Thursday, September 27, 2012

Gurucharitra sar.



                                                          
           
                 
  
            श्री प.प.श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरीचीत      श्रीसप्तशती 
   
                                              गुरुचरित्र सार.
                               



||ओम नमः श्रीगणेशाय|| श्रीसदगुरुवे नमः || सप्तशती गुरुचरित्र सार प्रारंभः||

आपल्या आत्मरूपी वस्त्रास धुउन शुद्ध परिमल करणारया आत्मज्योतीचा प्रकाशरूप असलेल्या, सुखरूप असणाऱ्या आणि समस्त अनर्थाची शांती करणाऱ्या श्रीदत्तप्रभुना माझे कोटी कोटी प्रणाम. ज्या पासून भूत भव्य आणि भवत उतपन्न होते,ज्यांच्या योगाने जीवित राहते आणि ज्यांच्या पायीच लय पावते ते त्रीगुणावर सत्ता असलेले ब्रम्ह  श्री दत्तात्रेय प्रभू  आहेत. भक्तीने  त्यांची प्राप्ती होते. अश्या त्या श्रीदत्त गुरुंचे चरित्र चित्ताची शुद्धी होण्यास प.प.श्री वासुदेवानंद सरस्वती संक्षेपाने सांगत आहेत. स्वामी महाराज म्हणतात “वासुदेवाचे केवळ निमित्य करून श्री दत्तप्रभूच  हे चरित्र वदवित आहेत. करता   करविता सर्वस्वी श्री दत्तप्रभूच आहेत.त्यांचे चरणी चित्त ठेवून संत सज्जनांनी ह्या गुरुचरित्राचे श्रवण करावे.जे साधक हे चरित्र वाचतात अथवा भक्तीभावाने श्रवण करतात  ते हा भवसागर तरुन  जातात आणि आपल्या कुलाचा उद्धार करतात.मन आणि वाचेला अगोचर असलेले जे स्वछानंदाने प्रकट होऊन भक्तांना दर्शन देतात अश्या यतीश्वर प.पु.नरसिंह सरस्वतीचे चरित्र श्रवण करून त्यांचे दर्शनासाठी गाणगापूरला जाण्यास श्रीदत्त प्रभूंचा भक्त ’नामधारक निघाला. कडक उन्हात फिरणाऱ्या मनुष्यास ज्याप्रमाणे शीतल छायेची इच्छा असते त्याच प्रकारे त्रीतापानी त्रस्त झालेला नामधारक श्रीदत्त प्रभुना विनवीत होता कि त्यांनी दर्शन देवून या संसारातील त्रीतापा पासून मुक्तता करावी. श्रीदत्त प्रभूंची प्रार्थना करताना नामधारक म्हणतो “ हे भगवंता तूच मूर्तिमंत ब्रम्ह आहेस. त्रिमूर्ती रुपात तूच सर्व विश्वात खालीवर चोहीकडे भरलेला आहेस.या कलियुगातील मंगलधाम भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या श्रीदत्तात्रेया मला दर्शन दे.तुझी विशाल सत्कीर्ती ऐकून मी तुला  आर्त भावाने विनंती करतो आहे. माझी प्रार्थना अजून तुझ्या कानावर पडली नाही याची खंत वाटते. हे ज्ञानवंत श्री दत्तप्रभू तू मला जाणत  नाहीस असे कसे म्हणू?  कारण तू सर्वज्ञ, प्रत्येक जीवाचे अंतरंग जाणणारा आहेस. तू माझी उपेक्षा करीत असशील अशी संभावना नाही.कारण माता आपल्या लेकराची उपेक्षा कधीच करीत नाही. तेव्ह्ना हे गुरु माउली तुझ्या  सारख्या दयाळू ईश्वराला हे शोभते का? हे दयाळा तू जर माझी उपेक्षा करशील तर मी अधःपातास जाईन. तुझ्या चरण कमळांची सेवा करावी अशी माझी तीव्र इच्छा आहे. तरी तू दाता होऊन हे सेवेचे दान अवश्य दे.मेघ ज्या प्रमाणे पावसाचा वर्षाव करून सर्वाना जीवन प्रदान करतात त्याच प्रमाणे हे श्री दत्तप्रभू तू माझ्या सेवेवर प्रसन्न होऊन मला दर्शन दे.पुविच्या काळी तू ज्या प्रमाणे प्रसन्न होऊन विभीषण, ध्रुव  आदिना दान दिले होतेस तशीच कृपा माझ्यावर सुद्धा करावी.शिशु मातेला जरी लाथा मारतो तरी माता त्याला प्रेमाने पान्हा देतेच ना? ती त्याला रागाने टाकून देत नाही. त्याच प्रमाणे हे गुरु माउली तू माझ्या अपराधाना क्षमा करून कृपा प्रसाद प्रदान करावा. हे श्री दत्तप्रभू तुम्हीच माझे माता आणि पिता आहात.तुमच्या शिवाय मला अन्य कोणी कुलदैवत नाही.येथे आपणामध्ये भिन्न भाव नसताना आपणा शिवाय मला  अन्य कोण दाता आहे?  हे नरेश्वरा  तूच आता माझे रक्षण कर.तूच सर्व प्राणीमात्रांचे रक्षण करणारा आहेस.हे महाप्रभू माझीच का उपेक्षा करीत आहात?मी आपली इतक्या आर्त भावाने प्रार्थना केली तरी आपले र्हुदय द्रवीत होत नाही का? पाषाणाला सुद्धा पाझर फुटावा अशी माझी अवस्था पाहून सुद्धा तू एवढा निर्दयी होउ शकतोस का? अशी प्रार्थना करून तो नामधारक ब्राम्हण मूर्च्छित पडला. त्याला त्या अवस्थेत एक स्वप्न  पडले.स्वप्नात श्री दत्तप्रभूनी एका सिद्धाच्या रूपात दर्शन देऊन त्याचा उद्धार करण्याचे आश्वासन दिले. 


    ( इति श्री प.प.वासुदेवानंद सरस्वती विरीचीत साप्तशिती गुरु चरित्र सारे चरीतानुसंधान नाम प्रथोमोध्याय ) ||१||
------------------------------------------------------------------------------------------------------------
                                                                                                                                                                           
                                      अध्याय २रा  ---दीपक आख्यान 
                                                  
 ते नयन मनोहारी स्वप्न पाहून नामधारक विप्र उठला आणि आपला मार्ग चालू लागला. थोडे अंतर चालून गेल्या नंतर त्याला एका सिद्ध यतीचे दर्शन झाले.त्यांना पाहताच नामधारकाला अत्यंत आनंद झाला जणू माता पिताच भेटले.त्याने सिद्ध मुनिना प्रश्न केला “ महाराज आपण कोण आहात? कोठे जात आहात? आपण मला माता पित्या  सारखे  प्रिय  वाटता. सिद्धमुनी आपल्या अत्यंत मधुर स्वरात म्हणाले “त्रिमुर्ती आमचे गुरु आहेत. ते अत्यंत दयावंत आहेत.ते भक्ताचे कष्ट दुख पाहू शकत नाहीत. सिद्धांचे ते वक्तव्य ऐकून नामधारक दिन वाणीने म्हणाला “ हे मुनिश्रेष्ठ मी श्री दत्तप्रभूंचा भक्त असून त्यांनी मला असे दूर का सारले? विश्व यंत्राचा चालक श्री दत्तप्रभू असताना हा अस्थिर चित्ताचा नामधारक त्यांच्या बद्दल असे उद्गार काढतो हे ऐकून सिद्ध्मुनी म्हणाले “अरे नामधारका| स्वच्छंदपणे वागतोस आणि व्यर्थच देवाला दोष देतोस. अन्य कोणास आपणावर राग आला असता त्या पासून सदगुरु आपले रक्षण करतात.परंतु सदगुरुच आपणावर कोपायमान झाले तर प्रत्यक्ष हरिहर सुद्धा आपले रक्षण करू शकत नाहीत.नामधारक सिद्धमुनींचे वक्तव्य ऐकून म्हणाला “ हे मुनिवर्या| कृपा करून मला गुरुंचे महात्म्य कथन करावे. सिद्धामुनी नामधारकाला सांगू लागले “अरे नामधारका एकदा ब्रह्मदेवानी कलीस गुरु महात्म्याचे वर्णन करून सांगितले होते. तेच तुला सांगतो.ते लक्षपूर्वक श्रवण  कर.गोदावरी नदीच्या किनारी वेदधर्म शर्मा नावाचे एक गुरु आपल्या शिष्यासह आश्रमात राहत होते.एकदा त्यांना कुष्ट रोगाने पिडीत केले.हळू हळू एक एक शिष्य आश्रम सोडून जाऊ लागले.गुरुदेवांनी काशीस घेऊन जाण्याची आपल्या शिष्यांना विनंती केली परंतु कोणी तयार होईना. त्यावेळी दीपक नावाच्या शिष्याने मोठ्या आनंदाने गुरुदेवांना काशी क्षेत्री आणले आणि त्यांची मनोभावाने सेवा करू लागला.सेवा करताना दिपकने आपणास होणाऱ्या कष्टांकडे लक्ष दिले नाही.सुहास्य वदनाने तो गुरूंची सेवा करीत असे.गुरु त्याला रागावीत,शिव्या देत,प्रसंगी मार सुद्धा देत.परंतु दीपक सर्व शांत चित्ताने सहन करीत असे.गुरुदेवांची अवस्था इतकी बिकट होती कि दीपकला त्यांचे मल,मूत्र सुद्धा स्वच्छ करावे लागे.याच वेळी गुरुदेवांना अंधत्व सुद्धा आले.यामुळे गुरुदेव अधिकच कष्टी झाले आणि दीपकला जास्तच त्रास देवू लागले.परंतु दिपकने आपल्या सेवेमध्ये थोडी सुद्धा कसूर केली नाही.दीपकची आपल्या गुरूप्रती असलेला श्रद्धाभाव,भक्ती.आणि सेवाभाव पाहून देवाधिदेव महादेव प्रसन्न झाले त्यांनी दीपकला दर्शन देवून वर मागण्यास सांगितले. त्यावेळी दिपकने मोठ्या नम्रभावाने महादेवाना साष्टांग नमस्कार केला आणि म्हणाला “हे  भगवान शिवशंकर मला वर घेण्याची   सम्मती नाही. त्यावेळी भगवान भोलेनाथ वर न देताच कैलासात परत गेले. हि घटना त्यांनी भगवान विष्णुना सांगितली. भगवंतानी स्वयम  काशी क्षेत्री येवून दीपकला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले दिपकने पूर्वी प्रमाणेच उत्तर दिले.भगवंतानी बराच आग्रह केल्यानंतर दीपक म्हणाला सर्व कांही माझे गुरुच मला देतील.त्याचा निश्चय ओळखून भगवंतानी त्याला गुरुभक्ती आणि मुक्तीचे दान आशीर्वादात दिले.हे पाहून गुरुदेव वेद धर्म शर्मा दिपाक्वर अति प्रसन्न झाले.एकदा गुरुदेव प्रसन्न झाल्यावर त्यांच्या शिष्यास काय कमी? गुरुदेवांनी आपली माया आवरून घेतली.त्यांना आपली पूर्व स्थिती प्राप्त झाली.त्यांनी दिपक वर प्रेमाचा,गुरुकृपेचा वर्षाव केला. हा कथाभाग सांगून सिद्ध मुनी म्हणाले “समस्त  शंका,कुशंका संशय यांचा त्याग करून परमेश्वराची भक्ती करावी.तो आपल्या भक्तावर नक्कीच कृपा करतो. 


   (इति श्री प.प.व.स.वि.स.सारे.दिपकाख्यान  नाम द्वितोयोद्ध्य  (२) श्लोक स ३३ 
-----------------------------------------------------------------------------------------------------------





                     अध्याय  ३ रा –अंबरीश आख्यान 


वेद धर्मआख्यान ऐकल्यानंतर नामधारक विप्राने सिद्ध्मुनिना विचारले “मुनीश्वर भगवंत सर्व शक्तिमान असताना मानवरुपात त्यांनी दहा अवतार का घेतले? त्यावेळी सिद्धमुनी म्हणाले “ अरे नामधारका  भगवंतानी दशावतार हे आपल्या  प्रिय  भक्त अंबरीश यासाठी घेतले.एकदा दुर्वास ऋषी द्वादशीच्या दिवशी अम्बरीशाचे राजदरबारात गेले महाराजांनी दुर्वास ऋषींचे यथायोग्य स्वागत केले आणि एकादशीचे व्रत सोडण्या करिता भोजनास येण्याची विनंती केली .ऋषिवर आपले स्नान,संध्या,नित्य आन्हिक आटोपून येतो असे सांगून नदीवर गेले.तेथे त्यांना खूप उशीर झाला.व्रत सोडण्याचा मुहूर्त टळून जाऊ लागला.त्यावेळी अम्बरीशाने राजपंडितांच्या सांगण्या प्रमाणे मुहूर्ताच्या वेळी एक पळीभर तीर्थ घेऊन व्रताची सांगता केली.थोड्याच वेळात दुर्वास ऋषी आपले आन्हिक आटोपून राज दरबारी आले.त्यांना अंतरज्ञानाने कळले कि महाराजांनी तीर्थ प्राशन करून व्रत सोडली आहे.या गोष्टीचा त्यांना एवढा क्रोध आला कि त्यांनी अम्बरीशाला शाप दिला तो असा “तुला दहा वेळा गर्भवास सोसावालागेल”. तो शाप ऐकताच अम्बरीशाचे  रक्षण करणारे विष्णू चक्र दुर्वासांच्या मागे लागले.ऋषिवर धावू लागले ते धावत धावत स्वर्गातील इंद्राकडे गेले आणि विष्णू चक्रापासून रक्षण करण्याची विनंती केली. परंतु इंद्राने आपली असमर्थता प्रकट केली तेथून  ऋषी ब्रम्ह लोकात, कैलासात गेले परंतु  कोणीही त्यांची त्या चक्रापासून सुटका करू शकले नाही. अंती ते विष्णू लोकात जावून भगवान विष्णूंच्या चरणी नतमस्तक झाले आणि त्या चक्रापासून सुटका करण्याची आर्त स्वरात  प्रार्थना केली. परंतु भगवान म्हणाले  “ आहो मुनिवर  ते चक्र माझे असले तरी सध्या ते अम्बरीशाच्या सेवेमध्ये आहे तोच तुमची  त्यापासून सुटका करू शकेल. तुम्ही त्यालाच शरण जा.”   भगवान विष्णूंच्या आदेशा प्रमाणे  दुर्वास पुनरपी अम्बरीशाचे दरबारी आले आणि त्यांनी अम्बरीशाची क्षमा याचना करून त्या विष्णू चक्रापासून सुटका करण्याची आर्त स्वरात प्रार्थना केली अम्बरीशाच्या आदेशानुसार ते चक्र स्वस्थानी  गेले.दुर्वासांचा शाप मात्र श्री नारायणाने आपल्या भक्तासाठी स्वत स्वीकारला.त्या प्रमाणे त्यांचे दहा अवतार झाले.भक्तासाठी त्या दयाघन नारायणाने दहा वेळा गर्भवास सोसला.

|| इति श्री प.प.व.स.वि म.सारे.अम्बरीश आख्यान तृतीयो|| श्लोक.स.३८ . 



-
   


                                    अध्याय ४था – अनसूया आख्यान 

नामधारक विप्राने सिद्धामुनिना पुढे विचारले “ हे मुनीश्वर अत्री मुनी कोण होते?  तीन देवांचे स्वामी श्री दत्तात्रेय अत्री मुनींचे पुत्र कसे झाले?हे मला सर्व विस्तार करून सांगा.त्यावेळी सिद्धमुनी म्हणाले  “ अरे नामधारका अत्री मुनी हे ब्राम्हदेवाचे पुत्र आणि अनसूया त्यांची धर्मपत्नी.ते एक परम पवित्र दाम्पत्य  होते.त्यांचेच पुत्र श्री दत्तात्रेय.यांच्या जन्माची कथा मोठी सुरस आहे.अनसूया एक पतिव्रता स्त्री होती.तिचे आचार संपन्न आणि व्रतस्थ जीवन पाहून देवेंद्र इंद्राला सुद्धा आपले इंद्रपद जाण्याची भीती वाटू लागली.इंद्र अन्य देवांसह भगवान विष्णू कडे गेले आणि त्यांनी सती अनसूयेचे महात्म्य वर्णन करून आपल्या इंद्रपदास धोका असल्यचे सांगून या बाबतीत कांही तरी उपाय करावा अशी आर्त स्वरात प्रार्थना केली.ब्रम्हा,वूष्णू,आणि महेश या तिघांनी सर्व देवांना आश्वासन दिले आणि परत पाठविले. त्या तिघांनि भिक्षुकाचा  वेश धारण करून अनसूयेची परीक्षा पाहण्याचे ठरविले.अत्रीमुनी आपली नित्यकर्मे करण्यासाठी नदीवर गेले होते. या संधीचा फायदा घेवून त्या तिघांनी ठरल्या प्रमाणे आश्रमात प्रवेश केला.अनसूयेने त्या तिघांचे यथायोग्य स्वागत केले आणि त्यांच्या आगमनाचे कारण विचारले.ते तिघे म्हणाले “आम्ही भुकेले आहोत आम्हास जेवण वाढ”.अनसूयेने मोठ्या आनंदाने होकार दिला. त्यावेळी ते तिघे म्हणाले आम्ही तुझ्याकडे जेवण करू परंतु आमची एक अट आहे तू आम्हास वस्त्र रहित होऊन वाढले पाहिजे. अनसूयेने ओळखले कि हे सामान्य याचक नाहीत.तिने त्या याचकांची अट मान्य केलीआणि म्हणाली तुम्ही स्वस्थ चित्ताने भोजन करा. तिने पतीदेवांचे ध्यान केले आणि ती तिघे बालके आहेत अशी कल्पना केली. त्यावेळी काय नवल घडले ते तिघे याचक तान्ही बालके झाली.त्या तिघांना पाहून अनसूया अत्यंत आनंदित झाली.तिने  प्रेमभराने एका एका बालकास उचलून घेतले आणि छातीशी लावले त्यावेळी त्या माउलीला प्रेमपान्हा फुटला आणि तिने प्रत्येक बालकास पोटभर स्तनपान करविले. नंतर तिने तिघांना पाळण्यात निजवून अंगाई गीत गाऊ लागली.  त्याच वेळी अत्री मुनी आपले आन्हिक संपवून घरी परतले. अनसूयेने घडलेली सर्व घटना मुनिना सांगितली, त्यांनी अंतरज्ञानाने ओळखले कि हि तीन बालके ब्रम्हा,विष्णू,आणि महेश आहेत.त्यांनी त्या तिघांचे स्तवन करून त्यांना प्रसन्न करून घेतले.ते तिघे निजरुपात प्रकट होऊन त्यांनी त्या परम पावन दाम्पत्यास वर मागण्यास सांगितले, अनसूया म्हणाली आपण या पुत्र रूपानेच आमचे घरी राहावे.तथास्तु असा आशीर्वाद देवून त्रिमुर्ती स्वस्थानी परतले.अत्री  मुनींनी त्या बालकांची नावे चंद्र, दत्तात्रेय आणि दुर्वास अशी ठेवली.कालांतराने चंद्र माता,पित्याची अनुमती घेवून चंद्र लोकी गेला.दुर्वास मुनी वेश धारण करून त्रिभुवनात  विचरण करण्यास गेले.श्री दत्रायेय मात्र आपल्या माता,पित्याच्या सेवेसाठी पितृ ग्रहीच राहिले त्यांनी आपल्या माता, पित्याची एकाग्रतेने सेवा करीत  स्मृत गामी (म्हणजे स्मरण करताच प्रकट होणारे) रुपात राहिले. यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ या रुपाने पिथापुरी अवतरीत झाले. 

   || इति प.प.व.स.वि.म.सारे. अनसूया आख्यान नाम ४ था अध्याय || श्लोक स. ५४ 



-----------------------------------------------------------------------------------------------------------                                                       



                अध्याय ५ वा –श्रीपाद अवतार कथनम  



आंध्र प्रांतातील पिठापूर   नामक ग्रामी श्री अप्पलराज शर्मा आणि महाराणी सुमती हे एक सच्छील आणि आचार संपन्न दाम्पत्य वास्तव्य करीत होते.एकदा त्यांच्या घरी श्राद्ध होते. श्राद्धाचा संपूर्ण स्वयंपाक तयार होता,ब्राम्हणांची जेवणे मात्र अजून झाली नव्हती.त्याच वेळी एक यती भिक्षेसाठी दारावर आला.सुमतीने त्याला पोटभर जेवू घातले.तो यती संतुष्ट झाला आणि म्हणाला “माते  तू मला भोजन देवून संतुष्ट केले आहेस आता वर मागून घे.” सुमती म्हणाली “ यतिवर मला दोन पुत्र आहेत परंतु  त्यातील  एक अंध आणि दुसरा पंगु आहे.  त्यामुळे मी अत्यंत दुखः  भोगते आहे.आपण मला माते असे संबोधन केले तेव्हा आपणा  सारखा दिव्य, तेजस्वी पुत्र माझ्या पोटी जन्मास यावा. त्या यतीने तथास्तु असा आशीर्वाद दिला आणि आलेल्या मार्गाने निघून गेला.ते यतिवर अन्य कोणी नसून प्रत्यक्ष दत्त प्रभूच होते.त्यांचा सारखा पुत्र होणे कसे शक्य आहे त्यामुळे त्यानीच स्वताच सुमती मातेच्या पोटी जन्म घेतला तो श्रीपाद श्रीवल्लभ या रुपात.बालपणापासूनच हा बालक असामान्य बुद्दीमत्तेचा होता.त्याच्या लीला अगम्य,अनाकलनीय आणि अद्भूत स्वरूपाच्या होत्या.श्रीपाद प्रभू सोळा वर्षाचे झाल्यानंतर त्या सच्छील माता,पित्यांनी श्रीपादाच्या विवाहाचा आग्रह केला परंतु “ मी योगाश्रीला अगोदरच वरले आहे “ असे सांगून त्याने विवाह केला नाही.सोळा वर्षापर्यंत घरी राहीन नंतर लोक जागृतीसाठी संचार करीन असे त्यांनी पूर्वीच सांगितले होते.त्या वचनानुसार ते घर सोडून जाण्यास निघाले.त्यांच्या या निर्णयाने माता,पित्यास अतिशय दुखः झाले.परंतु जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या मोठ्या बंधूचे अंधत्व आणि दुसऱ्याचे पंगुत्व आपल्या दिव्य द्रीष्टीने दूर करून त्यांना महान विद्वतेचा कृपा प्रसाद दिला.अंध बंधू उत्तम द्रीष्टी प्राप्त करून एक महान पंडित झाला.दुसऱ्याचे पंगुत्व नष्ट होवून तो एक वेदसंपन्न विद्वान आचर्य झाला.यानंतर श्रीपाद प्रभू काशीस गेले. तेथून ते बदरिका आश्रमास गेले.येथून ते गोकर्ण महाबळेश्वर या तीर्थस्थानी आले. या स्थानी कांही काळ वास्तव्य करून आंध्र प्रांतातील कुरवपूर या रम्य स्थानी आले. हे गाव परम पावन अश्या कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. या अति पावन स्थानी प्रभुनी वयाच्या तीस वर्षापर्यंत लोक कल्याणासाठी महान कार्य केले,या नंतर ते कृष्णेच्या प्रवाहात अंतर्धान पावले.
       विमल: कीर्तयो यस्य| श्री दत्तात्रेय एव: ||
       काळी श्रीपाद रूपेण | जयति स्वेष्ट कामाधुरा ||
अत्यंत शुध्द कीर्तीचे दत्तात्रेय कलीयुगात आपल्या भक्तांच्या  मनोकामना पूर्ण करण्या साठी श्रीपाद श्रीवल्लभ रुपाने विराजित आहेत.
   || इति श्री प.प,व.स.वि.स. सारे.श्रीपाद अवतार कथनाम नाम ५ वा अध्याय || श्लोक स. ६१ 


