Wednesday, September 26, 2012

श्री राघवेंद्र स्वामी चरित्रामृत.

                        श्री गुरु राघवेंद्र स्वामी चरित्र
                      _________________________

                              नम्र निवेदन

संत म्हणजे निर्गुण निराकार परमेश्वराचे सगुण साकार रुपात प्रकट झालेले मूर्तिमंत स्वरूपच. महापुरुषाची लक्षणे सांगताना भगवत गीतेत भगवान म्हणतात
  अद्वेष्टा सर्व भूतानां मैत्रः करुण एवंच |
  निर्ममो निर्हन्कारा सम दुखः सुख क्षमी ||
  संतुष्ट सततं योगी यतात्मा धृढ निश्चया |
   मय्यर्पित मनोबुद्धिर्यो मद्भक्तःस मी प्रियः ||
संताना महापुरुषाना कोणाविषयी द्वेष भाव नसतो त्यांचे सर्वांवर निर्व्याज प्रेम असते.त्यांची सर्वांशी मैत्री असते.ते सर्व जनसमुदायावर निरपेक्ष प्रेम आणि दया  करतात.भगवंता प्रमाणे महापुरुष सर्वांचे हित चिंतणारे असतात.त्याना पुत्र,पत्नी,घर,देह आदी बद्दल ममता,अथवा अहंकाराचा लवलेश सुद्धा नसतो.ते सदैव क्षमाशील असून कोणी त्यांचे कितीही अपराध केले तरी त्यांचे ते स्वप्नात सुद्धा अनिष्ट चिंतीत नाहीत.त्यांची वृत्ती सुख-दु:खात समान असते.ते सर्व अवस्थेत भगवंताच्या स्वरुपात आनंद अवस्थेत मग्न असतात असे योगी,महान पुरुष जितेंद्रिय असून दृढनिश्चयी असतात.त्यांनी आपल्या मनाला वश करून त्याला भगवंताला निश्चयात्मक बुद्धीने अर्पण केलेले असते.महात्मा पुरुषांचे दर्शन, भाषण, संवाद,स्पर्श, चिंतन, हे अति आनंद देणारे असते. संतांचे वर्णन करताना ज्ञानेश्वर माउलीची वाणी तर उंचावरून सतत पडणाऱ्या धबधब्याच्या प्रवाहांसारखी अखंड अविचल असते. माउली म्हणते हे संत म्हणजे कल्पतरूंचे चालते बोलते बगीचे आहेत.कल्पतरू हा एके ठिकाणी स्थित असतो आणि त्याच्या सानिध्यात येणाऱ्या लोकांच्या इच्छा पूर्ण करतो. परंतु संत महात्मे एका ठिकाणी थांबत नाहीत. आपल्याकडे जे जे चांगले आहे ते वाटत सुटतात. म्हणूनच त्याना चला कल्पतरूंचे आरव  असे माउली मोठ्या प्रेमभावाने म्हणते.चिंतामणी हा मनातील कामना पूर्ण करणारा मणी  असतो.परंतु या चिंतामणी  मध्ये चेतना नसते.संत मात्र चेतनापूर्ण चिंता मणीचे गावच्या गाव असतात.ते समस्त जनतेला भक्ती प्रेमाचे अमृत वाटतात. या संतांचे देणे कसे आहे याचे वर्णन करताना माउली म्हणते या संतांचे देणे |कल्पतरुहुनी दुणे |परिसा अगाध देणे|चिंतामणी ठेंगणा||
संतांच्या समोर चिंतामणी सुद्धा ठेंगणा ठरतो.चिंतामणीचा सुद्धा संकोच व्हावा असे सामर्थ्य संतांचे ठायी असते आणि म्हणूनच माउली म्हणते चला कल्पतरूंचे आरव| चेतन चिंतामणीचे गाव| बोलते जे अर्णव| पीयूषाचे|| हे संत महात्मे अमृताचे चालते बोलते महासागरच आहेत. अश्या या संतांचे,महात्म्यांचे जीवन चरित्र शब्दबद्ध करणे हे खरोखरी शब्दांच्या सामर्थ्याच्या सिमेपलीकडील आहे.अशा महान संतांच्या मालिकेतील एक दिव्य रत्न श्री गुरु राघवेंद्रस्वामी च्या रुपाने चारशे वर्षा पूर्वी प्रकट झाले.त्यांनी आपल्या प्रगाढ बुद्धिमत्तेच्या तेजाने,आचार संपन्न जीवनशैलीने आणि भगवंतांनी वर वर्णन केलेल्या सर्व गुणांनी आपल्या भक्तांवर करुणेचा ,दयेचा अक्षरशहा वर्षाव केला.या महान संताच्या पुण्यतिथेचे दिनी हे श्री राघवेंद्र चरित्रामृत त्यांच्या चरण कमळी अर्पण आणि कोटी कोटी प्रणाम|

     पुज्याय राघवेन्द्राय सत्यधर्म रथायच|
     भजतां कल्पवृक्षाय नमतां कामाधेनावे ||

                              अध्याय १ ला
                              --------------
देव लोकात  शन्कुकर्ण नावाचा एक महान विष्णू भक्त होता. तो ब्रम्हदेवाना, विष्णुना पूजेसाठी नित्य न चुकता गुलाब, मोगरा,चमेली,चाफा,शेवंती ,पारिजात या सारखी अत्यंत सुवासिक आणि भगवान विष्णुना प्रिय असणारी फुले आणून देत असे.नैवेद्या साठी तो आंबा,फणस,डाळिंबे,चिकू,संत्रे या सारखी मधुर फळे आणीत असे. या सेवेतून उरलेला वेळ तो विष्णू चिंतनात घालावीत असे. भगवान विष्णू शंकूकर्णावर अत्यंत प्रसन्न होते. त्यांनी शंकूकर्णास पृथ्वीवर तीन अवतार घेऊन जन सामान्यांचा उद्धार करावा अशी अनुज्ञा केली.भगवंताच्या आदेशानुसार शंकूकर्णाने तीन अवतार धारण केले.पहिला अवतार भक्त शिरोमणी प्रल्हाद याचा होता. दुसरा अवतार परमभक्त व्यासराय यांचा आणि तिसरा अवतार श्री गुरु राघवेंद्र स्वामी यांचा होता.
                प्रथम अवतार ---  श्री प्रल्हाद यांचा
                ___________________________

हिरण्याक्ष आणि हिरण्याकशिपू या नावाचे दोन अति पराक्रमी तसेच अत्यंत दुष्ट असुर बंधू होते. श्री विष्णूनी अवतार घेऊन हिरण्याक्षाचा वध केला.भावाच्या वधाची सल  हिरण्यकशपुच्या मनात सारखी बोचत होती.भगवान विष्णूचा पराभव करून तिन्ही लोकांचे राज्य मिळवावे अशी हिरण्यकशपुची तीव्र इच्छा होती.ही कामना पूर्ण करण्या साठी तसेच अमरत्व  मिळविण्यासाठी त्याने ब्रम्हदेवाची कठोर तपस्या करण्यास प्रारंभ केला.त्या तपस्येवर प्रसन्न होऊन ब्रम्हदेव हिरण्यकशीपू समोर प्रकट झाले आणि म्हणाले मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला हवा असलेला वर मागून घे हिरण्यकशीपू म्हणाला देवा मला अमरत्व प्राप्त व्हावे.ब्रम्हदेव म्हणाले जन्माला आलेला प्रत्येक प्राणी हा मरणार हे त्रिकाळ अबाधित सत्य आहे.त्या साठी तू कोणापासून मरण येऊ नये ते मला सांग तसा मी तुला वर देईन.हिरण्यकाशीपू म्हणाला मला देव,दैत्य,मानव,यक्ष,किन्नर यांच्या कडून मृत्यू येवू नये.तसेच दिवसा अथवा रात्री, घरात अथवा घराबाहेर,जमिनीवर अथवा आकाशात कोणी मला मारू शकू नये.अशा अटि घालून हिरण्यकाशिपुने मोठ्या चतुराईने आपणास अमरत्वच मागून घेतले.ब्रम्ह्देवानि तथास्तुअसे म्हणून त्या असुराला इच्छित वर दिला आणि ते अंतर्धान पावले.हिरण्यकशिपू मोठ्या आनंदाने अमरत्वाच्या अभिमानाने आपल्या राजधानीत परत आला.तो तपश्चर्येसाठी गेल्या नंतर त्याच्या अनुपस्थितीचा फायदा घेवून इंद्र त्याच्या राजधानीत आला आणि त्याच्या पत्नी कयाधु हिला कपटाने पळवून घेवून चालला होता. त्याच वेळी मार्गात देवर्षी नारद भेटले.त्यांनी गर्भवती कयाधुस कपटाने पळवून नेणाऱ्या इंद्राची कानउघाडणी केली आणि म्हणाले अरे देवेंद्रा गर्भवती स्त्रीचे अपहरण करणे हे तुझ्या कीर्तीला काळीमा फासणारे आहे.तू या मातेची क्षमा मागून तिला सोडून दे.  इंद्रास आपल्या कृत्याची लाज वाटली. त्याने देवर्शीची क्षमा मागितली आणि निघून गेला. देवर्शिनी कायाधुस आपल्या आश्रमात नेले आणि मोठ्या सन्मानाने पुत्र प्राप्ती  होई पर्यंत तेथे ठेवून घेतले.आश्रमातील पवित वातावरणाचा आणि दैनिक सत्संगाचा त्या गर्भस्त शिशुवर उत्तम परिणाम झाला. विष्णू भक्ती आणि अत्युत्तम संस्कार यांचा वारसा घेऊनच तो दिव्य शिशु जन्मास आला.हिरण्यकशपुच्या तपस्ये नंतर राजधानीत आगमन झाल्यानंतर देवर्शिनी कयाधू आणि नवशिशुस राजमहाली आणून सोडले.त्या दैदिप्यमान बालकास पाहून हिरण्यकशपूस अत्यंत आनंद झाला. त्याने देवार्शीची यथायोग्य पूजा केली आणि बालकाचे नाव प्रल्हाद असे ठेवले.यथा समयी प्रल्हादास विद्या ग्रहणासाठी दैत्य गुरु चंडामर्क  यांच्या कडे पाठविले.हिरण्यकशिपुने आपल्या राज्यातील सर्व यज्ञ  याग बंद करविले होते. भगवान विष्णूंची पूजा अर्चा करणाऱ्यास शिक्षा करण्यास प्रारंभ केला. परंतु प्रल्हाद मात्र आपल्या सहपाठीना विष्णू भक्तीचे पाठ देत होता.यामुळे त्याने आपल्या पित्याचा क्रोध ओढवून घेतला.पुत्राच्या मुखी विष्णू भक्तीचा महिमा ऐकून हिरण्यकशिपुच्या अंगाचा तिळपापड झाला.त्याने प्रल्हादाचा छळ करण्यास सुरवात केली.त्याला उकळत्या तेलात टाकण्यात आले. पर्वताच्या शिखरावरून लोटून देण्यात आले. परंतु प्रत्येक वेळी भगवान विष्णूनी त्याचे रक्षण केले.शेवटचा उपाय म्हणून प्रल्हादास हिरण्यकशिपुच्या बहिणीने आपल्या मांडीवर घेवून चोहीकडून अग्नी प्रज्वलित केला. अग्नीने प्रल्हादास स्पर्श सुद्धा केला नाही परंतु हिरण्यकशिपुची  वर प्राप्त बहिण मात्र अग्नीमध्ये जळून खाक झाली.या प्रसंगानंतर हिरण्यकशीपू अत्यंत क्रोधायमान झाला आणि प्रल्हादास म्हणाला कोठे आहे तुझा देव? प्रल्हाद उत्तरला पिताश्री माझा देव तुमच्यात आहे,माझ्यात आहे,सर्व प्राणी मात्रात,सर्व चल,अचल वस्तुत आहे.ते ऐकून हिरण्यकशिपुने दुष्ट भावाने विचारले या खांबात आहे का तुझा देव? प्रल्हादाने होकारार्थी मान हलविली आणि हिरण्यकशिपुने आपल्या गदेने त्या खांबावर एक जोरदार प्रहार केला.त्या खांबातून वीज चमकल्या प्रमाणे गडगडाट होऊन त्यातून एक अति विशाल सिंह मुख असलेले मनुष्य देह धरी नरसिंह भगवान बाहेर आले.ते अत्यंत क्रोधित होऊन सिंह गर्जना करीत हिरण्यकाशिपुच्या मागे धावले.त्याला आपल्या दोनी हातांनी घट्ट धरून राज महालाच्या उंबरठ्यावर बसून त्या असुरास मांडीवर घेवून आपल्या नखांनी त्याचे पोट फाडून अंत केला. ब्रम्हदेवानी दिलेल्या सर्व अटींचे पालन करूनच त्याचा वध केला होता.या वेळी भगवंतांचा क्रोध शांत करणे कोणासच जमले नाही. शेवटी प्रल्हादच त्याचा क्रोध शांत करण्यात सफल झाला. भगवंतांनी त्याला मांडीवर बसवून अनेक आशीर्वाद दिले नंतर त्याला राज्याभिषेक करून राज्यावर बसविले. प्रल्हादाने अनेक सहस्त्र वर्षे उत्तम प्रकारे राज्य करून आणि तो विष्णू लोकी गेला.

                   अध्याय २ रा
                   __________

         दुसरा अवतार श्री व्यास राय
         -----------------------------
  शंकू कर्णाचा दुसरा अवतार हा श्री व्यास राय यांचा झाला. विजयनगरच्या साम्राज्यात रामाचार्य आणि सितम्मा हे अत्यंत सुशील आणि आचार संपन्न दाम्पत्य राहत होते.ते नित्य नेमाने पूजा,अर्चा नैवेद्य आदी  शास्त्रानुसार करीत.रामाचार्य एक विद्वान ब्राम्हण होते.या दाम्पत्याला परमेश्वराच्या कृपा प्रसादाने एका अत्यंत दैदिप्यमान पुत्राची प्राप्ती झाली. त्यांनी बाळाचे नाव व्यासराय असे ठेवले.हा बालक लहानपणापासून अतिशय तीक्ष्ण बुद्धिमत्तेचा होता.वेदांचा अभ्यास याने श्री श्रीपाद राय नावाच्या एका व्युत्पन्न गुरुंकडे केला होता.व्यासराय म्हणजे ज्ञान,भक्ती आणि वैराग्य यांचा मूर्तिमंत पुतळा होता.त्यांनी आपल्या ज्ञानाने, आचारसंपन्न जीवन शैलीने द्वैतपीठ अलंकृत केले होते.व्यासरायाच्या निर्मल भक्तीस भुलून प्रत्यक्ष गोपाल कृष्णाने त्याना दर्शन दिले होते.तो भक्तप्रेमी कृष्ण अनेक वेळा व्यासरायाशी बोलला होता.त्यांच्या बरोबर नृत्य सुद्धा केले होते.व्यास रायाचे गुरु श्री श्रीपादराय यांनी हा प्रसंग स्वत पहिला होता. त्या वेळेपासून गुरुंचे  या शिष्याबद्दलचे प्रेम अधिकच वाढले होते.व्यास रायांनी तात्पर्य  चंद्रिका तर्क तांडव न्यायामृत असे उत्तम ग्रंथ रचले.व्यासराय तिरुमल क्षेत्रात राहत असताना एकदा काही कारणाने श्री वेंकटेश्वराची पूजा चुकली.त्या वेळी देवस्थानाचे प्रमुख साळव श्री नरसिंहराव यांनी श्री व्यासरायाना श्री बालाजीची दैदंदिन पूजा अर्चा करण्याची विनंती केली.व्यासरायांनी ती अत्यंत आनंदाने मान्य केली.यानंतर त्यांनी श्री बालाजीची पूजा सतत बारा वर्षेपर्यंत केली.या दीर्घकालीन भगवंताच्या सानिध्याचे फलस्वरूप व्यासरायांना श्री बालाजीची पूर्ण कृपा प्राप्त झाली.व्यासराय तिरुमल क्षेत्रात असताना श्री कृष्णदेव राय या राजाचे साम्राज्य होते. एकदा महाराजांना कुहू नावाचा वाईट योग आला होता.त्यांनी आपल्या राज्यातील प्रसिद्ध ज्योतिषाला बोलावून आपली जन्म पत्रिका दाखविली.त्याने तिचा सखोल अभ्यास करून असा निर्णय दिला की महाराजांनी कुहू योग  प्राप्त होण्यापूर्वी सिंहासन सोडून दिल्यास या योगाचा अपाय होणार नाही. श्री कृष्णदेव रायांनी कुहू योग जाईपर्यंत सिंहासन सोडण्याचा निश्चय केला.आपल्या जागी योग्य व्यक्तीची निवड करण्यासाठी त्यांनी एका हत्तीच्या सोंडेत पुष्पमाला देवून तो ज्या व्यक्तीच्या गळ्यात ती माला घालील त्याला राज्याचा तात्पुरता अधिकारी नेमावयाचा असा निश्चय केला.या आदेशानुसार एका हत्तीस सजवून सोंडेत माला देवून त्याला गावभर फिरविण्यात आले. त्या वेळी गावाच्या बाहेरील एका गुहेत श्री व्यासराय तपश्चर्या करीत बसले होते.त्या हत्तीने  गुहेजवळ जाऊन आपल्या सोंडेतील  माला श्री व्यासरायांच्या गळ्यात घातली.त्या हत्ती बरोबर आलेल्या सेवकांनी ही बातमी कृष्णदेवरायाना सांगितली.सम्राटाने मोठ्या सन्मानाने श्री व्यासरायाना दरबारात आणून त्यांना राज्यअधिकार ग्रहण करण्याची विनंती केली.श्री श्री व्यासरायांनी हा ईश्वरी संकेत आहे असे मानून राज्यपद स्वीकारले.ते राज्य चालवीत असताना ज्योतिष्याने सांगितल्या प्रमाणे कुहू योग सिंहासनावर बसू लागला.हा योग आल्याचे श्री व्यासरायांनी ओळखले आणि ते सिंहासनावरून उतरले. त्या ठिकाणी त्यांनी आपले भगवे उपरणे ठेवले आणि आपण दूर उभे राहिले.त्याच क्षणी ते उपरणे पेटले आणि जाळून भस्मसात  झाले. तेथे उपस्थित असलेल्या दरबारी सदस्यांनी तो प्रकार पाहिला.ते श्री व्यासरायांच्या बुद्धिमत्तेची, समय सुचकतेची स्तुती करू लागले. श्रीकृष्णदेवरायाना आलेला कुहू योग नष्ट झाल्याचे कळता च श्री व्यासरायांनी महाराजाना बोलावून त्यांचे राज्य त्यांना सुपूर्द केले.कृष्णदेवरायांना सिंहासनाधिष्ट करून त्यांना अनेक आशीर्वाद देवून ते तीर्थाटनास निघाले. त्यांनी अनेक ठिकाणी प्राणदेवांची प्रतिष्ठापना केली.भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे अशी त्यांची सर्वत्र प्रसिद्धी झाली.त्यांनी हम्पी क्षेत्राकडे येवून तेथे सुप्रसिद्ध असलेल्या प्राणदेवांची प्रतिस्थापना केली. या प्राणदेवाला यांत्रोद्धारक प्राणदेव असे नाव आहे.
श्री व्यासरायांनी रीसर्वोत्तम वायूजीवोत्तम या सिद्धांताचा अखिलभारतवर्षात प्रसार केला आणि ते जगतवंद्य झाले.त्यांनी द्वैत वेदांताचा प्रचार आणि प्रसार करून त्यात आपले एक अगळे वेगळे स्थान प्राप्त केले.त्यांचा मोठा शिष्यपरिवार होता.ते विलंबी नामक वर्षी फाल्गुन चतुर्थीस वयाच्या नव्वदाव्या वर्षी आनेगुंदि गावाजवळ तुंगभद्रा नदीच्या  काठावर वृंदावनस्थ झाले.या ठिकाणी अजून आठ द्वैत पिठाधीपतींची वृंदावने आहेत.या स्थळाला नववृंदावन असे नाव प्राप्त झाले.
                       || श्री व्यासरायाचा जय जयकार असो ||    

