन्य सुद्धा तीन प्रकारचे असते. एक बुद्धीची मर्यादा असलेले चैतन्य, दुसरे परिपूर्ण असणारे चैतन्य आणि तिसरे आभास चैतन्य. या तिघामधील केवळ आभास चैतन्याने युक्त अशा भूद्धीमध्येच कर्तेपण असते. याचाच अर्थ चिदाभास रहित असणारी बुद्धीच सर्व कार्य करते. परंतु अज्ञानी लोक भ्रांतीमुळे निर्विकार, अखंड, साक्षी असलेल्या आत्म्यावरच कर्तृत्व आणि जीवित्व यांचा आरोप करतात. अर्थात आत्म्यालाच कर्ता आणि भोक्ता मानतात. ज्याला आपण जीव म्हणतो ते आभास चैतन्य मिथ्या आहे कारण सर्व आभास हे मिथ्याच असतात. बुद्धी ही अविद्येचे कार्य आहे. परंतु तो परब्रम्ह परमात्मा अखंड आहे. त्यामुळे बुद्धीस त्याचा भाग मानणे ही केवळ कल्पना आहे. अहं(मी) च्या रुपाने प्रत्ययास येणारे, मर्यादित, साभास, वासनायुक्त, चैतन्य म्हणजेच जीव याचे, तत्वमसी(तेच तू आहेस)ते परब्रम्ह तूच आहेस इत्यादी वाक्यांनी पूर्ण चैतन्य परब्रम्हाशी एकत्व प्रतिपादन केले जाते. ज्यावेळी तत्वमसी, गुरुपादिष्ट या सारख्या महावाक्यांनी जीवात्मा आणि परमात्मा यांच्या एकतेचे ज्ञान  उत्पन्न होते त्यावेळी आपली बुद्धी आणि कार्यासह अविद्या सुद्धा नष्ट होऊन जाते यात अजिबात संदेह नाही. या स्थितीचा अनुभव येताच माझा भक्त माझ्या स्वरुपालाच प्राप्त होतो. परंतु जे लोक माझी भक्ती न करता, शास्त्ररूपी खळग्यात पडून भटकत रहातात त्याना शेकडो जन्मापर्यंत सुद्धा ज्ञानही होत नाही आणि मोक्षाचि प्राप्ती सुद्धा होत नाही. श्रीराम प्रभू हनुमंतास पुढे म्हणाले हे निष्पाप हनुमंता, हे परम रहस्य माझे हृदय आहे आणि  प्रत्यक्ष मीच तुला सांगितलेले आहे, हे रहस्य माझी भक्ती नसलेल्या कोणत्यही दुष्ट पुरुषास सांगू नकोस. एवढे बोलून प्रभुनी आपल्या वाणीस विराम दिला. महादेव पार्वतीस म्हणाले हे देवी अत्यंत गोपनीय, मनोहर, परमपवित्र आणि पाप नाशक असे श्रीराम हृदय मी तुला संगीताले आहे. हे सर्व वेदांताचे सार आहे. जो कोणी याचे भक्तिपूर्वक सतत पठण करतो तो मुक्त होऊन जातो. याच्या पठणाने अनेक जन्मातील संचित झालेली पापे सुद्धा नष्ट होऊन जातात.

                     प्रभू श्रीरामांनी लक्ष्मणास सांगितलेली श्रीराम गीता
एकदा श्रीराम आपल्या राज्यसभेत मंत्री आणि मुख्य सेनापती यांच्यासह बसले असताना त्यांनी बोलता,बोलता विजय नांवाच्या दूतास विचारले अरे विजय, माझ्याबद्दल.सितेबद्दल तसेच माझे बंधू, माता यांच्याविषयी नगरवासी, ग्रामवासी बरे-वाईट काय बोलत असतात? तू सत्य सांग मुळीच घाबरू नकोस. विजय म्हणाला   महाराज सर्व लोक असे म्हणतात की आत्मज्ञानसंपन्न अशा श्रीरामांनी अतिशय दुष्कर असे कार्य केले आहे. तथापि रावणाला मारल्यावर सितेविषयी कांही शंका न घेता तिला परत आणले आणि त्यानी तिला आपल्या घरी ठेवले हे मात्र योग्य केले नाही.अशा स्थितीत आम्हाला आमच्या बायकांचे दुष्कर्म सहन करावे लागेल. कारण जसा राजा असतो तशा प्रकारची प्रजा निश्चित असते. दूताचे हे वक्तव्य ऐकल्यावर श्रीरामांनी आपल्या स्वजानांकडे पृच्छा केली. ते श्रीरामाना  नमस्कार करून म्हणाले रामा हे असेच आहे खरे, यात संशय नाही हे ऐकल्यावर श्रीरामानी लक्ष्मणास बोलावून घेतले आणि म्हणाले  अरे लक्ष्मणा, सितेमुळे माझ्यावर फार मोठा लोकापवाद आला आहे. तेंव्हा उद्या सकाळीच सीतेला रथात बसवून वाल्मिकींच्या आश्रामाजवळ सोडून ये.