          अध्याय ६ वा --- गोकर्ण महाबळेश्वर  प्रतीष्ठापनम 

श्रीपाद प्रभूंच्या अवतार कर्याचे श्रवण केल्यावर नामधारक विप्राने सिद्धमुनिना विचारले “मुनिवर सर्व तीर्थ क्षेत्रे सोडून प्रभू महाबळेश्वरला का गेले?” सिद्धमुनिनी महाबळेश्वरचे महात्म्य सांगण्यास प्रारंभ केला. ते म्हणाले “ अरे नामधारका लंकेमध्ये महापराक्रमी रावणाचे राज्य होते. त्याने अनेक देवाना जिंकून आपल्या कारागृहात बंदिस्त केले होते.तो महादेवाचा मात्र परम भक्त होता.त्याची माता प्रतीदिन मातीचे एक शिवलिंग करून त्याची पूजा करीत असे  .रावणाने ते मातीचे शिवलिंग पाहिले आणि म्हणाला “माते तू मातीचे शिवलिंग कशाला करतेस मी तुला कैलासच  येथे आणून देतो.” असे सांगून तो कैलासाच्या दिशेने निघाला.पर्वताच्या पायथ्याशी येऊन त्याने तो उचलण्यासाठी त्यास हलविण्यास सुरुवात केली.कैलासावरील सारेजण त्या हलविण्याने घाबरून गेले. गिरिजा भयाने शिवशकराना  म्हणाली “नाथ प्रलय आल्या सारखा वाटतो आहे.तुम्ही सर्वांचे रक्षण करा.महादेवांनी आपल्या दोन्ही हातानी दोलायमान होत असलेल्या पर्वताला चेपले.पर्वताच्या खाली असलेला तो दैत्य रावण दबला जाऊन मरणोन्मुख  अवस्थेस पोहोचला.त्यावेळी त्याने भगवान शंकराची आर्त स्वरात प्रार्थना करण्यास प्रारंभ केला. तो आपल्या प्रार्थना स्तोत्रात म्हणत होता,”हे शिवशंकरा तुमच्या विना मला कोण त्राता आहे? आपणच माझे प्राणदाते आहात.आपणा  सारखे दयाळू कोण आहे? रावणाची प्रार्थना ऐकून भक्त पारायण शिवशंकर विरघळले आणि त्यांनी कैलास पर्वतास चेपावयाचे थांबविले.रावणाने अत्यंत आनंदित होऊन सप्त स्वरात शिवस्तोत्र गाण्यास सुरवात केली.आपले एक एक शीर कापून त्याची विणा करून मधुर स्वरात राग –तालात तो गाउ लागला. त्या मधुर गायनाने प्रसन्न होऊन भगवान शंकर रावणाजवळ आले.आणि त्याला आपले आत्मलिंग प्रदान करून म्हणाले “हे लंकापती माझे हे आत्म लिंग घे.याची अबाधितपणे  तीन वर्षापर्यंत पूजा केली असता तू स्वताच शिवरूप होऊन अमरत्व प्राप्त करून घेशील तसेच तुझी लंका प्रत्यक्ष कैलासच होईल,यात शंका नाही.परतू हे लिंग घेवून जाताना जर ते भूमीवर ठेवलेस तर मात्र ते पुन्हा तुझ्या हाती येणार नाही म्हणून ते तू सांभाळून घेवून जा. हा कैलास घेवून काय करशील? भगवंताचे हे वक्तव्य ऐकून अत्यंत आनंदित झालेला रावण ते आत्मलिंग घेवून लंकेस जाण्यासाठी निघाला.हि बातमी देवर्षी नारदांनी इंद्रास त्वरित जावून सांगितली इंद्राने ती ब्रम्हदेवाना सांगितली ते तिघे मिळून भगवान नारायणाच्या स्थानी गेले आणि झालेल्या घटनेची सविस्तर माहिती सांगितली आणि  रावणाकडून आत्मलिंग काढून घेण्याची प्रार्थना केली. ते सर्व देव  भगवान शिवशंकर याच्या कडे गेले.भगवान विष्णू भोलेनाथाना म्हणाले “रावण किती दुष्ट आहे ते तुम्ही चागल्या प्रकारे जाणता त्याने अनेक देवाना बंदिस्त करून ठेवले आहे.ससे असूनही आपण त्याला अमरत्वाचे दान दिलेत.” महादेव म्हणाले “माझ्या हातून हे अनुचित कर्म घडले.मी त्याला माझे आत्मलिंग दिले ते तो घेवून जावून एक प्रहर झाला.आपण कांही तरी उपाय करावा.”भगवान विष्णूनी देवर्षी नारदांना रावणाच्या मार्गात विघ्न निर्माण करण्या साठी पाठवून दिले. तसेच विघ्नहरता  गजाननाला मनोवेगाने जावून रावणास गाठावयास सांगितले.रावण मार्गक्रमण करीत असताना सायंकाळ झाली.सायंसंध्या करण्यास रावण नदीच्या किनारी थांबला. ते शिवलिंग कोणाच्यातरी हाती देवून आपण संध्या करावी या विचाराने त्याने चौफेर नजर फिरविली.त्याला नदीकिनारी एक लहानसा बटू दिसला त्याने त्या बटूस बोलावून त्याच्या हातात ते लिंग देवून म्हटले “अरे बालका माझे हे लिंग, माझी संध्या होईपर्यंत हातात जपून  धरून ठेव ते खाली ठेवू नकोस.” तो बटू म्हणाला “ मी लिंग हातात जपून  धरून ठेवीन परंतु माझ्या हाताला कळ लागताच मी तुम्हाला तीन वेळा हाक मारीन आणि जर तुम्ही आला नाही तर मी हे लिंग खाली ठेवून देईन.रावणाने हे कबुल केले आणि तो बटूच्या हाती लिंग देवून संध्या वंदनास गेला.त्या लहान बटूचा हात त्या लिंगाच्या वजनाने दुखू लागला . त्याने रावणास तीन हाका मारल्या परंतु रावण कांही आला नाही.त्यावेळी त्या बटूने ते लिंग खाली जमिनीवर ठेवले आणि स्वत निघून गेला.थोड्या वेळातच रावण तेथे आला पाहतो ते आत्मलिंग जमिनीवर प्रस्थापित झाले होते आणि त्या बटूचा कोठे  पत्ता नव्हता भगवान  गणेश बटूच्या रुपात येऊन आपले कार्य करून गेले होते.रावणाला अत्यंत क्रोध आला त्याने ते लिंग उचलण्याचा प्रयत्न केला परंतु ते जागचे तसूभर सुद्धा हलले नाही.रावणाने लावलेल्या शक्तीने त्या लिंगाचा आकार गायीच्या काना प्रमाणे झाला.त्यामुळेच त्याचे नाव गोकर्ण महाबळेश्वर असे पडले.

|| इति श्री प.प.व.स.वि.स.सारे.गोकर्ण महाबळेश्वर प्रतिस्थापन  नाम ६वा अध्याय श्लोक स. ८३ || 
 .

                     अध्याय ७ वा गोकर्ण क्षेत्र वर्णन 


श्री गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्राच्या प्रतिष्ठापनेची सुरस कथा सांगितल्यानंतर श्री सिद्धमुनिनी या पावन क्षेत्राचे महात्म्य सांगण्यास प्रारंभ केला. ते म्हणाले “अरे नामधारका पूर्वीच्या काळी मित्रसह नावाचा एक नृपती मृगयेच्या निमित्ताने अरण्यात गेला असताना त्याने अनेक प्राण्यांची शिकार केली. परत येताना त्याचा एका राक्षसाशी सामना झाला.त्यात तो राक्षस मारला गेला. त्या राक्षसाचा धाकटा भाऊ आपल्या मोठ्या भावाच्या हत्येमुळे अतिशय चिडून गेला होता. त्याने मित्रसह राजाचा सूड घेण्याचे ठरविले आणि एका स्वयपाक्याचा   वेश घेवून राजाच्या पाकशाळेत प्रवेश मिळविला.उत्तम पक्वान्ने तयार करून त्याने राजाची मर्जी संपादन केली.एकदा राजाकडे पितरांचे श्राद्ध होते.वाशिष्ठ् आदी ऋषी भोजनास आले होते.त्या वेळी या दुष्ट बुद्धी स्वयपाक्याने  स्वयपाकामध्ये गोमास शिजवून ते वशिष्ठ ऋषींना वाढले ते पाहून ऋषिवर अत्यंत क्रोधित झाले.त्यांनी राजास “ब्रम्ह राक्षस हो” असा  शाप दिला मित्रसह राजाने ऋषीवरांची क्षमा याचना केली. त्याने झालेला प्रकार ऋषींना सांगितला त्यावेळी ऋषींनी “बारा वर्षानंतर पुन्हा पूर्वपदास  येशील असा उशाप दिला.त्या शापानुसार राजा ब्रम्हराक्षस होऊन एका घनदाट अरण्यात राहू लागला.त्या अरण्यातील प्राणीमात्राशिवाय तो राक्षस त्या मार्गाने जाणाऱ्या वाटसरुना मारून खात असे.एकदा त्या अरण्यातून एक ब्राम्हण दाम्पत्य  प्रवास करीत होते.त्या राक्षसाने ब्राम्हणास मारून टाकले. त्या ब्राम्हण पत्नीच्या आर्त स्वरात केलेल्या विनंतीचा त्याच्यावर कांहीच परिणाम झाला नाही.त्यावेळी त्या पतीव्रतेने राक्षसास शाप दिला तो असा – ती म्हणाली “अरे अधमा तू माझे सौभाग्य हरण केलेस, तू जेव्ह्ना बारा वर्षानंतर पुन्हा एकदा राजा होशील त्यावेळी स्त्रीसंग करताच तत्काळ मृत्युमुखी पडशील.” असा भीषण  शाप देवून त्या साध्वीने पतीच्या अस्थी जमाकरून त्यांना अग्नी दिला आणि त्याच अग्नीमध्ये प्रवेश करून आपले जीवन संपविले.बारा वर्षांचा काळ उलटल्यावर तो ब्रम्हराक्षस पुनरपी आपल्या स्व- स्वरुपात  आला आणि त्याने राज्यपद ग्रहण केले. त्या पतिव्रतेचा शाप मात्र त्याचे हृदय विदीर्ण करीत होता.हि घटना राजाने आपल्या राणीस सांगितली.ती अत्यंत दु:खी झाली.राजपूरोहीताच्या सागण्या प्रमाणे राजा तीर्थ यात्रेस निघाला.ते दाम्पत्य मिथिला नगरीस गेले.तेथे महर्षी गौतमांचे दर्शन घडले.राजाने ब्रम्हहत्येची घटना ऋषीवराना सांगितली.गौतमांनी त्यास गोकर्ण क्षेत्रि  गेल्यास ब्रम्हहत्येचे पातक नष्ट होईल असे सांगितले,तसेच या पातकापासून मुक्ती मिळून पावन होशील असा सुद्धा आशीर्वाद दिला.गौतम ऋषींनी गोकर्ण क्षेत्री त्यांनी पाहिलेली एक नवल घटना राजास्  सांगितली.ते एकदा या परम पावन क्षेत्रि  गेले असताना त्यांना एक चांडाळ कुळातील स्त्री मरताच तिला नेण्यासाठी शिवदूत आलेले दिसले.त्यांना अत्यंत आश्चर्य वाटले.त्यांनी शिवदुताना विचारले या चांडाळ स्त्रीने कोणते महद पुण्य केले होते ज्याच्या योगाने तुम्ही तिला नेण्यासाठी आला आहात त्यावेळी ते शिवदूत म्हणाले “ हि स्त्री गेल्या जन्मी एका ब्राम्हणाची पत्नी होती.परंतु ती बालवयातच विधवा झाली आणि अनैतिक कर्मा मध्ये रममाण झाली.तिला दुसरा जन्म वैश्य  कुलात मिळाला.या जन्मात सुद्धा ती  जारकर्माने भ्रष्ट झाली.मद्य,मास,भक्षण केल्याने पुष्ट झाली.ती गोमास सुद्धा भक्षण करीत असे. त्याचे फलस्वरूप तिला नंतरचा जन्म चांडाळ कुलात मिळाला.या जन्मी तिला अंधत्व प्राप्त झाले.आई वडील लहानपणीच मरण पावले.त्यामुळे ती भिक्षा मागून आपले पोट भरू लागली.योगायोगाने ती गोकर्ण क्षेत्री आली ती उपाशी असल्याने मंदिरात येणाऱ्या लोकांना अन्न मागत होती.कांही भक्तांनी तिच्या हातात बेलाची पाने ठेवली.ती तिने वास घेवून भिरकावून दिली ती गोकर्णाच्या पिंडीवर पडली.तो महाशिवरात्रीचा परम पावन दिवस होता आणि बेलाची पाने शिवास अर्पण झाली होती.यामुळे भगवान शिव संतुष्ट झाले होते आणि तिचा मृत्यू होताच शिवदूत तिला नेण्यासाठी आले होते.अशा प्रकारे गौतम ऋषींनी गोकर्ण महाबळेश्वर स्थानाचे महात्म्य सांगितले आणि तेथे प्रयाण करण्यास सांगितले.मित्रसह राजा सपत्नीक गोकर्णक्षेत्री जावून आपल्या ब्रम्हहत्येच्या पताका पासून मुक्त झाला. सिद्ध्मुनी म्हणाले असे अति पावन क्षेत्र—गोकर्ण महाबळेश्वर असल्याने श्रीपाद प्रभू या क्षेत्री गेले आणि कांही काळ तेथे वास्तव्य केले.

|| इति श्री प.प.व.स.वि.स.सारे.गोकर्ण क्षेत्र वर्णन नाम ७ वा अध्याय || श्लोक स. १०२   



                  अध्याय ८वा शनी प्रदोष व्रत  कथनम.

सिद्धमुनी नामधारकाला पुढे सांगू लागले, ते म्हणाले “श्रीपाद प्रभू गोकर्ण क्षेत्री कांही काळ वास्तव्य करून कृष्णा नदीच्या तीरावर वसलेल्या कुरवपुर या रम्य  स्थानी आले.येथे त्यांनी बारा वर्षे वास्तव्य केले. या काळात त्यांनी अनेक अद्भूत लीला केल्या.या गावी एक विद्वान ब्राम्हण  आपली धर्म पत्नी आणि पुत्रासह राहत होता. पिता एवढा विद्वान परंतु पुत्रास गायत्री मंत्र सुद्धा म्हणता  येत नव्हता.कांही   काळाने त्या विद्वान विप्राचे देहावसान झाले.गावातील लोक त्या निर्बुद्ध मुलाची निंदा करू लागले या लोक निंदेस कंटाळून त्या दोघा माता, पुत्राने कृष्णा नदीत आपला देह विसर्जित करण्याचे ठरविले आणि खोल पाणी असलेल्या ठिकाणी ते जावू लागले. .दैव योगाने त्या ठिकाणी त्यांना श्रीपाद प्रभूचे दर्शन झाले.त्यांनी खोल पाण्याकडे जाण्याचे कारण विचारले त्यावेळी त्या मातेने आपली सर्व कर्म कहाणी सांगितली आणि  जीवनाला कंटाळून दोघे आत्म हत्या करीत असल्याचे सांगितले.त्यावेळी गुरुमाउलींनी त्यांना समजावून सांगून आत्म हत्येपासून परावृत्त केले.आपणास गुरुदेवासारखा पुत्र पुढील जन्मात व्हावा अशी त्या मातेने श्रींच्या चरणी आर्त स्वरात प्रार्थना केली.त्या वेळी श्रीपाद प्रभुनी उजैनीच्या चंद्रसेन राजाचे आख्यान सांगितले.चंद्रसेन राजा मोठा शिवभक्त होता.तो प्रदोषच्या शुभ मुहूर्तावर शिवाचे पूजन करीत असताना अकस्मात शेजारच्या राजाने दहा अक्षहोणी  सेना घेवून चन्द्रसेनावर चढाई केली.परंतु राजाने ती प्रचंड सेना पाहून सुद्धा न घाबरता आपली पूजा चालूच ठेवली. ते पाहून त्या गावातील गोप पुत्रांनी सुद्धा आप आपल्या घरातील अंगणात मातीचे शिवलिंग करून त्याची पूजा करण्यास प्रारंभ केला.त्यांच्या मातांनी राज्यावर चढाई होत असल्याचे वर्तमान ऐकून आपल्या मुलांना घरामध्ये ओढून नेले,त्या मुलांमध्ये एक लहान मुलगा शिवाची पूजा मोठ्या एकाग्र चित्ताने करीत होता.त्याच्या मातेने ती पूजा पायाने लोटून दिलीआणि मुलास ओढतच घरात नेले.त्यावेळी तो बालक मूर्च्छित झाला. त्यावेळी शिवशंकरांनी प्रकट होऊन त्या बालकास सायुज्य मुक्ती प्रदान केली.हाच बालक श्रीकृष्ण अवताराचे समयी नंदराजाची पत्नी यशोदेच्या  रुपात जन्मास आला.आणि भगवान श्रीकृष्णाची माता होण्याचा सन्मान प्राप्त केला. ज्या राजाने चन्द्रसेनावर चढाई केली होती त्याने उज्जैनीच्या  ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेउन, मनातील वैरभाव विसरून स्वस्थानी परतला. हे कथानक सांगून श्रीपाद प्रभुनी त्या मतिमंद पुत्राच्या शिरावर आपला वरदहस्त ठेवला आणि आशीर्वाद दिला. त्याचे फलस्वरूप तो मतिमंद ब्राम्हण पुत्र एक विद्वान पंडित झाला.त्या विप्रपत्नीने गुरुदेवांच्या उपदेशानुसार शनी प्रदोशाचे व्रत अत्यंत श्रद्धाभावाने केले.  त्याचे फलस्वरूप तसेच श्रीपाद प्रभूंच्या आशीर्वादाने तिला पुढील जन्मी प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयांनी तिच्या पोटी नरसिंह सरस्वती रुपात जन्म घेतला.

|| इति श्री प.प.वा..स, वि.स.सारे.शनी प्रदोष व्रत कथनम नाम ८ वा अध्याय || श्लोक स. ११४  



                                                              
                                         अध्याय ९ वा रजक वर प्रदानं 

श्रीपाद  प्रभूंचा एक सेवक जातीने रजक होता.तो मोठ्या श्रद्धेने प्रभूंची वस्त्रे धूत असे. ते ज्या वेळी  कृष्णा नदीमध्ये स्नान करून येत त्यावेळी त्यांना न चुकता साष्टांग नमस्कार करीत असे .एके दिवशी त्याला त्या गावाचा राजा आपल्या लवाजम्यासह कृष्णा नदीत नौका विहार करीत असलेला दिसला.त्या रजकाच्या मनात आपणही राजा होऊन असा जलविहाराचा आनंद लुटावा अशी एक सुप्त इच्छा तरळून गेली.या विचारांच्या नादात त्याचे लक्ष स्नान करून येत असलेल्या श्रीपाद प्रभूंकडे गेले नाही आणि त्याने नित्य परीपाठाप्रमाणे नमस्कार सुद्धा केला नाही.श्रीपाद प्रभू त्याच्या पाठीमागून आले आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले “अरे राजका तुला राजा होण्याची इच्छा आहे ना? मी तुला राज्यपद देवू का? त्यावेळी तो रजक म्हणाला “ प्रभू आता मी वृध्द झालो आहे.मला पुढील जन्मात राज्यपद द्यावे. परंतु त्या जन्मात सुद्धा आपल्या सेवेचा भक्तीचा लाभ व्हावा “ श्रीपाद प्रभुनी ” तथास्तु “असा आशीर्वाद दिला आणि म्हणाले तुला पुढचा जन्म यवन कुलात मिळेल त्यावेळी राजसुख उपभोगून अंती आपली भेट होईल तेंव्हा तुला माझी स्मृती होईल “ एवढे बोलून प्रभू निघून गेले.सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले “ श्रीपाद प्रभूंच्या कथनानुसार पुढील जन्मी तो रजक यवन कुलात जन्मला आणि यथाकाळी विदुर नगरीचा राजा झाला.आयुष्याच्या अंतिम चरणी त्याला नरसिंह सरस्वती या  अवतारात  प्रभूंच्या दर्शनाचा लाभ झाला.त्यावेळी त्याची पूर्वस्मृती जाग्रत झाली आणि त्याने श्रीचरणावर लोळण घेतली.स्वामिनी त्याचा उद्धार केला. 

|| इति श्री प.प.वा.स.वि.स.सारे.रजक वर प्रदानम ९ वा अध्याय || श्लोक स. १३३  



-                                                                                                                                                      अ                    अध्याय १०वा मृत विप्र संजीवन    


सिद्ध मुनींनी श्रीपाद प्रभूंच्या लीलांचे  वर्णन करताना नामधारकास एका ब्राम्हण व्यापाऱ्याची कथा सांगितली.श्रीपाद प्रभूंचा एक  भक्त उपजीविकेसाठी  व्यापार करीत असे. तो पत्येक वर्षी कुरवपुरी येऊन प्रभूंचे दर्शन घेत असे.एकदा त्याने नवस केला होता कि “व्यापारात नफा झाल्यास  कुरवपुरी येवून सहस्त्र ब्राम्हणांना भोजन देईन”. त्या प्रमाणे त्याने धन जमविले आणि ते घेवून कुरवपुरी येण्यास निघाला.मार्गात त्याला चोरांनी गाठले आणि त्याचे सर्व धन घेउन  त्यास मारून टाकले. आपल्या भक्तावरील संकट दूर करण्यासाठी श्रीपाद प्रभू तेथे प्रकट झाले.त्यांनी तीन चोरांना ठार केले चवथा त्यांना शरण आला, त्यास त्यांनी जीवदान दिले प्रभुनी त्या मृत व्यापाऱ्यास पुन्हा जिवंत केले आणि स्वयं अंतरधान पावले .तो व्यापारी झोपेतून जागे व्हावे त्या प्रमाणे उठून बसला.त्या शरण आलेल्या चोराने घडलेली घटना सविस्तर सांगितली.ती ऐकून तो व्यापारी श्रीपाद प्रभूंची स्तोत्रे गाऊ लागला. यथा समयी तो कुरवपुरी पोहोचला आणि त्याने तेथे आपल्या संकल्पानुसार एक सहस्त्र ब्राम्हणांना सुग्रास भोजन दिले.

|| इति श्री प.प.वा.स.वि.स.सारे.मृत विप्र संजीवन नाम १० वा अध्याय || श्लोक स.१२२  



                   अध्याय ११ वा –नृसिंह सरस्वती अवतार 

श्री सिद्धमुनिनी नामधारकास नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या जन्माची सुरस कथा सांगितली.करंजपूर (सध्याचे कारंजे ग्राम) गावी अंबा नावाची एक विप्र कन्या आपल्या माता,पित्यासह राहत असे. ती आपल्या पूर्व जन्मीच्या संस्कारा प्रमाणे प्रदोष व्रत करीत असे.यथा समयी तिचा विवाह माधव नावाच्या एका विद्वान,आचार संपन्न विप्रा बरोबर झाला.त्या श्रद्धावन दाम्पत्यास पुत्र प्राप्ती साठी अधिक काळ प्रतीक्षा करावी लागली नाही.ईश्वर कृपेने अम्बेस लवकरच पुत्र  प्राप्तीची लक्षणे दिसू लागली.त्या दिव्य मातेचे डोहाळे कांही अगळे  वेगळेच होते.ती श्री दत्तात्रेयांच्या उपासनेत सदैव मग्न असे आणि इतर वेळी तत्व  ज्ञानाच्या गोष्टी सांगे. या शुभ संस्कारांनी परिपूर्ण अशा अंबेने यथाकाळी एका शुभ मुहूर्तावर एका दिव्य बालकास जन्म दिला.जन्मताच त्या शिशुने ओंकाराचा उच्चार केला.बालक वाढू लागला परंतु तो अन्य कांहीच बोलत नसे.त्या सच्छील माता,पित्यास बालक मुका असल्या सारखे वाटले. व्रतबंध  करण्यास योग्य वय होताच त्या अजाण  बालकाने पित्यास खुणेने सांगितले कि मौंजीबंधन झाल्यावर तो बोलू लागेल.त्या कथनानुसार नृसिंहाचा व्रतबंध  होताच तो वेद उच्चारण करू लागला.ते पाहून सर्वाना आश्चर्य वाटले.माता,पित्यास आनंदाचे भरते आले.सर्व लोक म्हणू लागले कि हा असामान्य बालक एक दैवी अवतार आहे.ज्याप्रमाणे सूर्योदय होताच अंधकार दूर होण्यास क्षणाचाहि विलंब लागत नाही त्याच प्रमाणे तो बालक मातेजवळ जावून भिक्षा मागताच तिन्ही वेदांच्या ऋच्या उच्च स्वरात म्हणू लागला. नंतर त्या बटूने मातेस आपणास सन्यास घेण्यास परवानगी द्यावी असी विनंती केली.ती ऐकताच ती माता तर मूर्च्छितच पडली.शुद्धीवर आल्यानंतर ती म्हणाली “अरे बालका सन्यास घेण्याचा एक क्रम असतो  प्रथम ब्रम्हचर्य आश्रम नंतर गृहस्थ आश्रम नंतर वानप्रस्थ आश्रम आणि अंतिम सन्यास आश्रम  हा क्रम सोडून तू एकदम सन्यास आश्रम घेऊ म्हणतोस ते योग्य नाही.