                           अध्याय ३ रा

            तृतीय अवतार श्री राघवेंद्रस्वामी जन्म, बालपण आणि शिक्षण      

शान्तो,महान्तो,निर्वसंती संतो वसंत वल्लोक हितं चरन्त  |
तीर्णाः स्वयं भीम भवार्णवं जना नहेतुनान्यानपी तारयन्ताः ||
                              (विवेक चूडामणी)

परम पवित्र परम मंगल असलेल्या या आपल्या भारत भूमीत सच्चिदानंद परमात्मा वारंवार अवतार घेतात. कधी भगवान, ईश्वराच्या स्वरुपात तर कधी संत सदगुरुंच्या रुपात. संसार तापाने दग्ध झालेल्या जीवांना ते आपली स्नेहमय छाया देवून त्यांच्यावर करुणामृताची वर्षा करतात.ते जन सामान्यांना भवारण्यातील दावानलातून मुक्त करून आत्मस्वरुपात स्थित करतात.केवढे हे संतांचे आपणावर उपकार| अश्या महान संतांच्या मालिकेतील एक दिव्य रत्न आहे श्री गुरु राघवेंद्र स्वामी महाराज
ज्या वंशात महापुरुष, अवतारी पुरुष जन्म घेतात त्या वंशातील पूर्वीच्या अनेक पिढ्यांनी ज्ञान,भक्ती आणि वैराग्यसंपन्न जीवनाचे आचरण करून पुण्यसंचय केलेला असतो.याचे फलस्वरुपच दिव्य महात्मे या वंशात अवतरतात. श्री राघवेंद्र स्वामीच्या बाबतीत सुद्धा असेच घडले. स्वामीचे आजोबा श्री कृष्ण भट्ट एक विद्वान वेदशास्त्र पारंगत,सात्विक वृत्तीचे आचार संपन्न ब्राम्हण होते.ते विणा वाजविण्यात निष्णात होते.त्या काळी कृष्णदेवराय विजयनगर राज्याचे सम्राट होते.त्यांच्या दरबारात अनेक विद्वान पंडित, कलाकार होते. श्रीकृष्ण भट्ट स्वता सम्राटाला विणा शिकवीत असत. श्री कृष्णाची पत्नी एक देवभक्त,पतीव्रता स्त्री होती.कालांतराने या आचार संपन्न दाम्पत्यास एका दिव्य पुत्राची प्राप्ती झाली.त्याचे नाव कनकाचल असे  ठेवले होते. कनकाचल लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचा होता.आपली गुणवत्ता आणि बुद्धी चातुर्याने तसेच सात्विक आचरणाने पित्याप्रमाणेच त्याने श्री कृष्ण देवरायाच्या दरबारात  एक विशेष स्थान प्राप्त करून घेतले होते.कनकाचलाचा  यथाकाळी विवाह झाला आणि थोड्याच काळानंतर त्यास एका विद्वान पुत्राची प्राप्ती झाली.त्याचे नाव तीम्मणा  असे ठेवले होते. तीम्मणा ने पिता आणि पितामहा प्रमाणे विजयनगरच्या दरबारी सेवा केली नाही.त्याने आपल्या गुरुगृहि राहून वैदिक शास्त्रा मध्ये प्राविण्य मिळविले.विणा वादनाचा पारंपारिक गुण मात्र त्यात  विद्यमान होता. आपल्या अंगी असलेल्या विद्वतेच्या कारणाने ते ब्राम्हण समाजात तीम्मणा भट्ट या नावाने विख्यात झाले. यथाकाळी त्यांचा विवाह गोपम्मा नावाच्या सुंदर,सुशील,सुस्वभावी, सालास आणि सात्विक कन्येबरोबर झाला.विवाहोत्तर तीम्मणानी कुम्भकोनम येथील तुडीरमंडल या मध्वाचार्यांनी स्थापन केलेल्या वैष्णवांच्या प्रमुख संस्थांनी स्थलांतर केले.या ठिकाणी सुधींद्र तीर्थ नावाचे एक विद्वान,आचारसंपन्न मठाधिपती होते.त्यांच्या आश्रमात तीम्मणा  अनेक वर्षे होते.त्यांच्या विवाहास अनेक वर्षे लोटली होती परंतु अजून पुत्र प्राप्ती झाली नव्हती. श्रीबालाजीचा आशीर्वाद घेण्यासाठी तिम्मणा आपल्या धर्मपत्नी  गोपम्मा समवेत तिरुमला तिरुपती क्षेत्री गेले.तेथे राहून त्यांनी श्री बालाजीची मोठ्या भक्तीभावाने सेवा केली.पहाटेच उठून ते पुष्करणीत स्नान करीत. प्रातः संध्यादि आन्हिक उरकून गोविंदाचे दर्शन घेऊन साष्टांग नमस्कार करून अति प्रेमाने श्री चरणांना मिठी मारीत नंतर श्री बालाजीच्या स्तोत्राचा पाठ करीत.श्री व्यंकटेश्वराच्या भव्य दिव्य मूर्तीस स्नान घालीत.सुगंधी कस्तुरीचा टीका  ललाटावर लावून, नाना प्रकारच्या सुगंधी फुलांच्या माळा, तुळशीच्या माळा  श्रीनिवासास मोठ्या भक्तीभावाने अर्पण करीत.अशाप्रकारे यथासांग पूजा करून गोपाम्मा मातेने भक्ती भावाने तयार केलेला नैवेद्य श्रीनिवासास अर्पण करून सोबत तांबूल आणि दक्षिणा ठेवीत. अशी भक्ती भावाने श्री चरणाची सेवा चालू असतानाच श्रीनिवासाच्या कृपा प्रसादाने तीम्मणास दोन अपत्यांची प्राप्ती झाली. मोठी कन्या वेन्कम्मा आणि धाकटा गुरुराज. अशी कांही वर्षे लोटली,नंतर  तीम्मंणा तिरुमला क्षेत्र सोडून सहकुटुंब सहपरिवार कावेरी  पट्टन या गावी आले. ते येथे आले खरे परंतु तीम्मणाना  श्रीनिवासाची सारखी आठवण येई.तिकडे श्रीनिवासास तीम्मणाचा विरह सहन होईना. त्यांच्या सारखा भक्तीभावाने पूजा,अर्चा करणारा दुसरा कोणी अर्चक दिसत नव्हता. असा एक वर्षाचा काळ कसाबसा लोटला.तीम्मणाला भगवंतांचा दृष्टांत झाला. श्रीनिवास त्याना पूजेसाठी बोलावीत होते.मंदिराचा एक सेवक अर्चक सेवा सोडून गेला होता.हा दृष्टांत तीम्मणाने दुसरे दिवशीच पहाटे आपल्या पत्नीस सांगितला श्रीनिवासच्या सेवेची संधी पुन्हा चालून आली होती.त्यामुळे त्या सात्विक दाम्पत्याच्या आनंदाला पारावर राहिला नाही. तीम्मणा  आपल्या पत्नी आणि मुलासह तीरुमलास येऊन पोहोचले.दुसऱ्या दिवसापासूनच श्रीनिवासाच्या सेवेस प्रारंभ झाला. त्रिकाळ पूजेचा तीम्मणा चा नियम होता.त्यांची पूजा नैवेद्य, धूप.दीप, इतका सुन्दर  असे कि स्वर्गातील देव सुद्धा अदृश रूपात येऊन श्रीनिवासाचे  मंगलमय दर्शन घेउन जात.मध्यान्हीच्या भोजनोत्तर अल्पशा वामकुक्षी नंतर तीम्मणा  पुराण सांगण्यास मंदिरात येत.अश्या प्रकारे या दाम्पत्याचा भगवंताच्या सेवेमध्ये काळ आनंदात चालला होता. एके शुभदिनी तीम्मणास श्रीनिवासाचे प्रत्यक्ष दर्शन झाले.चतुर्भुज श्यामल सुंदर मूर्ती समोर अवतरली.भगवंतांनी शुभ आशीर्वाद देवून वर मागण्यास सांगितले.तीम्मणा  म्हणाले हे नाथ मला आपली  चरण सेवा सदैव घडावी.आज पर्यंत आपण माझे पिता आणि मी आपला पुत्र असे होते.आता आपण माझे पुत्र रुपाने जन्म घ्यावा. तथास्तु असे म्हणून भगवंत अंतर्धान पावले.त्यांनी प्रल्हादास तीम्मणाच्या घरी जन्म घेण्यास सांगितले.थोड्याच काळात गोपम्माला अपत्य प्राप्तीची लक्षणे दिसू लागली.तिला धान्य दळत असताना,कपडे धूत असताना हसऱ्या हरी मूर्तीचे दर्शन होऊ लागले.तिच्या मुखी सतत हरीनामाचे उच्चारण होऊ लागले.मंदिरात गेले की श्रीनिवासाचे स्थानी स्मित करणारी बाल मुकुंदाची छबी दिसू लागली. ती आपले डोळे चोळून पुन्हा त्या मूर्तीकडे पाही त्यावेळी तो बालक गोपम्माकडे मिस्कीलभावाने  हसत पाही.कधी कधी तिला वाटे की पर्वताच्या शिखरावर जाऊन तप करावे,तर कधी वाटे मंदिरात समाधिस्त बसावे.असे त्या मातेचे  अगळे वेगळे  डोहाळे होते.अशा आनंदी अवस्थेत नउ मास आणि नउ दिवस पूर्ण झाले आणि मन्मथ नाम वर्षातील शके १५९५ च्या फाल्गुन शुद्ध सप्तमीस पहाटेच्या सुमारास एका दिव्य बालकाचा जन्म झाला.या वेळी स्वर्गात दुंदुभी वाजू लागल्या अप्सरा आनंदाने नृत्य गायन करू लागल्या.देवांनी आनंदाने या नवजात शिशुवर पुष्पवृष्टी केली आणि मनोभावे त्याला अनेक शुभ आशीर्वाद दिले.घरासमोरील आंब्याच्या झाडावरील कोकिला मधुर सुरात गायन करू लागल्या पहाटेचा मंद मंद वारा स्वतामध्ये मोगरा,चंपक चमेली,गुलाब या  फुलांचा सुगंध भरून घेवून गावाक्षातुन हळुवारपणे आत येऊन त्या नवजात शिशूचे चरण स्पर्श करू लागला.या दिव्य पुत्राच्या जन्माने माता गोपम्मा आणि पिता तीम्मणा  अत्यंत आनंदित झाले.त्यांनी वेंकटेश स्तोत्राचे गायन करून सर्व आप्तजनाना साखर वाटली.बाराव्या दिवशी बाळाचे बारसे केले.या मंगल प्रसंगी लक्ष्मी आणि नारायण वेश बदलून तीम्मणाच्या घरी शिशुस  आशीर्वाद देण्यास आले होते.त्यांनी बाळासाठी वैराग्याचा भरजरी अंगरखा आणि ज्ञानाचे टोपडे आणले होते ते घालून लक्ष्मी माता शिशुस पाळण्यात निजवून मोठ्या कौतुकाने पाळणा झुलवू लागली.बाळाचे नाव वेंकटनाथ असे ठेवले.या दिव्य सोहळ्याचा आनंद लुटून लक्ष्मी नारायणाची जोडी गोपाम्मा आणि तिम्मणा  या भाग्यवान दम्पतीचा निरोप घेवून स्वस्थानी परतली.वेंकटनाथ दिवस मासाने वाढू लागला.गौर वर्ण भव्य ललाट,मोठे,मोठे काळेभोर पाणीदार नेत्र अत्यंत सरळ नासिका, गोबरे,गोबरे गाल नाजूक गुलाबी ओठ आणि निमुळती जीवणी वाटोळ्या चेहऱ्यास अत्यंत शोभून दिसत असे.पहाता,पहाता बाळाच्या कोडकौतुकात सहा महिने पंख लाऊन उडून गेले.सातव्या मासी बाळाचा अन्नप्राशानाचा समारंभ संपन्न झाला.बाळ एक वर्षाचा होताच चालू लागला.प्रथम पाउले टाकताना पाहून त्या सात्विक माता,पित्यास आनंदाचे भरते येई.बाळाच्या बाललीला पाहण्यात,त्याचे मधुर बोबडे शब्द ऐकण्यात,कोडकौतुक करण्यात तीन वर्षाचा काळ कसा गेला ते त्या सच्छील दाम्पत्यास  कळलेच नाही.आता वेंकटनाथाने चौथ्या वर्षात पदार्पण केले होते.त्याच्या अक्षर ज्ञानाचा ओनामा ओम अक्षराने केला.तो अत्यंत कुशाग्र बुद्धीचा असल्याने त्यास कोणतीही गोष्ट एकदा सांगताच पाठ होत असे.तीम्मणाची मोठी कन्या  वेन्कम्मा आता आठ वर्षाची झाली होती.तिचा विवाह, त्या काळातील पद्धती प्रमाणे,एका सुशील, विद्वान युवकाबरोबर करण्यात आला.या मंगल प्रसंगी तीम्मणाचा प्रथम पुत्र गुरुराज याच्या उपनयनाचा कार्यक्रम सुद्धा संपन्न झाला. सालंकृत कन्यादान करून तीम्मणा  धन्य झाले. मौंजी बंधनानंतर गुरुराज अध्ययनासाठी आपल्या मातुल गृही राहिला.नंतर कांही दिवसांनी तीम्मणा, पत्नी आणि वेंकटनाथ कुंभकोणम क्षेत्री आले.येथे सुधीद्र तीर्थ गुरूंच्या सेवेत कांही काळ लोटला.त्या वेळी तीम्मणाना आपला अंतकाळ जवळ आल्याची चाहूल लागली. त्याने ते व्याकुळ झाले.जीवनातील महत्वाची कर्तव्ये अजून अपूर्णच होती,वेंकटनाथ अजून अबोध बालकच होता. गुरुराजाचे अध्ययन अजून पूर्ण झाले नव्हते. या काळजीने तीम्मणा ची प्रकृती क्षीण होत गेली.औषधोपचाराचा कांही उपयोग होत नव्हता एके दिवशी देवांची पूजा करीत असताना,त्याना देवाज्ञा झाली.त्यांच्या निर्वाणाने घरावर जणू  आकाशच कोसळले घराची संपूर्ण जवाबदारी किशोर अवस्थेतील गुरुराज वर येवून पडली.मोठ्या धैर्याने त्याने आलेल्या परिस्थितीस तोंड देवून आपले शिक्षण पूर्ण केले.यथाकाळी गुरुराजाच्या मातामहा श्री लक्ष्मीनरसिंह यांनी एक सुयोग्य कन्या पाहून गुरुराजचा विवाह आणि वेंकटनाथाची मुंज केली. उपनयन संस्कारांनंतर वेंकटनाथास पुढील अध्ययनासाठी श्री लक्ष्मीनरसिंहाचार्य या व्युत्पन्न पंडितांकडे पाठविले मुळातच अतिशय कुशाग्र बुद्धीमत्तेच्या वेंकटनाथाने संपूर्ण अभ्यासक्रम अगदी सुलभतेने आणि अल्प काळातच पूर्ण केला.त्याची अभ्यासातील प्रगती पाहून गुरुजनांना धन्यता वाटे.थोड्याच कालावधीत वेंकटनाथाने शटशास्त्रे, चार वेद,अठरा पुराणे  यांचा सखोल अभ्यास पुरा केला.त्याच्या विद्वतेची कीर्ती चोहीकडे पसरली होती.

                        अध्याय ४ था
                        --------------

           श्री वेंकटनाथाचा विवाह आणि कुम्भकोणमला प्रयाण

वेंकटनाथाचे अध्ययन पूर्ण झाल्यावर आणि तो विवाहास योग्य झाल्यानंतर गुरुराजाने त्याचा विवाह करण्याचे ठरविले आणि एका सुशील,रुपवती,गुणवंती,सत्कुलीन कन्येची निवड केली.एका शुभ मुहूर्तावर त्यांचा विवाह संपन्न झाला. विवाह उपरांतसुद्धा वेंकटनाथाचे उच्च शिक्षण चालूच राहिले.त्या काळी कुम्भ्कोणम हे मध्व पिठाचे प्रसिद्ध केंद्र होते.तेथे सुधींद्रतीर्थ मठाधिपती होते.त्याना प्रसिध्द मध्व संत विजयीन्द्रतीर्थ यांच्या कडून अनुगृह मिळाला होता.सुधींद्रतीर्थ ६४ कलांमध्ये पारंगत होते.त्याना आपल्या विद्वतेसाठी मोठ्या,मोठ्या विद्वत सभेत सन्मान आणि सोन्याचे कडे मिळाले होत्र.त्यांनी द्वैत मताचा प्रचार आणि प्रसार दक्षिण भारतात केला होता.अशा अद्वितीय गुरुंकडे जाउन विद्याभास करावा असा वेंकटनाथाने संकल्प केला आणि आपला विचार मोठे बंधू गुरुराज यांना सांगितला.गुरुराजनी वेंकटनाथास कुम्भकोणाम जाण्याची परवानगी दिली. एका शुभ मुहूर्तावर त्याने बंधूचा आणि अन्य थोर मंडळींचे आशीर्वाद घेऊन कुम्भकोणमला प्रयाण केले.गुरुच्या आश्रमात पोहोचल्यावर वेंकटनाथ सद्गुरूसमोर हात जोडून अत्यंत नम्रभावाने उभा राहिला. त्या तेजपुंज   नवयुवकाकडे पहाताच गुरुवर्य म्हणाले हे युवका तू कोण,कोठला,येथे कशासाठी आलास?वेंकटनाथाने प्रथम सद्गुरू चरणी वंदन केले आणि म्हटले स्वामी माझे  नाव वेंकटनाथ, मी भूवनगिरीच्या  प्रसिद्ध विणा वादक तम्मणा  भट्ट यांचा पुत्र. मी सुधा आदी ग्रंथांचा अभ्यास करण्यासाठी आपल्या चरणी आलो आहे.आपण माझा स्वीकार करून मला आपला शिष्य करून अनुग्रहित करावे.वेंकटनाथाच्या या अत्यंत मधुर आणि विनयशील भाषणाने सुधींद्रतीर्थावर एव्हढा परिणाम झाला की त्यांनी वेंकटनाथास तत्काळ आपला शिष्य करून घेतले.आणि त्यास मठात राहण्याची परवानगी दिली.त्याच्या भोजनाची व्यवस्था सुद्धा मठातच करण्यात आली.
           