लोकोपवादामुळे सीतेचा त्याग केल्यानंतर श्रीरामांनी सर्व भोग सोडून दिले आणि विरक्त होऊन मुनिव्रताचे आचरण करू लागले. एकदा प्रभू श्रीराम एकांत स्थानी बसले असताना लक्ष्मण त्यांच्या जवळ आला आणि प्रणाम करून त्याना म्हणाला हे महाबुद्धीमंता तुम्ही ज्ञानस्वरूप आहात, समस्त देहधारी प्राण्यांचे आत्मा तुम्हीच आहां. तुम्ही निराकार असूनही सर्वांचे नियंते आहां. तुमच्या चरण कमळांच्या ठिकाणी  श्रद्धा, भक्ती असलेल्या आणि ज्ञान दृष्टी प्राप्त झालेल्या लोकांनाच तुम्ही प्रतीत होता. हे प्रभो, तुमचे जे चरण संसाराची निवृत्ती करतात आणि योगी लोक ज्यांचे ध्यान करतात त्या तुमच्या चरणी मी शरण आलो आहे. मी हा अज्ञान रूपी अपार सागर सुखाने व सहजपणे तरुन जाइन असा उपदेश मला करा. लक्ष्मणाची ही श्रद्धाभावाने केलेली प्रार्थना ऐकल्यावर शरणागताचे इच्छित पूर्ण करणारे श्रीराम प्रभू मनात प्रसन्न झाले. त्यांनी अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करण्यासाठी श्रुतीने सांगितलेले आत्मज्ञान लक्ष्मणास सांगण्यास सुरवात केली. प्रभू श्रीराम म्हणाले अरे लक्ष्मणा सर्वात प्रथम आप-आपला वर्ण आणि आश्रम यासाठी शास्त्राने वर्णन केलेली कर्मे यथायोग्यपणे  केल्यावर चित्ताची शुद्धी होते. चित्तशुद्ध झाल्यानंतर ती कर्मे सोडून द्यावीत. तत्पूर्वी, शम, दम इत्यादी साधनांनी संपन्न होऊन आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी मनुष्याने सदगुरुंचा आश्रय घ्यावा. प्रभू पुढे म्हणाले कर्म हेच पुनर्जन्माच्या प्राप्तीचे कारण आहे. कर्माबद्दल आसक्ती बाळगणार्या मनुष्याच्या बाबतीत इष्ट आणि अनिष्ट अशा क्रिया घडतात. तसेच धर्म आणि अधर्मही घडतात. अशा प्रकारे कर्मापासून जन्म आणि जन्मा मध्ये पुन्हा कर्म असा चक्राप्रमाणे संसार फिरत राहतो. अज्ञान हेच या संसाराचे मुळ  कारण आहे आणि त्या अज्ञानाचा नाश हाच संसारातून सुटण्याचा उपाय शास्त्रात सांगितला आहे. अज्ञानाचा नाश करण्यास ज्ञान हेच प्रभावी साधन आहे.  