||इति  प.प.वा.स.वि.स.सारे नृसिंह अवतरो नाम ११ वा अध्याय || श्लोक १३३ 



                        अध्याय १२ वा –सन्यासदीक्षा  ग्रहणम 

तो दिव्य बटू मातेस सांगू लागला “ हे माते परब्रम्हाचे ज्ञान प्राप्तीसाठी सन्यास दीक्षा ग्रहण करावयाची असते वैराग्यासाठी.  ब्रम्हचर्य आश्रम गृहस्थ आश्रम असा कोणताच क्रम नसतो.येथे आळस करावयाचा नसतो.हे माते तू मला या संधी पासून दूर का करतेस? मनुष्याचे जीवन हे आकाशात चमकणाऱ्या विजेप्रमाणे क्षणभंगुर आहे.केंव्हा मृत्यू येवून या देहावर झडप घालेल ते सांगता येत नाही.गेलेले आयुष्य पुन्हा मिळू शकत नाही.केंव्हा काय घडेल ते सांगता येत नाही. यासाठी   या   सन्मार्गात मला विघ्न आणू नकोस.असे म्हणून नृसिंहाने आपला उजवा हात मातेच्या मस्तकावर ठेवला आणि आश्चर्य असे कि त्या मातेला पूर्व जन्माची स्मृती झाली.ती माता म्हणू लागली “ अरे पुत्रा श्रीपादा तू आम्हास एक पुत्र झाल्यानंतर जा.त्यावेळी तो बटू म्हणाला तुझी इच्छा पूर्ण होईल तुम्हास पुत्र प्राप्ती झाल्यानंतर मी सन्यास घेईन या प्रमाणे बालक नृसिंह दीड वर्षेपर्यंत घरीच राहिला.या काळात त्याच्याकडे अनेक विद्यार्थी वेदसंपन्न झाले.जे विप्र पूर्वी मुकेपणाची नावे ठेवीत होते तेच, बालक नृसिंहाकडे मार्गदर्शनासाठी येवू लागले .यथाकाळी अंबा मातेने दोन पुत्रांना जन्म दिला. मातेची इच्छा पूर्ण होताच बालक नृसिंहाने   माता,पित्याची  आज्ञा घेवून काशीस  प्रयाण केले.सस्मित मुखाने सर्वांचा निरोप घेऊन पुन्हा तुम्हा सर्वाना भेटेन असे आश्वासन देवून नृसिंह मार्गस्थ झाला. अल्पवयीन बटूने काशीस येऊन योगाचा अभ्यास केला.त्याच्या तेजोमय मुखाने,अत्यंत शिस्तबद्ध आचरणाने काशीच्या ब्रम्हवृन्दानी नृसिंहास सन्यास धर्म स्थापन करण्याची विनंती केली.त्यावेळी त्याने प्रथम स्वत सन्यास ग्रहण केला. काशी क्षेत्रीचे अति विद्वान वृध्द सन्यासी श्री कृष्ण सरस्वती यांचे शिष्यत्व पत्करून नृसिंह सरस्वती हे नाव धारण करून सन्यास मार्गाचा अवलंब केला.स्वत संपूर्ण विश्वाचे गुरु असताना लौकिकासाठी गुरु करून घेतले.सन्यास ग्रहण केल्यावर भारतात चोहीकडे तीर्थ यात्रा करून समाजात अध्यात्म मार्गाचे महात्म्य सामान्य जनतेला समजावून सांगितले.तीर्थ यात्रा करीत असताना मार्गात कारंजे गाव लागले  तेथे स्वामी माता,पित्यास भेटून आले.पिता श्री माधवाना सन्यास मार्गाची दीक्षा दिली. 


|| इति श्री प.प.व.स.वि.स.सारे.सन्यास दीक्षा ग्रहण नाम १२ वा अध्याय  || श्लोक स. १४५ 


-

                                    अध्याय १३ वा –विप्रशूल हरणं 


सिध्दमुनी नामधारकाला पुढे सांगू लगले, ते म्हणाले “अरे नामधारका ज्ञान,ज्योती,कृष्ण,माधव,सरस्वती,सदानंद,उपेंद्र यती आणि मी सातवा असे गुरुदेवांचे पट्टशिष्य होतो.हे सर्व शिष्य शांत स्वभावाचे,निष्कपटी आणि आचार संपन्न होते.या सर्व शिष्य समुदाया समवेत गुरुदेव आपली जन्मभूमी कारंजे ग्रामी आले होते.येथे माता,पित्यास वंदन करून एक दोन दिवस राहिले.गावातील सर्व लोकांनी मोठ्या श्रद्धाभावाने आप-आपल्या घरी नेवून त्यांची पाद्यपूजा केली.गुरुदेवांनी मोठ्या आनंदाने सर्व भक्तांना मोक्ष प्राप्तीचा शुभ-आशीर्वाद दिला.विश्वरूप गुरुदेव सर्वाना मातेप्रमाणे प्रेमळ वाटत असत.परंतु आपल्या भगिनीस मात्र गुरुदेव म्हणाले “ तू दम्पती भेद केलास, एकदा तू गोमातेस लाथ मारलीस या पापाचे फलस्वरूप तुझा पती तुझा त्याग करीलआणि तू कुष्ट रोगाने पिडीत होशील.गुरुदेवांचे हे वाचन ऐकून ती भगिनी अत्यंत दुखी झालीआणि वारंवार त्याच्या चरणी नतमस्तक होऊन या संकटातून रक्षण करण्यासाठी आर्त स्वरात प्रार्थना करुलागली.त्यावेळी गुरुदेव म्हणाले वृद्धापकाळी तुझे पती सन्यासी होतील त्याच वेळी तुला कुष्ट रोग होईल परंतु त्याची मी शांती करीन.स्त्रियांना पती हाच परमेश्वर असतो.त्याची सेवा केल्यानेच त्यांना उत्तम गती मिळते.” असा उपदेश करून गुरुदेव आपल्या शिष्य परिवारासह अति पावन अश्या गोदावरीच्या तीरावर आले. येथे त्यांना अनेक शिष्य लाभले.सर्वाना ज्ञानामृत पाजवून सम्यक ज्ञानाची शिकवणूक देवून त्यांना शोक रहित केले.एके दिवशी ते सर्व गोदावरी नदीवर  स्नानाला गेले असताना त्यांना एक विप्र आपल्या पोटास मोठा दगड बांधून गोदावरीच्या पाण्यात आत्महत्या करणार असल्याचे दिसले.गुरुदेवांनी आपल्या शिष्या करवी त्या विप्रास बोलावून घेतले आणि आत्महत्या करण्याचे कारण विचारले.तो ब्राम्हण म्हणाला “मी असह्य अशा पोटशुलाने पिडीत आहे.पूर्वीच्या काळी जे कुकर्म केले त्याचे फलस्वरूप हे दुखः प्राप्त झाले आहे.पुण्य गाठीशी नसल्याने मी भूमीला भार  झालो आहे.म्हणून शेवटचा उपाय समजून मी आत्म हत्या करीत होतो. परम पूज्य गुरुदेव म्हणाले तू आत्म हत्या करू नकोस मी तुला औषध  देतो. आत्म हत्या  करणे महापाप आहे. त्याच वेळी तेथे एक विप्र आला त्याचे नाव सायंदेव असे होते.त्याने गुरुदेवाना मोठ्या श्रद्धाभावाने नमस्कार केला आणि म्हणाला “ गुरुदेव मी कांची वासी ब्राह्मण आहे.गुरुदेवांनी त्याच्या नमस्काराचा स्वीकार करून म्हटले “अरे सायन्देवा हा ब्राम्हण उपाशी आहे याला जेवू घाल.”  सायंदेव म्हणाला “गुरुदेव म्हणाले हा पोटशुलाने पिडीत आहे आणि अन्नवैरी झाला आहे.जेवणाने त्याचे कांही बरे-वाईट झाल्यास त्याचा दोष मला लागेल.गुरुदेव म्हणाले त्याला नुसते अपूप दे.सायन्देवाने गुरुदेवांना आपल्या शिष्यासह त्याचे घरी भिक्षा करण्याची प्रार्थना केली. गुरुदेवांनी ती मान्य केली. गुरुदेव घरी येताच त्यांच्या चरण कमळांची मोठ्या श्रद्धाभावाने पूजा केली आणि सर्वाना सुग्रास भोजन दिले.गुरुदेवांच्या कृपाप्रसादाने त्या विप्राची  पोटशुलाची व्याधीपासून पूर्णपणे मुक्तता झाली.सर्वाना अत्यंत आनंद झाला.सायंदेव गुरुदेवाचे एक आवडते शिष्य झाले. 

|| इति श्री प.प.व.स्वी.स.सारे.विप्रशुल हरणं नाम १३ वा || श्लोक १६१ 


                     अध्याय १४ वा सायन्देवो वर प्रदानं  


सायंदेव गुरुदेवांना म्हणाला “गुरुमाउली यवन राजा मला मारून टाकील अशी मला भीती वाटते आहे.आज त्याने मला बोलावले आहे.गुरुदेव म्हणाले “अरे सायन्देवा तू घाबरू नकोस तू त्वरित राजास भेटण्यास जा.तो तुझा सन्मान करून परत पाठवील.”असे बोलून त्यांनी सायान्देवाच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला. तो आशीर्वाद घेवून सायंदेव राजदरबारी गेले. त्यांना पाहताच यवन राजा अत्यंत घाबरून मृतप्राय झाला.नंतर शुद्धीवर आल्यानंतर त्याने सायंदेवाचा मोठा गौरव करून मान वस्त्र अर्पण करून  त्यास पाठवून दिले.सायंदेव पुन्हा गुरुदेवांच्या भेटीसाठी आले,त्यावेळी त्यास वंश वृद्धी आणि निज भक्तीचा  आशीर्वाद देवून पुन्हा भेटू असे आश्वासन देवून  गुरुदेवांनी पुढील यात्रेसाठी शिष्यांना पाठविले.स्वत मात्र गुप्त झाले.त्यांनी सर्वत्र निवृत्ती दर्शविली 

                    || इति श्री प.प.वा.स.वि.स.सारे.सायंदेव वर प्रदानं नाम १४ वा अध्याय || श्लोक स. १६६ 







                    अध्याय १५ वा –तीर्थयात्रा निरुपण नाम 

प.पु.गुरुदेव आपल्या शिष्यांना म्हणाले “बाळानो सर्व तीर्थ क्षेत्रांची यात्रा करून अंती श्रीशैल्य पर्वतावर या.तेथच आपण सर्व पुन्हा भेटू.शिष्य म्हणाले “गुरुदेव सर्व तीर्थे आपल्या चरणी सामावलेली असताना आपण आम्हास दूर का पाठवीत आहात? “ गुरुदेवांनी शिष्यांना तीर्थ यात्रेचे  महत्व समजावून सांगितले आणि खेद सोडून तीर्थयात्रेस निघण्याची आज्ञा केली.गुरुदेवांची आज्ञा शिरसावंद्य मानून शिष्यांनी गुरुदेवांना कोणकोणत्या तीर्थक्षेत्री जावे असा प्रश्न केला. त्यावेळी गुरुदेव म्हणाले सात पुऱ्या ,चार धाम,बारा ज्योतिर्लिंग या पवित्र क्षेत्राच्या दर्शनाने समस्त पापांचे क्षालन होते आणि पुण्याची प्राप्ती होते.तीर्थाच्या स्थानी आप आपल्या अधिकारानुसार क्षौर करावे.तसेच श्राद्धादि कर्मे आचारावीत असे केले असता तुमचे कल्याण होईल जितकी तीर्थे तुम्ही श्रद्धाभावाने, भक्तीभावाने जाल  तितके कछ फळ मिळून पूर्वज सारे मुक्त होतील.नदीच्या संगमात स्नान केल्याने उत्तम पुण्याची प्राप्ती होते.ग्रीष्म ऋतू गेल्यावर नदीच्या तीर्थधामास विटाळ येतो.स्वधर्माने आठ मासपर्यंत यात्रा करा नंतर चार महिने एका ठिकाणी वास्तव्य करा.नवीन पाणी नदीस आल्यानंतर दहादिवस त्याला विटाळ असतो. तीर्थस्थानी मात्र हा दोष नसतो.महानदिसं हा दोष केवळ तीन दिवस तर र्हुदकुपास हा दोष केवळ एक रात्रच असतो. हे सर्व ध्यानात ठेवून यात्रा करा. या यात्रेचे फलस्वरूप पापमोचन होऊन ज्ञानाची प्राप्ती होईल “बहुधान्य “ नामक वर्ष येताच मी आपणास श्रीशैल्यावर भेटेन.असे सांगून गुरुदेवांनी सर्वाना आशीर्वाद दिला आणि स्वयं निघून गेले.

     ||इति श्री प.प.वा.स.वि.स.सारे.तीर्थयात्रा निरुपण नाम १५ वा अध्याय ||श्लोक १७६ 

             

                   अध्याय १६ वा – शिष्यत्रय आख्यान 

नामधारकाने सिद्धमुनिना प्रश्न केला  “ मुनिवर गुरुदेवांनी आपल्या शिष्यांना यात्रेस पाठविल्यानंतर स्वत कोठे वास्तव्य केले? त्यांनी त्या काळात काय केले तो व्रतांत मला सविस्तर सांगा”.सिद्धमुनी म्हणाले अरे नामधारका, गुरुदेव वैजनाथ क्षेत्री राहिले होते.तेथे असताना त्यांच्या दर्शनासाठी एक विप्र आला होता.तो गुरुदेवांचे चरण स्पर्श करून अत्यंत    काकुळतेने म्हणाला “गुरुदेव मला माझ्या गुरुनी खूप कष्ट दिले मी विद्यार्जनासाठी गेलो असताना त्यांनी मला नको नको ती कामे सांगितली आणि विद्या मात्र कांही दिली नाही.मी कंटाळून आपल्या चरणी आलो आहे”.गुरुदेव क्रोधाने त्या विप्राचा  धिक्कार करून म्हणाले “ अरे विप्रा तू येथून चालता हो.” त्यावेळी तो विप्र गुरुदेवांचे चरण धरून अत्यंत नम्र भावाने विचारू लागला गुरुमाउली शिष्यांनी गुरूंची सेवा कशी करावी ते मी जाणत नाही,कृपा करून मला ते सांगावे. त्या विप्राच्या शरणागतीने गुरुदेवांना संतोष झाला आणि ते म्हणाले “ अरे विप्रा, गुरु हे प्रत्यक्ष ब्रम्हा,विष्णू आणि शिवाचे स्वरूप असतात. ते आपल्या शिष्यांना,भक्तांना सर्वार्थाने परिपूर्ण करतात.त्यांची सेवा जरी कठीण वाटली तरी गुरु आपल्या शिष्यास सर्व परीस्थिती मध्ये तारतात या संदर्भात द्वापर युगातील एक कथा तुला सांगतो ती ऐक  धौम्य नावाचे एक विद्वान गुरु होते.त्यांच्या कडे विद्याप्राप्तीसाठी तीन शिष्य गेले होते. वेदांचे शिक्षण देण्या पूर्वी  ते  वेदांचा विशेशार्थ  सांगत नसत.शिष्याकडून प्रथम कठीण सेवा घेवून त्यात तो उत्तीर्ण झाल्यास प्रसन्न होऊन त्यास विद्येचे वरदान देत. अशी त्यांची विद्या दानाची पद्धती होती.गुरुनी अरुण नावाच्या शिष्यास पाटाचे पाणी शेतास पुरविण्याचे काम सांगितले.अरुण शेतात गेला तेव्हां त्यास पाण्याचा प्रवाह विरुद्ध दिशेने वाहत असल्याचे दिसल.त्याने तो अडविण्यासाठी माती,दगड ठेवून पहिले परंतु कशाचाच उपयोग झाला नाही.त्यावेळी त्याने गुरुदेवांचे स्मरण करून प्रवाह अडविण्यासाठी स्वत पाण्याच्या प्रवाहात आडवा निजला.तेव्ह्ना पाणी शेतात जाऊ लागले.अशा अवस्थेत किती तास गेले ते कळलेच नाही.गुरुदेव शेतात आले परंतु त्यांना अरुण कोठेच दिसला  नाही.ज्यावेळी त्यांनी पाण्याच्या प्रवाहाकडे पहिले त्यावेळी त्यांना अरुण आडवा पडून प्रवाहास विरुद्ध दिशेस जाण्या पासून अडवीत असलेला दिसला गुरुदेवांनी त्यास प्रेमाने उठविले आणि त्याच्या मस्तकावर आपला कृपा हस्त ठेवला.त्यावेळी त्यास अध्यात्माचे संपूर्ण ज्ञान झाले. अश्या ज्ञानसंपन्न शिष्यास गुरुदेवांनी घरी जाण्याची आज्ञा दिली.  गुरुदेवांनी आपला दुसरा शिष्य बैद  यास शेताचे रक्षण करून धान्य  तयार झाल्यावर ते गाडीतून घरी आणण्यास सांगितले.गुरु आज्ञेनुसार त्या शिष्याने शेताचे उत्तम प्रकारे रक्षण करून पिक आल्यानंतर त्याची मळणी करून पोत्यामध्ये भरून गाडीतून घरी येताना मार्गात ती गाडी चिखलात रुतून बसली.त्या शिष्याने प्रयत्नांची पराकाष्ठा  केली परंतु एकट्याने ती गाडी वर निघेना त्यावेळी त्याने गुरुदेवाचे स्मरण केले आणि आर्त स्वरात प्रार्थना केली.गुरुदेव तेथे प्रकट झालेआनी त्यांनी ती चिखलात रुतलेली गाडी बाहेर काढली बैद ते धान्य गुरुग्रही घेऊन गेला गुरुदेव बैदवर प्रसन्न झाले आणि त्यांनी सर्व विद्या प्रदान केल्या तसेच त्याला स्वगृही जाण्याची अनुमती दिली.  तिसरा  शिष्य उपमन्यू याला गुरुदेवानि वनामध्ये गायी चरण्या साठी घेऊन जाण्याची सेवा सांगितली.ती त्याने आनंदाने स्वीकारली  तो भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करू लागला.त्यावेळी गुरुदेवांनी भिक्षा गुरुग्रही आणून देण्याची आज्ञा केली.त्याप्रमाणे उपमन्यू सकाळची भिक्षा गुरुग्रही नेऊन देवू लागला.केवळ सायंकाळच्या भिक्षेवर आपला उद्र्र निर्वाह करू लागला.नंतर गुरुदेवांनी ती भिक्षा सुद्धा गुरुग्रही आणून देण्याची आज्ञा केली.त्याप्रमाणे दोनीही वेळेची भिक्षा गुरुग्रही त्या शिष्याने आनंदाने दिली आणि  गायीचे, वासरांनी  पिल्यानंतर उरलेले,   दुध पिऊन आपला उदरनिर्वाह करू लागला.  परंतु त्यालासुद्धा गुरुदेवांनी बंदी केली. यावेळी त्या शिष्याच्या मनात गुरुबद्दल वाईट भाव आला नाही.त्याने क्षुधा पुरती साठी रुचकीच्या झाडाचे दुध पिले.त्यामुळे त्याला अंधत्व प्राप्त झाले.तो या अवस्थेत गायी चारीत असताना तो विहिरीत पडला त्यावेळी गुरुदेवांनी प्रकट होऊन त्याला विहिरीतून बाहेर काढले.आणि द्रीष्टी प्रदान करून तुझे समस्त मनोरथ पूर्ण होतील असा आशीर्वाद दिला.उपमन्यू समस्त विद्या संपन्न होऊन कृतार्थ झाला.कालांतराने तो एक विश्व विख्यात पंडित झाला.ही  कथा  त्या विप्रास सांगून  त्याला आपल्या  गुरुकडे   जाऊन त्यांची सेवा करून त्यांना प्रसन्न करून घे, तेच तुझे कल्याण करतील असे सांगून गुरुदेव स्वत भिल्लवाडीस गेले.तेथे त्यांनी चार मास वास्तव्य केले.


       ||इति श्री प.प.व.स.वि.स.सारे.शिष्य तृय आख्यान नाम  १६ वा अध्याय || श्लोक स.१९६  . 





                             अध्याय  १७ वा छिन्न जिंव्हा दानं 

   सिद्ध मुनी पुढे सांगू लागले नामधारका जे लोक विषय भोगांचे सतत चर्वण करतात ते आपले मानसिक संतुलन हरवून बसतात आणि वेड्यासारखे वर्तन करतात. अश्या लोकांना संसारसागरातून तारण्यासाठी गुरुदेव कार्यरत असतात.कोल्हापूर नगरात एका विद्वान पंडिताचा पुत्र मतिमंद होता.त्याला सर्व लोक नावे ठेवीत एवढ्या विद्वानाचा पुत्र असा मतिमंद कसा अशी निरंतर निंदा करीत. त्यामुळे तो मुलगा अत्यंत दुखी होई त्याची जीवन जगण्याची इच्छाच संपुष्टात येऊ लागली अशाच उद्विग्न अवस्थेत त्याने भुवनेश्वरी देवी समोर जाऊन प्रार्थना केली आणि प्रसन्न होण्यासाठी तेथेच धरणे धरून बसला तीन दिवस आणि रात्र सतत प्रार्थना केल्यानंतर सुद्धा देवी प्रसन्न झाली नाही.त्यावेळी त्याने तलवारीने आपली जीभ कापून देवीच्या चरणी अर्पण केली.त्याने नंतर आपली मान कापून संपूर्ण जीवनच देवीच्या चरणी समर्पण करण्याचा संकल्प केला. त्यावेळी देवीने त्यास नृसिंह  सरस्वती गुरुदेवांकडे जाण्याची आज्ञा दिली. त्याप्रमाणे तो विप्रपुत्र गुरुदेवांच्या चरणी नतमस्तक झाला.दयाघन गुरुमाउलीच्या कृपा प्रसादाने त्याची जीभ पूर्वीप्रमाणेच झालीआणि तो एक विद्वान ब्राम्हण झाला.
    || इति प.प.व.स.वि.स.सारे.छिन्नजिव्हा दान नाम १७ वा अध्याय || श्लोक स. २०० 


                       अध्याय १८ वा कुंभ प्रदानं 

कृष्णा पंचगंगा या दोन अतिपावन नद्यांच्या संगमावर एक सुंदर क्षेत्र निर्माण झाले होते.या गावी गुरुदेव बारा वर्षे राहिले.या रम्य स्थानी गुरुदेव गुप्त रुपाने अजूनही राहतात.या क्षेत्री एक गरीब ब्राम्हण भिक्षा मागून आपला आणि आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करीत असे.एके दिवशी गुरुदेवांनी त्या विप्राच्या घरी शाकभिक्षा केली.त्याच्या घरासमोरील अंगणात एक घेवडयाचा वेल  होता.तो गुरुदेवांनी जाता,जाता तोडून टाकला.त्या विप्राला आणि त्याच्या पत्नीला याचे वाईट वाटले कारण ज्या दिवशी भिक्षा मिळत नसे त्या दिवशी ते दाम्पत्य त्या वेलाच्या शेंगा तोडून शिजवून खात.तोडलेल्या वेलाच्या  मुळया  काढून टाकण्यासाठी त्या ब्राम्हणाने कुदळीने जमीन खोदण्यास प्रारंभ केला थोडे खोदताच त्याला धनाने भरलेला कुंभ सापडला. तो बाहेर काढून त्यांनी पहिला आणि आनंदाने ते दोघे गुरुकृपेची स्तोत्रे गाउ लागले. नंतर त्या दोघांनी संगमावर जाऊन श्रीगुरुना साष्टांग नमस्कार केला आणि घडलेला वृतांत सांगितला गुरुदेव  म्हणाले “ या घटनेची वाच्यता कोठे करू नका.”असे सांगून त्यांनी जीवनभर सुखी राहण्याचा आशीर्वाद दिला. 