                               अध्याय  ५ वा

                                      कुम्भकोणम मठातील जीवन
                   -----------------------------

महान गुरूंच्या मार्गदर्शनाखाली वेंकटनाथाचा सुधा ग्रंन्थाचा अभ्यास प्रारंभ झाला. गुरुवर्य प्रतिदिन या ग्रंथावर प्रवचने देत. ती ऐकून वेंकटनाथ त्यांच्यावर सुंदर टिपणे लिहीत असे.रोजचा अभ्यास रोज कंठस्थ करीत असे.कोणता भाग समजला नाही तर तो गुरुदेवाना पुन्हा विचारून समजावून घेत असे.त्याचा प्रामाणिकपणा, विद्याभ्यासाची आवड पाहून गुरुजन त्याच्यावर अत्यंत प्रसन्न असत. दिवसेंदिवस  गुरुदेवांचे वेंकटनाथा बद्दल वाटणारे प्रेम वाढतच होते.हे पाहून आश्रमातील कांही शिष्यांना त्याचा हेवा वाटू लागला.ते विचार करू लागले की कशा प्रकारे गुरुदेवांचे मन वेंकटनाथा बद्दल कलुषित करावे, एकदा तीन-चार शिष्यांनी मिळून गुरुदेवांकडे जाऊन तक्रार केली की वेंकटनाथ अभ्यास बरोबर करीत नाही.केंव्हाही त्याच्याकडे गेले असता तो पेंगत असतो  अथवा झोपलेला असतो.इतकेच नव्हे तर दुसऱ्या शिष्यांची चेष्टा करतो, खोड्या काढतो.गुरुदेव त्या शिष्यांचे बोलणे शांतपणे ऐकत असलेले पाहून त्याना अजूनच चेव आला आणि ते म्हणू लागले की वेंकटनाथासारख्या अयोग्य शिष्यास जेवण देवून शिकविणे सर्वस्वी व्यर्थ आहे.अशा विद्यार्थ्याने मठात राहणे योग्य नाही.त्याला मठातून बाहेर पाठवावे. हे शिष्यांचे  वक्तव्य ऐकून गुरुदेव म्हणाले तुम्ही चिंता करू नका.मी वेंकटनाथाबद्दल विचार करून योग्य तो निर्णय घेईन.तुम्ही आता चला. थोड्या वेळातच ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी गुरुदेव आले.त्यांच्या समोर सर्व शिष्यगण बसले होते.सुधाग्रंथातील पुढचा भाग ते समजावून सांगत होते.अचानकपणे एका श्लोकाचा अर्थ गुरुदेवाना  त्यावेळी आठवला नाही. ते शिष्यांना म्हणाले मुलानो मी या श्लोकाच्या अर्थाबद्दल साशंक आहे. उद्या मी तो तुम्हाला समजावून सांगेन. एवढे बोलून ते उठले.
वेंकटनाथ रोज शिकविलेला भाग त्याच दिवशी वाचून समजून घेऊन त्यावर टिपणे काढीत असे.अभ्यास संपताच थकून जाऊन त्याच ठिकाणी झोपत असे.त्यावेळी त्याची पुस्तके आजूबाजूला पडलेली असत.शिष्यांनी, वेंकटनाथाबद्दलची सांगितलेली माहिती खरी आहे का नाही हे पहावे म्हणून गुरुदेव सर्वांची जेवणे झाल्यानंतर वेंकटनाथाकडे आले.त्यावेळी तो पुस्तके उघडी टाकून गाढ झोपलेला होता.बाजूस ताडपत्रीची लिहिलेली पाने पडली होती.गुरुदेवांनी ती उचलून घेतली आणि वाचली. ती रोज शिकवीत असलेल्या सुधा ग्रंथातील श्लोकावर लिहिलेली टिपणे होती.आश्चर्याची गोष्ट अशी की वेंकटनाथाने आज गुरुदेवांनी सांगितलेल्या श्लोकावर, ज्याच्या अर्थाबद्दल ते साशंक होते, त्याचे सुद्धा समर्पक टिपण  लिहिले होते,ते वाचून गुरुदेवाना अत्यंत आनंद झाला. त्यांनी मोठ्या प्रेमाने आपल्या अंगावरील उपरणे थंडीत झोपलेल्या वेंकटनाथाच्या अंगावर घातले आणि सर्व लिखित ताडपत्रे घेऊन आपल्या स्थानी गेले.सकाळी वेंकटनाथ उठला तेंव्हा आपल्या अंगावर गुरुदेवांचे उपरणे पांघरलेले पाहून त्याला अत्यंत आश्चर्य वाटले, तसेच त्याने लिहिलेली टिपणे परिमलजवळ नव्हती. नित्या प्रमाणे स्नान,संध्या आटोपून वेंकटनाथ  गुरुदेवांचे उपरणे परत करून त्यांची क्षमा मागण्यासाठी गेला.गुरुदेवाना पहातच त्याने त्याना साष्टांग नमस्कार घातला आणि काल रात्री झालेला प्रकार सांगितला. तो म्हणाला गुरुदेवा काल रात्री लिहिता,लिहिता मला झोप लागली आणि सकाळी उठून पाहतो तर माझ्या अंगावर आपले हे उपरणे होते.मी लिहिलेली ताडपत्रे मात्र नाहीशी झाली. गुरुदेव मी अपराधी नाही.आपणच माझे रक्षण करावे.वेंकटनाथाचे कारुण्यपूर्ण बोलणे ऐकून गुरुदेव त्याचे समाधान करीत म्हणाले तू चिंता करू नकोस आता पाठाची वेळ झाली आहे आपण पाठशाळेत जाउ या.ते दोघे पाठशाळेत आले. तेथे इतर शिष्य बसले होते.गुरुदेव सर्व शिष्याना उद्देशून म्हणाले विद्यार्थ्यानो माझा शिष्य वेंकटनाथ हा कोणी सामान्य व्यक्ती नाही, तो महा प्रज्ञावंत आहे.तो दर रोज सुधाग्रंथाचा पाठ समजून घेतो आणि रात्री त्याचावर विचार करून सुंदर टिपणे तयार करतो.काल  मी एका श्लोकाच्या अर्था बद्दल साशंक होतो परंतु वेंकटनाथाने त्याच श्लोकावर सुंदर टीपण तयार केले आहे.ते तुम्हास वाचून दाखवितो. असे म्हणून गुरुदेवांनी वेंकटनाथाने लिहिलेले  टीपणवाचून दाखविले.सर्व शिष्यांनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली.गुरुदेवांनी वेंकटनाथाकडे नजर टाकून म्हटले वेंकटनाथाच्या प्रतिभा पांडित्यावर मी संतुष्ट झालो आहे.त्याने सुधा ग्रंथावर परिमळ नावाचे भाष्य लिहिले आहे.म्हणून त्याला मी परिमळचार्य अशी पदवी देवून त्याचा गौरव करतो. असे म्हणून त्यांनी त्याला आशीर्वाद दिला.ज्या शिष्यांनी वेंकटनाथाची तक्रार केली होती ते मनात अत्यंत लज्जित झाले.त्यांचा वेंकटनाथा बद्दलचा मनातील द्वेष नाहीसा होऊन त्याची जागा आदराने घेतली.

________________________________________________________________-

                            अध्याय  ६ वा  

              वेंकटनाथाचा गुरुदेवाकडून पदवी बहाल करून सन्मान

सुधींद्र तीर्थानि वेंकटनाथाच्या प्रतिभा पांडित्यावर संतुष्ट होऊन त्याला परिमळचार्य अशी पदवी बहाल केली. कांही दिवसांच्या अध्ययनानंतर  गुरुदेव आपल्या शिष्यासह यात्रेसाठी निघाले.ते गावा मागून गावे पार करीत पुढे चालले होते. मदुरा नगरीत त्यांचा मुक्काम होता.तेथे एक द्रविड सन्यासी होते. ते गुरुदेवाना व्याकरण शास्त्रात वादविवाद करण्याचे आव्हान करीत होते. गुरुदेव म्हणाले प्रथम माझ्या शिष्या बरोबर वादविवाद करा त्यांना पराजित करून नंतर माझ्याबरोबर वादविवाद करण्यास या. ते त्या व्याकरण पंडिताने मान्य केले. वेंकटनाथ आणि त्या द्रविड पंडिताचा वाद प्रारंभ झाला.दोघे तुल्यबळ असल्याने वाद खुपच रंगला परंतु शेवटी त्या द्रविड पंडिताने वेंकटनाथासमोर आपली हार मान्य केली आणि वेंकटनाथाच्या बुद्धिमत्तेचा मनापासून सन्मान केला.वेंकट नाथाच्या जीवनातील हि एक महान घटना होती.गुरुदेव वेंकटनाथाच्या बुद्धीमत्तेवर आणि समयसुचकतेवर अतिप्रसन्न झाले आणि त्यांनी त्यास महाभाष्याचार्य ही पदवी बहाल केली आणि मोठा सन्मान करून आशीर्वाद दिला. तंजाउर प्रांतात त्या वेळी रघुनाथराव नावाचे राजे राज्य करीत होते.ते मोठे रसिक असून त्यांनी साहित्य, संगीत,आणि अभिनव कलेस प्रोत्साहान  दिले होते. रघुनाथरावांनी सुधींद्रतीर्थांची कीर्ती ऐकली होती.त्यांनी स्वामीना आग्रहाचे निमंत्रण पाठविले.स्वामी मोठ्या आनंदाने आपल्या शिष्यांसह तंजाउरला आले.रघुनाथरावांच्या दरबारात गोविंद दिक्षित  नावाचे एक मंत्री होते.त्यांचे  पुत्र श्रीयज्ञनारायण दिक्षित हे अद्वैत वेदांतात एक प्रगाढ पंडित होते.त्यांनी सुधींद्रतीर्थाबरोबर  अद्वैत मतावर वाद करण्याचा आपला मानस सांगितला.त्यावेळी गुरुदेव म्हणाले  माझा शिष्य वेंकटनाथ याचे बरोबर प्रथम वादविवाद करावा. त्याना पराभूत करून नंतर आमच्या बरोबर वाद करावा. यज्ञनारायण दीक्षितांनी ते मान्य केले. मोठ्या विद्वत जनाच्या समूहामध्ये वेंकटनाथ आणि यज्ञनारायण याचा समोरा- समोर बसून वाद सुरु झाला.दोघे आपआपली मते मांडीत होते.प्रत्येकजण दुसऱ्याच्या मताचे मोठ्या चातुर्याने खंडन करीत होता .तत्वमसी,अहम ब्रह्मास्मि इत्यादी श्रुती वाक्यांचा शास्त्र संमत अर्थ सांगणे आणि प्रती पक्षाने तो तितक्याच चातुर्याने खोडून काढणे असा क्रम चालू होता. हा वाद अठरा दिवस चालला दोघेहि आपआपले मत अत्यंत बुद्धीचातुर्याने मांडीत होते.श्रोते तो वाद मोठ्या तन्मयतेने ऐकत होते. शेवटी एकोणिसाव्या दिवशी श्री वेंकटनाथाने द्वैत सिद्धांतच श्रेष्ठ असल्याचे पटवून दिले.दिक्षितानि आपला पराभव स्वीकारला. या प्रसंगी वेंकटनाथाने प्रदर्शित केलेली प्रतिभा आणि वाद-विवाद चातुर्य पाहून गुरुदेवांनी त्याला भट्टाचार्य अशी पदवी दिली.त्यावेळेपासून गुरुदेव त्याला प्रेमाने वेंकन्नाभट्ट  असे म्हणू लागले.यानंतर वेंकटनाथ कांही काल गुरुदेवाजवळ राहून तर्क, वेदांत शास्त्रात जे शिकावयाचे राहिले होते ते त्याने शिकून आत्मसात केले.

__________________________________________________________________    

                           अध्याय ७ वा
                           --------------
                  वेंकटनाथाचे भुवनगिरीस पुनरपी आगमन

अनेक पदव्या प्राप्त करून, वेद,  शास्त्र आत्मसात करून वेंकटनाथ  गुरुदेवांची अनुमती घेऊन भुवनगिरीस स्वगृही परत आला.त्याच्या आगमनाने सर्वाना आनंद झाला.वेंकटनाथाने गृहस्थाश्रमात पदार्पण केले.त्याना एका पुत्राची प्राप्ती झाली.त्याचे नाव लक्ष्मीनारायण असे ठेवले होते.वेंकटनाथांची प्रसिद्धी चोहीकडे झाली होती.त्यांच्याकडे शिकण्यासाठी अनेक विद्यार्थी येवू लागले.त्या काळी गुरुना विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय करावी लागे.आर्थिक सहाय नसल्याने इतक्या विद्यार्थ्यांची राहण्याची,जेवणा खाण्याची व्यवस्था करणे वेंकट नाथाच्या पत्नीस कठीण जात असे.
एकदा त्यांच्या गावातील एका श्रीमंत गृहस्थाकडे शुभ कार्य होते.त्यासाठी अनेक ब्राम्हण जमले होते.या प्रसंगी विद्वानांना सन्मानित करून धन देण्याची पद्धत होती.वेंकटनाथाच्या पत्नीने त्याना सांगितले की त्या श्रीमंत गृहस्थाच्या घरी गेल्यास नक्की धन मिळेल आणि त्याचा उपयोग दैनिक खर्चासाठी होईल. वेंकटनाथ पत्नीच्या सांगण्याप्रमाणे त्या श्रीमंत गृहस्थाकडे गेले.तेथे अनेक ब्राम्हण बसलेले होते.वेंकटनाथ एका बाजूस बसून वेद पठण करू लागले तेथील एका पुरोहिताने  गंध काढण्याचे स्वताचे काम वेंकटनाथास दिले. त्यांनी ते मोठ्या आनंदाने स्वीकारले.वेदांचे पठण  आणि गंध उगाळणे हि दोन्ही कामे चालू होती.उगाळणे संपल्यावर वेंकटनाथाने ते गंध त्या पुरोहितास दिले.त्याने ते लावण्यासाठी प्रत्येकास दिले. ते गंध लावताच ब्राम्हणांच्या अंगाचा दाह होऊ लागला. त्या घराच्या यजमानाने गंध काढणाऱ्या पुरोहितास बोलावून विचारले की त्याने चंदन उगाळले कि अजून काही होते.तो पुरोहित म्हणाला वेंकटनाथाने गंध उगाळले त्यालाच विचारू या.यजमान वेंकटनाथाकडे आले आणि त्यांनी विचारले ब्राम्हणदेव तुम्ही जे गंध उगाळले ते लावताच विप्रांच्या अंगाचा दाह का होऊ लागला?वेंकट नाथ म्हणाले गंध उगाळताना मी वेद पठण करीत होतो. त्यावेळी मी अग्नीसूत्र म्हणत होतो.त्याच्या प्रभावानेच गंध लावताच अंगाचा दाह होऊ लागला. यजमानांनी विचारले आता यावर उपाय काय? वेंकटनाथ उत्तरले आता वरूणसूत्र म्हणत गंध उगाळून ते लावले कि दाह कमी होईल  त्या प्रमाणे वेंकटनाथाने वरूणसूत्र म्हणत गंध उगाळले आणि ते विप्रानी आपल्या अंगास लावताच त्यांच्या अंगाचा दाह एकदम  नष्ट झाला.त्या श्रीमंत यजमानाने ओळखले कि वेंकटनाथ काही सामान्य व्यक्ती नाही.त्याने वेंकटनाथाचा गौरव करून शंभर रुपये दक्षिणा दिली. वेंकटनाथाचे समाधान झाले.ते दक्षिणा घेवून घरी आले.या रकमेचा उपयोग कांही दिवस  घरखर्चा साठी झाला.परंतु ती रक्कम संपताच चिंतेने पुन्हा ग्रासले.त्यांनी घरातील कांही वस्तू विकल्या आणि सर्वांचा उदरनिर्वाह थोडे दिवस चालविला.याच काळात त्यांच्या घरी चोरी झाली आणि चोरांनी सारे सामान चोरून नेले. भविष्य काळात महान पदास  प्राप्त होणारया व्यक्तीची भगवंत अशा प्रकारे परिक्षाच पाहत असतो हेच खरे.

                         अध्याय ८ वा 

          श्री वेंकटनाथ पुनरपी सुधींद्रतीर्थ स्वामीच्या आश्रयास गेले.

धनाच्या अभावामुळे श्री वेंकटनाथांना शिकण्यास आलेल्या मुलांचा आणि स्वताच्या संसाराचा खर्च चालविणे कठीण झाले.त्यातच चोरांनी घरच्या सर्व वस्तू चोरून नेल्याने परिस्थिती अधिकच बिघडली.यावेळी शेवटचा उपाय म्हणून वेंकटनाथानी सुधींद्र स्वामीच्या आश्रयास जाण्याचे ठरविले.त्याप्रमाणे वेंकटनाथ आपल्या पत्नी आणि पुत्रासह स्वामीच्या आश्रयास आले.स्वामीनि या सर्वांचे प्रेमाने स्वागत केले.वेंकटनाथाने स्वामीना सर्व परिस्थितीची कल्पना दिली.स्वामीनि तिघाना तेथे राहण्याची परवानगी दिली.वेंकटनाथ आश्रमातील विद्यार्थ्याना शिकवीत असे.तसेच विद्वत सभेमध्ये भाग घेत असे आपल्या विद्वत्तेने आणि आचार संपन्न आचरणाने वेंकटनाथ सर्व विद्यार्थ्याना प्रिय झाले.कांही दिवसांनी गुरुदेव सुधींद्र याची प्रकृती बिघडू लागली. त्या वेळी गुरुदेवांनी वेंकटनाथांना स्वतःजवळ बोलावून आपल्या दैहिक परिस्थितीची कल्पना दिली.आपल्यानंतर मठाचे काम कसे चालणार याची चिंता प्रकट केली.गुरुदेव वेंकटनाथाना म्हणाले तुझ्या अंगी मठाधिपती होण्यास  आवश्यक सर्व गुण आहेत.माझ्या इच्छेप्रमाणे तू सन्यास घेऊन मठाधिपती व्हावे.प्रज्ञाशीलपणे संसाराचा भ्रम सोड.वेंकटनाथाची अवस्था एकीकडे आड तर दुसरीकडे विहीर अशी झालीस्वामीची इच्छा पूर्ण करावी तर तरुण पत्नीला दुःखी करावे लागणार आणि पत्नी व मुलाची चिंता ही सन्यास घेतल्यावर सुद्धा राहणारच ही परिस्थिती वेंकटनाथाने धैर्य करून गुरुदेवाना सांगितली.त्यांनी वेंकटनाथास अधिक आग्रह केलानाही.त्यांनी दुसर्या व्यक्तीला सन्यास दिला त्यांचे नाव यादवेंद्र तीर्थ असे होते त्यांनाच पुढे मठाधिपती करावे असा गुरुदेवांचा मानस होता.कांही दिवसांनी गुरुवर्याची प्रकृती थोडी सुधारली आणि ते नित्याप्रमाणे श्री मुलरामाची पूजा करणे,विद्यार्थ्यांना पाठ प्रवचने देणे,इद्यादि कार्यक्रमात  सक्रीय भाग घेऊ लागले.त्यांनी यादवेंद्रतीर्थ याना प्रचार आणि प्रसारासाठी बाहेरगावी पाठविले.त्यांच्या बरोबर थोड्या देवमूर्तीहि दिल्याहोत्या.थोड्या दिवसांनी गुरुवर्यांची प्रकृती पुन्हा एकदा ढासळली त्यांना मुलरामाची पूजा करणे अशक्य झाले.