सकाम कर्मामुळे अज्ञानाचा नाश होत नाही. तसेच आसक्तीचा  सुद्धा नाश होत नाही. यासाठी मनुष्याने ज्ञान प्राप्तीचा प्रयत्न करावा. सर्व इंद्रियांच्या वृत्तीचे जे विषय त्यांच्या पासून निवृत्त होऊन आत्म्याच्या निरंतर अनुसंधनास लागलेल्या साधकाने सर्व कर्मे टाकून द्यावीत. कारण कर्मे विद्येला विरोधी असल्याने त्यांचा समुच्चय कधीही होऊ शकत नाही. परमात्मा आणि जीवात्मा यामध्ये जो भेद मानला जातो त्याचा नाश करणारे प्रकाशमय विज्ञान ज्यावेळी अंत:करणात स्पष्टपणे विलसु लागते त्याच वेळी जीवात्म्याच्या संसाराला कारणरूप असणारी माया (अविद्या) सहजपणे आपल्या कारकासह लयास जाते. शुद्ध आणि अद्वितीय अशा परमात्म्याचे विज्ञान झाल्यानंतर पुन्हा अविद्या(माया) उत्पन्न होऊ शकत नाही.श्रीराम लक्ष्मणास पुढे म्हणाले अरे लक्ष्मणा विकार रहित चित्त असलेल्या  ज्ञानि साधकाने वेदांनी विहित केलेल्या कर्माचा विधीपूर्वक त्याग करावा.  श्रेद्धेने संपन्न असलेल्या आणि चित्ताने शुद्ध असलेल्या  साधकाने, गुरुंच्या कृपाप्रसादाने  तत्वमसी आदी वाक्याच्या अर्थाने परमात्मा आणि जीवात्मा यांचे ऐक्य अनुभवून मेरू प्रमाणे निश्चल आणि सुखी असावे. श्रीराम पुढे म्हणाले लक्ष्मणा, भोगांचा आश्रय असणारे उत्पत्ती, आणि नाश असणारे पुर्वकर्मानी निर्माण होणारे आणि मायेचे कार्य असलेले जे स्थूल शरीर ही आत्म्याची स्थूल उपाधी आहे. मन, बुद्धी, दहा इंद्रिये आणि पंच प्राण यांनी युक्त, पाच अपंचीकृत भूतापासून उत्पन्न होणारे आणि भोक्त्या जीवाच्या सुख-दुःख इत्यादी भोगांचे साधन असणारे जे सूक्ष्म शरीर आहे ते जीवात्म्याचे दुसरे शरीर आहे. अर्थात ही आत्म्याची आणखी एक उपाधी आहे. या शिवाय अनादी, अनिवर्चनीय माया हे प्रधान असणारे तीसरे शरीर आहे. ही सुद्धा आत्म्याची आणखी एक उपाधी आहे. या तीन शरीरांच्या उपाधी पेक्षा संपूर्णपणे वेगळा असणारा आपला  आत्मा आहे, असा क्रमाने उपाधींचा निरास करीत आपल्या मनात आत्मा निश्चय करावा. प्रभू श्रीराम पुढे म्हणाले
हे रघुकुल दीपका, आत्मा हा कधीही जन्मास येत नाही, आणि तो कधीही मरत नाही. तो कधीही क्षीण होत नाही आणि कधीही वाढत नाही. तो पुरातन आत्मा सर्व विशेषणांनी रहित आहे. तो सुख-स्वरूप आहे. तो स्वयंप्रकाशी, सर्वव्यापक आणि द्वैत रहित आहे.