   ||इति प.प.वा.स.वि.स.सारे. धनकुंभ प्रदानं नाम १८  अध्याय श्लोक स.२०३    

                           अध्याय १९  वा योगिनी वरदानम   


नामधारकाने सिद्धमुनिना विचारले श्री दत्तप्रभूनी इतर अनेक वृक्ष असताना आपल्या ध्यानासाठी औदुम्बराचा वृक्ष का निवडला? सिद्धमुनि सांगू लागले   “अरे नामधारका  हिरण्यकशपुचे पोट आपल्या तीव्र नखांनी फाडून त्याला मारून टाकल्यानंतर नरसिंह भगवानांच्या नखांना असह्य वेदना होऊ लागल्या त्या कमी करण्यासाठी त्यांनी आपली नखे औदुबराच्या फळामध्ये टोचून ठेवली. त्यामुळे त्यांचा दाह कमी झाला. भगवान नरसिंहानी या वृक्षास आशीर्वाद दिला कि या व्र्क्षाच्या तळाशी परमेश्वराचा निवास राहील “याच कारणाने श्री दत्तप्रभूनी आपल्या ध्यानासाठी औदुम्बराचा वृक्ष निवडला आणि  तेथेच त्यांनी आपला निवास केला.या वृक्षाची शीतल छाया श्रीदत्तप्रभुना अत्यंत प्रिय होती.श्री नृसिंह सरस्वती स्वामी कृष्णेच्या द्वीपावर निवास करीत असताना योगिनी गुरुदेवांची सेवा करण्यासाठी मध्यान्हपूर्वी येत आणि गुरुदेवांना नदीतून आतील आपल्या राजमहाली घेवून जात.श्रीगुरुदेवांचा चरण स्पर्श होताच नदी त्यांना मार्ग करून देत असे.योगिनी गुरुदेवांची उत्तमप्रकारे सेवा करून मिष्टान्नाचा भोग लावीत. गुरुदेव भोजनोत्तर अल्प विश्रांती घेवून पुन्हा द्विपांतरी येत.हा नित्याचा नियमच झाला होता.गंगानुज नावाचा एक स्वामीचा भक्त प्रतिदिन हे दृश्य  मोठ्या  आतुरतेने पाहत असे.एके दिवशी तो योगिनींच्या मागोमाग गुरुदेवाबरोबर कृष्णा  नदीतून योगीनीच्या महालात गेला.तेथील ते ऐश्वर्य पाहून चकितच झाला.त्याने अत्यंत भक्तीभावाने गुरुदेवांच्या चरणी आपले मस्तक नमविले.गुरुदेवांनी त्यास अत्यंत प्रेमभराने उठविले आणि तेथे कसा आला ते विचारले.गंगानुजाने संपूर्ण व्रतांत सांगितला.गुरुदेवांनी त्याचा निरपेक्ष भक्तीभाव पाहून त्यास त्रीस्थळी,काशी,प्रयाग,आणि गया या तीन अतिपावन क्षेत्रांचे दर्शन घडविले या घटनेनंतर गुरुदेव अल्प काळ या द्वीपावर राहून गाणगापुरी जाण्यास निघाले.त्यावेळी त्या योगीनिना गुरुदेवांचे चरण दुरावणार या कल्पनेने अत्यंत दुखः झाले.स्वामिनी त्यांची समजूत काढून आपल्या चरण पादुका त्यांना दिल्या.योगिनी त्या पादुकांची यथासांग पूजा करू लागल्या.

||इति श्री प.प.व.स.वि.स.सारे.योगिनी वरदानाम नाम १९ वा अध्याय ||श्लोक स.२१० 





               अध्याय  २० वा समंध परीहारो 

योगीनीच्या रहस्यपूर्ण कथा ऐकल्यानंतर नामधारक विप्राने सिद्धमुनीस विचारले स्वामिनी गाणगापुरी अनेक लीला केल्या असतील ना? त्यांचे सविस्तर वर्णन करून सांगावे त्या वेळी सिद्ध मुनी सांगू लागले. ते म्हणाले “अरे नामधारका शिरोळे नावाच्या एका गावी एक दशग्रंथी ब्राम्हण राहत होता.त्याच्या कडून एका स्त्रीने कांही धन घेतले होते.ते परत करण्या पूर्वीच तो ब्राम्हण मृत्यू पावला.त्याला पिशाच्च योनी मिळाली आणि त्याने त्या देणेकरी स्त्रीच्या मुलास मारून टाकले.गावातील कांही विद्वान विप्रानि तिला सल्ला दिला कि तिने घेतलेले धन त्या मृत विप्राच्या गोत्रजाना  देवून त्याचे क्रियाकर्म करावे.परंतु ती स्त्री अत्यंत गरीब होती.तिच्या कडे एवढे धन नव्हते विप्रानी अजून एक मार्ग सुचविला.तो असा होता कि तिने एक मास पर्यंत श्रध्दाभावाने श्री गुरुदेवांची सेवा करावयाची. या प्रमाणे ती  गरीब स्त्री मोठ्या भक्तीभावाने गुरुदेवांची सेवा करू लागली. ते पिशाच्च तिला स्वप्नात येवून मारू लागले. श्रीगुरुदेवानि  तिची त्या पिशाच्चा पासून सुटका केली आणि तिच्या सेवेवर प्रसन्न होऊन तिला दोन दीर्घायुषी पुत्राची प्राप्ती  होईल असा आशीर्वाद दिला. यथाकाळी तिला दोन पुत्रांची प्राप्ती झाली यथाकाळी तिला दोन पुत्रांची प्राप्ती झाली.दोघे उत्तम रीतीने वाढू लागले.आठव्या वर्षी मोठ्या मुलाचा व्रतबंध करण्याचे त्या सच्छील दाम्पत्याने ठरविले परंतु त्या मंगल कार्याच्या अगोदरच एक दिवस धाकट्या मुलास धनुर्वात झाला आणि त्याचे अंग वाकडे होऊ लागले प्रयत्न करून सुद्धा त्या बालकास सन्निपात झाला आणि त्यातच तो मध्य रात्रीचे समयी मृत झाला.ती माता दुखाने विव्हळ झाली आणि शोक करू लागली. सकाळ होताच पुत्राच्या मृत्युची बातमी गावात पसरली.आणि लोक सांत्वन करण्यासाठी येवू लागले.मध्यान्न होताच बालकाचा अंत्यसंस्कार करण्यासाठी सर्व लोक त्या मातेस विनवू लागले.परंतु ती माता बालकास देण्यास तयार होईना.

|| इति श्री प.प.वा.स.वि,स.सारे.समंध परीहासे.नाम २० अध्याय || श्लोक स.२२० 




                  अध्याय २१ वा मृत पुत्रसंजीवन 

ती माता आपल्या पुत्रास देण्यास तयार नसताना त्याच वेळी एक स्पष्ट वक्ता ब्रम्हचारी तेथे आला. तो त्या मातेस सांगू लागला “हे माते कोण कोणाचा पुत्र आणि कोण कोणाची माता? तूच जर याची पूर्वापार माता असशील तर पूर्व जन्मी याचे नाव काय होते,तो कसा होता ते जाणतेस का?हा सर्व मायामय संबंध आहे.ज्या प्रमाणे सूर्योदय आणि सूर्यास्त तसेच नित्य दिवस आणि रात्र होते.त्याच प्रमाणे आपल्या कर्मानुसार जन्म,मरण सुख-दुखः हि भोगावीच लागतात,हे कोणीच टाळू शकत नाही.गुणमय  प्राण्यानाच नव्हे तर देवादिकांची हीच गत होते.युझ्या शोक करण्याने तो बालक परत येणार आहे का?तू ह्या बालकास अंत्यविधी साठी दे.त्या वेळी ती माता म्हणाली “गुरुदेवांनी मला दोन दीर्घायुषी पुत्रांचा आशीर्वाद दिला होता.या पुत्राचा असा अंत झाल्यास गुरुदेवांच्या वचनावर कोण विश्वास ठेवील? त्यावर तो ब्रम्हचारी म्हणाला तू औदुम्बरी जावून गुरुदेवांना या बद्दल विचार. त्या वेळी त्या मातेने आपल्या मृत बालकास पाठीवर घेवून पतीसह श्रीगुरुदेवांच्या पादुका जवळ गेली आणि मोठ्याने  विलाप करू लागली.तिने आपले कपाळ त्या पादुकांवर आपटून घेतले त्यातून रक्त येवू लागले.रात्र झाल्याने सर्व लोक आप आपल्या घरी गेले.रात्र वाढतच गेली.त्या मातेस सुद्धा थकल्यामुळे निद्रा  लागली. स्वप्नात गुरुदेव तिला म्हणाले “माते रडू नको तुझा मुलगा दीर्घायुषी आहे.”त्या वेळी तिला जाग आली. पाहते तो पुत्र झोपेतून जागे झाल्या प्रमाणे उठून बसला होता आणि पाणी मागू लागला. त्या मातेच्या आनंदाला पारावरच नव्हता पहाट  होताच गावातील लोक तेथे आले आणि सजीव पुत्रास पाहून आश्चर्यचकित झाले.त्या सर्वानी मिळून उच्च स्वरात गुरुदेवांचा जयजयकार केला. 

   ||इति श्री प.प.स.प.वा.स.सारे मृत पुत्र संजीवनम नाम २१ वा अध्याय ||श्लोक २३० 

---------------------------------------------------------------------------------------

                     अध्याय २२ वा वंध्या महिषी दोहनम  

नामधारक विप्राने सिद्धमुनिना विचारले गुरुदेवांनी श्री क्षेत्र  गाणगापूर येथे अनेक लीला केल्या असतील त्या मला ऐकण्याची  तीव्र  इच्छा आहे, आपण कृपा करून त्या सांगाव्यात गुरुदेव म्हणाले अरे नामधारका गाणगापूर क्षेत्री स्वामिनी इतक्या अदभूत ,अनाकलनीय आणि आश्चर्य कारक लीला केल्या कि माझ्यासारख्या    अज्ञानाला   त्यांचे संपूर्ण वर्णन करणे कठीणच आहे.ब्रम्हादि देव सुद्धा श्रीगुरूंचे चरित्र यथायोग्य वर्णन करण्यास कुंठीत होतात  तरी मी तुला त्यांच्या लीला संक्षेपाने सांगतो.अपरिमित कीर्ती असलेले स्वामी भीमा अमरजेच्या संगमावर वसलेल्या गाणगापूर क्षेत्री येऊन राहिले.ते एकदा भिक्षेसाठी एका विप्राच्या घरी गेले असताना त्या विप्राच्या  पत्नीने सांगितले पतीदेव बाहेर भिक्षेसाठी गेले आहेत ते येताच मी आपणास भिक्षा देते.गुरुदेवांनी अंगणात बांधलेल्या म्हशीकडे पाहून म्हटले “माते या म्हशीचे दुध काढून मला पिण्यास दे.ती विप्र पत्नी म्हणाली “ महाराज ही म्हैस वांझ आहे तिचे दुध कसे काढू? त्यावेळी गुरुदेव म्हणाले “घरातून भांडे तर घेऊन ये आणि दोहून दाखव” श्री गुरुदेवांवर नितांत श्रद्धा असलेल्या त्या विप्र पत्नीने भांडे आणून दोहण्यासाठी आचलाना हात लावला आणि काय आश्चर्य भांड्यात दुधाच्या धारा पडू लागल्या .दोन भांडी भरून दुध निघाले.एक पेलाभर दुध पिऊन संतुष्ट होऊन गुरुदेवांनी आशीर्वाद दिला ते म्हणाले “तुम्हास कधी कांही कमी पडणार नाही” यानंतर  गुरुदेव स्वस्थानी  निघून गेले.
||इति श्री प.प.वा.स.वि.स.सारे.वंध्या महिषी दोहनं  नाम २२वा अध्याय || श्लोक स.२३६ 




                  अध्याय २३ वा ब्रम्हराक्षस उद्धरण 

वांझ म्हशीने श्रीगुरुदेवांच्या कृपेने दोन भांडी भरून दुध दिले ही वार्ता कानो-कानी त्या नगरीच्या नृपापर्यंत गेली तो  गुरुदेवांचे महात्म्य जाणून घेवून त्यांना आपल्या नगरीत वास्तव्य करण्यास विनंती करण्यासाठी सर्व लवाजम्यासह गुरुदेवांकडे आला त्या नृपाचा भक्तीभाव पाहून गुरुदेव गाणगापुरी वास्तव्य करण्यास तयार झाले.त्या राजाने गुरुदेवांना एका सुंदर सजविलेल्या पालखीत बसवून मोठ्या थाटामाटात नगरात आणले.येत असताना मार्गात एक ब्रम्हराक्षस गुरुदेवांना शरण आला आणि त्याने राक्षस योनीतून मुक्तता करण्याची आर्त स्वरात प्रार्थना केली.गुरुदेवांनी त्याच्यावर कृपा द्रीष्टी टाकून म्हटले “अरे राक्षसा संगमात स्नान करून ये म्हणजे तू या योनीतून मुक्त होशील. गुरुदेवांच्या आदेशानुसार संगमात स्नान करून येताच तो राक्षस योनितुन मुक्त  झाला आणि गुरुदेवांची स्तोत्रे गावू लागला.त्या नगरीच्या नृपाने गुरुदेवांसाठी एक सुंदर मठ बांधून दिला.

  ||इति श्री प.प.वा.स.वि.स.सारे.ब्रह्राक्षस उद्धरण नाम २३ वा अध्याय ||श्लोक स.२४२ 



                      अध्याय २४  वा विश्व रूप दर्शन 

    
श्री गुरुदेवांच्या अगम्य आणि अनाकलनीय लीला पाहून सर्व लोक त्यांचे चरणी श्रद्धा भावाने नतमस्तक होऊ लागले.परंतु कुमशी नावाच्या एका गावात त्रिविक्रम नावाचा यती होता.तो मात्र स्वामींची निरंतर  निंदा करीत असे.एकदा श्रीगुरुदेव त्या नगरीच्या नृपाने  पाठविलेल्या सेनेसह कुमशी गावी जाण्यास निघाले. स्वामी येत असल्याचे त्रीविक्रमास ध्यानातच कळले. तो धावतच नदीचे किनारी आला. त्यावेळी त्याला सारे सैनिक आणि इतर लोक स्वामींच्या रुपातच दिसू लागले.ते आश्चर्य कारक दृश्य पाहून त्रीविक्रमाचा सारा अभिमान गळून गेला आणि त्याने स्वामींच्या चरणावर लोळण घेतली. स्वामिनी मोठ्या प्रेमभराने त्यास उठवून आपले निजरूप  दाखविले.नंतर तो गुरुदेवांचा एक प्रिय शिष्य बनला. तेथून स्वामी आपल्या लवाजम्यासह गाणगापुरी परतले.
|| इति श्री प.प.वा.स.वि.स.सारे.विश्वरूप दर्शन नाम २४ वा  अध्याय || श्लोक स.२४५ 

---------------------------------------------------------------------------------------



                       अध्याय २५ वा उन्मत्त द्विजाख्यान 

दोन मधांध ब्राम्हण म्लेछ राजाकडे येऊन वेद पठण करून त्याच्या कडून धन घेत असत. अतिधन आणि राज सन्मानाने  ते विप्र अहंकारी झाले होते.गावो-गावी जाऊन तेथील विप्राना वादात जिंकून विजय पत्र घेवून येण्याचा निश्चय त्यांनी  केला होता आणि यवन राजाने त्यांना परवानगी दिली.ते गावो-गावी फिरत फिरत कुमशी  गावी आले.तेथे त्यांनी त्रीविक्रमास वेद पंडित असल्याचे जाणून वाद करण्याचे आव्हान केले  आणि वाद करण्यास असमर्थ असल्यास हार मानून विजय पत्र लिहून द्यावे असे  सांगितले.  त्रीविक्रमाने त्या दोन उन्मत्त विप्राना  गुरुदेवाजवळ आणले आणि त्यांच्या आव्हानां बद्दल सांगितले. गुरुदेव म्हणाले “ अरे विप्रानो वेदाबद्दल जय-पराजय याचा वाद काय घालता? तुम्हाला आपल्या ज्ञानाच केवढा अभिमान केवढा अहंकार आहे? अहंकारामुळे कितीजण नामशेष झाले ते तुम्ही जाणत  नाही का? रावणासारखा महापराक्रमी राजा अभिमानामुळे रसातळाला गेला. कौरवांचा समूळ नाश  होण्यास अहंकारच कारणीभूत  झाला. हा वेडेपणा तुम्ही सोडून  निघून जा. 


   ||इति प.प.व.स.वि.स.सारे.उन्मत्त द्विजाख्यान २५ वा अध्याय || श्लोक स.२५५  



                        अध्याय २६ वा चतुर्वेद कथनम 

गुरुदेव त्या उन्मत्त विप्राना म्हणाले वेद केवळ म्हणण्यास सुद्धा ऋषींना अत्यंत  सायास होत असत कारण त्यांची व्याप्ती एवढी मोठी होती कि एका व्यक्तीस संपूर्ण आयुष्य घालविले तरी संपूर्ण वेदांचे ज्ञान होणे अशक्य  होते.यासाठीच महर्षी व्यासांनी वेदांचे चार भागात विभाजन करून एका एका शिष्याला एक एक वेद शिकविला पैल नावाच्या शिष्यास ऋग्वेद शिकविला वंशम्पायन या शिष्यास यजुर्वेद शिकविला सुमंत नावाच्या शिष्यास अथर्ववेद शिकविला आणि  जैमिनी नावाच्या शिष्यास सामवेद शिकविला.अशा प्रकारे वेदाची एक एक शाखा एका  एका  शिष्याने अभ्यासिल्या. असे असताना तुम्ही कोणत्या ज्ञानाचा अभिमान करता?  एवढे ऐकल्यावर सुद्धा ते उन्मत्त विप्र आपला हेका  सोडेनात. वाद करणार नसाल तर हार पत्र लिहून द्या असा ते दुराग्रह करू लागले.

  || इति श्री प.प.व.स.वि.स.सारे.चतुर्वेद कथनम नाम २६ वा अध्याय || श्लोक स. २७५ 

----------------------------------------------------------------------------------------                 

               अध्याय २७ वा- द्विज गर्व परिहार 

त्या हट्टी  ब्राम्हणांना धडा शिकविण्यासाठी श्रीगुरुदेवानि त्या विप्राचे म्हणणे मान्य केले.दूर अंतरावरून एक निम्न जातीचा पुरुष चालत जात होता.गुरुदेवांनी त्या पुरुषास बोलावून आणण्यास सांगितले. त्या प्रमाणे तो पुरुष गुरुदेवाजवळ आला आणि त्याने गुरुदेवांना नमस्कार केला.गुरुदेवांनी आपल्या शिश्याकरवी जमिनीवर सात रेषा काढून घेतल्या आणि त्या पुरुषास एक एक रेषा ओलांडण्यास सांगितली.पहिली रेषा ओलांडताच त्याला गत जन्माची स्मृती होऊन तो त्यातील घटना सांगू लागला.अशा प्रकारे सात रेषा ओलांडल्यावर त्याला सात जन्मांची स्मृती  झाली. त्यावेळी गुरुदेवांनी त्यास  म्हटले “ या विप्राना वादात परास्त कर.” गुरुदेवांच्या आदेशानुसार तो त्या मदांध विप्रबरोबर वाद करण्यास सज्ज झाला.त्याला पाहताच त्या दोन्ही विप्राना  मूढता प्राप्त झाली आणि त्यांचा सर्व अभिमान नष्ट झाला.ते गुरुदेवांच्या चरणी नतमस्तक झाले.गुरुदेवांना  त्यांच्या गर्वपूर्ण वर्तनाने क्रोध आला होता.त्यांनी “ ब्रम्हराक्षस व्हा” असा शाप त्या मदांध विप्राना दिला.त्यावेळी त्या विप्रानि अत्यंत दिनवाणीने गुरुदेवांची क्षमा मागितली. तेंव्हा गुरुदेव म्हणाले “ बारा वर्षानंतर तुम्हास पूर्वीचा जन्म प्राप्त होईल “ असा उशाप घेऊन ते सगमावर स्नानास गेले. स्नान करताच ते ब्रम्हराक्षस झाले. 

  || इति श्री प.प.वा.स.वि.स.सारे.द्विज गर्व परीहारो नाम २७ वा अध्याय ||श्लोक स.३०४     

---------------------------------------------------------------------------------------

                      अध्याय २८ वा –कर्मविपाक कथनम 

ते मदांध विप्र ब्रम्हराक्षस योनीत बारा वर्षापर्यंत राहिल्यानंतर गुरुकृपेने पुनरपी ब्राम्हण त्वास प्राप्त झाले. तो निम्न जातीचा पुरुष गुरुदेवांना म्हणाला मी ब्राम्हण असताना अंत्यज जातीमध्ये कसा जन्मलो? गुरुदेव सांगू लागले १)जो आपल्या धर्माचा त्याग करतो २) माता,पिता देव,गुरु,आणि निर्दोष स्त्री,पुत्रांचा त्याग करतो ३)जो चोर असून असत्यवादि  असतो. ४) जो निरंतर अशुध्द व्यवहार करून भगवान विष्णू आणि भगवान शंकर याच्या मध्ये भेदभाव करतो ५) जो निर्दोष प्राण्यास क्रुरतेने मारून टाकतो ६) जो पंक्ती भेद करतो.जो लोकांची घरे जाळून टाकतो ७)जो आपल्या कन्येचा विक्रय करतो.८) श्राद्ध कर्माची जो निंदा करतो.९) ज्या गोष्टी संध्या समयी वर्ज्य आहेत त्याच जो करतो. १०)लोकांचा विश्वासघात  जो करतो. ११) गुरु आणि पित्याबरोबर जो वितंड वाद करतो  हे सर्व ब्रम्हराक्षस योनीस प्राप्त होतात. जे चोरीने धन कमावतात ते उंटाच्या योनिस प्राप्त होतात. या योनिनंतर भयंकर अशा नरक यातना भोगाव्या लागतात.यानंतर नीच योनीत  माशी,उंदीर,जलचर, चातक,पशु, अशा अनेक योनीतून दुर्गती भोगून ज्यावेळी पाप आणि पुण्य समान होते त्यावेळी पुनरपी मनुष्य जन्म प्राप्त होतो. त्रीविक्रमाने  पापांचे क्षालन कसे करावे असा प्रश्न  गुरुदेवांना  विचारला त्यावेळी  गुरुदेव म्हणाले दान धर्म करावा, शक्तीहीनास गोधनाचे दान द्यावे. जप,यात्रा,होम करावे.शक्ती असणाऱ्यांनी चांद्रयान व्रत करावे.गव्याचे  प्राशन  करावे.श्रीगुरुना शरण जावे ते आपल्या शिष्यांची पापे क्षालन करतात. हे वक्तव्य ऐकून तो निम्न जातीचा पुरुष गुरुदेवांना म्हणाला मी आता पावन झालो मला आपल्या विप्रामध्ये मिसळून घ्या.ते ऐकून गुरुदेव म्हणाले “विश्वामित्रासारखा नृप अत्यंत कठीण तप केल्यानंतर पवित्र होऊन ब्राम्हणत्वास प्राप्त झाला.तू अत्यंत हीन कुलात जन्मास आल्यामुळे तुला इतक्या  लवकर ब्राम्हण होता येणार नाही.तितक्यात त्या पुरुषाची पत्नी आणि मुले तेथे आली ती जवळ येताच तो त्यांना दूर जा  मला शिवू नका असे म्हणू लागला.  त्यावेळी गुरुदेव म्हणाले आपल्या पत्नी,मुलाचा त्याग करू नये.त्यांनी आपला शिष्य लुब्धास  सांगितले कि त्या पतीताच्या अंगाला जी विभूती लावली आहे ती धुवून टाक. लुब्धाने तसे करताच त्या पतीताचे सर्व ज्ञान विभूती बरोबर निघून गेले आणि त्यास पूर्वीची भ्रांती प्राप्त झाली.तो आपली पत्नी आणि मुलासह घरी निघून गेला.             


  ||इति श्री प.प.वा.स.वि.स.सारे.कर्मविपाक कथन नाम अध्याय २८ वा ||श्लोक स.