                             अध्याय ९ वा
                            
                   श्री वेंकटनाथाचा सन्यास आश्रमात प्रवेश  

गुरुदेवांची प्रकृती बिघडली आणि त्यामुळे मुलरामाच्या पूजेत खंड पडणार अशी त्याना चिंता लागून राहिली.त्याच दिवशी रात्री गुरुदेवाच्या स्वप्नात श्री मुल्रराम प्रकट झाले आणि ते म्हणाले माझी पूजा करण्यास वेंकटनाथ योग्य आहे.आता तो सन्यास आश्रम स्वीकारण्यास मनाने तयार झाला आहे.त्याच्याशी बोलून आवश्यक तो बदल घडवून आणावा.ज्या दिवशी रात्री गुरुदेवांना हे स्वप्न पडले त्याच दिवशी रात्री वेंकटनाथांना सुद्धा एक स्वप्न पडले.स्वप्नात शारदामाता प्रकट झाली आणि म्हणाली हे वेंकटनाथा तू विद्वान आहेस महाप्रतिभावान आहेस.तुझ्या हातून लोकोद्धाराचे आणि मध्वसिद्धांत प्रसाराचे महान कार्ये होणार आहेत. तू आता संसाराचा त्याग करून सन्यास आश्रमात प्रवेश करून पिठाधीश पदाचा स्वीकार कर.श्री मुलराम देव तुझ्या कडून पूजा करून घेण्यास अत्यंत आतुर आहेत असे सांगून शारदामाता अदृश्य झाली.  दुसरया दिवशी गुरुदेवांनी वेंकटनाथाना बोलावून घेतले परंतु त्याला सन्यास घेण्यास कसे सांगावे याचाच ते विचार करीत होते.दोघे एकमेकासमोर उभे होते.दोघेही आपआपल्या स्वप्नातील वृतांत सांगण्यास आतुर होते.प्रथम वेंकटनाथाने गुरुदेवांना साष्टांग नमस्कार केला आणि आपल्या स्वप्नातील वृतांत सांगितला.तो ऐकल्यावर गुरुदेवांनी आपणास पडलेल्या स्वप्नाचा वृतांत सांगितला.दैवी संकल्पानुसार आपण सन्यास घ्यावा असे वेंकटनाथास वाटू लागले.आणि ते सन्यास घेण्यास सिद्ध झाले वेंकटनाथाचा निश्चय पाहून गुरुदेवाना अत्यंत आनंद झाला आणि त्यांची चिंता मिटली.दुसरे दिवशी वेंकटनाथ आपला पुत्र लक्ष्मीनारायण यास घेऊन गुरुदेवांकडे गेले.त्यांनी आपल्या मुलास ब्रम्होपदेश करवून त्याचा उपनयन संस्कार करून घ्यावा अशी इच्छा प्रकट केली.गुरुदेवांनी लक्ष्मीनारायणाचा उपनयन संस्कार मोठ्या आनंदाने  स्वखर्चाने संपन्न केला.
वेंकटनाथाने सन्यास घेण्याचा निर्णय तर घेतला परंतु तो आपल्या पत्नीस कसा सांगावा  हा एक यक्ष प्रश्न त्यांच्या पुढे उभा होता.तिची समजूत घालून सन्यास घेण्यास स्वीकृती मिळविणे महा कठीण काम होते.तरी धैर्य करून वेंकटनाथ तिला भेटले आणि म्हणाले सरस्वती तू माझी धर्म पत्नी आहेस आणि पत्नी या नात्याने तू माझी सेवा केलीस,सुख दिलेस. परंतु दैवी संकल्पानुसार आता बदल घडणार असल्याचे जाणवते. तो बदल आपण स्वीकारला पाहिजे. सरस्वती आपल्या पतीचे बोलणे ऐकत होती परंतु तिला त्यांच्या बोलण्यातील उद्देश कळला नाही.ती म्हणाली मी पत्नी या नात्याने जे कर्तव्य होते तेच केले.मी जगावेगळे कांही केले नाही. त्यावेळी वेंकटनाथ म्हणाले श्री मुलरामाच्या संकल्पानुसार आता एक निर्णय घेतला आहे. मुलरामाचे नाव घेताच ती साध्वी अधिकच गोंधळून गेली.ती म्हणाली स्पष्ट काय ते सांगा. तेंव्हा वेंकटनाथ म्हणाले मी सन्यास घेण्याचा निश्चय केला आहे. ते शब्द ऐकताच सरस्वतीच्या कानात  उकळते तेल घातल्या प्रमाणे झाले.ती अत्यंत दु:खी झाली. वेंकटनाथ तिचे समाधान करू शकले नाहीत.
  श्री सुधींद्रतीर्थ, वेंकटनाथ आणि इतर शिष्य तंजाउरला आले.तेथे रघुनाथरावांनी गुरुवर्यांचे भव्य स्वागत केले.येथेच श्री वेंकटनाथास सन्यास दिक्षा देण्याचा विधी पार पडला.त्यासाठी अनेक विद्वान ब्राम्हण आले होते.फाल्गुन शुद्ध द्वितीयेस,रुधीरोदगिरी नामाच्या वर्षी शके १५४५ या शुभ दिनी वेंकटनाथाना सन्यास दीक्षा देवून त्यांचे श्री राघवेंद्र तीर्थ हे नूतन आश्रमातील नाव ठेवले. रघुनाथरावांनी दोन्ही  महान यतीचा भव्य सन्मान केला. याच मंगलदिनी श्री राघवेंद्र तीर्थांचे पीठारोहण झाले.

                            अध्याय १० वा

            पत्नीची आत्महत्या आणि तिची पिशाच्च योनीतून मुक्तता   

वेंकटनाथाच्या सन्यास ग्रहण करण्याचे सर्वात अधिक दुखः त्यांची पत्नी सरस्वतीस झाले.तिला वाटले आता आपले पती आपणास दिसणार नाहीत.या विचाराने तिने आत्महत्या करण्याचे ठरविले. एके दिवशी तिने एका विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.या तिच्या कृत्यामुळे तिला पिशाच्च योनी प्राप्त झाली.पिशाच्च रुपात ती राघवेंद्र तीर्थांसमोर वारंवार येऊ लागली.त्याना तिची दया आली.तिची त्या योनीतून सुटका करण्यासाठी त्यांनी  आपल्या कमंडलूतील तीर्थ त्या पिशाच्च्यावर शिंपडले.तत्काळ त्या मातेची पिशाच्च योनीतून सुटका झाली आणि तिला सद्गती मिळाली.

                             अध्याय ११ वा
                 सन्यास ग्रहण केल्यानंतर राघवेंद्र तीर्थांचा संचार.

सुधींद्रतीर्थ स्वामीच्या आज्ञेनुसार श्री राघवेंद्र स्वामी सन्यास ग्रहण केल्यानंतर धर्मप्रचार कार्यासाठी निघाले.प्रथम त्यांनी अग्रमान जिल्हातील परिपूर्णनावाच्या नगरीत प्रवेश केला.या सुंदर नगरीत चतुर्भुज विष्णूंचे एक भव्य मंदिर होते.अत्यंत प्रसन्न चित्त अशा श्री विष्णूंची मूर्ती, हातात शंख,चक्र,गदा,पद्म,धारण केलेली होती.श्री राघवेंद्र स्वामीनि या सुंदर मूर्तीची शोडोषपचारे पूजा केली.येथील जनसमुदायास उपदेशाचे ज्ञानामृत पाजाविले.येथून स्वामी कमलालयी ग्रामी आले.येथील श्रीलक्ष्मीच्या मंदिरी मातेचे दर्शन घेऊन अर्धनारी नटेश्वराच्या मंदिरात आले. येथे स्वामीनि महारुद्राचे अति श्रद्धाभावाने पूजन केले.या नंतर स्वामीनि कावेरी नदी ज्या स्थानी समुद्रास मिळते त्या क्षेत्री प्रयाण केले.या अति पावन स्थानी स्वामीनि अनेक दिवस वास्तव्य केले.येथे त्यांनी आपल्या भक्तांना चंद्रिका ग्रंथ समजावून सांगितला.येथून स्वामी चम्पकेश्वराचे दर्शन घेऊन श्रीरामेश्वराच्या पवित्र तीर्थ क्षेत्री आले.येथील सेतूमध्ये स्नान करून  सेतूमाधवाचे दर्शन करून स्वामी श्रीरामानि  प्रतिष्ठापित केलेल्या महादेवाचे दर्शनास गेले.या स्थानी स्वामीनि महादेवाची रुद्राभिशेकासह   यथोचित पूजा केली.या परमपवित्र स्थानी त्यांना श्रीराम आणि लक्ष्मणाचे दर्शन घडले.दोघे बंधू दर्भाच्या शय्येवर निद्रिस्त अवस्थेत होते.येथून स्वामी अलगिरी क्षेत्री आले.येथील अनंत पद्मनाभाचे दर्शनाने स्वामी अत्यंत आनंदित झाले.येथून स्वामीनि तीर्नवेली प्रांतात प्रयाण केले.हा प्रांत अतिशय सुपीक जमिनीचा असल्याने येथे धन-धान्याची विपुलता होती.या गावातील लोकांनी एका ब्राम्हणास अतिसामान्य अपराधासाठी शिक्षेच्या स्वरुपात त्यास वाळीत टाकले होते.तो विप्र स्वामीना शरण आला आणि त्याने आपली कर्मकहाणी स्वामीना सांगितली.करुणामयी स्वामीनि त्याच्यावर आपल्या कमंडलूतील पवित्र जलाचे प्रोक्षण करून त्यास शुद्ध केले.गावातील लोकाना सदुपदेश करून त्या ब्राम्हणास समाजात योग्य ते स्थान मिळवून दिले. येथून स्वामीनि मदुरा मिनाक्षीच्या भव्य-दिव्य  मंदिरी जाण्यास प्रस्थान केले.या मंदिराच्या सुंदरतेचे वर्णन करण्यास शब्द तोकडे पडतात.या क्षेत्री येऊन स्वामीनि या स्थानाचे महात्म्य अजून वाढविले.त्रिभुवन सुंदरी मिनाक्षी देवी आणि भगवान सुन्दरेश्वराचे स्वामीनि दर्शन घेतले.येथील पंडितांनी स्वामीचा यथायोग्य सन्मान केला.त्यांची हत्तीच्या अंबारीतून शोभायात्रा काढली.येथून स्वामी नामकल्ल नगरी  भगवान श्री नरसिंहाचे दर्शन घेण्यास आले.येथे स्वामीनि भगवंताची शोडोशोपचारे पूजा केली.स्वामी प्रत्येक तीर्थाचे स्थानी तेथील जनतेला उपदेश करून वैष्णव धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यात धन्यता मानीत.येथून स्वामीनि वेल्लूर नगरी प्रयाण केले.येथील विद्वतसभेमध्ये पंडितांना आपल्या विद्या चातुर्याने आश्चर्य चकित केले.येथील नरेशाने स्वामीना एका गावाची जागीर देवून सन्मानित केले.यानंतर स्वामी मंगल नावाच्या ग्रामी आले.या     पवित्र स्थानी महाविष्णू आणि महालक्ष्मी यांचे शोडोषपचारे पूजन केले.स्थानीय लोकाना द्वैत मताचे महात्म्य समजावून स्वामी तेथून उडपी क्षेत्री आले.हे मध्व संप्रदायाचे एक पुरातन स्थान आहे.या स्थानी स्वामीनि अनेक दिवस वास्तव्य केले आणि येथील जनतेला भक्ती, ज्ञान,आणि वैराग्याचा उपदेश केला.त्यांनी आपल्या शिष्यांना उडपीच्या मठाच्या स्थापनेपासूनची परंपरा सविस्तर सांगितली.शिष्याच्या विनंती वरून, श्री मध्वाचार्यांनी स्थापन केलेल्या श्रीकृष्णाच्या मूर्तीचा इतिहास सांगितला. तो असा.--उडपी क्षेत्री असताना श्रीमध्वाचार्य प्रतिदिन समुद्र स्नानासाठी जात. एके दिवशी नित्य नियमा प्रमाणे जात  असताना त्याना कृष्ण स्तोत्र स्फुरू लागले. या शुभ संकेतामुळे आचार्य  मनोमनी संतोषले.अन्त:करणात कृष्ण भेटीची एक अनामिक ओढ लागली होती.याच वेळी एक आश्चर्य घडले.सागरात अचानक  एक   भयंकर वादळ आले. मोठ-मोठ्या लाटा किनार्यावर येवून आदळू लागल्या. ते वादळ एवढे भयंकर होते की सागर जणू तांडव नृत्य करीत असल्यासारखे वाटत होते.समुद्रातील नावा हेलकावे खात पाण्यात बुडत आणि पुन्हा वर येत होत्या.त्यातील प्रवासी अत्यंत भयभीत होऊन परमेश्वराची प्रार्थना करू लागले.हे भयंकर दृश्य पाहून श्री मध्वाचार्यांनी सागराच्या काठावर उभे राहून दोन्ही हातात आपले उत्तरीय धरून फडकावले.त्या वेळी आश्चर्य असे घडले की त्या भयंकर वादळाचा वारा त्या उत्तरीयातून वाहू लागला आणि सागर निमिशातच शांत झाला.नावा सुखरूप किनारी येवून पोहचल्या.नावेतील सर्व प्रवासी खाली उतरले.त्यांनी आचार्याना मोठ्या श्रद्धाभावाने नमस्कार केला.त्या नौकेच्या मालकाने ती नौका आचार्याना अर्पण केली आणि साष्टांग नमस्कार केला.आचर्य म्हणाले नौका घेवून काय करायचे? तुझी इच्छा असल्यास नौकेतील तीन खडे आम्हास दे.त्या नौकेच्या मालकाने मोठ्या भक्तीभावाने नौकेतील तीन खडे आचार्यांना आणून दिले.ते खडे एव्हढे जड होते की दोन खडे उचलण्यास चार माणसे लागलीएक सर्वात जड खडा आचार्यांनी स्वत आपल्या खांद्यावर घेतला आणि मोठ्या आनंदात आश्रमी परत आले.आश्रमात येताच एक महद आश्चर्य घडले. त्या खड्यातून श्रीकृष्णाची एक अति सुंदर बाहेर आली.मुरलीधराच्या अनुपम मूर्तीची प्राण-प्रतिष्ठा करून आचार्यांनी ती मूर्ती मठात स्थापन केली.हीच ती अद्वितीय मूर्ती असे श्री राघवेंद्र स्वामीनि शिष्यास सांगितले.त्या मूर्तीकडे पहात असताना स्वामीची समाधी लागली.त्यांना त्या मूर्तीत आपला मुलराम, श्री कृष्ण स्वरुपात दिसू लागला.येथील वास्तव्यात स्वामीनि सरस्वती मातेची आज्ञा होताच चंद्रिका ग्रंथावर टीकात्मक ग्रंथ रचना केली.या नंतर स्वामीनि अनेक ग्रंथ रचले.यात प्रामुख्याने ब्रम्हसूत्र,परिमळ,न्याय मुक्तावली,चंद्रीका प्रकाश इत्यादींचा प्रामुख्याने समावेश होतो.येथे निर्मित केलेले सर्व ग्रंथ स्वामीनि श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण केले. स्वामीच्या उडपी येथील वास्तव्यात श्रीराम नवमीचा मंगल दिन आला.या दिवशी स्वामीनि मुलरामाच्या प्रतिमेस श्रीकृष्णाच्या सानिध्यात बसवून महाभिषेक केला.या मंगल प्रसंगी अनेक विद्वान ब्राम्हणांनी वेदमंत्रांच्या घोषाने सारा आसमंत भरून टाकला होता आणि भाविक भक्तांचा नुसता पूर लोटला होता. या अति पावन क्षेत्री स्वामीनि चंद्रिका ग्रंथावर अनेक विद्वतापूर्ण  प्रवचने केली. श्री कृष्णाच्या आज्ञेनुसार एक मुरलीधराची सोन्याची मूर्ती करून त्याची मठात स्थापना केली.
उडपीहून स्वामी मैसूर प्रांती आले. चातुर्मासासाठी ते श्रीरंगपटणं या नगरी राहिले.मैसूरचे महाराजे वडियार  यांनी स्वामीना आषाढ  शुद्ध एकादशीस मोठ्या सन्मानाने आपल्या राजग्रही आणून रत्नजडीत चौरंगावर बसवून त्यांची शोडोषपचारे पूजा केली.या मंगल प्रसंगी सनई,चौघडे,नगारे आप-आपल्या मधुर स्वरात वाजत होते.विप्रगण  उच्च स्वरात वेदघोष करीत होते.चंदनाचा सुगंधी धूप,नाना प्रकारच्या सुगंधी फुलांच्या  सुवासात मिसळून वातावरण अति मंगलमय करीत होता.नैवेद्यासाठी अनेक पक्वान्ने केली होती.ती  महाराजांनी अत्यंत श्रद्धाभावाने स्वामीना अर्पण केली. नाना प्रकारची फळे,तांबूल आणि दक्षिणा स्वामी समोर ठेवून महाराजांनी स्वामीना साष्टांग नमस्कार केला.स्वामीनि अतिप्रसन्न होऊन राजाना शुभ आशीर्वाद दिले.ज्या प्रमाणे शिवरायास रामदास स्वामी गुरु होते, श्रीरामाना वशिष्ठमुनी गुरुपदी  होते त्याच प्रमाणे मैसूर राज्याच्या दोड्डदेवराय महाराजाना श्रीराघवेंद्र स्वामी गुरुस्थानी होते.त्यांनी स्वामीचे चरण तीर्थ प्राशन केले आणि   दोन गावे स्वामीना अर्पण केली.या शिवाय अनेक जड-जवाहर,दागिने सुद्धा त्यांनी स्वामीना अर्पिले.स्वामिनी ते सर्व मुलरामाच्या चरणी ठेवले.चातुर्मास समाप्तीनंतर स्वामी स्वस्थानी परतले.
     स्वामींच्या अनेक शिष्यापैकी एका शिष्यास मोक्ष प्राप्तीची तीव्र इच्छा होती.तो प्रतिदिन स्वामीना मोक्ष द्यावा अशी प्रार्थना करीत असे.एके दिवशी आश्चर्य घडले. स्वामी त्या मुमुक्षु शिष्यास म्हणाले आज तुझ्या मोक्षाची व्यवस्था करतो.तू कावेरी नदीवर जाऊन स्नान,संध्या करून शुचिर्भूत होऊन ये. स्वामींच्या सांगण्या प्रमाणे तो शिष्य नदीत स्नान करून संध्या आटोपून आला.स्वामिनी त्याला पंचगव्य देवून बीजाक्षर मंत्राचा उपदेश केला.शेजारीच लाकडाची चिता रचून ठेवली होती.त्या चितेत अग्नी प्रज्वलित करण्यात आला.त्यातून ज्वाला निघू लागल्या  होत्या. स्वामिनी त्या शिष्यास जवळ बोलावून त्या धगधगत्या चितेत उडी घेण्यास सांगितले.गुरु वचनावर  धृढ श्रद्धा असलेल्या त्या उत्तम शिष्याने स्वामीना नमस्कार केला आणि त्या चितेमध्ये उडी घेतली.ते भयंकर दृश्य पाहून बाजूस उभ्या असलेल्या प्रेक्षकांनी हा:हा:कार केला.ते म्हणू लागले मोक्षप्राप्तीसाठी हा कोणता मार्ग स्वामिनी योजिला? त्यावेळी स्वामी म्हणाले मोक्षप्राप्तीसाठी प्रथम यातना सोसाव्या लागतात.तुम्ही आकाशात पहा. माझा दिव्य शिष्य विमानात बसून श्रीहरीच्या लोकास जात आहे.लोकांनी आकाशात पहिले तेव्ह्ना त्यांना आकाशात काय दिसले, श्रीहरीचे पार्षद त्या मुमुक्षु शिष्यास मोठ्या सन्मानाने विमानात बसवून घेवून जात होते.ते दिव्य दृश्य पाहून सर्वाना अति आश्चर्य वाटले आणि त्यांनी एकमुखाने स्वामींचा जय-जयकार केला.
श्री राघवेंद्र स्वामिनी आपल्या धर्मप्रचार संचारात दक्षिण भारतातील सर्व पवित्र स्थळांचे दर्शन घेतले.नंतर महाराष्ट्रातील पवित्र देवालयांचे दर्शन घेवून तेथे धर्मप्रचाराचे कार्य करण्यासाठी प्रस्थान केले. प्रथम त्यांनी पंढरपूरच्या भक्त प्रिय पांडुरंगाचे दर्शन घेण्याचे ठरविले.त्यांच्या बरोबर अनेक शिष्य आणि मठातील एक सेवक आपल्या गर्भवती पत्नीसह होता.मजल दरमजल करीत स्वामींची यात्रा चालू होती.मार्गातील भाविक भक्तांना दर्शन देत,भजन,कीर्तन करीत सर्वजण मार्गक्रमण करीत होते.एके दिवशी मार्गातच त्या सेवकाच्या पत्नीस प्रसव वेदना सुरु झाल्या.त्या अरण्यात कोणी सुईण नव्हती.त्या साध्वीने स्वामींचा धावा प्रारंभ केला आणि अत्यंत आर्तभावाने या संकटातून सुटका करण्याची प्रार्थना केली.स्वामिनी आपल्या कमंडलूतील पवित्र  जल घेतले आणि ते  त्या सेवकास देवून त्याच्या पत्नीस देण्यास सांगितले.ते मुखी पडताच त्या माउलीच्या वेदना थांबल्या आणि अत्यंत सुलभतेने बाळाचा जन्म झाला.सर्वाना आनंद झाला. तेथे तीन दिवस मुक्काम करून सर्वजण पुढच्या प्रवासास निघाले. यथा समयी स्वामी आपल्या शिष्यांसह भू-वैकुंठ असलेल्या पंढरपुरी येऊन पोहोचले. स्वामिनी चंद्रभागेत स्नान करून ते पांडुरंगाच्या दर्शनासाठी राऊळात आले आणि काय आश्चर्य भक्तांची आतुरतेने वाट पाहणारा पांडुरंग गाभारा सोडून  धावतच राऊळात आला आणि आपले दोन्ही बाहू पसरून त्याने स्वामीना आलिंगन दिले.या मंगलमय सोहोळ्याचे वर्णन करण्यास शब्द तोकडे पडतात, वाणी खुंटते.पांडुरंगाच्या या भावपूर्ण दर्शन-भेटीमुळे स्वामी अति आनंदित झाले.त्यांनी येथे तीन दिवस मुक्काम केला.याकाळात त्यांनी संतांच्या गाठी-भेटी घेतल्या, तेथील जनतेला ज्ञान,भक्ती,वैराग्य यांचा उपदेश आपल्या रसाळ प्रवचनातून दिला.येथून स्वामी कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनासाठी निघाले.यथासमयी त्यांनी मातेच्या भव्य मंदिरात प्रवेश केला.त्यांनी मातेची महापूजा केली.भगवान विष्णूंच्या अंत:करणात वसलेल्या लक्ष्मीमातेने स्वामीना करवीर क्षेत्री दर्शन दिले होते.त्यांनी मातेचे मोठ्या भक्तीभावाने स्तवन केले. ते ऐकून माता प्रसन्न झाली आणि म्हणाली राघवेंद्र बाळ, तुंगभद्रा नदीपासून एक योजन अंतरावर मन्चाले ग्राम आहे.या प्रदेशातच हिरण्यकाशिपुचे साम्राज्य होते.मंचाले आणि गणधाळ या दोन गावांच्या मध्ये तुंगभद्रा नदी आहे.गणधाळ या स्थानीच हिरण्यकाशिपुचे गंडस्थळ पडले होते.तू प्रल्हादाचा अवतार आहेस आणि त्याच्या रक्षणासाठीच भगवान विष्णूनी नरसिंहाचा अवतार धारण केला होता.तू असा थोर भक्त असून मला अत्यंत प्रिय आहेस. तू मी सांगते तसे कर.तुझा संचार पूर्ण झाल्यानंतर मन्चाले ग्रामी वास्तव्य कर. गणधाळ ग्रामाजवळ जे महारुद्राचे मंदिर आहे तेथे तप करून तुंगभद्रा नदीस प्रसन्न करून घे.ती तुझ्या मठाच्या जवळून वाहू लागेल.मन्चाले ग्रामी  प्रथम मारुतीची स्थापना करून त्याच्या समोरच एक सुंदर वृंदावन बांधावे. मठाबाहेर माझ्या मूर्तीची प्रतिस्थापना करावी.मंत्रालायांविका या नावाने मी सदैव तेथे राहीन.भक्तांनी प्रथम माझे दर्शन घेऊनच मठात प्रवेश करावा.प्रल्हादाच्या अवतारात तू केलेल्या यज्ञा  मुळे मी अति प्रसन्न झाले होते.त्याच प्रमाणे या अवतारात सुद्धा एक महायज्ञ कर.ज्याच्या योगाने मी संतुष्ट होईन माता पुढे म्हणाली तुझे अवतार कार्य संपल्यावर सुद्धा तू भक्तांसाठी वृंदावनात राहावे.आपल्या जीवन काळात ग्रंथ रचना करून विष्णू भक्ती वाढवावी हीच तुला माझी आज्ञा आहे. तुझ्या या राघवेंद्र अवताराची कीर्ती यावचंद्र दिवाकारो राहील.असंख्य भक्त तुझे गुणगान गातील. एवढे बोलून माता महालक्ष्मी अंतर्धान पावली. त्यावेळी स्वामींचे ध्यान भंगले. त्या दर्शन सुखाचा परमानंद शब्दातीत करणे केवळ अशक्यच. स्वामीना मातेचा वियोग सहन होईना. मातेने पुन्हा एकदा दर्शन द्यावे म्हणून त्यांनी मातेची आर्ततेने  प्रार्थना केली. मातेने पुन्हा एकदा दर्शन दिले त्यावेळी स्वामिनी मातेचे चरणकमल धरून त्यावर आपले मस्तक ठेवले आणि अत्यानंदाच्या प्रेमाश्रुनी भिजवून टाकले. मातेने आपला वरद हस्त स्वामींच्या मस्तकावर ठेऊन शुभ आशीर्वाद दिले आणि नंतर अंतर्धान पावली.
कोल्हापूरहून स्वामी अतिपावन अश्या पंचवटी स्थानी आले.येथे त्यांनी गोरा रामाचे दर्शन घेतले.नाशीक  या पुण्य क्षेत्री दोन दिवस मुक्काम करून तेथून विजापुरी जाण्यास निघाले.मार्गात एक निबिड अरण्य लागले.उन्हाळ्याचे दिवस होते.सूर्य माथ्यावर तळपत होता.त्या अरण्यात पाण्याचा कोठे मागमूस सुद्धा नव्हता. एक प्रवासी ब्राम्हण त्या अरण्यात तृषेने अगदी व्याकुळ झाला होता.त्याचे प्राण कंठाशी आले होते.तो मुखाने अत्यंत क्षीण झालेल्या स्वरात भगवंताचा धावा करीत होता.स्वामी त्याच मार्गाने चालले होते.त्या विप्राची असी तृशाकांत अवस्था पाहून स्वामीना त्याची दया  आली. त्यांनी एक काडी घेऊन जमीन थोडी उकरली.तो काय आश्चर्य त्या जमिनीतून शुद्ध पाण्याचा एक फवारा वर आला.स्वामिनी ते पाणी त्या ब्राम्हणास पाजविले. पोटभर पाणी पिऊन तो विप्र उठून बसला.त्याने स्वामीना साष्टांग नमस्कार केला.आनंदाने त्याच्या मुखातून शब्द निघत नव्हते त्याने स्वामींची चरणसेवा करून त्याना संतुष्ट केले.असे दिनांचे नाथ परम दयाळू स्वामी कृपेचे एक सागरच होते.त्यांचा महिमा वर्णन करणे केवळ अशक्यच आहे.
स्वामी एकदा आंध्र प्रांतातील एका लहान गावी मुक्कामास थांबले होते.तेथे वेन्कन्ना नावाचा एक गरीब परंतु अत्यंत आचार संपन्न ब्राम्हण राहत होता.स्वामी त्याच्या  घरी मुक्कामास उतरले. नियमा प्रमाणे त्याने पाच-सहा घरातून भिक्षा मागून आणून स्वामींची उत्तम व्यवस्था ठेवली.वयाने लहान असूनही वेन्कन्नाने स्वामींच्या नित्य पूजेची चोख व्यवस्था ठेवली होती.स्वामी त्याच्या सेवेवर प्रसन्न झाले आणि जाताना म्हणाले जेव्ह्ना तुला कांही अडचण येईल त्यावेळी माझे स्मरण कर मी तुला मदत करीन.तेथून ते पुढच्या गावी गेले.त्या काळी आंध्र प्रदेशातील त्या भागात सिद्धिमसुखखान नावाचा नवाब राज्य करीत होता. तो शिकलेला नसल्याने त्याला लिहिता-वाचता येत नव्हते.केवळ नशिबाने त्याला नवाबाचे पद प्राप्त झाले होते.एकदा तो शिकारीसाठी अरण्यात गेला असताना थकून एका झाडाखाली विश्रांतीसाठी बसला होता.इतक्यात एक घोडेस्वार सैनिक तेथे आला आणि त्याने एक लिफाफा नवाबास दिला. नवाब अक्षर शत्रू असल्याने त्याला काय लिहिले असेल ते कळले नाही.त्याने आपल्या सेवकास कोणी साक्षर मनुष्य दिसतो काय ते पाहण्यासाठी पाठविले. थोड्याच अंतरावर वेन्कन्ना लाकडे तोडीत होता.सेवक वेन्कन्नाकडे आले आणि त्याला नवाबाकडे घेऊन गेले.नवाबाने वेन्कन्नाकडे पाहून म्हटले तू  ब्राम्हणाचा मुलगा दिसतोस, हे पत्र वाचून दाखव. वेन्कन्नाने ते पत्र घेवून वाचण्याचा प्रयत्न केला परंतु ते अक्षर त्याला समजेना.त्यावेळी त्याने श्री राघवेंद्र स्वामींची प्रार्थना केली आणि आश्चर्य असे की  त्याला ते पत्र वाचता आले. पत्रात लिहिले होते की नावाबाचे सैन्य युद्धात यशस्वी होऊन शत्रूचा पराभव करून येत आहे.तो मजकूर ऐकून नवाब आनंदित झाला.त्याने वेन्कन्नाला विचारले तू ब्राम्हण असून विद्या का शिकला नाहीस? वेन्कन्नाने उत्तर दिले घरच्या गरिबीमुळे त्याला शिकता आले नाही.नवाबाने वेन्कन्नाच्या शिक्षणाचा खर्च करण्याचे आश्वासन दिले.त्याप्रमाणे वेन्कन्ना तीन चार वर्षे मन लाऊन शिकला.नवाबाने त्याला आपल्या दरबारात सेवेसाठी ठेवून घेतले.तो पुढे आपल्या चाणाक्ष बुद्धीने आणि स्वामींच्या कृपा आशीर्वादाने उच्च पदावर चढत गेला आणि कालांतराने दिवाण पदावर आरूढ झाला.