अज्ञानाच्या योगाने आत्म्यावर अध्यास होऊन (अध्यास म्हणजे भ्रमामुळे एखाद्या ठिकाणी दुसराच पदार्थ भासणे) हा संसार अनुभवास येतो. परंतु आत्म्याचे ज्ञान होताच हा संसार क्षणात लयास जातो. कारण ज्ञान आणि अज्ञान हे संपूर्णपणे परस्पर विरोधी आहे. अनादी बुद्धीपासून उत्पन्न झालेल्या बुद्धीत प्रतिबिंबित झालेला चैतन्याचा प्रकाश हाच जीव आहे.बुद्धीचा साक्षी या स्वरूपात आत्मा हा वेगळाच असतो, बुद्धीमुळे मर्यादित होत नाही कारण तो आत्मा  पर म्हणजे सर्व व्यापक आहे. श्रीराम पुढे म्हणाले लक्ष्मणा, मी प्रकाशरूप, अजन्मा, अद्वितीय, नित्य. प्रकाशमान, अतिशय निर्मळ, शुद्ध, विज्ञानघन, निरामय, क्रीयारहित आणि संपूर्णपणे आनंद स्वरूप आहे. विकार रहित असणे हे माझे स्वरूप आहे. मी निरंतर मुक्त आहे. माझ्याजवळ अचिंत्य शक्ती आहे. मी अतींद्रिय,ज्ञान  स्वरूप, अविकृत स्वरूप, असणारा आहे. मी अनंत आणि अपार आहे. वेदांचा अभ्यास करणारे वेदवेत्ते रात्रंदिवस आपल्या हृदयात माझेच चिंतन करीत असतात. अशा प्रकारे अखंड मनोवृतीने आत्म्याचे चिंतन करणार्याच्या मनात उत्पन्न होणारी विशुद्ध भावना सुद्धा त्वरित काराकासह अविद्येचा नाश करून टाकते.  प्रभू पुढे म्हणाले अरे लक्ष्मणा, इन्द्रियाना  आपल्या विषयांपासून दूर करून अंत:करण जिंकून घ्यावे आणि आत्म्यामध्ये स्थित होऊन इतर कोणत्याही साधनांचा आधार न घेता शुद्ध चित्त होऊन विज्ञान दृष्टीने केवळ आत्म्याचे चिंतन करून साधकाने सर्व बंधनातून मुक्त व्हावे. मी कर्ता, मी भोक्ता या अभिमानाने रहित होऊन प्रारब्ध भोगात राहणारा मनुष्य नंतर साक्षात माझ्यातच लीन होऊन जातो. प्रभू पुढे म्हणाले ज्या प्रमाणे समुद्रात जल, दुधात दुध, महाकाशात घटाकाश, वायूमध्ये वायू मिसळून एकरूप होतात त्याप्रमाणे हा  संपूर्ण संसार आत्म्याशी अभिन्न (एकरूप) होतो, असे चिंतन केल्यास जीव हा मज परमात्म्याबरोबर अभिन्न भावनेने स्थित होतो. जो पर्यंत सर्व विश्व हे माझेच स्वरूप आहे हे मनुष्यास पाहता येत नाही , तोपर्यंत त्याने माझी आराधना करण्यात तत्पर असावे. जो पुरुष श्रद्धेने युक्त आणि उत्कट भक्तीने संपन्न असतो त्यालाच स्वतःच्या ह्रदयात रात्रंदिवस माझाच साक्षात्कार होतो. श्रीराम पुढे म्हणाले हे प्रिय लक्ष्मणा, सर्व श्रुतींचे सार संग्रहरूप असे  हे रहस्य मी निश्चित करून तुला सांगितले आहे. येथे या जगात जे बुद्धिमान पुरुष आहेत ते या रहस्याचे मनन करून एका क्षणात सर्व पापातून मुक्त होतील. हे जग जे दिसत आहे ते सर्व माया आहे. हे जाणून ते तू आपल्या मनातून काढून टाक. माझ्या चिंतनाने चित्त शुद्ध  करून तू सुखी, आनंदमय, आणि क्लेश रहित हो. जो पुरुष आपल्या मनाने गुणांच्या पलीकडे आणि  गुणरहित अशा, माझे चिंतन करतो किंवा कधी माझ्या सगुण रूपाचे चिंतन करतो तो आणि मी एकरूप आहोत. ज्या प्रमाणे सूर्य आपल्या किरणांनी समस्त विश्वास प्रकाशित करतो त्याप्रमाणे महापुरुष आपल्या पायाच्या रज:कणाच्या स्पर्शाने तिन्ही लोक पवित्र करतात. श्रीराम शेवटी म्हणाले हे प्रिय लक्ष्मणा, गुरुभक्तीने युक्त होऊन जो पुरुष श्रद्धापूर्वक हे पठण करील आणि त्याची जर माझ्या वचनांवर भक्ती असेल तर तो पुरुष मद्रूप होऊन जाईल यात संदेह नाही.     
                           || हरी ओम तत्सत ||
चैत्र शुद्ध प्रतिपदा(गुडीपाडवा)
दिनांक २३ मार्च २०१२

No comments:

Post a Comment