----------------------------------------------------------------------------------------            अध्याय २९ वा भस्म महिमा वर्णन

त्रीविक्रमाने गुरुदेवांना प्रश्न केला “ गुरुदेव त्या पतित पुरुषाची  विभूती धुवून टाकताच त्याचे सर्व ज्ञान निघून जाऊन तो पूर्वीप्रमाणे होऊन आपल्या पत्नी मुलासह निघून गेला आणि पूर्वी प्रमाणे अज्ञानी झाला हे कसे काय झाले?  त्यावेळी गुरुदेव म्हणाले त्या विभूतीच्या विलेपनाने त्या पतितास ज्ञान प्राप्त झाले होते.ती धुवून टाकताच त्याचे ज्ञान निघून गेले आणि तो पूर्वी सारखा  अज्ञानी  झाला.गुरुदेव पुढे म्हणाले “ भस्माचे महात्म्य सांगणारी एक कथा सांगतो ती तू एक एकदा वामदेव क्रौंच वनातून जात असताना अचानक एक राक्षस धावत धावत त्यांच्यावर चाल करून आला आणि वामदेवाच्या अंगास भिडला. वामदेवांनी अंगास  लावलेले भस्म त्या राक्षसाच्या अंगास लागताच एक महान आश्चर्य घडले.तो क्रूर राक्षस एकदम शांत झाला.त्याला पूर्वीच्या पंचवीस जन्मांची स्मृती झाली तो वामदेवाना  सांगू लागला “महाराज मी एका जन्मात एक महापराक्रमी राजा होतो.त्यावेळी मी स्त्रियांवर फार अन्याय केला.त्यांना माझी भोग सामुग्री बनविली. त्यांनी मला नको नको ते शाप दिले.माझ्या मृत्यू नंतर यामदूतांनी मला नरकात टाकले. तेथे शिक्षा भोगून मी ब्रम्हराक्षसाच्या योनिस प्राप्त झालो.या योनीमध्ये वनोवनी फिरत मी अनेक पशु मारून खाल्ले.परंतु माझ्या पोटातील भुकेची आग कशानेच कमी झाली नाही परंतु आज तुमच्या स्पर्शाने माझी भूक शांत झाली.आपण प्रत्यक्ष देव आहात. वामदेव त्या राक्षसास म्हणाले हा सर्व भस्माचा परिणाम आहे.त्यानेच तुझी शुद्धी झाली आणि भूक हि शांत झाली. भस्ममहिमा सांगणारी एक घटना वामदेवानी त्या राक्षसास सांगितली. एकदा एका शूद्राने द्रविड ब्राम्हणास मारून त्याचा मृत देह रानात फेकून दिला.एक कुत्रे त्या मृत देहाजवळ आले आणि त्या देहाचा त्याने वास घेतला त्यावेळी त्या मृत ब्राम्हणाच्या कपाळावरील भस्म त्या कुत्र्याच्या ललाटावर लागले.योगायोगाने त्या कुत्र्यास त्याच दिवशी मृत्यू आला तेव्हा त्याला नेण्यास शिवदूत  आले.त्याला लागलेल्या त्या भस्माच्या प्रभावाने ते श्वान शिवदुताबरोबर कैलासात गेले..वामदेवांचे ते वक्तव्य ऐकल्यावर तो राक्षस पुढे म्हणाला मी राजा असताना कांही चांगली कामे केली होती ब्राम्हणांना दान दिले होते.जनतेसाठी निर्जल स्थानी विहिरी खोदाविल्या होत्या आणि पाण्याची सोय केली होती या सत्कर्माचे फळस्वरूपच  आपली भेट होऊन माझी या नीच योनीतून मुक्ततता झाली.
वामदेव  पुढे म्हणाले एकदा कैलासात सर्व देव,ऋषी,मुनी आदी जमले असताना त्या सभेमध्ये सनत  कुमारांनी भगवान शंकरांना प्रश्न विचारला “ हे देवाधिदेव महादेव, असा कोणता अगदी सोपा उपाय आहे ज्याच्या योगाने मनुष्य प्राणी या भवसागरातून सुगमतेने  तरून जाईल आणि आपल्या चरणी येतील.महादेव म्हणाले जे साधक,मनुष्य प्राणी आपल्या कपाळी  भस्म धारण करतील ते आपल्या मृत्यूनंतर शिवलोकी येतील. हे अत्यंत सुगम असे साधन आहे. गोमयाच्या अग्निहोत्रातून भस्म घेवून त्याने मध्य अन्गुलीने त्रिपुंड ( तीन रेषा) काढाव्यात. अशी कथा वामदेवानी त्या राक्षसास सांगितली आणि स्वतः  त्या राक्षसाच्या कपाळावर त्रिपुंड काढले.त्या भस्म धारण केल्याने तो राक्षस उद्धरून गेला.श्री गुरुदेवांचे वक्तव्य ऐकून सारे शिष्य आनंदित झाले. 
      || इति श्री प.प.वा.स.वि.स.सारे. भस्म महिमा वर्णन नाम २९ वा अध्याय || श्लोक स.३२९ 




               अध्याय ३० वा प्रेतांगना शोको 

श्री दत्तगुरूंचे जन्मस्थान असलेल्या माहूर गावी गोपीनाथ नावाचे एक सच्छील, आचार संपन्न ब्राम्हण रहात होते. .दैव गती अशी विचित्र कि त्यांना अनेक अपत्ये झाली परंतु त्यापैकी एकच पुत्र जीवित राहिला. तो मोठा झाला विद्यासंपन्न झाला.यथाकाळी त्याचा विवाह एका सुंदर,सुशील कन्येबरोबर झाला. वधू -वराचा जोडा लक्ष्मी नारायण सारखा होता.पत्नी पतिव्रता होती.पुत्राचा संसार पाहून माता,पित्यास कृत-कृत्य झाल्यासारखे वाटे. परंतु हा आनंद फारच अल्पकाळ टिकला.त्या विप्रपुत्रास असाध्य असा क्षय रोग झाला सर्व प्रकारची औषधे घेतली परंतु त्याचा परिणाम झाला नाही.तो विप्र पुत्र दिवसेंदिवस क्षीण होत चालला होता,शेवटचा उपाय म्हणून त्या विप्राच्या सुनेने आपल्या पतीस गाणगापुरी घेवून जाण्याची परवानगी आपल्या सासू-सासऱ्या कडून मिळविली. डोलीत बसून गाणगापुरी जात असतानाच त्या विप्रपुत्राचे देहावसान झाले.ती सती अत्यंत दुखी झाली  आणि विलाप करू लागली. त्याच वेळी गुरुदेव एका ब्रह्मचार्याचे रूप घेवून तेथे आले.ते त्या विप्र पत्नीस समजावण्याच्या सुरात म्हणाले “ बालिके, तू असा विलाप केल्याने या मृत शरीरात जीव येणार आहे काय? हे सर्व मायामय संबंध आहेत.व्यर्थच तू त्याला आपला पती मानून तो देवाघरी गेला म्हणून शोक करीत आहेस.प्रत्यक्ष देव सुद्धा काळाचे आधीन आहेत तेंव्हा मर्त्य प्राण्याची काय कथा? कोण जन्मला आणि कोण निवर्तला?हा जन्मणारा मरणारा  देह आहे आत्मा तर अमर आहे.हा देह म्हणजे तुझा पती नव्हे.त्यातील चेतन स्वरूप आत्मा हाच खरा पती तो तर कधी मरतच नाही.त्याला अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू  शकत नाही वारा सुकवू शकत नाही तो सनातन आहे.असे असताना तू या नश्वर देहासाठी शोक करणे योग्य नाही.नदीच्या वाहत्या प्रवाहात लाकडाचे दोन ओंडके जवळ येतात, कांही काळ एकमेका बरोबर वाहतात परंतु एखादी मोठी लाट येते आणि त्यांना विभक्त करते ते पुन्हा कधीच भेटत नाहीत.अगदी असेच मानवाचे जीवन आहे.कर्म योगाने देह संबंध जुळतात कांही काळ राहतात आणि दैवयोगाने वेग वेगळे होतात. अज्ञानामुळे आपण देहालाच आत्मा मानतो आणि देहाचा विनाश झाला असता अविनाशी आत्म्याचाच मृत्यू झाला असल्या प्रमाणे शोक करतो.त्या ब्रम्हचाऱ्याचे वक्तव्य ऐकून ती विप्रपत्नी म्हणाली आपणच मला शोक सागरातून बाहेर काढावे  ||इति श्री प.प.वि.स.वा.स.वि.स.सारे. प्रेतांगना शोको नाम ३० वा अध्याय || श्लोक स.३४९      


---------------------------------------------------------------------------------------

                   अध्याय ३१ वा   पतिव्रता धर्म निरुपण 


ब्रहस्पती ऋषींनी अगस्ती मुनिना लोपमुद्रेच्या पातिव्रत्याबद्दल माहिती सांगितली होती तीच गुरुदेवांनी त्या विप्रपत्नीस सांगितली. ते म्हणाले “ हे बालिके, लोपमुद्रा पतीदेवासमवेत छाये प्रमाणे असे. ती काया,वाचा,मनोभावे पतीची सेवा करण्यात सदैव तत्पर असे.पतीदेव पहाटे उठण्यापूर्वी उठून स्नान आदी कर्मानी शुद्ध होत असे.रात्री पती झोपल्यानंतर स्वत झोपत असे.पतीसमोर कधीही बसत नसे.ती कामाशिवाय बाहेर जात नसे.ती अगदी सम्यक आहार घेत असे.ती पतीवचनास सदैव सादर असे.ती पतीदेवास निरंतर अनुकूल असे. .दैवायोगाने लाभलेल्या वस्त्र,आभूषणे,अलंकार यामध्येच आनंदाने राही.कधीही कोणावर क्रोध करीत नसे.ती आपला धर्म देह लोभाने कधीही सोडीत नसे.आपल्या धर्मआचरणात ती शोभून दिसत असे.ती घरातील सर्व वडीलधारी व्यक्तीना योग्य सन्मानाने मान देवून वर्तन करीत असे.पतिव्रतेचे वर्णन करताना सिद्धमुनी  पुढे म्हणाले ज्या स्त्रिया पती,गुरु,यांच्या बरोबर वाद-विवाद,भांडण करतात त्या पुढील जन्मात श्वान योनीस प्राप्त होतात.तसेच ज्या स्त्रिया पतीस न देता मिष्टान्ने, उत्तम वस्तू स्वत एकट्याच ग्रहण करतात त्यांना अत्यंत निम्न  अशा वटवागुळाच्या योनीत जन्म घ्यावा लागतो.धर्माचे पालन करीत असताना दैवयोगाने पतीचे देहावसान झाल्यास पतीबरोबर सती जावे.     
|| इति श्री प..वि.स.वा.स.सारे पतिव्रताधर्म निरुपण  नाम ३१ वा अध्याय || श्लोक स, ३५९  


                        अध्याय ३२  वा प्रेत संजीवन नाम  

गुरुदेव पुढे सांगू लागले “ पती निधनानंतर परतंत्र न राहता पतीसमवेत सती जाउन  पदोपदी यज्ञाचे फळ घ्यावे  पतीलोकी आपले एक स्थान घ्यावे.सती जाणे परिस्थितीवश शक्य नसल्यास विधवा धर्माचे योग्य प्रकारे पालन केले असता सुद्धा सुख मिळू शकते मुल लहान असल्यास अथवा शिशु गर्भस्थ असल्यास अथवा पतीचा मृत देह न मिळाल्यास सती जाण्याची शास्त्रानुसार गरज नाही पतीनिधनानंतर केशवपन करावे. असे न केल्यास पतीस दुर्गती प्राप्त होते .पती निधनानंतर जी स्त्री पलंगावर शयन करते तिला नरकात जावे लागते, या कारणाने भूमीवर शयन करावे.तिने दाग दागिने उंची वस्त्रे तांबूल सेवन याचा त्याग करावा शुभ्र वस्त्र परिधान करून आपल्या शिलत्वाचे रक्षण करावे.मंगल स्नान वर्जावे भगवान श्री विष्णूस पती समान मानून आपल्या वैधव्य धर्माचे पालन करावे.अशा प्रकारे जी विधवा स्त्री आचरण  करील तिला सहगमन केल्याचे फळ मिळेल,ती आपल्या अशा शास्त्रशुद्ध वर्तनाने आपल्या पतीस स्वर्गात घेऊन जाईल 
हे वक्तव्य ऐकून ती विप्र पत्नी म्हणाली वैधव्यपूर्ण जीवन जगणे मला आवडत नाही माझे तारुण्य विषाप्रमाणे आहे असे मला वाटते त्यामुळे मी सती जाण्याचा निश्चय केला आहे.तो ब्रम्हचारी म्हणाला अवश्य आणि त्याने सतीला चार रुद्राक्ष दिले आणि भस्म देऊन म्हटले हे तुझ्या पतीच्या कपाळास  लावून दोन दोन रुद्राक्ष  कानास बांधून गुरुदर्शन घेऊनच नंतर सहगमन करावे.असे सांगून तो ब्रम्हचारी निघून गेला.त्या साध्वीने दान करून पतिच्या  मृत देहास रुद्राक्ष बांधले. लोकांनी त्या मृत देहास उचलले तेंव्हा ती विप्र पत्नी अग्नी घेउन  पुढे चालत होती ते अंतकरण विदारक दृश्य पाहून लोक हळहळत होते.मंद गतीने ती त्या मृत देहासह स्मशान भूमीत पोहोचली . त्यावेळी तिला त्या ब्रम्ह्चार्याच्या आदेशाची आठवण झाली. अग्नी जमिनीवर ठेवून ती गुरुदेवांच्या दर्शनास गेली.अनेक लोक कुजबुज करीत त्या स्त्रीच्या मागे गेले.ती मार्गात सतत गुरुदेवांचे स्तवन करीत होती, गुरुदेवांना पाहताच तिने साष्टांग नमस्कार केला. तेंव्हा गुरुदेवानि  तिला पंच पुत्र सौभाग्यवतीभव असा शुभ आशीर्वाद दिला. तो ऐकताच आलेल्या लोकांनी गुरुदेवांना सांगितले कि तिचा पती मृत झाला असून ती पतीसह सती जाण्यास सिद्ध झाली आहे.ते ऐकून गुरुदेव म्हणाले त्या मृत देहास येथे घेऊन या. गुरु आदेशा  नुसार लोकांनी त्या देहास गुरुदेवासमोर आणून ठेवले. गुरुदेवांनी त्यावर रुद्र तीर्थाचे स्नपन केले आणि आश्चर्य असे कि तो विप्र पुत्र झोपेतून जागे व्हावे त्या प्रमाणे उठून बसला.  परंतु अंगावर वस्त्र नसल्याने लाजला.त्याला जीवित पाहून सर्व  लोकांना अत्यंत आनंद झाला.त्यापत्नीचा आनंद तर गगनात मावत नव्हता.एखाद्या रंकाला सुवर्णाने भरलेला कलश मिळावा तसे तिला झाले. त्या उभयतांनी श्रीगुरुदेवांचे अत्यंत श्रद्धाभावाने स्तवन केले.गुरुदेवांनी तिला वर दिला ज्याच्या योगाने सारे दोष मिटून जाउन  सद्गती प्राप्त झाली,ज्या प्रमाणे परिसाचा स्पर्श होताच लोखंडाचे रुपांतर सुवर्णामध्ये होते.   .गुरुदेव म्हणाले “पुढील शंभर वर्षाचा विधिलेख आम्ही तुला मागून दिला आहे.आता तुम्ही सौख्यभरे नांदा.तेथे जमलेल्या सर्व लोकांनी उच्च स्वरात गुरुदेवांचा जय-जयकार केला.त्या दम्पतीने मोठ्या आनंदाने संगमावर जाउन  मंगल स्नान केले आणि मठात गुरुदेवांकडे आले.
||इति श्री प.प.वा.स.वि.स.सारे.प्रेत संजीवन नाम अध्याय ३२ वा ||श्लोक स.
             

               

               अध्याय ३३ वा रुद्राक्ष महिमा वर्णन



गुरुदेवांच्या चरणी नतमस्तक होऊन त्या पतीव्रतेने विचारले “ गुरुदेव काल lएक मुनी आले होते त्यांनी मला उत्तम उपदेश करून सांगितले कि पतीच्या कानांना दोन दोन रुद्राक्ष बांधून कपाळावर भस्म लेपन कर. ते मुनी कोण होते? गुरुदेवांनी स्मित हास्य केले आणि म्हणाले आम्हीच रूप बदलून तुझी पतिनिष्ठा,पतिप्रेम पहावयास आलो होतो. रुद्राक्ष  आम्हीच दिले होते.रुद्रतीर्थाने तुझ्या पतीचे प्राण वाचविले.रुद्राक्षाचे  महात्म्य सांगणारी एक कथा गुरुदेवांनी सांगितली. पूर्वीच्या काळी काश्मीर देशाच्या राजाचा कुमार आणि प्रधानाचा कुमार आपली उंची वस्त्रे काढून टाकून अंगास भस्म लेपन करीत आणि रुद्राक्ष धारण करीत.एकदा पराशर मुनी राजाच्या दरबारी आले.राजाने मुनिना या दोन कुमाराबद्दल विचारले. पराशर मुनी राजास म्हणाले “महाराजा, हे दोघे कुमार शिवभक्त आहेत त्यांची रोमहर्षक कथा ऐक.नंदीग्राम नावाच्या गावात महानंदा नावाची एक सच्छील वेश्या राहत होती.ती भगवान शिवाची एक महान भक्त होती.एकदा भगवान शंकर तिची परिक्षा घेण्याच्या उद्देशाने एका वैश्याचे रूप घेउन  आले.त्यांनी महानंदेस आपल्या हातातील दिव्य कंकण काढून दिले. त्याचा स्वीकार करून ती म्हणाली “मी तीन दिवसासाठी तुमची अनन्य झाले.नंतर त्या वैश्याने त्याच्याकडील एक दिव्य लिंग दाखवून म्हटले हे सुरक्षित ठेव. जर हे फुटले अथवा दग्ध झाले तर मी माझे प्राण देईन  त्याचे ते वचन ऐकून महानंदेने ते लिंग आपल्या नृत्य शाळेत सुरक्षित ठेवले.दैवयोगाने त्या नृत्य शाळेस आग लागली आणि त्यातील ते दिव्य लिंग जळून खाक झाले.त्या वैश्याने आपल्या वचनानुसार अग्नी पेटवून त्यात प्रवेश केला.या प्रसंगाने अति दुखी होऊन महानंदेने आपले संपूर्ण धन,दागिने,घर सर्व कांही ब्राम्हणांना दान देवून टाकले. स्नान पूजा आदि करून शुचिर्भूत होऊन अग्नी पेटवून त्या -धगधगत्या चीतेमध्ये “ ओम नमोशिवाय “ असे म्हणून तिने उडी टाकली. त्याच क्षणी भगवान शंकर तेथे प्रकट झाले आणि त्यांनी महानंदेला वरच्यावर झेलून घेतले.आणि प्रसन्न होऊन वर मागण्यास सांगितले. तिने संपूर्ण नंदीग्रामच्या  लोकांना शिवलोकी स्थान द्यावे असा वर मागून घेतला.त्या नुसार त्या गावातील नर नारी मुले वायुयानात बसून शिवलोकी गेले. महानंदेने आवडीने एक कुक्कट   आणि एक मर्कट पाळले होते.प्रेमाने तिने त्यांच्या गळ्यात रुद्राक्षाचि माला  घातली होती.ती ज्यावेळी  शिवपुराण, शिवलीलामृत या ग्रंथांचे पारायण करीत असे त्यावेळी हे दोघे मोठ्या श्रद्धाभावाने  ते श्रवण करीत ज्यावेळी नृत्य शाळेस अग्नी लागला त्या वेळी हे कुक्कट  मर्कट  वनात पळून गेले होते. त्यांच्या या पुण्याईने त्यांना पुढचा जन्म राजकुमार आणि प्रधानकुमारचा जन्म मिळाला.
||इति श्री प.प.वा.स. वि..स.सारे. रुद्राक्ष महिमा वर्णन नाम ३३वा अध्याय ||श्लोक स. ३९३ 

--------------------------------------------------------------------------------------- 


        अध्याय ३४ वा रुद्राभिषेक फळ आणि  देवयानी आख्यान कथन 


मुनीच्या मुखातून आपल्या पुत्राचे आणि प्रधानाच्या पुत्राचे पूर्व जन्मीचे रहस्य ऐकल्यानंतर त्या नृपाने पराशर मुनिना विचारले “ मुनिवर माझ्या पुत्राचे भविष्य सांगा. हा किती वर्षे राज्य करेल? मुनी म्हणाले “ हे नृपा मी सत्य सांगेन परंतु तुम्हास दुखः होईल”  नृप म्हणाला “आपण निसंकोचपणे सर्व सांगावे.” मुनी म्हणाले आजपासून आठवे दिवशी याला मृत्यू येईल.ती भविष्य वाणी ऐकून राजा मूर्च्छित झाला नंतर शुद्धीवर आल्यानंतर त्याने मुनिवराना या संकटापासून रक्षण करण्याचा उपाय विचारला. मुनिवर म्हणाले “राजा तू घाबरू नकोस आपण विद्वान ब्राम्हणा करवी महादेवास रुद्राभिषेक  आणि मृत्युन्जय जपाचे अनुष्ठान करवून  घेवू.राजाने पराशर मुनिनाच यज्ञाचे  अधिपत्य करण्याची विनंती केली आणि सहस्त्र श्रद्धावान विप्राद्वारे रुद्राभिषेक आरंभ केला. सातवे दिवशी राजकुमार मृत्यू मुखी पडला. त्यावेळी मुनिवारांनी त्या रुद्रतीर्थाचे कुमारवर प्रोक्षण केले.त्यावेळी शिवदूत आले आणि त्यांनी यमदूताना पळवून लावले. राजकुमार झोपेतून जागे झाल्या प्रमाणे उठून बसला. राजाचा आनंद गगनात मावत नव्हता, त्याने विप्राना भरपूर दान देउन  संतुष्ट केले.यमदुतानी घडलेला वृतांत यम धर्मराजास सांगितला.  यमाने शिवास याबद्दल विचारले त्यांनी चीत्रगुप्ताचा लेख पाहिला त्यावेळी त्यात राजकुमारास दहा सहस्त्र वर्षे आयुष्य असल्याचे लिहिले होते.ते पाहून यम शिवाची क्षमा मागून निघून गेला हे सर्व रुद्राभिशेकाचेच फळ होते.    
गुरुदेवांच्या मुखातून रुद्राक्ष महिमा वर्णन करणारी कथा ऐकल्यावर त्या विप्र पत्नीने गुरुदेवांना आपणास गुरु मंत्र देण्याची विनंती केली.त्यावेळी गुरुदेव म्हणाले “स्त्रियां गुरुमंत्र घेण्यास पात्र नसतात. त्यांचा पतिसेवा हाच मुख्य धर्म असून त्यानेच त्याना सर्व फलप्राप्ती होते.या संदर्भात गुरुदेवांनी  देवयानीचे आख्यान सांगितले.  देव आणि दैत्य  यामध्ये नेहमी युद्ध होत असे.दैत्यांचे गुरु शुक्राचार्य यांना संजीवनि  विद्या येत असल्याने ते युद्धात मारली गेलेली दैत्य सेना पुनरपी जिवंत करीत. यामुळे देवांची संख्या कमी होऊ लागली परंतु दैत्यांची सेना मात्र अबाधितच राही. संजीवनी विद्येची प्राप्ती  करून घेण्यासाठी इंद्राचा मुलगा कच यास देवांनी शुक्राचार्याकडे पाठविले.शुक्राचार्याच्या अन्य शिष्यांना कच आवडत नसे.त्यांनी कचाला  मारण्याचे अनेक प्रयत्न केले.परंतु कचावर शुक्राचार्याची  कन्या देवयानी अनुरक्त होती.तिने त्याला प्रत्येक वेळी पित्याच्या मंत्रशक्तीने जीवित केले होते.शेवटी अगदी शेवटचा उपाय म्हणून दैत्यांनी कचास जाळून टाकले आणि त्याची राख मद्यात मिसळून ते मद्य शुक्राचार्यांना पाजविले. कच न दिसल्याने देवयानी अत्यंत दुखी झाली. तिने आपल्या पित्यास कच कोठे आहे ते अंतरदृष्टीने पाहण्याची  विनंती केली.शुक्राचार्यांना कच आपल्या पोटात असल्याचे जाणवले. कचास  जीवित केल्यास आपले पोट फुटून मृत्यू होईल असे पित्याने देवयानिस सांगितले.तरी त्या प्रेमवेड्या कन्येने कचास जिवंत न केल्यास आपण देहत्याग करणार असा दृढ संकल्प केला.ती पित्यास म्हणाली “ पिताश्री मला संजीवनी मंत्र शिकवा म्हणजे कच तुमच्या पोटातून बाहेर येताच मी तुम्हास संजीवनी मंत्राने जीवित करीन” कन्येच्या हट्टामुळे संजीवनी मंत्र शुक्राचार्यांनी देवयानीला शिकविला आणि कचास  जीवित पोटातून बाहेर काढले. देवायानीने आपल्या मृत पित्यास मंत्राच्या सहाय्याने पुन्हा जीवित केले.या वेळी तो मंत्र कचास कळला, त्याने तो ऐकला त्यामुळे त्या मंत्रास हीनता प्राप्त झाली.कचाने आपला उद्देश पूर्ण केला असल्याने त्याने परत घरी जाण्याची अनुज्ञा गुरुदेवांकडे मागितली देवयानीने  कचाबरोबर विवाह करण्याचा मानस दर्शविला त्यावेळी कच म्हणाला आपण दोघे बंधू भगिनी प्रमाणे आहोत कारण आपणास जन्म देणारे पिता एकच आहेत.देवयानीच्या सर्व प्रयत्नावर पाणी फिरल्याने तिने कचास शाप दिला ती म्हणाली “ कचा तू सारी विद्या विसरून जाशील” कचाने सुद्धा देवयानीस शाप दिला. तो म्हणाला “ तुला विप्र पती मिळणार नाही.कालांतराने देवयांनीचा विवाह क्षत्रिय राजा ययाती बरोबर झाला.अशा प्रकारे शुक्राचार्यांनी कन्येला दिलेला मंत्र भ्रष्ट झाला.आणि दोघांची हानी झाली.या कारणाने स्त्रियांनी व्रतोपासना करावी असे गुरुदेवांनी सांगितले.
|| इति श्री प.प.वा.स.वि.स.सारे. देवयानी आख्यान नाम अध्याय ३४ वा ||श्लोक स. ४०२   