                               अध्याय १२ वा

                              मृतीकेचा चमत्कार

श्री राघवेंद्र स्वामी महाराष्ट्रातील गावात प्रचार आणि प्रसारासाठी संचार करीत असताना एक आश्चर्यकारक घटना घडली.त्यांचा एक सेवक स्वामींकडे आला आणि म्हणू लागला स्वामी मी आता माझ्या गावी जाऊन लग्न करणार आहे.आपण मला आगाऊ पगार द्याल आणि आठ दिवसांची रजा द्याल  तर मी आपला कृतघ्न होईन.त्या वेळी स्वामी प्रात: विधी आटोपून येत होते.ते म्हणाले तू आपल्या गावी जाऊन लग्न करून ये.सध्या माझ्या हातात पैसे नाहीत. तू हि मृतीकाच घेऊन जा.  त्या सेवकाने मोठ्या श्रद्धाभावाने म्हटले आपण दिलेली मृतीकाच मला दहा हजार  रुपया पेक्षा अधिक मोलाची आहे.ती मृतिका एका पिशवीत घेवून तो आपल्या गावी जाण्यास निघाला.चालता, चालता रात्र झाली.तेव्ह्ना तो एका घराच्या ओट्यावर निजला.ते मृतीकेचे गाठोडे  त्याने उशाला घेतले होते.त्या रात्रीचे वेळी त्या ब्राम्हणाची पत्नी प्रसुती वेदनांनी तळमळत होती.पूर्वीच्या दोन प्रसुतीच्या वेळी एका पिशाच्चाने येऊन नवजात बालकास गळा दाबून मारून टाकले होते.आज त्या ब्राम्हण पत्नीचा प्रसुती दिन असल्याने सारे काळजीत होते.रात्रीच्या वेळी ते पिशाच्च घरात प्रवेश करणार होते.परंतु दारात स्वामींचा सेवक उशाला मृतीकेचे गाठोडे घेऊन झोपला होता.त्या पिशाच्चाला आतमध्ये जाता येत नव्हते.त्या मृतीकेतून अग्नीच्या ज्वाला निघत असलेल्या त्या पिशाच्चाला दिसल्या. त्याने सेवकाला गाठोडे सरकवून ठेवण्यास सांगितले. परंतु त्या सेवकाने त्या पिशाच्चाचे ऐकले नाही.ज्यावेळी ते पिशाच्च खुपच विनवणी करू लागले त्यावेळी तो सेवक म्हणाला एक हंडा भरून पैसे घेऊन ये म्हणजे मी मृतिका काढतो.ते पिशाच्च त्वरेने गेले आणि पंधरा मिनिटातच पैशांनी भरलेला हंडा घेऊन आले.त्या सेवकाला स्वामिनी दिलेल्या मृतीकेचे मोल कळले होते.त्याने त्या पिशाच्चाकडून तो पैशाचा हंडा घेतला आणि स्वामिनी दिलेल्या मृतीकेतून चिमुटभर घेऊन त्या पिशाच्चाच्या अंगावर टाकली.तत्काळ त्या पिशाच्चाची त्या योनीतून मुक्तता झाली.हे सारे दृश्य त्या घरचा यजमान पहात होता.त्याची पत्नी रात्री प्रसूत झाली होती आणि तिला पुत्र रत्नाची प्राप्ती झाली होती. परंतु ते पिशाच्च येऊन त्या नवजात शिशुस मारून टाकणार याची सर्वाना भीती वाटत होती.स्वामींच्या सेवकामुळे त्यांच्या  मुलाचे प्राण वाचले होते.त्यांच्या आनंदाला पारावार नव्हता.त्या घरातील गृहस्थाने त्या सेवकाचा सन्मान केला आणि वारंवार  पाया पडून  म्हणू लागला तुम्हीच आमच्या मुलास जीवदान दिलेत त्याला जेव्ह्ना कळले की तो सेवक अविवाहित आहे आणि तो लग्नासाठी इच्छुक आहे.त्यावेळी त्याने आपली उपवर कन्या त्या सेवकास देऊन थाटात लग्न करून दिले.लग्नानंतर ते उभयता स्वामींच्या दर्शनास गेले. त्या सेवकाने घडलेला सारा वृतांत स्वामीना सांगितला आणि पैशाने भरलेला तो कलश स्वामीना अर्पण केला.त्यांनी तो न घेता त्यांनाच परत केला.स्वामींच्या आशीर्वादाने ते नवदाम्पत्य अत्यंत आनंदात राहिले.
                              अध्याय १३वा
                         किरीटगिरी येथील चमत्कार
श्रीराघवेंद्र स्वामी आपल्या शिष्यांसह संचार करीत असताना त्यांचा मुक्काम किरीटगिरी गावातील देसाई रघुनाथ राय  यांच्या कडे झाला.देसाईच्या अति आग्रहाने स्वामी त्यांचे घरी एक दिवस राहिले.सकाळच्या पहिल्या प्रहरी स्नान करून स्वामी मुलरामाच्या पूजेस बसले.सर्व साहित्यासह पूजा मोठ्या थाटात संपन्न झाली.आरती नंतर स्वामीनि स्वत: तीर्थ देण्यासाठी तीर्थाचे पात्र हातात घेतले.इतक्यात त्या तीर्थात एक माशी पडली आणि ते तीर्थ भक्तांना देण्यायोग्य राहिले नाही.स्वामिनी त्या घरच्या यजमानास बोलावून सांगितले तुमच्या घरात कांही अशुभ घटना घडली असली पाहिजे.सर्वानी चौफेर नजर फिरविली. देसाईच्या कुटुंबातील एक लहान मूल पाण्याने  भरलेल्या एका मोठ्या भांड्यात पडून गतप्राण झाले होते. स्वामिनी त्या बालकाकडे  आपल्या अत्यंत करुणामयी नजरेने बघितले आणि त्याचे आयुष्य वाढविले.नंतर त्या बालकास पूजा स्थानी घेऊन येण्यास सांगितले.त्या बालकाच्या पित्याने त्याला पूजा स्थानी आणले.स्वामिनी त्याच्यावर आपल्या कमंडलूतील पवित्र तीर्थाचे प्रोक्षण केले आणि काय आश्चर्य, ते बालक झोपेतून जागे झाल्याप्रमाणे उठून बसले.देसाई कुटुंबियांचा आनंद गगनात मावत नव्हता.स्वामींच्या अचाट सामर्थ्याचे सर्वाना आश्चर्य वाटले.त्यांनी स्वामींचा मुक्त कंठाने जय-जयकार केला.देसाई कुटुंबियांनी आनंदाने स्वामीना विपुल संपत्ती दिली आणि त्यांचा मोठा सन्मान केला.
                            अध्याय १४ वा 