---------------------------------------------------------------------------------------

                   अध्याय ३५ वा सीमंतिनी आख्यान 

देवयानीची कथा ऐकल्यानंतर ती विप्रपत्नी गुरुदेवांना म्हणाली “आपण मला एक व्रत सांगावे.गुरुदेवांनी तिला सोमव्रत  सांगितले. या व्रताचे महात्म्य सांगणारी एक कथा गुरुदेवांनी सांगितली ते म्हणाले “ बालिके हे व्रत यथासाग आणि श्रद्धा भावाने केले असता सर्व कार्ये सिद्धीस जातात.आर्यवर्ता मध्ये चित्रवर्मा नावाचा एक पराक्रमी राजा राजा राज्य करीत होता.त्याला सीमंतिनी नावाची एक सुंदर,सुशील सदगुणी कन्या होती.एका भविष्य वक्त्याने राजास  सांगितले होते की  चौदा वर्षे पूर्ण होताच तिला वैधव्य प्राप्त होईल. हे संकट निवारण करण्यासाठी तिने मैत्रेयेची प्रार्थना केली तिने सीमंतिनीला सोमवार व्रत करण्यास सांगितले.प्रत्येक सोमवारी भगवान शिवांचे पूजन करून उपोषण करावे अथवा नक्तभोजन करावे.या व्रताच्या योगाने सर्व संकटांचा नाश होतो, सौभाग्य,पुत्र,आणि राज्य प्राप्ती भगवान शिव यांच्या कृपाप्रसादाने त्वरित होते.सिमन्तिनीने हे वत मोठ्या श्रद्धा भावाने करण्यास प्रारंभ केला.याथासामयी चीत्रवर्मा राजाने आपली कन्या चित्रांगद नावाच्या राजकुमारास देवून त्यांचा विवाह मोठ्या  थाटात संपन्न केला. जावायास आपल्याच घरी ठेवून घेतले.दैवयोगाने चित्रांगद एके दिवशी यमुनेत स्नान करीत असताना पाण्यात बुडाला.पती पाण्यात बुडालेला पाहून सिमन्तिनीने अत्यंत दुखी होऊन देह त्याग करण्याचा निश्चय केला.परंतु राजाने तिला तसे करू दिले नाही.तिने सोमव्रत मात्र अव्याहत चालू ठेवले.काळाची गती कोणालाच सांगता येत नाही.पुत्रशोकाने विव्हल अशा चीत्रांगदाच्या पित्यास शत्रू राजाने कैद करून त्याचे राज्य घेतले.पाण्यात बुडालेल्या चीत्रागदास नागांनी पाताल  लोकात नेले.वासुकी  नागाने त्यास जीवित केले.चीत्रांगदाने घडलेली सारी घटना त्या नागराजास सांगितली त्या सर्पराजाने राजपुत्रास तुमचे दैवत कोणते असा प्रश्न केला. त्यावेळी राजपुत्राने भगवान शिव शंकर असे सांगितले.वासुकीने प्रसन्न होऊन त्यांच्याकडे थोडे दिवस राहण्याचा आग्रह केला.परंतु राजपुत्राने आपली माता,पिता पत्नी अत्यंत आतुरतेने प्रतिक्षा करीत असल्याचे सांगितले आणि लवकर पाठविण्याची विनंती केली वासुकीने त्याला वर पाठविण्याची व्यवस्था केली.चित्रांगद सर्पाच्या मदतीने यमुना तीरी आला.त्यावेळी सीमंतिनी नदीवर आली होती. ती चीत्रागदाला पाहून आश्चर्यचकीत झाली.हाच आपला पती आहेना या विचारात असतानाच चित्रांगद तिच्या समोर उभा राहिला.आणि तिला सीमंतिनी बद्दलच विचारू लागला त्यावेळी सिमन्तिनीच्या दासींनी घडलेली  घटना सविस्तर सांगितली. त्यावेळी तो म्हणाला सिमन्तिनीचा पती भगवान शिवाच्या कृपेने लवकरच भेटेल.नंतर त्याने आपल्या राज्यात जाउन  माता,पित्याची शत्रूच्या कैदेतून सुटका केली.राज्य परत मिळविले  आणि सिमन्तनीस मोठ्या थाटाने आपल्या राज्यात घेउन  गेला.हे सर्व सोमव्रताच्या प्रभावाने घडले.गुरुदेव म्हणाले हे सावित्री हे व्रत तू श्रद्धा, भक्तीभावाने कर.जसा आपला भाव असेल तसे आपणास फळ मिळेल 

||इति श्री प.प.वा.स.वि.स.सारे.सीमंतिनी आख्यान कथन नाम  अध्याय ३५ वा ||श्लोक स.४३७   


               अध्याय -३६ वा आन्हिक कर्म निरुपण 

गाणगापुरी एक गरीब ब्राम्हण राहत होता.तो अत्यंत श्रद्धाभावाने पूजा पाठ आन्हिक करीत असे.त्याची पत्नी विवेक शून्य होती. त्या विप्राने परान्न ग्रहण न करण्याचा संकल्प केला होता.तो पौरहित्य करून आपली उपजीविका चालवीत असे.त्या गावात एक महाजन आला होता. तो दाम्पत्यांना उत्तम भोजन देउन  चांगली दक्षिणा सुद्धा देत असे.त्या विप्रपत्नीने ही  वार्ता ऐकली परंतु आपला पती परान्न घेणार नाही या विचाराने ती अत्यंत दुखी झाली.तिने गुरुदेवांकडे जाउन  दिन वाणीने आपली कर्म कहाणी त्यांनी  सांगितली आणि विनंती केली कि गुरुदेवांनी तिच्या पतीस परान्न घेण्यास सांगावे.त्या विप्र पत्नीची  आर्त प्रार्थना ऐकून गुरुदेवांनी त्या विप्रास बोलावून सांगितले,” अरे विप्रा पत्नीस असंतुष्ट ठेवणे योग्य नाही तू तिला घेउन  भोजनास जा.” गुरुदेवांच्या आदेशानुसार तो ब्राम्हण आपल्या पत्नीसह त्या महाजनांच्या घरी भोजनास गेला.पाने मांडली होती सर्व अन्न पदार्थ वाढले होते.आता भोजन करण्यास सुरवात करणार इतक्यात त्या विप्र पत्नीस आपल्या पानातील अन्न सुकर,श्वान येवून खात असल्याचे दिसले.ते दृश्य पाहून ती तत्काळ पानावरून उठली आणि पतीस सुद्धा उठविले.ते दोघे भोजन न करताच घरी परत आले.सायंकाळी ते गुरुदेवास जाउन  भेटले. त्या विप्र पत्नीने झालेली घटना त्यांना सांगून गुरुदेवांची क्षमा मागितली.तो विप्र म्हणाला हिच्यामुळे माझे व्रत भंगले आणि मी भ्रष्ट झालो. गुरुदेव म्हणाले तू दुखी होऊ नकोस मीच माया दाखवून तिचे मन शुद्ध केले.यानंतर ती परान्नाची आशा कधी धरणार नाही.त्या विप्राने गुरुदेवाना विचारले कोणाकडे अन्न घ्यावे आणि कोठे वर्जावे? गुरुदेव म्हणाले स्वसंबंधित, गुरुग्रही,मित्रांच्या घरी,अन्न ग्रहण करण्यास हरकत नाही.तामस अन्न,कुचारान्न,विधिनिषेध रहित अन्नाचा त्याग करावा.दुष्प्रतीग्रह,दुर्भिक्ष्यान्न, कन्येच्या घरी तिला पुत्र प्राप्ती होईपर्यंत अन्न ग्रहण करू नये.निन्दाकाच्या घरचे अन्न तसेच श्राधान्न,प्रेतांन्न वर्ज्य करावे.श्राधान्नाचे  भक्षण केल्यास सहा प्राणायाम करावे.तीर्थ क्षेत्रात पर्वणी दान हीन दान घेउ  नये.त्या विप्राने नित्य आचरणाचे नियम मला सविस्तर सांगावे अशी प्रार्थना केली.त्यावेळी गुरुदेवांनी पराशर मुनींनी सांगितलेली दिनचर्या सांगितली.ते म्हणाले “ पहाटे ब्रम्ह मुहूर्तावर उठून गुरु,देवादिकांना वंदन करावे. प्रातविधी आदी आटोपून मुख मार्जन करावे.विप्रानी बारा वेळा चुळा भराव्य, आठ,सहा,चार, वेळा इतरांनी भराव्या प्रात स्नान करून शुचिर्भूत व्हावे व्रत करणाऱ्यांनी  आणि सन्यासी यांनी तीन वेळा स्नान करावे.नित्य शीरस्नान करण्याची गरज नसते.स्नानानंतर पूजा पाठ करावा.आचमन, प्राणायाम. मार्जन, मंत्राचमन, अधमार्षण अर्घ्य दान  करावे. सूर्योदयापूर्वी संध्या केल्यास तीन वेळा अर्घ्य द्यावे सूर्योदयानंतर संध्या केल्यास चार वेळा  अर्घ्ये द्यावीत जप माळेने करावा. जप मौन धारण करून समाधानी वृतीने  करावा. जप करताना झोप येउ  देउ  नये.गायत्री मंत्राचा एक सहस्त्र जप करावा.अशक्त, वृद्धांनी आपणास झेपेल तेवढा करावा. ब्राम्हणांना देवपूजा करणे अत्यंत महत्वाचे असते.

||इति श्री प.प.वा.स.वि.स.सारे आन्हिक कर्म निरुपण नाम ३६ वा अध्याय || श्लोक स.४७८ 
---------------------------------------------------------------------------------------      

               अध्याय ३७ वा – आन्हिक कर्म निरुपण २ 

गुरुदेव पुढे सांगू लागले. ते म्हणाले “ घरातील भूमीस नित्य संमार्जन गायीच्या गोमायेने लेपन करावे.घरात गायीच्या शेणाने तयार केलेल्या गोवऱ्यांनी अग्निहोत्र करावे. अथवा पहाटे सकल  साहित्याने विस्तारपूर्वक देवांचे पूजन करावे.दुपारी पंचोपचारांनी आणि सायंकाळी निरांजनाने आठ स्थाने पुजावीत.जे कोणी असे करीत नाहीत त्यांना यमदंड प्राप्त होतो.पांढरी आणि लाल फुले देवाला वाहण्यास उत्तम असतात दुर्गा देवीस दुर्वा, केवडा, वाहावा  गणपतीला तुळस वाहू नये तसेच धोतरा, आणि काळी फुले वर्ज्य आहेत.पूजेसाठी बसल्यानंतर आपल्या डाव्या बाजूस पाण्याचा कलश ठेवावा. फुले दुर्वा आदी दक्षिण दिशेस ठेवावे. शंख , घंटा डावीकडील दक्षिणेस ठेवावे.न्यास करून पूजेस प्रारंभ करावा.काया, वाचा, मनाने, शोडोपचारे पूजा करावी.पंचामृताने देवांना स्नान घालावे.नंतर शुद्धोदकाने स्नान घालावे. “ हे परमेश्वरा मी अज्ञानी आहे तुझे पूजन कसे करावे ते जाणत नाही तुम्हीच माझे रक्षण करावे.” अशी प्रार्थना करून निर्माल्य आपल्या शिरावर ठेउन  नंतर त्याचे विसर्जन करावे.यानंतर भावपूर्ण चित्ताने मंत्रजप करावा.तीर्थ घेउन  ते श्रद्धाभावाने पिऊन टाकावे उरलेले शिरास लावावे. .वैश्यदेव, नैवेद्य देवांना अर्पण करावा.याने अन्न  शुद्धी होते.भोजनास बसण्यापूर्वी अंगणात उभे राहून कोणी अतिथी येतो का याची प्रतिक्षा करावी.अतिथी आल्यास त्याला आपल्या शक्तीनुसार अन्न आणि जल द्यावे नंतर पाय धुवून  चूळ भरून परिवारातील सर्वांसहित भोजन करावे.चित्राहुती घालून आपोशण घ्यावे.पाणी घेवून मन्त्र  म्हणून भोजनास प्रारंभ करावा. जेवण मौनपणे करावे .पानात कांही उच्छिष्ट  टाकू नये. पाणी पिताना आवाज करू नये. दीप मावळल्यानंतर जेवण करू नये.रजस्वला स्त्रियांना पाहू नये.त्यांचे शब्द ऐकू नयेत आणि त्यांना स्पर्श करू नये.अन्नात कीटक पडल्यास त्या अन्नाचे ग्रहण करू नये.केस पडल्यास प्रोक्षून घ्यावे.विप्रानी कांदे,लसूण आदी खाऊ नये, ते खाल्यास तो द्विज द्विजत्वापासून भ्रष्ट  होतो  सात्विक अन्नाच्या सेवनाने ज्ञान वृद्धी आणि तामस अन्नाने अज्ञान वृद्धी होते.पानातील सर्व पदार्थ खावे कांही सुद्धा टाकू नये.मुखशोधनासाठी तर्जनीचा उपयोग करू नये.भोजनानंतर सम्यक तांबूल सेवनास हरकत नाही.भोजनानंतर  पुराण  आदी श्रवण करावेत सायंकाळी संध्या आदि  झाल्यानंतर पूर्वी सांगितल्या प्रमाणे भोजन करावे.दिवसातील यज्ञ आदी कर्मात कांही चूक झाल्यास त्याचे प्रायश्चित्त करावे.रात्री झोपण्यापूर्वी परमेश्वराचे चिंतन करून दिवसभराची सर्व कर्मे त्याच्या चरणी फलासह  अर्पण करावीत. गुरुदेवांनी अशाप्रकारे आचारसंहिता त्या विप्रास सांगितली 

||इति श्री प.प.वा.स.वि.स.सारे.आन्हिक कर्म निरुपण नाम ३७ वा अध्याय || श्लोक स.५०४ .

              अध्याय ३८ वा  अन्नपुर्ती करण 

गुरुदेवांच्या भास्कर नावाच्या शिष्यास आपण भिक्षा करावी अशी  मनापासून इच्छा होती.परंतु धनाच्या अभावामुळे  तीन माणसाना पुरेल एवढाच शिधा त्याने आणला होता.त्या धान्याच्या पिशव्या रात्री उशी प्रमाणे डोक्याखाली घेउन  तो  झोपत असे.तो गुरुदेवांकडे येउन  तीन महिने झाले होते परंतु भिक्षा करण्यास दिवसच मिळत नव्हता. त्याचा शिधा पाहून त्याचे मित्र त्याची मस्करी करून हास्य व्यंग करीत.ही  वार्ता गुरुदेवांना कळली.त्यांनी भास्करला बोलावून दुसऱ्या दिवशी भिक्षा करण्यास सांगितले आणि सर्वाना भोजनाचे आमंत्रण देण्यास सांगितले  सर्व शिष्य भास्करच्या आमंत्रणास हसून म्हणू लागले आमच्या वाट्याला अन्नाचा एक एक कण तरी येईल का? असे शिष्यांचे व्यंगपूर्ण बोलणे भास्करने गुरुदेवाना सांगितले. गुरुदेव म्हणाले तू आणलेल्या शिध्याने पाक सिद्धी करून ठेव. सर्व स्वयपाक झाल्यानंतर गुरुदेवांनी त्यावर  तीर्थ प्रोक्षण केलेआणि त्यावर वस्त्र झाकून ठेवले.नंतर सर्वाना भोजनास बसविले.गावातील समस्त विप्र, लहान,थोर सर्वजनसमुदाय  पोटभर जेवण करून संतुष्ट झाले. गावातील अन्य जातीच्या लोकाना सुद्धा जेवण दिले.जवळ जवळ चार हजार पाने झाली तरी सुद्धा अन्न शिल्लक होते.तेव्हा गुरुदेवांनी तो प्रसाद जलचरांना सुद्धा द्या असे सांगितले.केवळ तीन व्यक्तीना  पुरेल इतक्या   शिधा सामुग्रीने एवढी  माणसे जेवून तृप्त झाली होती हे गुरुदेवांचे कौतुक पाहून सर्वानी त्यांचा उच्च स्वरात जय जयकार केला.
 ||| इति श्री प.प.वा.स.वि.स.सारे.अन्नपुर्ती करण नाम  अध्याय ३८ वा ||श्लोक स.५१३ 


              अध्याय ३९ वा वृद्ध वंध्या प्रसवोनाम 

गाणगापुरात सोमनाथ नावाचा एक ब्राम्हण रहात होता.त्याची पत्नी वयोवृद्ध झाली होती परंतु अपत्य हीन होती.ती अत्यंत भक्तीभावाने गुरुदेवांचे पूजन करीत असे गुरुदेवांनी तिच्या सेवेवर प्रसन्न होऊन विचारले “तुझी काय इच्छा आहे? ती अत्यंत दुखी होऊन म्हणाली “गुरुदेवा माझ्या पोटी संतान नाही माझे जीवन व्यर्थ आहे.मी अश्वथाच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालण्यात संपूर्ण  आयुष्य घालविले परंतु त्या पूजनाचा कांहीच उपयोग झाला नाही.गुरुदेवा या जन्मात नाही तरी पुढील जन्मात मला पुत्र प्राप्ती व्हावी. गुरुदेव म्हणाले पुढील जन्माचे कोण जाणतो? तुला याच जन्मी कन्या,पुत्र होतील तू पिंपळाच्या व्र्क्षाची निंदा करू नकोस. ब्राम्ह्देवानी देवर्षी नारदांना सांगितले होते “आम्ही सर्व देव पिंपळाच्या वृक्षाखाली निवास करतो.” श्रुती स्मृती सुद्धा या वृक्षाचे  वर्णन करता थकत नाहीत.तू या अश्वथाला एक लक्ष प्रदक्षिणा घाल आणि त्याचे उद्यापन कर.विप्राना भोजन देवून ,दान देवून संतुष्ट कर.ती विप्र पत्नी गुरुदेवांना म्हणाली “मी साठ वर्षाची झाले आहे आता मला पुत्र, कन्या  कश्या होतील? तिची  गुरुचरणी नितांत श्रद्धा होती.ती गुरुदेवांच्या सांगण्या प्रमाणे पिंपळाला प्रदक्षिणा घालतच राहिली गुरुकृपेने तिला प्रथम एक कन्या झाली.त्या कन्येस घेउन  ती गुरुदेवांकडे गेली. गुरुदेवांनी त्या बालिकेस आशीर्वाद दिला. ते म्हणाले “हिला यथासमयी उत्तम दिक्षित  वर मिळेल. त्या वृद्ध दाम्पत्यास कांही काळानंतर एक सुंदर पुत्र झाला. कालांतराने तो मोठा होऊन एक विद्वान आणि सर्वगुण संपन्न विप्र  झाला.अशा प्रकारे दयाघन गुरुदेवाची कीर्ती चोहीकडे पसरली. 

 ||इति श्री प.प.वा..स.वि.स.सारे वृद्ध वंध्या प्रसवे नामे ३९ वा अध्याय || श्लोक स.५२६ 
________________________________________________________________



                अध्याय -४० वा विप्र कुष्ट हरणं 

एक वेद संपन्न ब्राम्हण श्वेत कुष्ट रोगाने पिडीत झाला होता त्याने गुरुदेवांकडे येउन  अत्यंत नम्र भावाने प्रार्थना केली “हे दयाघन गुरुदेवा दैवयोगाने मी कुष्ट रोगाने पिडीत झालो आहे.त्यामुळे माझे तोंड सुद्धा कोणी पाहत नाही.या रोगापासून आपण माझे रक्षण करावे.आपण या व्याधी पासून मुक्तता न केल्यास मला आत्महत्ये शिवाय अन्य मार्ग नाही.हे गुरुदेवा आपणच माझे मायबाप आहात. माझ्या पापांचे क्षालन आपणच करू शकता.त्याच वेळी डोक्यावर लाकडाची मोळी घेउन  एक लाकुडतोड्या तेथे आला गुरुदेवांनी त्याच्या मोळीतील एक लाकूड घेण्यास त्या विप्रास सांगितले गुरुदेव पुढे म्हणाले हे लाकूड संगमावरील जमिनीत लाव आणि त्याला नित्यनियमाने पाणी  घाल. ज्या वेळी या लाकडाला पालवी फुटेल त्या वेळी तुझे कुष्ट नष्ट होईल.त्या विप्राने श्रद्धा भावाने ते लाकूड संगमावर नेऊन लावले आणि नित्य नेमाने पाणी घालू लागला.त्या शुष्क लाकडाला पाणी घालत असलेले पाहून कांही लोक त्याची मस्करी करीत परंतु त्या विप्राने आपला नियम सोडला नाही त्याची गुरुदेवांच्या चरणी दृढ श्रद्धा होती.गुरुदेवांच्या एका शिष्याने ही  वार्ता त्यांना सांगितली त्यावेळी गुरुदेवांनी आपल्या सर्व शिष्यांना धनंजय सुशीला या भिल्ल दम्पतीची कथा सांगितली.गुरुदेव म्हणाले “ अरे बाळानो धनंजय आणि सुशीला हे एक सच्छील जोडपे होते.त्यांचा एक नित्य नियम होता कि भगवान शंकराच्या पिंडीला चिता  भस्म अर्पण करावयाचे. एके दिवशी  चिता भस्म मिळाले नाही त्या दिवशी त्या भिल्लाच्या पत्नीने तिला स्वताला जाळून  ते भस्म  शिवास वाहावे अशी आपल्या पतीस विनंती केली.  त्या भाविक भिल्लाने मागचा पुढचा विचार न करता चिता  भस्मासाठी आपल्या भार्येला अग्नी दिला आणि ते भस्म शिवचरणी अर्पण केले.आणि नित्या प्रमाणे पूजा केली.पूजा समाप्तीनंतर त्याने भार्येला प्रसाद घेण्यासाठी  हाक  मारली आणि आश्चर्य असे कि त्याची भार्या प्रसाद घेण्यासाठी समोर आली त्याच वेळी भगवान शंकर तेथे प्रकट झाले आणि त्यांनी त्या उभयतांना शुभाशीर्वाद दिले.असा हा श्रद्धा, भक्तीभावाचा परिणाम असतो. हे कथानक सांगून गुरुदेव संगमावर ज्या ठिकाणी त्या पिडीत विप्राने शुष्क काष्ठ लावले होते तेथे गेले.त्या  काष्ठाला प्रोक्षण करताच त्याला पालवी फुटली आणि त्याच क्षणी तो विप्र कुष्ठमुक्त झाला.त्याची कांती सुवर्णाप्रमाणे  चमकू लागली.त्याचे अष्टभाव जागृत झाले तो गुरुदेवांचे स्तवन करू लागला.ते अशा प्रकारे होते,” हे शनी दांत,इंदुकोटी कांत दिप्त अत्रीनंदना देवांना वंद्य आणि भक्तांचे चित्त रंजन करणाऱ्या,पापाने तापलेल्याचे दुख नाहीसे करणाऱ्या शाश्वत जनार्दना, माया अंधकाराला सूर्यासमान आणि भक्ताच्या अंतकराणाला   आनंद देणाऱ्या परमेश्वरा ,काम,राग, ज्याने नष्ट केले आहेत तो तू संन्याशाचे रूप घेवून  लोकाना इच्छित देतोस.चंद्र,सूर्य, हे ज्याचे नेत्र कमल आहेत अशा श्री दत्तात्रेय आमचे राग,द्वेष,मद आदी दोष दूर करा आणि आम्हास तारा.तुम्हीच भक्तांचे कामधेनु आहात. लाल कमळाच्या पाकळी प्रमाणे ज्याचे नेत्र आहेत अशा हातात दंड कमंडलू धारण करणाऱ्या श्री दत्ता तुम्ही मृतास जीवदान  देणारे आहात.तुम्ही विश्वाचे हेतू असून त्याचे अपराध सोसणारे मायबाप आहात. नित्य आणि शुद्ध भक्तांच्या ह्रदयाला  आनंद देणाऱ्या श्री दत्ता तुम्हास नमस्कार असो.आपण देव असून योगी आहात तुम्हीच दैन्य आणि दुखाच्या अपयाचा नाश करा.तुम्हीच सन्यासी होऊन कृष्णातीरी निवास करता.आदी,मध्य, अंत रहित अशी वस्तू आपणच आहात.तुम्ही आमच्या वासना नष्ट करून आमचे रक्षण  करावे. गुरुदेवांनी त्या विप्राच्या मनातील भाकीभाव जाणून “विद्या सरस्वती” हा मंत्र दिला.
|| इति श्री प.प.वा.स.वि.स.सारे.विप्रा कुष्ट हरणं नाम ४० वा अध्याय || श्लोक स.५४७ 


                      अध्याय ४१ वा  काशीयात्रा  निरुपण 


सिद्ध मुनी नामधारकाला म्हणाले “ तुला मी सायान्देवाबद्दल सांगितले होते ना तोच गुरुदेवांचा शिष्य कांचीपुरमहून गाणगापूर क्षेत्री गुरुदेवांच्या सानिध्यात राहण्यास आला.गुरुदेवांचे दर्शन होताच त्याला अतिशय आनंद झाला.त्याचे अष्टभाव जागृत झाले आणि तो गुरुदेवांची स्तोत्रे गाउ  लागला.त्याने गुरुदेवांबरोबर राहून त्यांची सेवा करण्याचा आपला मनोदय गुरुदेवांना सांगितला.गुरुदेव म्हणाले “ आमची सेवा करणे फार कठीण आहे.कधी आम्ही गाणगापुरी असतो तर कधी वनात,रानात,नदीतीरावर आमचा निवास असतो.तुला आमच्यासाठी खूप कष्ट सहन करावे लागतील.तू असा त्रास का पत्करतोस? सायन्देवाचा   दृढ निश्चय झालेला असल्याने त्यांनी सेवेचे कार्य आनंदाने स्वीकारले.
     एके दिवशी संगमावर असताना गुरुदेवांनी सायन्देवाची परीक्षा पहाण्याचे ठरविले. त्यांनी  सायंकाळ होताच मेघांना भरपूर पाउस पाडण्याची आज्ञा दिली. पहाता पहाता आकाशात काळेकुट्ट ढग जमा झाले आणि विजेच्या गड गडातात धो धो पाऊस सुरु झाला सोसाट्याचा वारा सुटून गुरुदेवांना थंडी वाजू लागली. त्यांनी सायन्देवास मठात जावून भांड्यात अग्नी घेऊन येण्यास सांगितले.सायन्देवाने मठात जाऊन अग्नी घेऊन येत असताना अंधार झाला होता .सायन्देवाच्या मागोमाग पाच फण्याचा एक नाग येत होता. त्याच्या शिरावरील मण्याचा प्रकाश सायन्देवास मार्ग दाखवीत होता परंतु त्याना मात्र भीती वाटत होती.जीव मुठीत धरून धावतच सायंदेव गुरुदेवाजवळ आले आणि त्याच वेळी तो नाग अदृश्य झाला गुरुदेव भांड्यातील अग्नी पाहून म्हणाले अरे सायन्देवा तुझ्या रक्षणासाठी आम्हीच त्या नागाला पाठविले होते.तू निष्कारणच त्याला घाबरलास. आमची सेवा किती कठीण असते ते पाहिलेस ना? सायंदेव म्हणाले “ आपण प्रत्यक्ष ब्रम्हविधान आहां.आपण मला गुरुसेवेचे विधान सांगावे ज्यामुळे माझे मन स्थिर होईल.” त्यावेळी गुरुदेव म्हणाले “पूर्वीच्या काळी एका कुमाराने आपल्या गुरुग्रही राहून आपला विद्याभ्यास पूर्ण केला.त्यावेळी गुरुदक्षणा देण्याच्या उद्देशाने गुरु म्हणाले तू एका अशा घराचे निर्माण कर जे कधी तुटणार नाही.आणि जुने होणार नाही.गुरुमाता म्हणाली मला अशी चोळी आणून दे जी न शिवलेली असावी न  विणलेली परंतु अंगास बरोबर यावी.गुरुपुत्र म्हणाला मला अश्या पादुका आणून दे ज्याना मातीचा स्पर्श न व्हावा त्या पाण्यात बुडू नयेत आणि पायांना अत्यंत सुखदायी असाव्यात त्याच वेळी गुरुकांया आली ती म्हणाली मला असे एक पत्र आणून दे जे अग्नीने काळे होऊ नये. तसेच माझ्यासाठी सुंदर कुंडले घेवून ये. त्या सर्वांची मागणी स्वीकारून तो कुमार त्याच्या गुरुना नमस्कार करून निघाला.त्याच्या मनात काळजी होती कि सर्वांच्या मागण्या कश्या पूर्ण कराव्या. अशा सचिंत अवस्थेत जात असताना त्याला मार्गात अवधुतांचे दर्शन झाले.त्याचा म्लान चेहरा पाहून गुरुदेवांनी त्याला त्याचे कारण विचारले त्यावेळी त्या कुमारने घडलेली हकीकत सांगितली. गुरुदेव म्हणाले काशी क्षेत्रि जाऊन  भगवान विश्वनाथाची आराधना कर तो तुझी  या संकटातून सुटका करेल.तो कुमार म्हणाला “ गुरुदेवा मला काशीचा मार्ग माहीत नाही.त्या वेळी गुरुदेव म्हणाले मी तुला काशी क्षेत्रि घेऊन जातो. तू भाव भक्तीने शिवाची आराधना कर.तो तुझे सारे मनोरथ पूर्ण करील.गुरुदेवांनी त्या कुमारास मनोवेगाने काशीस नेले त्यास मनीकर्णिकेत  स्नान करून विश्वनाथाचे दर्शन घेण्यास सांगून स्वता गुप्त झाले.
  ||इति श्री स.स. वा.स. वि.स. सारे.कशी यात्रा निरुपण नाम ४१ वा अध्याय || श्लोक ५७४ 


       अध्याय ४२ वा काशी यात्रा निरुपण (२)

 सिद्ध मुनी नामधारकाला  पुढे म्हणाले “ त्या कुमाराने गुरुदेवांनी सांगितल्या प्रमाणे प्रथम विश्वेश्वराचे  दर्शन घेतले.नंतर भवानी, हरी, धुंडीश्वर   दंडपाणी, भैरववीर आणि विघ्नेश्वराच्या गुहेचे दर्शन घेतले.अत्यंत श्रद्धाभावाने त्या कुमाराने विश्वनाथाचे स्तवन केले.आणि वाळूचे शिवलिंग तयार करून त्याची पूजा केली. त्या बालकाचा भक्तीभाव पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले.त्यांनी त्या कुमाराचे मनोरथ पूर्ण केले.गुरुदेवांनि ही  कथा सायन्देवास सांगितली तसेच सर्व शिष्यांनी सुद्धा या कथेचा लाभ घेतला. सर्वांना काशी विश्वनाथाचे दर्शन घेतल्याचा आनंद झाला. सायंदेव म्हणाले “गुरुदेव आपण मला येथे बसल्या बसल्या काशी क्षेत्राचे दर्शन घडविलेत. गुरुदेव  सायन्देवास म्हणाले या नंतर तू यवनांची सेवा करू नकोस. आपल्या पत्नी, पुत्रासह येथे येऊन रहा.सायन्देवास अतिशय आनंद झाला. त्यांनी कानडी भाषेत रचलेले  गुरुदेवांचे  स्तोत्र गाऊन दाखविले.गुरुदेवांच्या आदेशांनुसार सायंदेव आपला पुत्र नागनाथ आणि पत्नीसह गाणगापुरास  वास्तव्यासाठी आले आणि गुरुचरणी पत्नी, पुत्रासह नतमस्तक झाले.
||इति श्री प.प.वा.स.वि.स.सारे.काशी यात्रानिरुपण (२) श्लोक स.५८४ 
           
                   अध्याय ४३ वा अनंत व्रत कथन  

सिद्ध मुनींनी नामधारकास पुढील कथाभाग सांगण्यास प्रारंभ केला.ते म्हणाले “ भाद्रपद शुक्ल  चतुर्दशीस गुरुदेवांनी एक लाल रंगाचा दोरा घेऊन त्याला चौदा गाठी मारून तो सायन्देवाच्या हातात बांधला.त्यावेळी आनंदित होऊन सायन्देवाने गुरुदेवांना विचारले “गुरुदेव आपण हे कोणते  व्रत केले आहे?” गुरुदेवांनी अनंत व्रताचे महात्म्य सायन्देवास कथन केले. दुर्योधनाने कपटी  बुद्धीने पांडवांचे राज्य द्युत क्रीडे मध्ये जिंकून घेतले आणि पांडवांना बारा वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञात वास यासाठी पाठविले .पांडव वनवासात असताना  श्री कृष्णाने  पांडवा कडून अनंत व्रत करवून घेतले होते.या व्रताच्या पुण्याने तेरा वर्षानंतर पांडवाना आपले राज्य,वैभव सारे प्राप्त झाले  नंतर  राज्यसुख भोगून अंती ते स्वर्गात गेले.गुरुदेव सायन्देवास पुढे म्हणाले असे हे पुण्यदायक व्रत  तू कर आणि  या व्रताचा  परमात्मा भगवान श्री कृष्ण आपलासा करून घे.
|| इति श्री प.प.वा.स. वि.स. सारे.अनंत व्रत कथा निरुपण नाम ४३ वा अध्याय || श्लोक स.५९७ 
__________________________________________________________________   
              अध्याय ४४ वा श्री पर्वत यात्रा निरुपण 
गाणगापूर ग्रामी एक विणकर गुरुदेवांचा भक्त होता.तो आपला व्यवसाय उत्तम प्रकारे करून गुरुदेवांचे मोठ्या भक्ती भावाने पूजन करीत असे.त्याची भक्ती आणि श्रद्धा भाव पाहून गुरुदेव त्याच्यावर सदैव प्रसन्न असत. एकदा महाशिवरात्री निमित्याने गावातील अनेक भक्तगण श्री शैल्यास जाण्यास निघाले.त्यांनी या विणकरास श्री शैल्यास येण्या बद्दल विचारले त्यावेळी तो म्हणाला “श्री शैल्यावरील मल्लिकार्जुन आणि सर्व देव श्री गुरु देवांच्या चरणी  समावलेले आहेत.त्यांना सोडून त्या पाषण मूर्तीचे दर्शन कशासाठी घ्यावे? त्या लोकाना विणकराचे म्हणणे पटले नाही.ते त्याची निंदा करून निघून गेले.शिवरात्रीचे दिवशी तो विणकर गुरु दर्शनास गेला.त्या वेळी गुरुदेवांनी विचारले “ अरे तंतुका तू श्रीशैल्यास का नाही गेलास? त्याने गुरुदेवांना तेच उत्तर दिले जे त्याने सर्व लोकाना दिले होते.गुरुदेवांनी त्याला आकाश मार्गाने श्रीशैल्यास नेले.त्याने क्षौर करून महादेवाचे दर्शन घेतले  त्यावेळी त्याला महादेवांच्या पिंडीवर प्रत्य्क्ष गुरुदेव बसलेले दिसले. गुरुदेवांनी त्यास तीर्थ स्थानांचे  महात्म्य सांगितले.ते म्हणाले “ पम्पापुरी असलेल्या शिवाच्या दर्शनाने एका श्वानास पुढचा जन्म एका राज घराण्यात मिळाला.तसेच एका घारीने आपल्या तोंडातील मासाचा तुकडा दुसऱ्या पक्षापसुन वाचविण्या साठी श्रीशैल्याच्या मंदिरास प्रदक्षिणा मारल्या होत्या त्या पुण्याईने ती राजाची राणी झाली.असे हे क्षेत्रांचे महात्म्य आहे. गुरुदेवांनी त्याला वायू मार्गाने स्वस्थानी आणले.आठ दहा दिवसांनी सर्व लोक यात्रेहून परत आले.त्यांनी त्या  विणकरास श्रीशैल्यावर पहिले होते.त्यांनी त्यास विचारले “ अरे तू  एकटाच कसा लवकर आलास?” त्यावेळी तो म्हणाला “ मी गुरुदेवाबरोबर आलो.” त्याचे ते सांगणे ऐकून सर्वांना आश्चर्य वाटले आणि त्या सर्वानी  मोठ्या आनंदाने  गुरुदेवांचा उच्च स्वरात जय जयकार केला. 
||इति श्री प.प.वा.स.वि.स.सारे.श्री पर्वत यात्रा वर्णन नाम ४४ वा अध्याय || श्लोक स.६०९ 


                अध्याय ४५ वा ब्राम्हण कुष्ट निवारण 

नंदिनाम नावाचा एक ब्राम्हण कुष्ट रोगाने अत्यंत पिडीत झाला होता.त्याने तुळजापूरच्या तुळजाभवानि कडे धाव घेतली. तिची अत्यंत श्रद्धा भावाने आराधना करून त्या दुर्धर रोगातून सुटका व्हावी या साठी आर्त स्वरात  प्रार्थना केली.देवीने त्या विप्रास गुरुदेवांकडे जाण्यास सांगितले.त्यावेळी तो विप्र म्हणाला  माते तू देवता असून मानवाकडे जाण्यास का सांगत आहेस? असे म्हणून तो मातेसमोर धरणे धरून बसला तेव्हा मातेच्या आदेशानुसार भोपी लोकांनी त्याला मंदिराच्या बाहेर नेले.नंतर तो गुरुदेवांकडे आला.त्याने अत्यंत विनम्र भावाने गुरुदेवांचे चरणी नमस्कार केला. त्यावेळी गुरुदेव म्हणाले “ देवी देवता सोडून तू नरा कडे का आलास?  त्या विप्रास आपल्या शब्दांची आठवण  होऊन तो लज्जेने पाणी पाणी झाला.दयाघन गुरुदेवांनी त्याला संगमावर जाऊन स्नान करून येण्यास सांगितले.त्या प्रमाणे तो सोमनाथ नावाच्या शिष्या बरोबर स्नानासाठी संगमावर गेला.स्नान करून अश्वथाला प्रदक्षिणा घालून मठात आला.त्यावेळी गुरुदेव म्हणाले आता आपल्या शरीराकडे पहा.त्याचे  शरीर दिव्य झाले होते .केवळ मांडीवर थोडासा  दाग राहिला होता.त्या विप्राने गुरुदेवांना विचारले “ एवढे कुष्ट का राहिले?गुरुदेव म्हणाले तुझ्या मनात मनुष्याप्रती शंका आली होती ना? त्याचे फलस्वरूप हा दाग राहिला.आता तू गुरु स्तुतीपर काव्य कर त्याने तो दाग सुद्धा निघून जाईल “तो विप्र म्हणाला “ गुरुदेवा मी अज्ञानी आहे काव्य कसे करू?”त्यावेळी गुरुदेवांनी त्याच्या जिभेवर विभूती टाकली त्यावेळी त्यास ज्ञान प्राप्त झाले आणि त्याने गुरुदेवांच्या स्तुतीपर एका स्तोत्राची रचना केली त्या स्तोत्राचा अर्थ असा होता.” हे गुरुदेवा तूच आत्मरूपाने सर्वामध्ये समावलेला आहेस.तूच शुद्ध नित्य आहेस.तुला न जाणल्यामुळे सारे जीव कर्म पाशाने, अज्ञानाने बद्ध होतात.अहंकाराच्या योगाने त्यांना त्रिविध ताप सहन करावे लागतात. पापामुळे त्यांना विविध  योनी मध्ये  जन्म घ्यावा लागतो.पाप,पुण्य सम-समान झाले म्हणजे मनुष्य जन्म प्राप्त होतो.गर्भामध्ये असताना जीवास महान यातना सहन कराव्या लागतात.त्यावेळी तो जीव ईश्वराची अत्यंत नम्रभावाने त्या नरक योनीतून सोडविण्यासाठी प्रार्थना करतो.परंतु जन्म होताच सारे विसरून जातो आणि भोग भोगून मरून जातो.हे गुरुदेवा आपल्या कृपा प्रसादाशिवाय हा वेडा मोक्ष कसा प्राप्त करू शकेल?हे गुरुदेवा आपण सर्वावर कृपा करणारे दयासिंधु आहात” हे स्तोत्र  पूर्ण होताच त्या विप्राच्या मांडीवरील राहिलेले कुष्ट सुद्धा नष्ट झाले. कालांतराने तो गुरुदेवांचा अत्यंत प्रिय शिष्य झाला त्याने गुरुनिष्ठ होऊन अनेक काव्यांची रचना केली.
||इति श्री प.प.वा.स.वि.स.सारे.ब्राम्हण कुष्ट निवारण नाम ४५ वा अध्याय || श्लोक स.६२३  



                                         अध्याय ४६ वा कविश्वर उपदेश 

श्री गुरुदेवांची गाणगापूर नगरात कीर्ती चोहीकडे पसरली होती.त्यांच्या एका भक्ताने त्यांना मोठ्या आग्रहाने हिप्परगे गावी नेले.तेथे त्याने गुरुदेवांची  शोडोशपचाराने पूजा केली.मोठा समारंभ केला.त्या गावात एक शिवालय कल्लेश्वर नावाने प्रसिद्ध होते.त्या गावात नरहरी नावाचा एक कवी होता.तो प्रतिदिन कल्लेश्वराची पूजा करून स्तुतीपर पाच कवने करून परमेश्वराच्या चरणी समर्पित करीत असे.गावातील लोकानी  नरहरीस आपली कवने गुरुदेवांना अर्पण करण्यास सांगितली.. नरहरी कवी म्हणाला मी माझे कवित्व केवळ कल्लेश्वरासाठीच ठेवले आहे.ते कोणत्या मानवासाठी नाही.असे बोलून नरहरीने कल्लेश्वराचे पूजन केले.आणि तेथेच त्याला निद्रा लागली स्वप्नात त्याला महादेवाच्या पिंडीच्या स्थानी गुरुदेव बसलेले दिसले नरहरीने मानस पूजेत आपली कवने गुरुदेवास अर्पण केली होती.नरहरीस जाग येताच अत्यंत आश्चर्य वाटले. धावतच तो गुरुदेवाकडे गेला  आणि त्याने  गुरुचरणावर लोळण घेतली आणि प्रार्थना केली “हे गुरुदेवा मला क्षमा करा. मी आपणास ओळखू शकलो नाही.आपण साक्षात अवतारी पुरुष आहात. मला आपल्या शिष्यामध्ये स्थान द्या.”तो श्री गुरुदेवा समवेत गाणगापुरी आला आणि तो गुरुदेवांचा एक उत्तम भक्त झाला.हा दुसरा कवी भक्त होता.
|| इति श्री प.प.वा.स.वि.स.सारे.कविश्वर उपदेशो नाम ४६ वा ||श्लोक स.६२८ 


               अध्याय ४७ वा दीपावली उत्सव नाम 

जो वेदाना सुद्धा अगोचर असतो तो भक्ताना मात्र सुगोचार होतो.गुरुदेव गाणगापुरी असताना दीपावलीच्या  सणाच्या दिवशी त्यांच्या सात शिष्यांनी आपल्या घरी सण साजरा करावा अशी अत्यंत आग्रहाची विनंती केली.त्या सर्वांना आनंदित करण्यासाठी श्री गुरुनी सात रूपे घेतली आणि स्वतः मठात सुद्धा राहिले.प्रत्येक शिष्यास आपणा बरोबर आपल्या घरी गुरुदेवांनी दिवाळी साजरी केली असल्याने अत्यंत आनंद झाला होता.कार्तिक पौर्णिमेस सारे  शिष्य दीपाराधना करण्यासाठी गाणगापुरी मठात जमले.ते सातहि शिष्य गुरुदेव  दिवाळीस आमच्या घरी होते असे म्हणू लागले.मठातील शिष्य म्हणू लागले कि गुरुदेव तर दिवाळीत आमच्या बरोबर मठात होते.आम्ही सर्वानी मिळून दिवाळी  मोठ्या  थाटात साजरी केली. सर्व शिष्य गुरुदेवांकडे गेले आणि त्यांना म्हणाले “ गुरुदेवा आपण आमच्या घरी दिवाळीचा सण साजरा केला ना? गुरुदेव म्हणाले “सारे सत्य आहे.” गुरुदेवांची हि अगाध लीला पाहून सर्व शिष्य आनंदित झाले आणि त्यांनी गुरुदेवांचा उच्च स्वरात जय जयकार केला.
||इति श्री प.प.वा.स.वि.स.सारे.दीपावली उत्सव वर्णन  नाम ४७ वा अध्याय ||श्लोक स.६३३  

               अध्याय ४८ वा धान्य प्रवृद्धी वर्णन 
गाणगापूर ग्रामातील  एक शेतकरी, गुरुदेव स्नानासाठी संगमावर जाताना आणि स्नान करून येताना न चुकता साष्टांग नमस्कार करीत असे.त्याची गुरुदेवांच्या चरणी अढळ श्रद्धा होती. तो आपली शेती मनः पूर्वक श्रम करून करीत असे.एके दिवशी गुरुदेवांनी त्याला सांगितले कि मध्यान्हा पर्यंत हे कच्चे पिक कापून  टाक .त्या शेतकऱ्याची गुरुदेवांच्या  चरणी नितांत श्रद्धा होती.त्याने कोणताही विचार न करता पिकाच्या कापणीस सुरवात केली.त्याच्या घरच्या लोकांनी खूप विरोध केला परंतु त्या शेतकऱ्याने कोणाचेच ऐकले नाही.मध्यान्हीचे वेळी गुरुदेव येत असताना त्याना कच्चे पिक कापलेले दिसले. गुरुदेवांनि त्याला विचारले “ अरे कच्चे पिक कापलेस आता काय खाशील ? तो शेतकरी म्हणाला गुरुदेवा आपल्या कृपाप्रसादाने आम्हाला नक्की लाभच होईल “ त्या शेतकऱ्याची श्रद्धा गुरुदेवांच्या चरणी एवढी दृढ होती कि त्या वर्षी मुळ नक्षत्रावर भरपूर  पाऊस पडला आणि त्याने लावलेले पिक उत्तम आले.प्रतीवर्षाच्या पिकापेक्षा कैकपट जास्त उत्पन्न त्या वर्षी आले.त्या शेतकऱ्याने पत्नीसह, गुरुदेवाचे मनोभावाने पूजन  केले.धान्याचा कांही भाग त्याने विप्राना वाटून दिला.गुरुदेवांना अत्यंत संतोष झाला.आणि त्यांनी त्या उभयतांना अनेक शुभ आशीर्वाद दिले.अशा किती लीला गुरुदेवांनी केल्या असतील ते केवळ ब्रम्हदेवच जाणू शकतात. 
|| इति श्री प.प.वा.स.वि.स.सारे.शुद्र धान्य प्रवृधी  वर्णन ४८वा अध्याय || श्लोक स.६३३ 