                     पूर्व जन्मीचा कनकदास यास मुक्ती

स्वामी प्रसार कार्यासाठी फिरत असताना त्यांचा मुक्काम एका मारुतीच्या मंदिरात होता.ते मारुतीच्या भव्य मुर्तीसमोर बसलेले असताना त्या मंदिराच्या बाहेर उभे राहून एक महार स्वामीना मोठ्या भक्ती भावाने नमस्कार करीत होता.त्याच वेळी स्वामीना आपल्या पूर्व जन्माची आठवण झाली.त्यावेळी ते व्यासराय या नावाने प्रसिद्ध होते.त्यांनी समोर उभा असलेल्या महाराच्या पूर्व जन्मासंबंधी विचार केला तेंव्हा त्याना आठवले की हा महार पूर्वीच्या जन्मात कनकदास नावाचा एक प्रसिध्द पुरुष होता.स्वामिनी त्याला विचारले अजून कर्मभोग संपला नाही का? त्यावेळी तो महार म्हणाला गुरुदेव माझी कर्मापासून अजून विमुक्ती झाली नाही.जीवनात मला आसक्ती उरली नाही.जीवन संपविण्याची इच्छा आहे.त्याचे वक्तव्य ऐकून स्वामीना कळून चुकले की त्याचा मुक्तीकाळ जवळ आला आहे.स्वामिनी त्यास महाप्रसादासाठी घरून कांही तरी घेऊन येण्यास सांगितले.तो आनंदाने घरी गेला आणि घरात पदार्थ शोधू लागला.त्याला घरात केवळ मोहरीचा डबा सापडला तोच घेऊन तो स्वामींकडे आला.ते चातुर्मासाचे दिवस असल्याने आहारात मोहरी त्याज्य होती. ही बातमी विप्रानी स्वामीना सांगितली.स्वामी  म्हणाले मोहरी घेऊन आलेला हा महार गेल्या जन्मी प्रसिध्द कनकदास होता.त्यावेळी मी व्यासराय होतो.त्यावेळी त्याने मला देवदर्शन घडविले होते.याच्या स्मरणार्थ आतापासून चातुर्मास असला तरी मोहरीचा उपयोग स्वयंपाकात होत जावा. ही स्वामींची इच्छा सर्व विप्रानी एकमताने मान्य केली.त्यावेळेपासून  स्वामींच्या मठात चातुर्मासात सुद्धा मोहरीचा उपयोग स्वयंपाकात होत असतो.
त्या दिवशी स्वामिनी दिलेला प्रसाद त्या महाराने भक्ती-भावाने खाल्ला आणि नंतर हरी भजन केले.भजन संपताच त्याने आपला देह ठेवला आणि स्वामींच्या कृपा प्रसादाने जीवन-मरणाच्या या चक्रातून मुक्त झाला.
                              अध्याय १५ वा
                       श्रीनिवासाचार्य पंडिताला पश्चाताप

बिरूदहल्ली श्रीनिवासाचार्य नावाचे एक विद्वान पंडित आपण लिहिलेला एक ग्रंथ स्वामीना दाखवून त्यास मान्यता मिळविण्याच्या उद्देशाने आले होते.स्वामिनी त्यांचा ग्रंथ डोळ्याखालून घातला.त्याना त्यात युक्तिवाद आणि पांडित्य असल्याचे जाणवले.त्यांनी त्या ग्रंथाबद्दल उत्तम अभिप्राय देताना म्हटले हा ग्रंथ लेखकास तीर्थ ही  पदवी मिळवून देण्यास योग्य आहे. त्या पंडिताचा स्वामिनी  यथा-योग्य सन्मान करून आपणा जवळ भोजनास बसवून घेतले.तो चातुर्मासाचा काल होता.वाढण्यात आलेल्या पदार्थात मोहरीची फोडणी दिलेले सार होते.त्या पंडिताने ते सार घेतले नाही.  जेवणे झाल्यानंतर तो पंडित स्वामींच्या चरणी नतमस्तक झाला.स्वामिनी त्याला आशीर्वाद देऊन फळे आणि मंत्राक्षदा दिल्या. ते घेवून तो आपल्या स्वस्थानी परतला.तेथे गेल्यानंतर तो उत्तरादि मठातील गुरु योगीद्र तीर्थ याना भेटला आणि त्याना फळे,मंत्राक्षदा दाखविल्या.लाल असलेल्या अक्षदा अगदी काळ्याभोर झाल्या होत्या.त्या पाहून योगींद्र तीर्थ म्हणाले तुम्ही राघवेंद्र स्वामींचा अपमान केला असेल.तितक्यात त्या पंडिताला असाहय असे पोटशूळ उठले.तेंव्हा श्रीनिवास चार्य म्हणाले मी स्वमिबरोबर जेवताना मोहरीची फोडणी दिलेले सार घेतले नाही, कारण चातुर्मासात ते आपणास निशिध्द असते ना? योगींद्र तीर्थ म्हणाले तुम्ही स्वामींचा अपमान केला  आता पुनरपी तेथे जाऊन स्वामींची क्षमा मागून तेथील ते सार खाऊन या. या आदेशानुसार श्रीनिवासाचार्य पुन्हा श्री स्वामींकडे गेले आणि त्यांची आर्त भावाने क्षमा मागितली. दयेचे सागर असलेल्या श्री स्वामिनी श्रीनिवासाचार्याना पुन्हा एकदा आपणाबरोबर भोजनास बसवून घेतले.या वेळी त्यांनी मोहरीचे सार आवडीने खाल्ले.ते खाताच  त्यांचे पोटशूळ कमी झाले.ते नंतर स्वस्थानी परत आले. त्यांनी मंत्राक्षदाची पुडी उकलुन पाहिली तो काय आश्चर्य त्या पुडीत लाल-भडक चमकदार मंत्राक्षदा होत्या
                             
                             अध्याय १६ वा

                       तीन  ब्राम्हणांना इच्छा भोजन

श्री राघवेंद्र स्वामी कुंभकोणम येथे असताना उत्तरे कडून तीन ब्राम्हण आले होते . त्या ब्राम्हणांनी ऐकले होते की स्वामी त्यांच्याकडे येणार्या लोकांच्या मनातील इच्छा ओळखून त्या पूर्ण करतात.त्या विप्रानी मनात इच्छा भोजनाची कामना केली होती.एकास वाटले आपणास चित्रान्न मिळावे तर दुसरा खीर मिळावी असे इच्छित होता. तिसरा  पुरणाच्या कडबुची इच्छा करीत होता.त्या तिघांनी स्वामींची परिक्षा पहाण्याचे ठरविले. आपल्या इच्छेप्रमाणे भोजन मिळाले तर स्वामींचा कल्पतरू कामधेनु  असा महिमा खरा मानावा असे त्या तिघांना वाटले.मठात येण्या पूर्वी ते तिघे स्नानासाठी नदीवर गेले.तेथे स्वामींचा एक शिष्य कपडे धूत होता.त्या कपड्यामध्ये स्वामींचा एक भगव्या रंगाचा पंचां होता.तो त्या शिष्याने धुण्यासाठी हातात घेतला. तेवढ्यात तो त्या ब्राम्हणाकडे पाहून म्हणाला तुम्ही इच्छा केलेले भोजन तयार आहे.हे त्या शिष्याचे बोलणे ऐकून त्या तिघाना खूप आश्चर्य वाटले. ते तिघे स्नान करून बाहेर आले आणि आपले कपडे सुकवू लागले. त्यावेळी त्या शिष्याचे कपडे धुणे आणि स्नान आटोपले होते.  त्याने उन्हात वाळलेली वस्त्रे घेतली.स्वामींचा पंचां त्यात होता.तो शिष्य तत्काळ त्या तीन विप्रांकडे वळून म्हणाला आपण इच्छिलेले भोजन तयार आहे आपण लवकर आश्रमात चलावे. ते विप्र म्हणाले आपण स्वामींचे शिष्य दिसता. त्या शिष्याने होकारार्थी मान हालविली त्यांनी त्या शिष्यास विचारले तुम्हास आमच्या मनातील कसे कळले? तो शिष्य अवाक होऊन पहातच राहिला. तो नंतर  म्हणाला मी तुम्हास कांहीच म्हटले नाही.तुम्हास भास झाला असेल.असे म्हणून तो निघून गेला.त्या विप्राच्या लक्षात एक गोष्ट आली की ज्या वेळी स्वामींचा भगवा पंचां त्या शिष्याच्या हातात होता त्यावेळी तो म्हणत होता की तुमचे इच्छा भोजन तयार आहे. स्वामींच्या या पंचाची किमया जाणून ते तिघे विप्र लज्जित झाले.त्याना वाटले आपण विनाकारण एवढ्या महान संताची परिक्षा घेण्याचे ठरविले.त्या तिघांपैकी एकजण म्हणाला आपण परत जावू या.दुसरे दोघे म्हणाले इतके दूर येऊन स्वामींचे दर्शन न घेता आणि प्रसाद न घेता परत जाणे योग्य नाही.ते तिघे आश्रमात गेले आणि भोजनाची सूचना मिळताच पानावर जाऊन बसले. प्रत्येकाने इच्छिलेला पदार्थ भोजनात होता.भोजनोत्तर ते स्वामींच्या दर्शनास गेले.त्याना पहातच स्वामी म्हणाले तुम्ही इच्छा केलेले भोजन मिळाले ना? ते लज्जेने चूर झाले होते.त्यांनी स्वामीना साष्टांग नमस्कार केला आणि त्यांची  परिक्षा घेण्याचा मानस धरून आल्या बद्दल क्षमा याचना केली. स्वामी म्हणाले तुम्ही माझी परिक्षा पहाण्यासाठी आला होता तेंव्हा तुम्हास काही तरी बक्षिस दिले पाहिजे.तुम्ही पुढील जन्मात ब्राम्हण म्हणून जन्मास याल आणि या मठात पूजा करीत राहाल त्या वेळी सुद्धा तुम्हास इच्छा भोजन मिळेल. असा आशीर्वाद स्वामिनी त्या तिघा विप्राना दिला.ते तिघे संतुष्ट होऊन स्वस्थानी गेले. या घटनेनंतर त्या  मठातील अर्चक त्या तीन विप्रांचे वंशजच आहेत.

                           अध्याय १७ वा
                    ज्योतिष्याने केलेले भविष्य कथन
मलीयालम प्रांतातून तीन ज्योतिष्य पंडित श्री स्वामींच्या दर्शनास आले.त्यांनी स्वामीना साष्टांग नमस्कार केला आणि आपण केलेल्या अभ्यासाची माहिती स्वामीना सांगितली. एकदा  ते सभेत बसले असताना स्वामिनी आपली जन्म पत्रका त्या तिघा पंडितांना दिली आणि सांगितले की तुम्ही तिघे पत्रिकेची एक एक प्रत घेवून वेग वेगळ्या खोलीत बसा आणि माझ्या भविष्या बद्दल लिहा. त्या तिघा पंडितांना स्वामींचे भविष्य लिहावयास मिळणार या कल्पनेनेच आनंद झाला.ते तिघे वेग-वेगळ्या खोलीत जाऊन जन्म पत्रिकेचा अभ्यास करून भविष्य लिहू लागले.त्यांचे लेखन संपल्यावर स्वामिनी प्रत्येकास वेग-वेगळ्या वेळी बोलावून त्यांच्याकडून भविष्यफल ऐकले.नंतर तिघाना सभेत एकत्र बोलावले. त्या तिघांची भविष्यवाणी सारखीच होती.केवळ फरक होता तो स्वामींच्या आयुर्मर्यादेवर. एका पंडिताने त्यांचे आयुष्य शंभर वर्षे असे लिहिले होते,तर दुसर्या पंडिताच्या मते तीनशे वर्षे आणि तिसरा पंडित सातशे वर्षे असे म्हणत होता. सभेतील मंडळीनी शंभर वर्षाची आयुमर्यादा  बरोबर असल्याचा निर्वाळा दिला.स्वामी म्हणाले तिघे ज्योतिषी विद्वान आहेत.तिघांचा आयुर्मर्यादेचा अभिप्राय बरोबरच आहे.त्याचे स्पष्टीकरण असे की माझी भौतिक आयुमर्यादा शंभर वर्षे आहे.माझे ग्रंथ, पठन करणार्या साधकांचे मनोरथ, तीनशे वर्षेपर्यंत पूर्ण होतील. मी वृंदावनात समाधी घेऊन सातशे वर्षे पर्यंत भक्तांचे मनोरथ पूर्ण करीत राहीन.या सातशे वर्षात मी वृंदावनात योगनिष्ठ् अवस्थेत राहीन.स्वामिनी केलेल्या या विवरणाने सर्वांचे समाधान झाले.त्या तिन्ही पंडितांना आपल्या ज्ञान संपादनाबद्दल स्वामींकडून एक प्रकारे प्रशस्ती पत्रच मिळाले होते.

                             अध्याय १८ वा
               अग्नीनारायणाला अर्पण केलेला हार पुनरपी मिळविला

एकदा तंजौरच्या राजाने राघवेंद्र स्वामीना एक अत्यंत मौल्यवान रत्नजडीत हार अर्पण केला. सेवकाने तो स्वामीना आणून दिला.त्यावेळी स्वामी यज्ञ करीत होते.अनेक वस्तूंच्या आहुती यज्ञात पडत होत्या.स्वामिनी तो हार सुद्धा यज्ञात अग्नि नारायणाला अर्पण केला.एवढा मौल्यवान हार स्वामिनी यज्ञात  टाकल्याची वार्ता राजाना कळली.त्याना वाईट वाटले.थोड्या दिवसांनी त्यांनी स्वामींकडे निरोप पाठविला की आम्ही दिलेल्या हारासारखाच अजून एक रत्नजडीत हार करवून घ्यावयाचा आहे.म्हणून सोनारास दाखविण्यासाठी तो हार पाठवावा.स्वामिनी कळविले की आम्ही हार देतो परंतु राजांनी स्व:ता यावे आणि हार घेवून जावा. स्वामींच्या आदेशांप्रमाणे  महाराज रघुनाथ राय स्व:त स्वामींकडे आले.राजाच्या समोर स्वामिनी यज्ञ देवतेला आपण अर्पण केलेला रत्न जडित हार परत करण्याची विनंती केली. यज्ञेश्वर स्वयम प्रकट होऊन त्यांनी तो रत्न जडित हार परत केला.तो हार पाहून राजा अत्यंत लज्जित झाला.त्याने स्वामीना साष्टांग नमस्कार केला आणि क्षमा याचना केली.दयाघन स्वामिनी क्षमा तर केलीच शिवाय तो हार राजास दिला शिवाय एक सुंदर भेट वस्तू सुद्धा दिली.ते त्या राजाला म्हणाले राजे महाराज आता आपण आपल्या राजधानीस जावे.आम्ही एकदा तंजौरला येऊ.पुढे कांही काळानंतर तंजौर येथे भीषण दुष्काळ पडला.लोक अन्नासाठी दारोदार फिरू लागले.पाउस न पडल्याने शेतीत कांहीच पिकले नाही.राजा चिंतेत होता.त्याला स्वामींची आठवण झाली आणि वाटले की स्वामी येथे आल्यास त्यांच्या कृपेने पाउस पडून आपली दुष्काळापासून सुटका होईल.हा विचार राजाच्या मनात आला आणि त्याच वेळी स्वामी तंजावुरला पोहोचले.राजाला स्वामींच्या आगमनाने अत्यंत आनंद झाला.स्वामिनी राजगृहाच्या मंडपात मुलरामाची पूजा मांडली आणि मनोभावे प्रार्थना केली की तंजौरच्या लोकांची स्थिती सुधारावी आणि दुर्भिक्ष्य नाहीसे व्हावे.श्री राघवेंद्र तीर्थांवर कृपा दृष्टी असलेल्या मुलरामाने प्रसन्न होऊन स्वामींची प्रार्थना फलद्रूप केली.त्या दिवशी तंजावुरला मुसळधार पाउस पडला.आणि पुढे सुद्धा कांही दिवस पाउस सतत पडत राहिला.योग्य पावसाने उत्तम पीक आले आणि दुष्काळाची छाया दूर झाली.रघुनाथरावांनी स्वामींची अत्यंत श्रद्धा भावाने पूजा केली आणि भव्य सन्मान केला.
                           
                           अध्याय १९ वा

         दिवाण वेन्कन्नातर्फे सिद्धिंमसुद खानास श्री राघवेंद्र स्वामींचा परिचय.-
                     नवाबाकडून मन्चाले ग्रामाची देणगी.