                    अध्याय ४९ वा गाणगापूर वर्णन 

 श्री सिद्धमुनींनी नामधारकाला गाणगापूर क्षेत्रीच्या अनेक तीर्थांचे महात्म्य वर्णन करून सांगितले जे गुरुदेवांनी आपल्या शिष्यांना सांगितले होते.गुरुदेव गाणगापूर क्षेत्राचे महात्म्य सांगताना म्हणाले “अरे शिष्यानो हे अतिपावन क्षेत्र भीमा आणि अमरजा नदीच्या संगमावर वसलेले आहे.पूर्व काळात देव आणि दानव यांच्या युद्धात जालन्दराने अनेक देवांना मारून टाकले.त्यांना पुनरपी जीवित करण्यासाठी इंद्राने भगवान शंकराकडून अमृत कलश आणला.परंतु तो मार्गातच कलंडला आणि अमृत भूमीवर वाहू लागले.त्याच्याच प्रवाहाने अमरजा नदी निर्माण झाली.तिचा भीमा नदीशी संगम झाला हा संगम प्रयाग क्षेत्राप्रमाणे पापाचे क्षालन करणारा आहे.भूमीवरील हे एक सुंदर तारक तीर्थ क्षेत्र आहे.येथे कल्पद्रुम असा अश्वथ व्रुक्ष आहे.याच्या पुढे अति पावन असे वाराणशी तीर्थ आहे.येथे प्रत्य्क्ष भगवान विश्वनाथ आहेत.त्यांची कथाही मोठी सुरस आहे.ती गुरुदेवांनी आपल्या शिष्याना सांगितली. एक द्विज भगवान शंकराचा परम भक्त होता परंतु लोक त्याला वेडा समजत त्याचे बंधू  एकदा काशी यात्रेस निघाले.त्यांनी या भावाला काशीस चलण्याची विनंती केली तो भाऊ म्हणाला तुम्हाला काशीस जाण्याची गरज नाही मी तुम्हाला  येथेच काशी क्षेत्राचे दर्शन घडवितो  असे म्हणून त्याने भगवान विश्वनाथाचे ध्यान करण्यास प्रारंभ केला.त्यावेळी प्रत्य्क्ष विश्वनाथानी प्रकट होऊन सर्वाना दर्शन दिले.आणि त्यांची इच्छा पूर्ण केली.तेथे मणीकर्णिका समान कुंड निर्माण झाले.भगवान शिवाची मूर्ती तेथे प्रकट झाली गंगाजल हि वाहू लागले.ते भीमा नदीला मिळाले.तेथे स्नान करून सर्वजण  पापविनाशी तीर्थास गेले.तेथे गुरुदेवांची भेट आपल्या भगीनिशी झाली तिला दैव योगाने कुष्ट रोग झाला होता, ती गुरुदेवांना अनन्य भावाने शरण आली.गुरुदेवांनी तिला आठ दिवस पाप विनाशीचे स्नान करण्यास सांगितले.तीन दिवस स्नान करताच तिचे संपूर्ण कुष्ट नष्ट झाले. ती तेथेच माठ बांधून राहिली.गुरुदेवांनी कोटी तीर्थाचा अपार महिमा सांगितला आणि ते तीर्थ दाखविले.गयेप्रमाणे पावन असलेल्या त्या तीर्थात सर्वानी स्नान केले.आणि दान धर्म केला.नंतर गुरुदेवांनी केशवासमोर असलेले चक्रतीर्थ सर्वाना दाखविले.गुरुदेव म्हणाले या तीर्थात स्नान केल्याने पतित सुद्धा ज्ञानी होतो.हे द्वारकेहून सुद्धा प्रशस्थ आहे.मायेने  मोहित झालेला मनुष्य येथे स्नान केल्याने मुक्त होतो.नंतर गुरुदेवांनी पूर्व भागी असलेले कल्लेश्वराचे मंदिर दाखविले.ते गोकर्ण महाबळेश्वरा समान  आहे.अशी हि सर्व तीर्थे भक्तांना दाखवून गुरुदेव आपल्या मठात परत आले.हि तीर्थे कली युगाचे आगमन होताच गुप्त झाली होती.परंतु गुरुदेवांच्या कृपा प्रसादाने त्यांचे दर्शन शिष्यांना आणि भक्तांना झाले.त्यामुळे सर्वजण अत्यंत आनंदात होते. 

||इति श्री प.प.वा.स.वि.स.सारे.गाणगापूर वर्णन नाम ४९ वा अध्याय || श्लोक स.६५४


                   अध्याय ५० वा यवन उद्धरण 
श्रीपाद प्रभुनी आपल्या एका रजकास तू पुढील जन्मी राजा होशील असा वर दिला होता.तसेच  त्या वेळी मी नृसिंह सरस्वती अवतारात असेन असे हि सांगितले होते.त्यांच्या वचना प्रमाणे तो रजक यवन कुलात जन्मास आला आणि कालांतराने विदुरा नगरीचा ( सध्याचे बिदर गाव) राजा झाला.त्याच्या राज्यात प्रजा सुखी होती.त्याने हिंदू प्रजेवर अन्याय केला नाही.जीवनाच्या सायंकाळी त्याच्या मांडीवर मोठा स्फोटक झाला. त्याने अनेक उपाय केले परंतु कशाचाही उपयोग झाला नाही.त्याच्या अतितीव्र वेदनेने राजा अत्यंत दुखीः झाला होता.त्याने दरबारातील एका विप्रास तो स्फोटक निवारण करण्याचा उपाय विचारला.त्यावेळी त्या विप्राने राजास् पाप विनाशी तीर्थास नेले आणि एकांतात सांगितले कि सतपुरुषाच्या आशीर्वादाने तो स्फोटक बारा होईल.या संदर्भात विप्राने पूर्व काळी घडलेली एक घटना सांगितली.उज्जैन नगरीत एक द्विज एका वेश्ये बरोबर रहात असे.दैव योगाने एके दिवशी ऋषभ ऋषी त्याच्या घरी आले.त्या उभयतांनी ऋषींची मनोभावे पूजा केलीआणि अहोरात्र सेवा केली.त्या पुण्याच्या योगाने त्या दोघांचा पुढील जन्म एका राज घराण्यात झाला.यथाकाळी त्यांचा विवाह होऊन  थोड्याच काळात राणीला पुत्र प्राप्तीची लक्षणे दिसू लागली परंतु याच वेळी तिच्या सवतीने तिला अन्नातून विष दिले.त्या विषाच्या प्रभावाने राणीच्या गर्भावर परिणाम झाला.परंतु ती दैव कृपेने वाचली.आणि दहाव्या मासी पुत्राचा जन्म झाला.परंतु त्या दोघांना एक असह्य  अशी व्याधी जडली.तिला कंटाळून राजाने त्या दोघा माता,पुत्रांना अरण्यात नेऊन सोडून दिले.त्या व्याधीने बाळाचा मृत्यू झाला.परंतु पूर्व पुण्याईने तेथे ऋषभ ऋषी आले.त्यांनी त्या बाळस जीवदानच दिले.नाही तर त्या दोघांची अघोरी व्याधी पासून सुटका केली.राजाने आपल्या राणीस आणि पुत्रास पुन्हा राजप्रसादात बोलावून घेतले.तो विप्रा म्हणाला “ राजे साहेब सत पुरुषाच्या दर्शनाने सर्व काही मंगल होते.राजाने विचारले “ सत पुरुष कोठे भेटतील?  त्या विप्राने भीमातीरी वसणाऱ्या श्री नृसिंह सरस्वती स्वामींची माहिती सांगितली. राजा आपल्या लवाजम्यासह  गुरुदेवांना भेटण्यास गेला.त्याला पहातच गुरुदेव म्हणाले “ अरे राजका इतकी वर्षे कोठे होतास? राजाने अत्यंत नम्र भावाने गुरुदेवाना नमस्कार केला.तत्काळ त्यास पूर्व जन्मीची आठवण होऊन त्यास श्रीपाद प्रभूचे रूप आठवलेआणि तो गुरुदेवांचे स्तवन करू लागला.तो राजा म्हणाला “हे गुरुदेवा मी आपणास शरण आलो आहे.माझ्या मांडीवर एक भयानक स्फोटक झाला आहे.आपण माझे या पासून रक्षण करावे.गुरुदेव म्हणाले “ कोठे आहे स्फोटक मला दाखव.”राजाने आपल्या मंदीकडे पाहिले तेथे स्फोटक असल्याची साधी खूण सुद्धा नव्हती.राजाने अतिआनंदाने गुरुदेवाना साष्टांग नमस्कार केला आणि आपले राजवैभव पाहण्यास येण्याची प्रार्थना केली.गुरुदेवांनी ती मान्य केली.गुरुदेवांना पालखीत बसवून मोठ्या थाटात राजधानीस नेले.राजाने गुरुदेवांना सिंहासनावर बसवून त्यांची याथोपचारे पाद्य पूजन केले.तो अविस्मरणीय सोहळा संपल्यानंतर गुरुदेवांच्या चरणी  सेवा करण्याची संधी द्यावी असी अत्यंत कळकळीची विनंती राजाने  केली.गुरुदेव त्या नृपास म्हणाले “ अरे नृपा राज्य कारभार मुलांच्या हाती स्पून तू श्री शैल्यास ये. आपण तेथे भेटू “एवढे बोलून गुरुदेव आपल्या शिष्यासह गाणगापुरी येण्यास निघाले.
 ||इति श्री प.प.वा.स.वि.स.सारे.यवन उद्धरण नाम ५० वा अध्याय || श्लोक स.६९२ 
   
.                         अध्याय  ५१ वा –वर प्रदानं 

यवन राजाने गुरुदेवाची  पाद्यपूजा केल्यानंतर त्यांना आता आपण गुप्त व्हावे असे वाटू लागले. कलीयुगामुळे हीन प्रवृत्तीचे लोक आपल्या कामना पुर्तीसाठी त्रास देतील आणि भविष्य काळात वाईट दिवस येतील,  हे जाणून गुरुदेवांनी गुप्त राहण्याचा निश्चय केला.या निर्णयामुळे दुखी झालेल्या शिष्यांना गुरुदेव म्हणाले “जे सदबुद्धी विवेकपूर्ण शिष्य, भक्त  असतील त्यांना पूर्वीप्रमाणेच आम्ही दर्शन देवू आम्ही गाणगापुरातच राहू हे त्रिवार सत्य आहे. माझ्या पादुकांचे अत्यंत श्रद्धाभावाने पूजन अर्चन केल्याने, माझे नाम घेण्याने तुमचा भवसागर तरुन  जाण्यास सुगम होईल. माझ्या चरित्राचे गायन करण्याने तुमचे मनोरथ पूर्ण होतील.तुम्ही व्यर्थ चिंता करू नका.मी माझ्या निर्गुण पादुका येथे ठेवीत आहे.या माझ्या पादुकांचे पूजन अर्चन आणि माझ्या नामाचे नामस्मरण हे विघ्नहर्त्या चिंतामणी प्रमाणे आहे.प्रतिदिन पहाटे कृष्णा नदीवर माझे अर्चन करा. मी तेथे दररोज स्नानासाठी येत जाईन. जसा तुमचा भक्तीभाव असेल तसा मी तुमच्या जवळ असेन.” असे बोलून श्री गुरुदेव सर्वांचा निरोप घेवून श्रीशैल्यास गेले.भक्तांच्या नेत्रातील आसवे थांबत नव्हती. या परमेश्वराचे सगुण रूपात पुन्हा दर्शन होणार नाही या विचाराने ते अत्यंत दुखी झाले होते.गुरुदेवांच्या असंख्य लीलांचे स्मरण करीत मोठ्या जड अंतकरणाने सारे भक्तगण  आप आपल्या घरी परतले.
श्रीशैल्यास पोहोचल्यावर गुरुदेवांनी फुलांचे आसन करावयास आपल्या शिष्यांना सांगितले.शिष्यांनी ते तयार केल्यावर त्यावर बसून गुरुदेव कृष्णेच्या पैलातीरी गेले.तेथे पोहोचताच त्यांच्या प्रसादाची फुले वाहात आली.ती शिष्यांनी हृदयाशी लावली .नामधारकाला सिद्धमुनी म्हणाले अति रहस्यमय अशा गुरुचरित्राचा हा सार आहे.हे श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज श्री दत्तात्रेयांच्या चरणी समर्पित करीत आहेत.

श्री स्वामी महाराजांचे कृपेने आणि त्यांनी दिलेल्या प्रेरणेने हा सप्तशिती गुरुचरीत्राचा गद्यानुवाद आज पूर्ण झाला. हा प.प. स्वामी महाराजांचे चरणी सहर्ष अर्पण करीत आहे. 

||इति श्री प.प.वासुदेवानंद सरस्वती विरीचीत सप्तशती गुरुचरित्र सारे वर प्रदानं नाम ५१ वा अध्याय || श्लोक संख्या ७०१  
                ||  हरी ओम तत्सत ||

दिनांक १६- ०३-२०१० 
गुडी पाडवा 































                              जगतगुरू श्री दत्तात्रेय

अत्रीमुनी आणि अनुसूया या अति पावन दाम्पत्याचा पुत्र दत्तात्रेय. यांच्या जन्माची कथा मोठी सुरस आहे. अनसूया एक अत्यंत सुशील आणि पतिव्रता स्त्री होती.तिच्या पतीव्रताच्या तेजाने भगवान सूर्यदेव यांनी आपली प्रखरता कमी केली होती.एकदा मांडव्य ऋषींच्या शापाने मरण पावलेला एक कौशिक गोत्री ब्राम्हण अनसूयेने आपल्या सामर्थ्याने पुनरपी जीवित केला होता.तिच्या पतीव्रताची महंती तर त्रीलोक्यात पसरली होती. तिच्या या असामान्य सामर्थ्याने इंद्रास आपले पद जाण्याची भीती वाटू लागली होती.तो सर्व देवतांना घेऊन ब्रम्हा,विष्णू आणि महेश यांच्या कडे गेला आणि अति नम्र भावाने म्हणाला ” हे देवाधिदेव अनुसुयेच्या सामर्थ्याने माझे इंद्रपद जाणार असे वाटते.तरी कृपा करून आपण कांही तरी उपाय करावा.इंद्राची आर्त स्वरातील प्रार्थना ऐकल्यावर त्रीलोकीनाथ म्हणाले “तुम्ही स्वस्थ राहा.आम्ही त्या सतीचे शील हरण करून तिला निस्तेज करून टाकतो “ हे कार्य संपन्न करण्या साठी तिघांनी भिक्शुकांचा वेश धारण केला आणि अनसूयेच्या द्वारी आले.त्या वेळी अत्री मुनी नित्य साधनेसाठी नदीवर गेले  होते.अनसूयेने त्या तीन अतिथींचे यथोचित स्वागत केले आणि तिघांना पाटावर बसविले. ते अतिथी म्हणू लागले “अनसूये आम्हाला खूप भूक लागली आहे त्वरित जेवणाची तयारी कर.”अनसूयेने भोजनाची उत्तम तयारी केली. त्यावेळी ते तिघे म्हणू लागले आमची एक अत्त आहे तू आम्हास विवस्त्र होऊन वाढले पाहिजेस.अनसूयेने अन्त्राज्ञानाने ओळखले कि हे सामान्य अतिथी नाहीत हे तर प्रत्यक्ष ब्रम्हा,विष्णू आणि महेश्वर आहेत. तिने त्यांचे म्हणणे मान्य केले आणि पतीदेवांचे स्मरण करून कमंडलूतील जल त्या तिघाच्यावर शिंपडले आणि काय आश्चर्य ते तिघे अतिथी तीन सुंदर  गोंडस बाले  झाली.सतीने त्या तिघांना पाळण्यात निजविले आणि आनंदात अंगाई गीत गाऊ लागली. त्याच वेळी अत्री मुनी आपले नित्यकर्म  संपवून घरी आले.त्यांना अनसूयेच्या मुखातून अंगाई गीत ऐकून मोठे आश्चर्य वाटले.ते आत येवून पाहतात तो पाळण्यात तीन सुंदर बालके निजलेली.सतीने मुनिना सारा वृतांत सांगितला.त्यांनी मोठ्या  श्रद्धाभावाने  त्या तीन बालकांना नमस्कार केला.त्यावेळी तेथे ब्रम्हा विष्णू आणि महेश्वर प्रकट झाले.त्यांनी त्या परम पावन दाम्पत्यास वर मागण्यास सांगितले. त्यावेळी अनसूया म्हणाली “ही तीनही बालके पुत्र रुपाने आमच्या घरी राहू द्यावीत.” “तथास्तु असा आशीर्वाद देवून त्रिमूर्ती अंतर्धान पावले.  अनसूयेने ब्रम्हाचे नांव चंद्र,विष्णूचे दत्त आणि महेशचे दुर्वास असे ठेवले.कांही काळानंतर चंद्र आणि दुर्वास मातेची आज्ञा घेवून स्वस्थानी निघून गेले.दत्तात्रेय मात्र त्या त्रीमुर्तीचे एकरूप होऊन माता पित्यांची सेवा करीत राहिले.

ब्रह्माचा रजोगुण  सत्वगुण विष्णूचा 
तमोगुण उमरामणा  मूर्ती एकाची अवधारा 
अनसूयेच्या घरी देखा त्रिमुर्ती एक होऊनी  
नाम दत्तात्रेय ऐका   मुल पीठ श्रीगुरूंचे 

श्री दत्तात्रेय हाच श्रीगुरूंचा अवतार आहे.


                                            श्रीपाद श्रीवल्लभ – श्रीदत्तात्रेयांचा प्रथम अवतार 

श्रीपाद श्रीवल्लभ हा श्रीदात्तात्रेयांचा पहिला अवतार.यांच्या जन्माची कथा मोठी रंजक आहे.आंध्र प्रांतातील पिथापुराम या गावी अप्पाल्राज शर्मा नावाचे एक वेदसंपन्न विद्वान ब्राम्हण आपल्या सुशील  आणि पतिव्रता पत्नी—सुमती समवेत आचार संपन्न जीवनाचा आनंद घेत होते. एकदा त्यांच्याकडे पितरांचे  श्राद्ध होते स्वयपाकाची सर्व तयारी झाली होती.ब्राम्हणांच्या जेवणास थोडा वेळ होता.त्याचवेळी त्यांच्या घरासमोर एक अवधूत आले आणि ओम भवती भिक्षांदेही अशी आरोळी मारली. सुमतीने त्या यतीस घरात बोलावून सुग्रास भोजन वाढले.जेवण करून तो यती तृप्त झाला. त्याने सुमातीस हवा असलेला वर मागण्यास सांगितले.त्यावेळी सुमती म्हणाली “यतिवर मला दोन पुत्र आहेत परंतु एक अंध आणि दुसरा पांगला आहे त्यामुळे मी अति दुखी आहे. मला आपणासारख विश्व वंद्य पुत्र व्हावा हीच प्रार्थना आहे. “माते तुझी कामना पूर्ण होईल” असा आशीर्वाद देवून ते यतिवर निघून गेले.ते यती  प्रत्यक्ष भगवान दत्तात्रेयच होते. यथा समयी सुमातीस पुत्र रत्नाची प्राप्ती झाली.बाळाचे नांव श्रीपाद असे ठेवले.श्रीपादांच्या बाललीला पाहून माता,पिता,आजी आणि आजोबा अत्यंत आनंदित होत. चंद्राच्या कलेप्रमाणे बालक वाढत होता.आठवे वर्षी त्याचा व्रतबंध करण्यात आला नंतर त्याने चार वेद  आठरा पुराने यांचा अभ्यास केला.विवाह करण्यास योग्य वय होताच त्या प्रेमळ माता पित्यास श्रीपादाने विवाह करून गृहस्थाश्रमात पदार्पण करावे असे वाटू लागले.त्यांनी श्रीपादला विवाह करण्याचा आग्रह केला परंतु श्रीपाद म्हणाला “पिताश्री विवाह करून संसारात गुरफटून राहण्याची माझी ईछां नाही.जन्मभर अखंड ब्रम्हचर्य पालन करून लोक कल्याण करण्यासाठी माझा जन्म झाला आहे.” पुत्राच्या या वक्तव्याने माता पिता अत्यंत दुखी झाले. “वृद्धआवस्थेत तू आमचा सांभाळ करशील आम्हास विश्वास होता.तुझी दोन भावंडे एक आंधळा तर दुसरा पांगळा आहे त्यांचे पालन कोण करणार? हे भक्त-प्रिया आम्हास सोडून जाऊ नकोस.” असे म्हणून ती असहाय माता रडू लागली.त्यावेळी श्रीपादाने कृपा द्र्ष्टीने त्या दोन्ही बंधूंकडे पाहिले आणि काय आश्चर्य अंध बंधूस द्रीष्टी प्राप्त झाली आणि पांगळा अव्यंग झाला.ते पाहून सर्वाना खूप आनंद झाला यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ उत्तरेच्या यात्रेस निघाले. जाताना आशीर्वाद दिला “आपला संसार सुखाचा होईल कांही उणे पडणार नाही.श्रीपाद श्रीवल्लभांचा संपूर्ण  जीवन व्रन्तांत “श्रीपाद श्रीवल्लभ चरीतामृत या दिव्य ग्रंथात मोठ्या रसाळ भाषेत वर्णन केले आहे.  

                        श्रीनरसिंह सरस्वती—श्रीदात्तात्रेयांचा द्वितीय अवतार 

श्रीपाद श्रीवल्लभ कुरवपूर येथे असताना एकदा ते नदीवर अनुष्ठान करीत बसले होते. तेथे एक ब्राम्हण स्त्री आपल्या मंद बुद्धीच्या पुत्रास घेऊन आत्महत्त्या करण्यास आली होती. तिने श्रीगुरुना नमस्कार करून आपला आत्महत्त्या करण्याचा निश्चय सांगितला श्रीगुरूंनी आत्महत्त्या करण्याचे कारण विचाले.त्यावेळी ती विप्र  स्त्री म्हणाली या मतिमंद मुलास गावातील सारे लोक नावे  ठेवतात याचा पिता एक वेदसंपन्न विद्वान ब्राम्हण होता. हिऱ्याच्या पोटी गारगोटी असा याचा वारंवार अपमान करतात. अशा या अपमानित जीवनाला कंटाळून आम्ही आत्महत्या करीत आहोत. गुरुदेवांना त्या मुलाची दया आली.त्यांनी प्रेमभराने त्या मुलाकडे पहिले आणि आपला वरद हस्त त्याच्या मस्तकावर ठेवला.त्या अमृतमय दृष्टीने तो मुलगा वेदसंपन्न ब्राम्हण युवक झाला. तरी त्या अंबा मातेचे  समाधान झाले नाही. ती म्हणाली “गुरुदेव पुढच्या जन्मी मला आपणा सारखा विश्ववंद्य पुत्र व्हावा” गुरुदेवांनी तथास्तु म्हटले आणि तिला शानिप्रदोषाचे व्रत सांगितले.त्या अंबा मातेने याथाकाली  देह ठेवल्यानंतर तिला दुसरा जन्म वऱ्हाड प्रांतातील कारंजे गावात वाजसनेय  शाखेतील एका वेदसंपन्न ब्राम्हणाचे घरी झाला.तिच्या माता पित्यांनी तिचे नाव अंबा असेच ठेवले होते.याथासामयी तिचा विवाह एका शिवभक्त माधव नावाच्या विद्वान आणि आचारसंपन्न ब्राम्हणाबरोबर  झाला. त्या आचारसंपन्न दाम्पत्यास श्रीपाद प्रभुनी दिलेल्या वरदाना नुसार श्रीदात्तात्रेयानी नरसिंह सरस्वती या रुपात जन्म घेतला.श्रीस्वामिंच्या अवतार कार्याचे वर्णन गुरुचारीत्रातील बारा ते एक्कावन अध्यायातअत्यंत मधुर भाषेत   आले आहे.श्रीगुरुदेवानि आपल्या लीलांनी असंख्य भक्तांचा उद्धार केला.परंतु लोक ज्यावेळी संसारिक वासना पूर्तीसाठी गुरुदेवांकडे येऊ लागले त्या वेळी भूमीवर प्रत्यक्ष न राहता गुप्तरुपाने राहावे या विचाराने ते भगवान माल्लीकार्जुनाच्या दर्शनासाठी श्रीशैलम क्षेत्री जाण्यास निघाले.त्या वेळी जमलेला शिष्य समुदाय विरहाच्या दुखाने शोकसागरात बुडाला.या वेळी श्रीगुरूंनी प्रत्यक्ष चान्द्रमौलीश्वर स्वरुपात सर्वाना दर्शन दिले आणि कृतार्थ केले.त्यावेळी गुरुदेवांनी केलेला उपदेश अत्यंत मौलिक स्वरूपाचा होता.ते म्हणाले “शिष्यानो| मी यापुढे देह रुपात प्रत्यक्ष राहणार नसलो तरी याच गानागापुरात चिरकाल वास करणार आहे.तुम्ही मुळीच दुख करू नका.माझ्या निर्गुण पादुका मठात आहेत गुप्त रुपाने आम्ही अमरजा संगमात स्नान करण्यासाठी नित्य येऊ.अधिकाधिक लोक दर्शनाला येतील त्यामुळे सामान्य भक्तांना उपद्रव होईल म्हणून आम्ही गुप्त रुपाने राहणे बरे.ज्यांची भक्ती दृढ असेल त्यांना आम्ही नक्की दर्शन देवू संगमावरील अश्वथ वृक्ष कल्पवृक्ष समान आहे. जे भाविक लोक पादुका आणि अश्वथाची निस्सीम भक्तीने सेवा करतील त्यांना इष्ट सिद्धी प्राप्त होतील यात कदापी शंका घेऊ नका.तुम्ही सर्वजन सतधर्माने आणि सदचाचाराने रहावे.परमात्मा सर्वाव्य्पी आहे.त्याला विसरू नका. सतत भगवंताचे स्मरण करा.जे लोक माझ्या वचनावर पूर्णपणे विश्वास ठेवून श्रद्धेने भक्तीने वागतील त्यांच्या अंतरंगी मी निरंतर  वास करतो.असे सांगून गुरुदेव पुष्पसनावर बसून काडली वनाकडे निघाले.थोड्या वेळाने नावाडी सांगू लागले कि त्यांनी एका यतीस कदली वनाकडे जाताना पाहिले. नंतर प्रसादाची फुले वाहत आली.याच कदली वनातून तीनशे वर्षानंतर श्री स्वामी समर्थ प्रकटले.  




No comments:

Post a Comment