श्री स्वामी संचार करीत असताना पुन्हा एकदा आदवानि ग्रामी गेले.त्यांच्या आगमनाची वार्ता मिळताच दिवाण वेन्कन्ना अत्यंत भक्ती भावाने स्वामींच्या दर्शनास गेला.त्याना मोठ्या सन्मानाने आपल्या घरी घेवून जाऊन त्यांच्या भिक्षेची व्यवस्था केली. त्याने तेथील नवाब सिद्धिंमसुदखान यास श्री राघवेंद्र स्वामीच्या  दैवी सामर्थ्याबद्दल सांगितले. त्याना भेटून त्यांचा आशीर्वाद घेतल्यास राज्यात सुख,समृद्धीची वाढ होऊन राजास स्व:ताला शांती आणि समाधान लाभेल असे आपले प्रांजळ मत स्पष्ट केले. .स्वामी सारख्या संत पुरुषांचे दर्शन अत्यंत दुर्लभ असते तरी नवाबाने स्वामींचे एकदा तरी दर्शन  घ्यावे असे वेन्कन्नाने  सुचविले.दिवाण स्वामींची एवढी महत्ता वर्णन करतो आहे तर आपण त्या यतीची परिक्षा पहावी असे त्या नावाबास वाटले.एकदा स्वामी मुलरामाची पूजा करीत बसले असताना नवाबाचा  एक सेवक आला त्याने ताटात झाकून काही आणले होते.त्यावेळी मुलरामास नैवेद्य दाखविण्याची वेळ होती. त्या ताटात नवाबाने मासाचे तुकडे घालून त्यावर व्यवस्थित झाकून स्वामींकडे पाठविले होते.अंतर ज्ञानी स्वामिनी ताटात काय आणले ते ओळखले होते.नवाबाचा आपली परीक्षा घेण्याचा हेतू त्यांनी जाणला होता.ते कांही न बोलता थोडा वेळ ध्यानस्थ बसले.नंतर कमंडलूतील पवित्र जलाचे त्या ताटावर प्रोक्षण केले आणि मुलरामाची प्रार्थना केली.नंतर ते जवळ उभे असलेल्या सेवकाला म्हणाले आता तटावरील कापड बाजूला करा.तितक्यात नवाब तेथे स्वामींच्या दर्शनाला आला. त्याच्या  समोरच ताटावरील कापड दूर केले आणि नवाबास त्यात काय दिसले? फळे,फुले आणि मासाचा पत्ताच नव्हता.नवाब मनातून अत्यंत लज्जित झाला.त्याला आपल्या या करणीचा पश्चताप झाला.त्याला चैन पडेना त्याला वाटले स्वामींची गैरमरजी झाल्यास आपली सारी संपत्ती वैभव,राज्य यांचा नाश होण्यास वेळ लागणार नाही.त्याने  दिवाण वेन्कन्नास बोलाऊन सांगितले तुमचे स्वामी फार थोर आहेत.आम्ही त्यांना एक जागीर देवू इच्छितो. वेन्कन्नाने नावाबाचा विचार स्वामीना सांगितला.स्वामी म्हणाले आम्ही निरीछ  आम्हास जागीर घेऊन काय कारावयाचे? नावाबाचा फार आग्रहच असेल तर त्याना तुंगभद्रेच्या काठावरील मन्चाले ग्राम आमच्या मठाच्या खर्चासाठी देण्यास सांगा.स्वामींचा निरोप वेन्कन्नाने नवाबास सांगितला.नवाबाने मोठ्या आनंदाने मन्चाले ग्राम स्वामीना अर्पण केले.मन्चाले ग्रामाचे महात्म्य फार थोर होते. पुरातन काळी प्रल्हादाने यज्ञ केला होता ते स्थान येथेच आहे.
                             अध्याय २० वा
                      देह ठेवण्याचा काल राघवेंद्र स्वामीना आकाश मार्गाने कळला
श्री राघवेंद्र स्वामी एके दिवशी आपल्या शिष्यांना आंब्याच्या झाडाखाली बसून पाठ सांगत
होते.ते एका एकी उभे राहिले आणि आकाशाकडे नजर लावून कांही तरी ऐकू लागले.त्यांनी आकाशाकडे पहात हात जोडले नंतर स्मित केले आणि खाली बसले.त्यांच्या या कृतीचा शिष्यांना बोध होईना.परंतु त्यांची आतुरता त्याना शांत बसू देईना. शेवटी एका शिष्याने धाडस करून स्वामीना विचारलेच स्वामी आपण अचानक उभे राहून आकाशाकडे पाहून कांही ऐकले आणि नंतर हात जोडून नमस्कार केला याचा अर्थ काय? स्वामी म्हणाले कृष्ण दैपायन नावाचे एक थोर यती विमानारूढ होऊन वैकुंठाला जाताना मला दर्शन देवून गेले.म्हणून मी त्याना नमस्कार केला.मी अजून किती काळ या भौतिक जगात राहणार असे त्याना विचारले. त्यावेळी त्या यतीनी आपली दोन बोटे पुढे करून तीन वेळा ती बोटांची जोडी हलविली.या खुणेचा अर्थ असा की मी अजून दोन वर्षे दोन महिने आणि दोन दिवस येथे राहणार नंतर  वृंदावनात प्रवेश करणार. स्वामींचे हे वक्तव्य ऐकून त्यांचे शिष्य दु:खी झाले.
                          अध्याय २१ वा
                    श्री राघवेंद्र स्वामींचा वृंदावन प्रवेश  
दोन वर्षांचा काळ पंख लाऊन उडून गेला.स्वामींचा वृंदावन प्रवेशाचा दिवस जवळ जवळ येऊ लागला.भक्तांची चारी दिशेकडून येण्याची गती अतिशय वाढली. प्रत्येकजण हे दैवी रूप डोळ्यात साठवून घेण्याचा प्रयत्न करीत होता.स्वामी मोठ्या प्रेमाने दर्शनास आलेल्या प्रत्येक भाविकाला तोंडभरून आशीर्वाद देत होते.स्वामिनी  दिवाण वेन्कन्नाला बोलावून घेवून सांगितले वेन्कन्ना, माधवर नावाच्या गावात एक मोठी दगडाची शिला आहे त्या ठिकाणी वृंदावन बांध.वेन्कन्नाने कुतुहुलाने विचारले स्वामी वृंदावनासाठी ही जागा का निवडली? स्वामी म्हणाले वेन्कन्ना, त्रेतायुगात श्री रामचंद्रप्रभू सीतेच्या शोधासाठी निघाले असताना या महान शिळेवर सात घटिका विश्रांती घेण्यासाठी थांबले होते. प्रभूंच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही  शिला या नंतर सातशे वर्षेपर्यंत पूजार्ह आहे.या साठी आम्ही वृन्दावनासाठी हे स्थान निवडले. विरोधी नाम वर्षातील श्रावण कृष्ण द्वितीया, गुरुवार हा शुभ दिवस स्वामिनी वृंदावन प्रवेशासाठी निश्चित केला.श्री स्वामींच्या आदेशानुसार सर्व तयारी झाली. सातशे शालीग्राम वृंदावनात ठेवले.वर एक शिला ठेवली.पूर्व निश्चित मुहूर्तावर स्वामिनी वृंदावनात प्रवेश केला. ततपूर्वी ते तेथे जमलेल्या भक्तांना, शिष्यांना म्हणाले बाळानो देहरुपाने मी दिसलो नाही तरी ध्याननिष्ठ होऊन मी भक्तांच्या कल्याणाकरिता अस्तित्वात आहे. मी भक्तांच्या हाकेला धाऊन येईन. यावेळी स्वामींचे मुखमंडल एका दिव्य तेजाने चमकत होते आणि त्यावर अति प्रसन्न भाव होते. वेदघोष, नामघोष सतत चालू होता.त्या घोषातच स्वामिनी वृंदावनात प्रवेश केला.समस्त भक्तगणांच्या नेत्रात अश्रुंचा पूर दाटला होता.आता हे दैवीरूप, सगुण परब्रम्ह पुन्हा पहावयास मिळणार नाही या विचाराने आर्त भक्त स्फुंदून स्फुंदून रडू लागले.ज्या शिळेतून वृंदावन तयार केले होते त्याच्याच राहिलेल्या शिळेतून प्राणदेवांची मूर्ती,श्री स्वामींच्या इच्छेनुसार, कोरून त्यांच्या वृन्दावनासमोर प्रस्थापित केली.
                               श्री राघवेंद्र स्वामिनी केलेली ग्रंथ रचना.
 श्री स्वामींच्या अलौकिक बुद्धीमत्तेची चुणूक ते श्री सुधींद्र तीर्थ गुरुदेवांकडे शिकत असतानाच  जाणवली होती.त्यांनी केलेल्या विशाल ग्रंथ रचनाच याची पुष्टी करते.त्यांनी एकूण तेवीस ग्रंथांची रचना केली.ते खालील प्रमाणे आहेत.
१)पुरुष सुक्तादि पंच सुक्तांची व्याख्या २) न्यायमुक्तावली ३) तत्व मंजिरी ४)मंत्रार्थ मंजिरी ५) वेदत्रय विवृती ६) तत्व प्रकाश भाव दीपिका ७) परिमळ  ८) दशोपनिषतखन्दार्थ  ९) तत्व दीपिका १०)गीतार्थ संग्रह ११) राम चरीत मंजिरी १२) कृष्ण चरित्र मंजिरी १३) दश प्रकरण टीका व्याख्या १४)प्रमेय दीपिका १५) गीता तात्पर्य टीका विवरण १६) निर्णय भाव संग्रह १७)चंद्रिका प्रकाश १८)वादावळी व्याख्या १९)तर्क तांडव व्याख्या २०) प्रमाण पद्धती व्याख्या २१)अणुमध्व विजय व्याख्या २२)प्रात:संकल्प गद्य २३) भाट संग्रह

                                                  श्री राघवेंद्र गुरु स्तोत्राची निर्मिती

स्वामींच्या भक्तांना आणि भाविकांना अत्यंत प्रिय असलेल्या श्री राघवेंद्र गुरु स्तोत्राच्या रचने संबंधी एक सुरस कथा आहे.श्री अप्पन्नाचार्य नावाचे एक स्वामींचे एक परम भक्त शिष्य होते.स्वामी वृंदावनात प्रवेश करण्याच्या वेळी ते बाहेर गावी गेले होते.त्याना स्वामी वृंदावनात प्रवेश करणार असल्याची बातमी जेंव्हा मिळाली तेंव्हा खूप उशीर झालेला होता.त्यावेळी ते मन्चाले गावी येण्यास धावतच निघाले.पळत येत असताना त्याना राघवेंद्र गुरु स्तोत्र सुचले. ते जेंव्हा वृन्दावनाजवळ पोहोचले त्यावेळी एकतीस श्लोकांची रचना झाली होती. एकातीसाव्या श्लोकाची शेवटची ओळ कीर्तीदिग्विदिता विभूतीस्तुला येथपर्यंत रचना झाली होती.याच वेळी अप्पान्नाचार्य वृन्दावनाजवळ आले.त्याच क्षणी वृन्दावनातून ध्वनी उमटला साक्षी हयास्योत्रही स्व:ता श्री राघवेंद्र तीर्थानि तो श्लोक अशा रीतीने पूर्ण केला. याच कारणाने हे स्तोत्र आजही घरो-घरी मोठ्या श्रद्धेने म्हटले जाते.  श्री पूर्णबोध गुरुतीर्थ पायोब्द्धी पारा या शब्दांनी प्रारंभ होणारे हे स्तोत्र एकशे आठ वेळा म्हटल्यास आपले इच्छित कार्य पूर्ण होते.या स्तोत्राच्या पठणाने विविध पापे,रोग,भूतबाधा इत्यादी नष्ट होतात.या बद्दल प्रत्यक्ष हयग्रीव देवच साक्ष आहे असे श्री स्वामिनीच अप्पन्नाचार्याचा अपूर्ण श्लोक पूर्ण करून खात्री दिली आहे.अप्पन्नाचार्याने नंतर श्री राघवेंद्र मंगलाष्टक रचून भक्तगणावर फार मोठे उपकार केले आहेत.
             श्री राघवेंद्र स्वामींच्या कांही दिव्य आणि अनाकलनीय लीला---
१)     श्री रामनाथ चेत्तीयारवर  स्वामींची कृपा. 
तामिळ प्रांतातील रामनाथ चेत्तीयार या सदगृहस्थाना आलेला अनुभव अत्यंत आश्चर्यकारक आहे. ते एक कोट्याधीश गृहस्थ होते.त्याना अचानक पोटशुलाचा त्रास सुरु झाला.अनेक औषधोपचार केले परंतु कशाचाही उपयोग झाला नाही आणि ती व्याधी कमी झाली नाही.त्याना एका ब्राम्हणाने श्री राघवेंद्र स्वामींचा फोटो देऊन त्यांच्या पूजेचे विधान सांगितले. रामनाथांनी त्या प्रमाणे स्वामींची पूजा  अत्यंत श्रद्धाभावाने केली. सातव्या दिवशी स्वामी रामनाथाच्या स्वप्नात आले आणि म्हणाले रामनाथा शस्त्रक्रिया करवून घेतल्यास तुझी व्याधी दूर होईल. हा स्वप्नाचा वृतांत रामनाथांनी आपल्या पत्नीस सांगितला.तिला आनंद झाला. ते दोघे एका निष्णात शस्त्रक्रिया करणार्या डॉक्टराकडे गेले.त्याना रामनाथांची प्रकृती दाखवून शस्त्रक्रिया करण्याची विनंती केली.प्रथम ते डॉक्टर शस्त्रक्रिया करण्यास तयार नव्हते, परंतु बराच आग्रह केल्यानंतर आणि श्री स्वामींनि  स्वप्नात दिलेल्या आदेशांबद्दल सांगितल्यानंतर ते डॉक्टर तयार झाले. एवढी कठीण आणि गुंता-गुंतीची शस्त्रक्रिया त्यांनी पूर्वी कधीच केली नव्हती.परंतु यावेळी त्याना आपणात एक दैवी शक्तीचा संचार झाला आहे असे जाणवले आणि त्यांनी ती शस्त्रक्रिया अत्यंत सुलभतेने केली आणि ती पूर्णपणे यशस्वी झाली.या नंतर रामनाथांची प्रकृती सुधारली आणि ते तीन महिन्यानंतर मंत्रालयास दर्शनासाठी आले.त्यावेळी स्वामींच्या पिठावर श्री सुयमिन्द्र स्वामी होते.त्याना रामनाथांनी भेटून श्री गुरुचरणी कांही सेवा करण्याचा संकल्प बोलून दाखविला.त्यावेळी पिठाधीश स्वामी म्हणाले तू एक चांदीचा रथ तयार करून दे म्हणजे शाश्वत सेवा केल्या प्रमाणे होईल. रामनाथांनी ते कबुल केले. ज्यावेळी त्याना येणे असलेले मलाया देशातील पैसे आले त्यावेळी त्यांनी संकल्प केल्या प्रमाणे एक चांदीचा रथ तयार करवून तो इसवीसन १९४७ साली देवस्थानास अर्पण केला.त्या वर्षी श्रावण कृष्ण द्वितीयेस रथाचे उदघाटन केले.त्यात स्वामींची लहान मूर्ती तसेच प्रल्हाद राजांची प्रतिमा ठेऊन रथसमारोह मोठ्या थाटात संपन्न झाला. त्यावर्षीपासून दर वर्षी स्वामींची रथयात्रा याच रथातून निघते.

२)     सर् थामस मनरो यास श्री राघवेंद्र स्वामींचे दर्शन
त्यावेळी भारतात इंग्रजांचा अंमल सुरु झाला होता. इस्ट इंडिया कंपनीने स्थानिक राजाना पराभूत करून आपले राज्य स्थापन केले होते.राज्यांची मुलकी पुनररचना करण्यासाठी त्यांनी पूर्वीच्या ज्या जागिरी होत्या,जी संस्थाने होती त्या सर्वाना एकसंघ करण्याचे ठरविले होते.त्यासाठी त्यांनी जागीरदाराना नोटीसा पाठविल्या होत्या.त्या नुसार मन्चाले उर्फ मंत्रालय क्षेत्राची जागीर रद्द करण्याची नोटीस आली होती. या कारणाने मठाधीश आणि अर्चक दोघेही चिंतेत होते.त्यांनी कंपनीच्या उच्च अधिकाऱ्यास विनंती स्वरूपाचा अर्ज पाठविला. त्यात कळविले होते की जागीरीच्या उत्पन्नाचा उपयोग केवळ मंदिराच्या दैनंदिन पूजा,अर्चा आणि दर्शनास येणार्या भाविक भक्तांच्या भोजन प्रसादासाठी  केला जातो.जागीर रद्द केल्यास मंदिराची व्यवस्था करणे शक्य होणार नाही. त्या जागीरीची चौकशी करण्यासाठी इंग्रजांचा एक अधिकारी सर् थामस  मनरो मंत्रालयास आला. त्याने पायातील बूट काढून बाहेर ठेवले.डोक्यावरची विलायती टोपी काढून वृन्दावनासमोर जाऊन उभा राहिला.तितक्यात त्या वृन्दावनातून एक सन्यासी बाहेर आल्याचे त्या इंग्रज अधिकारी थामस मनरोला दिसले.तो सन्यासी इंग्रज अधिकाऱ्या बरोबर बोलत होता.त्यांचे भाषण मात्र कोणालाच ऐकू येत नव्हते केवळ त्या अधिकाऱ्याचे ओठ हललेले भोवतालच्या लोकाना दिसत होते.ते सन्यासी दुसरे कोणी नसून प्रत्यक्ष राघवेंद्र स्वामीच होते.त्यांनी जागीर रद्द करू नये असे त्या अधिकाऱ्यास पटवून दिले होते.लोकांनी मनरो ला विचारले त्यावेळी त्याने सांगितले की स्वामी स्व:ता त्यास इंग्रजी भाषेतच बोलले आणि जागीर रद्द करू नका असे सांगून मला मन्त्राक्षदा दिल्यात्या वेळच्या मठाधीपतिनी मनरोच्या थोर नशिबाचे कौतुक केले आणि त्या मन्त्राक्षदा अन्न शिजवताना त्यात  घालण्यास सांगितले.मनरो ने ती नोटीस मागे घेतली आणि जागीर कायम राहिली.मठाधीपतिनी त्या इंग्रज अधिकाऱ्यास धन्यवाद दिले. ही माहिती मद्रास जील्ला गझेट मध्ये प्रसिध्द झाली होती.
३)     पुण्याचे खांडेकर यांचा अनुभव
खांडेकर नावाचे पुण्याचे एक प्रसिद्ध व्यापारी होते. त्यांची वाचा एकदमच बंद झाली.त्यांचे मित्र एस. टि. पप्प्पू याना खांडेकरांची वाचा गेल्याचे कळताच खूप वाईट वाटले.त्यांनी  आपल्या मित्रास श्री राघवेंद्र स्वामींची मनोभावे सेवा केल्यास त्यांची गेलेली वाचा पुन्हा येईल असे आश्वासन दिले. तसेच स्वामींचा फोटो,थोडी मुल मृतिका देऊन ती पाण्यात घालून दर रोज पिण्यास सांगितले  त्यांनी पूजेचा विधी सुद्धा सांगितला. खांडेकरांनी अत्यंत श्रद्धाभावाने स्वामींचे विधिवत पूजन केले आणि मृतिका मिश्रित पाणी पिले. पुढे बावीस दिवसांनी श्री राघवेंद्र स्वामी खांडेकरांच्या स्वप्नात आले आणि त्यांनी खांडेकराच्या जिभेवर कांही लिहिले आणि त्याना आशीर्वाद दिला. सकाळी खांडेकर उठले ते एका अनामिक आनंदात.त्यांची वाचा पुनरपी आली होती.ज्या वेळी ते पूर्वी प्रमाणे बोलू लागले त्यावेळी घरातील सर्व मंडळींच्या आनंदाला पारावार राहिला  नव्हता.ते तत्काळ आपले मित्र श्री पप्पू याना भेटले.नंतर दोघे मिळून मंत्रालयास गेले.तेथे त्यांनी मोठी पूजा केली. ब्राम्हण सुवासिनिना जेवण दिले.या प्रसंगा नंतर खांडेकर स्वामींचे एक उत्तम भक्त झाले.
अपेक्षित प्रदातान्यो राघवेन्द्राय विद्यते ह्या श्री राघवेंद्र स्तोत्रातील वाक्याची अनुभूती आपणास वारंवार येते ती श्री स्वामींच्या कृपेनेच.श्री स्वामिनी दृष्टी गेलेल्यास दृष्टी दिली,वाचा गेलेल्यास पुनरपी वाचा प्रदान केली.दारिद्र्याने पीडिताला धनवान केले.पुत्र विहितास पुत्रवान केले.रोगग्रस्तास रोगमुक्त केले.श्री स्वामींच्या चरण कमली  श्रद्धा ठेऊन अनन्य भावाने शरण आलेल्या, सेवा करणार्या भक्ताला स्वामिनी सदैव आपल्या हाती धरून त्याची दु:खे दूर केली. तसेच त्याच्या मनोकामना पूर्ण केल्या.
अगदी अलीकडचा प्रसंग म्हणजे कर्नाटकातील मल्लप्पा शिंदे याच्यावर झालेली स्वामींची कृपा.  शिंदे पोटशुलाने  अत्यंत पिडीत होते.मुंबईच्या डाक्टरांनी आपले हात टेकले होते.मल्लप्पाच्या एका मित्राने त्याना श्री राघवेंद्र स्वामींची सेवा करण्याचा सल्ला दिला आणि पूजेचे विधी विधान सांगितले. मल्लप्पाने अत्यंत श्रद्धाभावाने स्वामींची सेवा केली.थोड्याच अवधीत स्वामिनी मल्लप्पास  स्वप्न दृष्टांत दिला आणि सांगितले मल्लप्पा तू मुंबईस जाऊन तज्ञ डाक्टर कडून शस्त्र क्रिया करवून घे.रोगमुक्त होशील. मल्लप्पा या आदेशानुसार मुंबईला गेले जे डाक्टर ऑपरेशनसाठी तयार नव्हते तेच आता तयार झाले.ऑपरेशन झाल्यानंतर प्रमुख डाक्टर येऊन म्हणाले माझ्या अंगात एक दिव्य शक्तीचा संचार झाला होता.त्या शक्तीनेच सर्व कार्य पूर्ण केले.मल्लप्पा एका महिन्यात सुधारले.कांही दिवसांनी स्वामी त्याच्या स्वप्नात आले आणि म्हणाले मंदिरा समोर आर. सी.सी. चा मंडप बांधावयाचा आहे.हे कार्य तू पूर्ण कर. स्वामींच्या आदेशानुसार मल्लप्पाने मंदिरासमोर एक सुंदर मंडप बांधला. तसेच मंदिराचे नुतनीकरण केले.याच वेळी वृन्दावनास तीनशे वर्षे पूर्ण  झाली होती.   

४)     श्री गुरु राजाचार्यांची लोखंडी कपाटातून सुटका.

ही घटना पन्नास साठ वर्षापूर्वी घडलेली आहे.त्यावेळी श्री सुयमिन्द्र तीर्थ मंत्रालयाचे पिठाधीश होते. त्यावेळी सोन्याचे,चांदीचे दागिने,पूजेचे साहित्य ठेवण्यासाठी एक मोठे लोखंडाचे कपाट बेंगलोरहून कंपनीचे दोन मिस्त्री घेऊन आले होते. त्या कपाटाची परिक्षा करण्यासाठी राजा गुरुराजचार्य आणि तीर्थहल्लीचे राघवेंद्रचार्य आले होते.गुरुराजाचार्य त्या कपाटाची आतील बाजू पहाण्यासाठी त्याच्या आतील बाजूस गेले आणि  बाहेर उभे असलेल्या राघवेंद्रचार्यांना म्हणाले दोन्ही दारे बरोबर बसतात का नाही ते पाहून घ्या.त्यांच्या सागण्याप्रमाणे राघवेन्द्राचार्यांनी कपाटाची दोन्ही दारे लाऊन पाहिली.परंतु त्यावेळी श्री गुरुराजाचार्य कपाटाच्या आत होते आणि कपाटाच्या किल्ल्या त्यांच्याकडेच होत्या.ते आतून दार उघडा, उघडा असे मोठ्याने म्हणत होते आणि कपाटाच्या दारावर आवाज करीत होते.बाहेर असलेल्या मिस्त्रीचा नाईलाज होता.सर्वजण घाबरून गेले.श्री सुयमिन्द्र तीर्थ स्वामींच्या वृन्दावना समोर उभे राहून स्वामींची अनन्य भावाने प्रार्थना करू लागले. श्री गुरुराजचार्य सुद्धा आत बसून स्वामींची आर्त स्वरात प्रार्थना करू लागले.इतक्यात एक मोठा चमत्कार झाला.वृंदावनाच्या समोर एक मोठा खीळा  पडला.श्री सुयामिन्द्रतीर्थानि तो पटकन उचलला आणि त्या मिस्त्रीस दिला. त्याने तो कपाटाच्या किल्ली लावण्याच्या ठिकाणी घातला आणि फिरविला तो काय आश्चर्य त्या कपाटाची दोन्ही दारे एकदम उघडली.त्यातून श्री गुरुराजाचार्य बाहेर आले आणि सरळ स्वामींच्या वृंदावना समोर जाऊन लोळण घेतली.त्याना नव जीवनच प्राप्त झाले होते.त्यांनी त्यानंतरचे संपूर्ण आयुष्य स्वामींच्या सेवेत आणि त्यांच्या भक्तीचा प्रसार करण्यात घालविण्याचा दृढ निश्चय केला.
५)     सोन्याच्या कवचाचा चमत्कार.
श्री राघवेंद्र स्वामींच्या वृन्दावनास तीनशे वर्षे होणार होती, या निमित्ताने वृन्दावनास सोन्याचा पत्रा लावावा अशी त्या वेळचे पिठाधीश श्री विज्यीन्द्र तीर्थ यांची फार तीव्र इच्छा होती.संपूर्ण वृन्दावनास सोन्याचे कवच लावण्यासाठी आठशे तोळे सोन्याची गरज होती.समारोहाचा मुहूर्त जवळ येत होता.पुष्कळ भक्तांनी आपल्या इच्छेने सोने दिले परंतु तीस तोळे सोने कमी पडत होते.याची पिठाधीपतिना सारखी काळजी वाटत होती.एके दिवशी सकाळी श्री हरेकृष्ण नावाचे एक गृहस्थ पुण्याहून आले.त्यांनी प्रथम वृंदावनाचे दर्शन घेतले आणि नंतर ते पिठाधीपतीना भेटले.ते म्हणाले काल रात्री मला स्वप्नात राघवेंद्र स्वामींचे दर्शन झाले.त्यांनी मला सांगितले की वृन्दावनास  सोन्याचे कवच  लावावयाचे आहे परंतु त्यासाठी तीस तोळे सोने कमी पडत आहे.ते तू नेऊन दे. स्वामींच्या आज्ञेनुसार मी ते आणले आहे.आपण याचा स्वीकार करावा.या प्रमाणे स्वामिनी पिठाधीपतींची इच्छा पूर्ण केली.तीनशे वर्षे पूर्ण झाल्याचा समारोह मोठ्या थाटात आणि वृन्दावनास सोन्याचे  कवच लाऊन संपन्न झाला.हि सारी स्वामींचीच कृपा.
६)     स्वामिनी आपल्या पायातील पादुका एका भक्तास प्रसाद रुपाने दिल्या.

कर्नाटक राज्यातील रायचूर शहराजवळ तीरपूर नावाचे एक लहानसे गाव आहे.या गावात मनसबदार या उपनावाचे एक सच्छील आणि आचार संपन्न दाम्पत्य राहत होते.गृहस्थ श्री राघवेंद्र स्वामींचे निष्ठावान भक्त होते.त्यांची दिवसाची मंगलमय सुरुवात प्रात:कालच्या मधूर  सुरात गायिलेल्या श्री राघवेंद्र स्तोत्राने होत असे.स्नानोत्तर स्वामींची पूजा,अर्चा जप,जाप्य  यात एक-दोन तासाचा अवधी जात असे.त्यांच्या पूजेमध्ये स्वामींचे एक लहानसे वृंदावन होते.त्याची ते मोठ्या भक्ती भावाने पूजा करीत.एके दिवशी मंत्रालयमध्ये पूजा करणार्या ब्राम्हणास स्वामिनी स्वप्नात आदेश दिला तीरपूर  गावी मनसबदार नावाचे माझे एक भक्त राहतात. त्यांच्याकडे पूजेमध्ये एक सुंदरसे वृंदावन आहे.माझा आदेश त्याना सांगून ते येथे घेऊन ये.त्याचा उत्सव मूर्ती प्रमाणे पालखी सेवेसाठी उपयोग करावा. या आदेशांनुसार ते ब्राम्हण तीरपूर  गावी आले. त्यांनी मनसबदारांच्या घरी जाऊन स्वामींचा आदेशाचा वृतांत मनसबदारांच्या धर्म पत्नीस सांगितला.त्या माउलीने मोठ्या आनंदाने स्वामींच्या आदेशाचे पालन करीत त्या ब्राह्मणाचा  यथोचित सत्कार करून पूजेतील ते वृंदावन त्यांच्या स्वाधीन केले.या वेळी मनसबदार कामानिमित्त बाहेर गावी गेले होते.दुसरे दिवशी घरी आल्यानंतर पूजा करताना त्याना ते वृंदावन दिसले नाही.तेंव्हा त्यांनी या संबंधी आपल्या पत्नीस विचारले.त्या माउलीने घडलेला वृतांत सविस्तर सांगितला आणि म्हणाली आपले भाग्य थोर म्हणून आपल्या घरच्या वृन्दावनास  प्रतिदिन पालखी पूजेचा सन्मान मिळणार.  परंतु ते वृंदावन म्हणजे मनसबदारांचे जीव की प्राण होते.ते परत घरी घेऊन येण्यासाठी त्यांनी तत्काळ मंत्रालयाकडे धाव घेतली.भूक,तहान,उन,पाउस कशाचीच तमा न बाळगता ते चालत चालत मंत्रालयास येऊन पोहोचले.त्यांनी मंदिराच्या अर्चकास आपले वृंदावन परत देण्याची विनंती केली.परंतु  त्या अर्चकाने स्वामींच्या आदेशाचा वृतांत त्याना सांगून वृंदावन परत करता येणार नाही असे स्पष्ट सांगितले. दु:खी झालेले मनसबदार अन्न,पाणी न घेता स्वामींच्या मुख्य वृन्दावनासमोर ध्यान करीत बसले.अशा दोन रात्री  आणि दोन दिवस गेले.तिसरे दिवशी प्रात:काळी एक आश्चर्य घडले. मनसबदार ध्यानमग्न असताना त्याना एक भगवी वस्त्रे परिधान केलेली,हातात शुद्ध जलाने भरलेला कमंडलू घेतलेली सुस्नात, भव्य,दिव्य,मूर्ती दिसली.ते क्षणभर चकितच झाले आणि त्यांनी आपले नेत्र उघडले.समोर मंद स्मित करीत असलेले राघवेंद्र स्वामी गुरुना पाहून ते भांबावूनच गेले. काय करावे ते त्याना सुचेना.अंगी रोमांच दाटले,गळा भरून आला,अष्टभाव जागृत झाले.कसे-बसे भानावर येत त्यांनी स्वामीना साष्टांग नमस्कार केला.स्वामी अत्यंत मधुर स्वरात म्हणाले बाळ तुझ्या घरातील परम पवित्र वृंदावन आम्ही येथील पालखी सेवेसाठी ठेऊन घेतले आहे.तुला मी माझ्या पायातील  या लाकडी पादुका प्रसाद रुपाने देत आहे.त्याची तू नित्य पूजा करीत राहा.तुझे कल्याण होईल.एव्हढे बोलून आणि आपल्या पायातील पादुका श्री मनसबदारांच्या हाती देऊन स्वामी अंतर्धान पावले. स्वामींच्या प्रत्यक्ष दर्शनाने आणि त्यांनी दिलेल्या पादुकानी, मनसबदार अत्यंत आनंदित झाले. आपल्या आयुष्याचे सार्थक झाल्याचे समाधान त्यांच्या मुखावर विलसत होते.या आनंदाच्या अत्युच्च अवस्थेत ते घरी येण्यास निघाले. मार्गात त्याना स्वामींच्या रूपाचे सारखे स्मरण होत होते आणि त्यात मार्ग कधी संपला आणि घरी केंव्हा येऊन पोहोचलो ते कळलेच नाही. त्यांनी आपल्या धर्म पत्नीस स्वामिनी दिलेल्या पादुका दाखविल्या आणि घडलेला वृतांत सांगितला.तो ऐकून त्या परम पावन माउलीच्या आनंदाला सीमाच उरली नाही.त्या उभयतांनी ब्राम्हणाकरवी वेदोक्त मंत्राद्वारे त्या मंगल पादुकांची प्रतिस्थापना केली.आणि मोठा समारोह केला.शेकडो लोकाना अन्नदान केले.या दिव्य पादुकांच्या पूजन अर्चनाचा नित्यनेम श्री मनसबदारांनी आयुष्यभर मोठ्या श्रद्धाभावाने सांभाळला आणि सध्या त्यांचे वंशज सुद्धा तो नित्यनेम तितक्याच भक्तीभावाने सांभाळीत आहेत.आनंदाची गोष्ट अशी की या परम पावन मंगल पादुका सध्या श्री शामराव मनसबदार यांच्या हैदराबाद मधील तुलसीनगर या भागातील घरात देवपूजेत आहेत.त्यांचे विधिवत पूजन,अर्चन होत असते. मनसबदार कुटुंबिय श्री राघवेंद्र स्वामींचे परम भक्त असून ते पुण्यतिथीचा समारोह मोठ्या श्रद्धाभावाने करतात.या सच्छील,आचार संपन्न कुटुंबियावर स्वामींच्या कृपेचा वरदहस्त कायम राहील यात तीळमात्र संदेह नाही.

७)     श्री राघवेंद्र स्वामी समवेत घालविलेली एक रात्र परंतु अज्ञानात.

श्री राघवेंद्र स्वामिनी वृंदावनात प्रवेश करून चारशे वर्षापेक्षा अधिक काळ लोटला परंतु  आजही स्वामी आपल्या भक्तांच्या आर्त हाकेस देतात आणि धाऊन येऊन त्यांची दु:खे दूर करतात.असंख्य भक्तांचे असे अनुभव आहेत.स्वामींच्या लीला अगम्य आणि अनाकलनीय असतात.असाच एक अंत:करणास स्पर्श करणारा प्रसंग श्री वेंकटेश ब्राम्हेश्वरकर (पंडितजी) निझामाबाद निवासी  यांच्या बाल्यावस्थेत असताना घडला तो असा
पंडितजींचे पिताश्री श्री नारायानाचार्य श्री राघवेंद्र स्वामींचे एक महान भक्त होते.एकदा ते मंत्रालयास स्वामींच्या दर्शनास गेले. तेथे त्यांनी चाळीस दिवस स्वामींची अत्यंत श्रद्धा भावाने सेवा केली.त्यानंतर  एके दिवशी रात्री त्याना स्वामींचा स्वप्न दृष्टांत झाला.स्वामिनी सांगितले बाळा तू इतके दिवस घर,दार बायका,मुले सोडून माझी आराधना केलीस. परंतु यानंतर तुला इतके दूर येण्याची गरज नाही. तू स्वग्रामीच राहून माझी आराधना कर.तुझे कल्याण होईल. दुसरे दिवशी सकाळी उठल्यानंतर नारायणाचार्यांनी आपला तो स्वप्न दृष्टांत मंदिराच्या अर्चकास सांगितला आणि स्वामींच्या आदेशांनुसार आपल्या गावी ब्राम्हेश्वरला परतले. त्या वेळी त्यांच्या शेतातील पिके तयार होऊन त्यांची कापणी मळणी इत्यादी कामे चालू होती. यामुळे आचार्यांनी आपल्या धर्म पत्नीसह शेतातील झोपडीतच वास्तव्य केले होते.शेतात काम करणारा एक सेवक रात्रीच्या वेळी त्यांच्या सोबतीसाठी आणि धान्य रक्षणासाठी येत असे.सायंकाळी येताना तो बरोबर कंदील घेऊन येई.त्याच्या प्रकाशात ते तिघे झोपत असत.एके दिवशी तो सेवक नित्याप्रमाणे आला नाही.रात्रीचे आठ वाजले, अंधार पडला तसा आचार्यांना काळजी वाटू लागली.झोपडी समोर धान्याच्या राशी पडलेल्या होत्या.ज्वारीच्या पिकाची वाळलेली चीपाटे एकत्र करून त्या सच्छील दम्पतीने ती पेटविली आणि त्या प्रकाशात श्री स्वामींची पदे मधुर स्वरात गावयास सुरवात केली.त्या आर्त स्वरात म्हटलेली भजने अंत:करणाला स्पर्श करणारी होती.तितक्यात लांबून हातात कंदील घेऊन कुणीतरी येत असल्याचे  त्याना दिसले.त्यावेळी त्या माउलीने सुटकेचा निश्वास सोडला. रामय्या जवळ येताच त्या माउलीने म्हटले अरे रामय्या उशीर झाला ना? तुला भूक लागली असेल चल लवकर भाजी भाकर खाऊन घे. रामय्याने विचारले मालक तुमची जेवणं झाली का? ती माउली म्हणाली अरे तुझी वाट पाहून उजेड असतानाच आम्ही जेवलो. रामय्याने भाजी भाकरी मोठ्या आनंदात मिटक्या मारीत खाल्ली. तो म्हणाला आईसाहेब भाजी लयी बेस झाली पहा. मी एक भाकरी जास्तच खाल्ली. ती माउली म्हणाली अरे ही आपल्या शेतातलीच आहे. आज त्या माउलीला रामय्याच्या आवाजात एक वेगळेच मार्दव असल्याचा अनुभव येत होता. जेवण होताच रामय्याने अंगणात घोंगडी अंथरली आणि त्यावर आडवा झाला आचार्य आणि त्याची पत्नी झोपाडीत झोपले. दिवसभराच्या श्रमाने त्याना तत्काळ गाढ निद्रा लागली आणि जाग आली त्यावेळी सूर्याची कोवळी किरणे झोपडीच्या आत डोकावत होती. त्या माउलीने चहा केला  आणि आचार्यांना देउन रामय्यास देण्यासाठी त्याला हाका मारल्या. परंतु रामय्या तेथे नव्हता. तो अगोदरच निघून गेला होता.रोजची कामे सुरु झाली. स्वयपाक करण्यात आणि मजुरांच्या कामावर देख-रेख करण्यात दिवस कसा गेला ते त्याना कळलेच नाही. सायंकाळ झाली,अंधार पडू लागला त्याच वेळी रामय्या कंदील घेऊन आला.त्याला पहातच त्या माउलीने विचारले अरे रामय्या सकाळी चहा न घेता  का निघून गेलास? रामय्या म्हणाला आई साहेब म्या काल दिवसभर तापाने फणफणत होतो म्हणून  रातला आलो नाही.  अंधारात तुम्हाला लई  तरास झाला असल.अंधारात कस निजलात? त्याचे ते बोलणे ऐकून आचार्य म्हणाले अरे रामय्या रात्री थोडा उशिरा तूच आला होतास ना. भाजी भाकरी आनंदाने मिटक्या मारीत खाल्लीस. मालकाचे हे भाषण ऐकून रामय्या म्हणाला धनी मी शपथ घेऊन सांगतो तापामुळे मी काल घरीच राहिलो होतो. रामय्याचे ते वक्तव्य ऐकून आचार्याच्या लक्षात आले कि आपण भजन करीत असताना कंदील घेऊन आलेले दुसरे कोणी नसून रामय्याच्या रूपात प्रत्यक्ष श्री राघवेंद्र स्वामीच होते.ते रात्रभर उघड्या हवेत धान्याच्या राशीच्या बाजूस घोंगडीवर निजले आणि प्रात:काल होताच अंतर्धान पावले.भक्तप्रिय स्वामिनी आपणासाठी केव्हढे कष्ट घेतले याचे स्मरण होऊन आचार्यांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या. त्या पाहून त्या माउलीला कळेना की आचार्याच्या डोळ्यात अश्रू का? तिने निरागसपणे विचारले अहो काय झाले?त्यावेळी आचार्य म्हणाले अग आपण ज्याला आपला रामय्या समजलो ते आपले गुरु राघवेंद्र स्वामीच  होते. त्याना आपण ओळखू शकलो नाही. ती माउली म्हणाली मला त्याच्या आवाजात वेगळच मार्दव जाणवल. त्यांचे ते मिटक्या मारीत भाजी भाकरी खाणे आपल्या रामय्या सारखे नव्हते. परंतु मी वेडी त्या देवाला ओळखू शकले नाही.असे म्हणून त्या माउलीने आपल्या डोळ्यातील अश्रू  पुसले.
या प्रसंगा नंतर त्यांची स्वामींच्या चरणी असलेली भक्ती द्विगुणीत झाली.हाच भक्तीचा वारसा  श्री नारायणाचार्यांच्या पुत्र, पौत्र, पुत्री पौत्री याना आशीर्वादाच्या स्वरूपात मिळाला आहे. पंडितजी आपल्या पिताश्री प्रमाणेच स्वामींचे अति श्रद्धावन भक्त आहेत.त्यांनी निझामाबाद शहरात चारशेच्या वर श्री स्वामी भक्तांचा मेळावा जमविला आहे. ते श्री स्वामींच्या पुण्यतिथीचा समारोह मोठ्या भक्ती भावाने साजरा करतात. या प्रसंगी चारशेच्या वर भाविक तीर्थ, महाप्रसादाचा लाभ घेतात.या आचार  संपन्न,सात्विक,सच्छील,मृदुभाषी,परोपकारी आणि लोकप्रिय दाम्पत्यावर आणि त्यांच्या पुत्र,पुत्री,पौत्र,पौत्रींवर श्री राघवेंद्र स्वामींच्या कृपाप्रसादाचा वरदहस्त निरंतर राहील यात तिळमात्र संदेह नाही.

                         || श्री गुरु राघवेन्द्राय नम: ||
                         || हरी ओम तत्सत ||

No comments:

Post a Comment